‘‘मिकू, आता झोपायचं हं..’’
आईनं मिकूला ओरडून सांगितलं. पण मिकीचं आईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तिचा आपला एकटीचाच दंगा सुरू होता. सोफ्यावर चढून उडी मारायची. परत खुर्चीवर चढायचं आणि उडी मारायची. तिला एवढी गंमत वाटत होती. तेवढय़ात आई आली. तिनं मिकूचा हात पकडला,
‘‘शाणी माझी.. झोपायचं ना आता. उद्या आपल्याला मामाच्या गावाला जायचंय ना.’’
‘‘उद्या मामाच्या गावाला जायचं.. हे’’ मिकू ओरडली.
आईबरोबर लग्गेचच झोपायला गेली. पण तिला काही केल्या झोपच येत नव्हती. तिला मामा डोळ्यासमोर दिसायला लागला. मामाच्या मोठ्ठय़ा मोठ्ठय़ा मिशा.. त्याचं खदाखदा हसणं.. तो मिकूला उचलायचा आणि हवेत भिरकावून द्यायचा तेव्हा तर एवढी मज्जा यायची. तो मिकूला आइस्क्रीम खायला घेऊन गेला होता. त्याच्या त्या मोठ्ठय़ाने आवाज करणाऱ्या गाडीवरून पुढे बसवून. तेव्हा तर आधी मिकू घाबरूनच गेली आणि नंतर तिला खूप गम्मत वाटली. मिकूनं दंगा केला आणि आई ओरडायला लागली की मामा हळूच मिकूला उचलायचा आणि बाहेर घेऊन जायचा. खांद्यावर बसवून. तेव्हा पण खूप मज्जा यायची मिकूला. त्यानंच तर मिकूला गाणं शिकवलं होतं..
अस्सावा सुंदर चॉकोलेटचा बंगला..
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला..
पुढच्या वेळी येशील तेव्हा तुला चॉकोलेटच्या बंगल्यात घेऊन जाईन असंही त्यानं मिकूला सांगितलं होतं.
म्हणजे आता मामाबरोबर चॉकोलेटच्या बंगल्यात जायला मिळणार.. मिकूला खूप आनंद झाला.
तिला डोळ्यासमोर चॉकोलेटचा बंगला दिसायला लागला. आणि तिला आत्ता लग्गेच चॉकोलेटच्या बंगल्यात जावंसं वाटायला लागलं.
तेवढय़ात तिला तिकडची आज्जी आठवली. एकदम मऊ मऊ आज्जी. आज्जीनं मिकूला एक गंमत सांगितली होती. डोळे मिटायचे आणि दहा वेळा लाल परी, लाल परी असं म्हणायचं की लग्गेच लाल परी येते आणि आपल्याला पाहिजे ते देते.
मिकूनं लग्गेच डोळे मिटले आणि लाल परी.. लाल परी असं म्हणायला सुरुवात केली.
दहा वेळा लाल परी म्हणून झाल्यावर तिनं डोळे उघडले आणि बघते तर काय.. लाल परी तिच्यासमोर उभी..
लाल परी एकदम गुलाबासारखी गुलाबी होती. तिला बघून मिकूला एकदम हिमगौरी आणि सात बुटके गोष्टीतली हिमगौरी आठवली. लाल परीने लाल लाल झगा घातला होता. त्याच्यावर सोनेरी गोळे होते. तिच्या पायात सिन्ड्रेलासारखे बूट होते. डोक्यावर एक छान मुकुट होता आणि तिला एकदम मस्त पंख होते. मिकूला वाटलं आपल्याला पण पाहिजेत अस्सेच पंख.
लाल परीने हात पुढे केला. तसा मिकूनेही आपला हात पुढे केला. मिकूचा हात हातात घेऊन लाल परी म्हणाली, ‘‘तुला चॉकोलेटचा बंगला बघायचाय ना.. चल माझ्याबरोबर. पण आधी थोडा वेळ माझ्या घरी जाऊ.’’
मिकू काही बोलायच्या आधीच लाल परी मिकूचा हात धरून उडायला पण लागली. कितीतरी वेळ त्या दोघीजणी उडतच होत्या. मिकूला खाली काय काय दिसत होतं. डोंगर, दऱ्या, झाडं, समुद्र.. उडता उडता लाल परी छान छान गाणी म्हणत होती.
मिकूराणी मिकूराणी
तू कित्ती कित्ती शहाणी
हे गाणं तर मिकूला खूप खूप आवडलं. तिनं काहीतरी छान छान केलं की आई, आजी, आजोबा सगळे तिला गुड्ड गर्ल म्हणायचे. आता लाल परीपण तिला मिकूराणी किती शहाणी असंच म्हणत होती. मिकू एकदम हॅप्पी झाली. आणि हॅप्पी झाल्यावर ती घरी जे करायची तेच तिने आत्ता इथेही केलं.
मिकूराणी झाली हॅप्पी
तिनं दिली गोड गोड पप्पी
असं म्हणत तिनं लाल परीला एक गोड पापा दिला. लाल परी एकदम गोड हसली.
किती तरी वेळ त्या दोघी उडतच होत्या. मध्ये मध्ये ढग येत होते. मध्ये मध्ये चिऊताई, कबुतरदादा भेटत होते. सगळेजण लाल परीला खूप आनंदाने भेटत होते. चिऊताई भेटली तशी लाल परीने तिला खाऊ दिला आणि पिल्लांसाठी तो घरी घेऊन जायला सांगितलं, कबुतरदादा भेटला तर त्याला धान्याचे दाणे दिले. चिऊताईने लाल परी भेटली म्हणून आनंदाने गिरक्या घेत नाच केला आणि नंतर लाल परीने दिलेला खाऊ घेऊन ती निघून गेली. कबुतरदादाने लाल परीला घुटुर्रघुचं एक गाणं म्हणून दाखवलं आणि धान्याचे दाणे घेऊन तो निघून गेला. जाताना चिऊताई आणि कबुतरदादा दोघेही मिकूला बाय बाय करायला विसरले नाहीत.
मिकू आणि लाल परी अशा खूप वेळ उडत गेल्यावर मग लाल परीचं घर आलं..
घर कसलं, चॉकोलेटचा बंगलाच होता तो. चॉकोलटच्या पायऱ्या, चॉकोलेटचं दार, चॉकोलेटच्या खिडक्या, चॉकोलेटच्या खुच्र्या, चॉकोलेटचा सोफा, मध्ये मध्ये शो म्हणून टॉफीज लावलेल्या होत्या. लिमलेटच्या गोळ्या लावलेल्या होत्या. पेपरमिंट होतं. च्युइंगम होतं.
‘‘कित्ती मस्त..’’ मिकूनं टुण्कन उडीच मारली.
‘‘लाल परी, कित्ती मज्जा आहे तुझी.. तू रोज रोज यातलं चॉकोलेट खात असशील..मी पण खाऊ.. हव्वं तेवढं’’
‘‘खा की..’’ लाल परी हसत हसत म्हणाली. मिकू मग धावतच सुटली. जिकडे बघावं तिकडे चॉकोलेटच चॉकोलेट. आणि ‘चॉकोलेट खाऊ नकोस, दात किडतील’ किंवा ‘चॉकोलेट खायचं तर नंतर दात घासायचेत बरं का’ हे सांगायला आजूबाजूला आई नव्हती, आज्जीही नव्हती. किंवा दुकानात गेल्यावर दोन चार मोठमोठी चॉकोलेट घेतली की पुढची घ्यायला ‘पैसे संपले बरं का मिकूराणी’ असं म्हणायला इथे आजूबाजूला बाबापण नव्हता.
मिकूनं एका खुर्चीला हात लावला तर त्या खुर्चीचा दांडाच तिच्या हातात आला. दांडा कसला भलं मोठ्ठं चॉकोलेट होतं ते. मिकूनं ते गपागप खाऊन टाकलं. तिथं टेबलावर मिल्क चॉकोलेटच्या रंगाच्या कपबशा होत्या. मिकूनं त्यातला एक कप उचलून मटकावला. तेवढय़ात तिला चॉकोलेटचा रिमोट दिसला. मिकूनं त्याचा एक तुकडा तोंडात टाकला आणि तिला एकदम कड्डू कड्डू लागलं. ते एकदा बाबानं आणलेल्या डार्क चॉकोलेटसारखं कड्डू होतं. मिकून तो तुकडा पटकन तोंडातून काढून टाकला.
मग मिका वळली टॉफीजकडे. कितीतरी रंगाच्या मस्त टॉफीज होत्या तिथे. मॉलमध्ये गेल्यावर तिला सगळ्याच्या सगळ्या घ्यायच्या असायच्या. पण त्यातली कुठलीतरी एकच मिळायची. आता या सगळ्या टॉफीज तिच्याच होत्या. तिनं सगळ्या टॉफीज खाऊन बघितल्या. मग जेम्सच्या, लिमलेटच्या, पेपरमिंटच्या गोळ्या, लॉलीपॉप सगळं खाऊन झालं तिचं. तरी काहीही संपलं नव्हतं की कमी झालं नव्हतं. उलट आणखी नवीन नवीन चॉकोलेटं तिच्या समोर येत होती. मिका प्रत्येक प्रकार हातात घेत होती. खाऊन बघत होती.
इतका मोठा चॉकोलेटचा बंगला.. मिकूनं इतकी चॉकोलेटं खाल्ल्यावरही ते झालं नव्हतं. उलट आणखी नवीन नवीन चॉकोलेटं तिच्या समोर येत होती. मिका प्रत्येक प्रकार हातात घेत होती. खाऊन बघत होती. पण तिला आनंदच होत नव्हता. तिला सारखं काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं. तिला एकदम आठवलं.. तिला मामानं सांगितलं होतं, पुढच्या वेळी येशील तेव्हा मी तुला चॉकोलेटच्या बंगल्यात घेऊन जाईन. आणि आपण मात्र मामाला न घेताच आलो इथं. एकटय़ाच. मामा पाहिजे इथे आपल्याबरोबर.
तिनं लाल परीला विचारलं, ‘आपण जाऊन माझ्या मामाला घेऊन येऊ या का?’
‘नाही गं राणी’ लाल परी म्हणाली, ‘इथे तुला कुण्णाला घेऊन नाही येता येणार. इथे एकटीनेच यायचंस. हव्वी तेवढी चॉकोलेटं खायची. पण एकटीनेच.’
‘आईलापण नाही आणायचं?’
‘नाही गं!’ लाल परी म्हणाली. ‘बघ, मी पण एकटीच आले की नाही इथे?’
‘मग तू का नाही खात चॉकोलेट?’ मिकूने लाल परीला विचारलं.
‘‘अगं मिकू मी नाही खात यातलं चॉकोलेट. ते रोज रोज खाऊन मला की नाही कंटाळा आलाय. आणि बरं का मला की नाही चॉकोलेटपेक्षा माझी आई भरवते ना वरणभाताचा घास, तोच खूप आवडतो. आई म्हणते हा घास काऊचा.. तो मी खाते. ती म्हणते, हा घास चिऊचा..तो मी खाते. मग ती म्हणते, हा घास माऊचा.. तो मी खाते. मग ती सांगते, हा घास भूभूचा तो मी खाते.. आणि सगळ्यात शेवटी ती म्हणते हा घास मिकूचा.. तो घास तर मला खूपच आवडतो..’’
मिकूला पण एकदम आईची आठवण झाली. ती लाल परीला म्हणाली, ‘‘मला पण.. माझी आई वरणभात खाताना लाल परीचा घास भरवते ना, तो खूप खूप आवडतो. मला नक्को रोज रोज चॉकोलेट. मला पण आईच्या हातचा वरणभातच पाहिजे.’’

तुम्हाला पण अशी एखादी परी कधी भेटली आहे? तिच्याबरोबर केलेली गंमतजंमत तुम्हाला आठवते? मग ती लिहून काढा आणि पाठवा आमच्याकडे!