‘मिड रोड गँग’ सिनेमातली माखाम, त्याची मित्रमंडळी आणि माखामची गर्लफ्रेंड नामकांग यांची गोष्ट पाहिल्यापासून प्रांजल एकदम रिचार्ज झाली होती. माखामसारखं किंवा नामकांगसारखं गोडसं कुत्रं आपल्या घरी पण असावं, आपण त्याची माया माया करावी, त्यानं आपल्याला माया माया करीत चाटावं असं तिला फार फार वाटू लागलं होतं.. पण घरी कुत्र्याचा व्याप ओढवून घ्यायला आई, बाबा, आजी तयार नव्हते. सिनेमा पाहिल्यापासून बरेच दिवस प्रांजलची भुणभुण चालू होती, पण थोडय़ा दिवसांनी शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळं, गॅदरिंगमुळं आणि परीक्षेमुळं घरी पाळायला कुत्रं आणण्याचा विषय प्रांजल विसरून गेली.
मे महिन्याची सुट्टी सुरू झाल्यामुळं सुरुवातीचे दोन-तीन दिवस मजेत गेले होते, पण नंतर कंटाळा यायला लागला. आई म्हणाली पण, ‘‘काय गं प्रांजू, ‘सुट्टी कधी लागणार, सुट्टी कधी लागणार?’ म्हणून घोकत होतीस आणि आता दोन दिवसांत कंटाळा आला. कसं होणार गं तुझं? आता तू तिसरीत जाणार.. थोडा वेळ तरी एका गोष्टीवर टिकत जा ना! लग्गेच कंटाळा कसा बाई येतो तुम्हा मुलांना?’’
आईचं बोलणं प्रांजलनं ऐकलं आणि तोंड पडलेल्या स्मायलीसारखा चेहरा केला. आळस देत गादीवर अंग टाकलं. तेवढय़ात आजी तिथं आली, ‘‘प्रांजलबाळा, ऊठ. असं सारखं आळसावून झोपू नये गं. एक वेळ असते झोपायची. चल, बागेत बसू या थोडा वेळ.’’
‘‘मी नाही ज्जा! मला बोअर होतं बागेत. सारखं काय बघायचं तिथं. त्यापेक्षा बाबा आला की मॅकडीला जाऊया. बर्गर खायला.’’ प्रांजलनं गादीवर कोलांटी उडी घेत उत्तर दिलं. बाबा कधी एकदा गावाकडून येतो आणि सगळ्यांना बाहेर घेऊन जातो असं तिला झालं होतं. इतक्यात बाहेर कारचा आवाज आला.. ‘आला वाटतं बाबा!’ म्हणत ती टुणूक्कन उठली आणि पोर्चमध्ये गेली. बाबानं हसत प्रांजूकडं पाहिलं आणि तिला डोळे मिटायला सांगितले. प्रांजलनं मिटले. बाबानं तिच्या हातात काहीतरी ठेवलं. मऊमऊ, गरम, ओलसर, हलणारं! तिनं चटकन डोळे उघडले तर काय! हातात एक इटुकलं कुत्र्याचं पिलू होतं. प्रांजल आनंदानं किंचाळली. आईला, आजीला बहुतेक माहिती होतं, घरात कुत्रं येणार हे. -कारण त्यांना आश्चर्यच वाटलं नव्हतं. प्रांजल आनंदानं नाचायला लागली. त्या पिलाला कुठं ठेवू, कुठं नको असं तिला झालं. तिची कामं एकदम वाढली. पिलाचं नाव काय ठेवायचं? कुणाकुणाला फोन करून पिलाबद्दल सांगायचं? कुणाकुणाला ‘व्हॉटस् अप’वर पिलूचा फोटो पाठवायचा? पिलाला भूक लागली की काय नि कसं भरवायचं? त्याला आंघोळ कधी घालायची? त्याला झोपवायचं कुठं? त्याला खूश करण्यासाठी काय करायचं? -प्रांजलची कामाची यादी मोठी मोठी होत गेली.
अख्खी संध्याकाळ प्रांजल खूप बिझी होती. तिचा कंटाळा पळून गेला. दर अध्र्या तासानं ‘बोअर होतंय’ म्हणायचं ती विसरून गेली. रात्री जेवायची वेळ झाली तरी तिला भान नव्हतं. आईनं शेवटी तिला दामटून जेवायला बसवलं. कुत्र्याला खायला घातल्याशिवाय मी अजिबात जेवणार नाही असं म्हणत प्रांजल बराच वेळ बशीत दूध घेऊन कुत्र्यासमोर बसली, पण ते छोटं पिलू दुधाला तोंड लावायला तयार नव्हतं.
‘‘कारे पिलू? पी ना दूधऽऽऽ बोर्नविटा घालून देऊ का तुला? की स्ट्रॉबेरी फ्लेवर घालूया? तू असा का करतोस रे? मला तू खूप आवडलास. पी.. दूध पी. ताकद कशी येणार त्याशिवाय?’’ प्रांजलचं चालू होतं.
‘‘अगं, आता कुठं पिलू एक महिन्याचं आहे आणि तो मुलगा नाही मुलगी कुत्रा आहे. तू एवढी मोठी होऊनसुद्धा पटपट जेवतेस का, सांग? मग ते कसं लगेच ऐकेल? ठेव त्याच्यापुढं बशी आणि आत जेवायला ये. तू जेवेपर्यंत तेही दूध पिऊन टाकेल. तू त्याची दोस्त नं? तू खा, मग तेपण खाईल.’’ आई-बाबा-आजीनं प्रांजलची कशीबशी समजूत काढली.
प्रांजलला कसं कोण जाणे, पण घरच्यांचं म्हणणं पटलं. नेहमीप्रमाणं टेबलवर बसून अळंटळं न करता, भाताच्या शितांशी न खेळता प्रांजलनं ताटातलं जेवण नीट संपवलं. ‘अगं खा गं, खा गंऽऽ’ अशी नेहमीप्रमाणं तिची मनधरणी करावीच लागली नाही. हात धुऊन, चूळ भरून ती पटकन हॉलमध्ये आली. तोवर पिलानं बशीतलं दूध संपवलं होतं.. दोन ठिकाणी शी पण करून ठेवली होती. थोडा वास सुटला होता. शीची घाण चुकवत, उडय़ा मारत प्रांजल पिलाजवळ गेली. पिलाच्या डोळ्यांत पाणी आलंय की काय असं तिला वाटलं. एवढं छोटंसं बाळ, त्याला आईशिवाय एकटं वाटत असणार. त्याच्यावर भरपूर प्रेम केलं की ते विसरून जाईल आईला, असं प्रांजलला वाटलं. पिलाकडं प्रेमानं पाहता पाहता तिला एकदम नाव सुचलं, ‘‘िडकी!! नाव ठरलं पिलाचं. उद्या आपण माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना बोलवायचं िडकीला बघायला. केक पण आणायचा. केक कापून झाला की सगळ्यांना तिचं नाव सांगायचं. उद्या पार्टी!!’’ प्रांजलनं जाहीर केलं.
प्रांजलच्या उत्साहाकडं पहात आईनं रद्दीचा पेपर आणून पिलानं केलेली घाण उचलली. फिनेल टाकून फरशी स्वच्छ केली. अजून बरीच कामं शिल्लक होती, त्यामुळं ती आत गेली. आजी पण तिच्या सीरिअल्स पाहण्यात गढून गेली. बाबानं मागच्या दाराच्या बंद चौकात कडेला एक खोकं आणून ठेवलं. त्यात एक जाडसर पोतं घातलं. त्यावर जुनी साडी अंथरली आणि मग त्यावर पिलाला ठेवलं. चौकातली लाइट लावून ठेवली. िडकीला सोडून बेडरूममध्ये जायला प्रांजल तयारच नव्हती. िडकी दमलीय, तिला झोपू दे अशी समजूत काढत तिला ओढून आत न्यावं लागलं. िडकीच्या खोक्यात म्हणजे घरात बराच वेळ वाकून पहात, तिला गळ्यापर्यंत पांघरूण घालून, थोपटून मगच प्रांजल तिथून हलली. बेडवर झोपल्यावरही तिला कितीतरी वेळ िडकीचं थरथरणारं गरम अंग हाताला जाणवत होतं.
‘‘प्रांजू, ऊठ बरं .. साडेआठ वाजलेत. आटप पटपट. तुझ्यापेक्षा तुझी िडकी बरी .. किती लवकर उठलीय बघ.’’, आईची हाक ऐकून न ऐकल्यासारखी करायची असं प्रांजलनं ठरवलेलं असायचं, पण आजची सकाळ वेगळी होती. िडकीचं नाव ऐकल्या ऐकल्या प्रांजल अंथरुणातून उठून एकदम उभीच राहिली. सगळा आळस पळून गेला. चार ढांगात ती अंगणात पोचली. िडकी कोपऱ्यात कशाचा तरी वास घेत होती. तिची थरथर कालपेक्षा बरीच कमी झाली होती. पटपट दात घासून, बशीत दूध घेऊन प्रांजल िडकीजवळ आली. िभतीच्या कडेकडेनं हुंगत फिरणारी िडकी दुधाची बशी जमिनीवर ठेवल्यावर सावकाश तिथं आली. जीभ लपलप आत बाहेर करत ती दूध प्यायली. ‘‘चल आता, तुझा दुधाचा कप संपव.’’ असं आईनं म्हटल्यावर प्रांजल लगेच उठली व दूध प्यायला स्वयंपाकघरात गेली. हाक मारल्यावर लगेच ओ देणं, ऐकणं हा प्रांजलमध्ये झालेला मोठाच बदल आहे असं आईबाबांना जाणवलं. त्यांनी िडकीच्या अंगावर थोपटत तिला ‘थँक्स’ म्हटलं. कळल्यासारखं लगेच िडकी पोटातून क्वँक्वँक्वॅं करायला लागली.
संध्याकाळी प्रांजलच्या घरी तनुश्री, वेदा, अथर्व, प्रियल, सुमित, सानिका, प्रज्वल, पिनाक असे सगळे जमले. सगळ्यांनी मिळून ‘िडकी’च्या बारशाचा केक कापला. आजीनं केक, वेफर्स, चिवडा असा खाऊ भरून डिशेस दिल्या. तनू आणि सुमितकडं घरात आधीपासूनच कुत्रं होतं. तनूकडं स्नोई आणि सुमीतकडं सितारा. तनू म्हणाली आमचा स्नोई पामेरिअन आहे, शुभ्र लांब केसांचा कापसाचा गोळा. सुमित म्हणाला आमची सितारा जर्मन शेफर्ड आहे, एकदम उंच नि सुंदर. प्रांजलला तोवर कुत्र्यांचेही असे प्रकार असतात हे माहितीच नव्हतं. तिनं लगेच बाबांना विचारलं. बाबा म्हणाले, ‘‘अगं, आपल्या गावाकडच्या काकांनी शेताच्या बांधावर जन्म झालेल्या पाच कुत्र्यांपैकी एक आपल्याला दिलाय. त्याची जात आहे मुधोळ हाउंड.’’
‘‘जात म्हणजे?’’, प्रांजलचे प्रश्न संपायचेच नाहीत.
‘‘जात म्हणजे प्रकार .. ब्रीड गं. अगं त्या प्रकारावरून त्या कुत्र्याचं खाणंपिणं, स्वभाव, काम असं बदलत जातं.’’
केक पुढय़ात आल्यावर प्रांजल शंका विसरली आणि तिनं केक, चिवडा व वेफर्स िडकीच्या पुढय़ात ठेवले. एक एक चिप्स भरवल्यावर िडकी खायला लागली. बहुतेक तिला खाऊ आवडला होता. त्यामुळं ती तिची बारीकशी वळलेली शेपटी सारखी हलवत होती. सगळंच मित्रमंडळ मग आपापलं खाणं घेऊन िडकीला मधे ठेवून गोल करून बसलं. तितक्यात शेजारचे अप्पा आले. प्रांजलचे लाड करणारे अप्पा. त्यामुळं त्यांनाही िडकीच्या बारशाचं निमंत्रण होतं. अप्पांनी पाहिलं की िडकीला चिवडा, चिप्स व केक भरवणं चालूय. त्यांनी नेहमीप्रमाणं जोरदार हाक मारली, ‘‘प्रांजल-िब्रजॉल, अगं काय वेडय़ासारखं खायला घालतेहेस त्या पिल्लाला? टक्कल पडेल त्याला माझ्यासारखं!’’
‘‘का हो अप्पा. माझ्या िडकीला का पडेल टक्कल? तुम्हालाच पडेल आणखी मोठंच्या मोठं. िडकीचीच पार्टी आहे, मग तिला नको का द्यायला खाऊ आपण खातो तो? मग? आता मी कोकम सरबतपण देणारे तिला,’’ प्रांजलनं उत्तर दिलं.
‘‘अगं बाळे, तेलकट व अतिगोड खाल्लं की केस गळतात कुत्र्यांचे. त्रास होतो त्यांना.. आणि झाला त्रास की हे एवढंसं पिलू तुला सांगणार कसं? सांगितलंन् त्यानं तरी तुला कळणारे का त्याची भाषा? आता तुझ्याकडं ते राहायला आलंय तर त्याला काय चालतं, काय नाही हे समजून घे. तूच आता आई नं त्याची? मग?’’
अप्पा आपल्याला िडकीची आई समजतात, त्यांच्यासारखं मोठं समजतात हे पाहून प्रांजल खूशही झाली नि गंभीरही. तिनं पटकन िडकीसमोरची डिश बाजूला केली आणि िडकीला दूध आणून दिलं. दुधाबरोबर भाकरीचा कुस्करा घालू का असं अप्पांना विचारून तिनं दुधात भाकरीचा चुराही घातला. िडकीनं मुटूमुटू करत तो खाल्ला.
हळूहळू िडकी आमटी-भाकरी, पालेभाजी, रस्साभाजी-पोळी, दूधभात असं सगळं खायला लागली. बारीकशी, हाडकुळी दिसणारी, कडमडत चालणारी िडकी व्यवस्थित चालायला लागली. तिच्यात एकदम ताकद आली. क्वँक्वँक्वँक्वँ असा बारीक आवाज करून भुंकणारी, गुरगुरणारी िडकी जोरदार भुंकायला लागली. तिच्या अंगात ताठरपण यायला लागलं. सगळ्या खोल्यांमधून ती धावायला लागली. ती धावताना वाटायचं की तिला वजनच नाहीये. ‘आणून आणून इतकं हाडकुळं जनावर कशाला आणलं? डोळ्यांना जरा बरं दिसेल अशा प्रकारातलं नाही का आणायचं?’’, आजी कधीतरी म्हणायची, पण तीही िडकीचे लाड करायची. कधी बाबांबरोबर, कधी आजी-आईबरोबर िडकी संध्याकाळी फिरायला जायची. उरलेला वेळ खाणं आणि दिसेल ती वस्तू चावणं असाच तिचा उद्योग असायचा. शेवटी तिला रबरी हाड आणून दिलं तेव्हा आजीचा जीव भांडय़ात पडला. डिंकीला आंघोळ घालण्याचासुद्धा मोठा कार्यक्रम. तिचा साबण वेगळा. अंगावर पाणी ओतायला लागलं की ती उडय़ा उंच मारायला सुरुवात करायची. भुंकायची. तिचे पाय धरून बाबा कशीबशी तिला आंघोळ घालायचे. आई तिची शीशू साफ करण्यातच इतकी दमायची की तिच्या आंघोळीच्या गोंधळात पडायचीच नाही. िडकीला डॉक्टरकडे कधी नेऊन आणलं, कुठलं इंजेक्शन दिलं याची तर प्रांजलनं वहीच घातली.
सुट्टी िडकीच्या सहवासात भरभर संपली. शाळा सुरू झाली. बाबांचं ऑफिस चालूच होतं. आईचीही शाळा सुरू झाली. आजी घरी असायची, पण कधीकधी ती गावाकडं जायची, कधी दसऱ्या काकाकडे. त्यामुळं मागच्या अंगणात िडकीला बांधून ठेवावं लागायचं. आधी दारात समोर गेटजवळ बांधलं तेव्हा ती कामवाल्या बाईलाही आत येऊ देईना. दिवसभर भुंकून भुंकून ती शेजारच्या घरातल्या आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांनाही ओरडायला लावायची. माणसांपेक्षा कुत्र्यांचाच आवाज खूप व्हायला लागला होता. पण प्रांजल खूश होती. शाळा सुटल्यावर कधी एकदा घरी येते आणि िडकीशी खेळते असं तिला व्हायचं. ती शाळेतून आली की िडकी मोठाल्या उडय़ा मारून प्रांजलजवळ धावत जायची. तिची ताकद वाढल्यामुळं प्रांजललाही ती झेपायची नाही. त्यामुळं दोघी भेटल्या की जमिनीवर आडव्याच व्हायच्या. मग आई-बाबा-आजीचा ओरडा सुरू व्हायचा की काय गं प्रांजू, कपडे का मळवतेस? युनिफॉर्मला डाग पडले, निघाले नाहीत की ग्रेड कुणाची कमी होते? एरवी जमिनीवर बसून जेऊ या म्हटलं की नखरे करते आणि िडकीबरोबर मात्र लोळालोळी!
सगळ्यांचे बिझी दिवस सुरू झाल्यामुळं िडकीला रोज फिरवायला कुणाला वेळ नसायचा. ती दिवसभर भुंकत राहायची. कधी कधी रात्री पण.. रडायचीसुद्धा. ती रडली की प्रांजलला भीती वाटायची. आई मात्र दमून गेली होती. घरचं सगळं आवरून शाळेत शिकवायला जायचं आणि घरी आल्यावर नेहमीच्या कामांसोबत िडकीचंही पाहायचं. िडकी नवी आली तेव्हा तिला रोज खायला घालणं, तिची आंघोळ पाहणं, त्यासाठी मदत करणं याचा उत्साह प्रांजलला होता, पण नंतर तो कमी झाला. रोज ठरावीक वेळी बाहेर जाऊन शी-शू करण्याची सवय िडकीला लावण्यासाठी कुणालाच वेळ नव्हता, त्यामुळं तिनं केलेल्या घाणीचा वास घरभर सुटायचा. िडकीचे गळलेले केस घरभर व्हायचे. कधी कधी ती दोन-दोन दिवस खायची पण नाही. अशाच एका रविवारी प्रांजल िडकीला मनवायचा प्रयत्न करत होती, पण िडकीचा मूडच नव्हता. नेहमीप्रमाणं प्रांजल अभ्यास घेऊन िडकीजवळ बसली होती, तिला शिकवत होती.. िडकी मात्र ऐकत नव्हती. फक्त झोपत होती. तितक्यात अप्पा आले. त्यांनी िडकीला पाहिलं. आई त्यांना पाणी घेऊन आली. अप्पा म्हणाले, ‘‘प्रांजलची आई, तुमच्या िडकीचं काहीतरी बिनसलंय. शिकारी कुत्र्याचा प्रकार आहे हा, पण कसा मऊ पडलाय. त्याला भरपूर फिरवायला हवं. मेंदू तल्लख राहण्यासाठी खेळवायला हवं. दमवायला हवं. तसं नसल्यामुळं ती आजारी पडलीय. ‘फॅमिली पेट’ नाहीये हे.’’
‘‘खरंय तुमचं अप्पा. तुम्हीच बघा, खेळायला आणि प्रेम करायला िडकी हवी, पण िडकीनं शी केली तर मात्र कुणी तिची स्वच्छता करायला येत नाही. फिरवायला वेळ काढत नाही.’’
‘‘काय गं प्रांजल-िब्रजॉल, तुझं प्रेम आहे िडकीवर तर तू कधीतरी तिची शी पण काढून बघायला हवीस, हो नं?’’ अप्पा म्हणाले.
प्रांजल गोंधळलीच. म्हणाली, ‘‘अप्पू, मला नाही माहीत कशी काढायची शी! तिच्या नाकात शेंबूड आला तर काढीन, पण शी कशी काढतात? ओढून काढतात? मला नै येत..’’
प्रांजलच्या उत्तरावर आई दमणं विसरून हसायला लागली. अप्पाही हसले गडगडाट करून. प्रांजलला कळलंच नव्हतं ते का हसतात हे. शेवटी अप्पाच म्हणाले, ‘‘चुकलो गं बयो. तुम्हा इंग्रजी शाळेत जाणाऱ्यांना मराठी भाषेतल्या सोप्या गोष्टी कळत नाहीत आणि मग म्हणून आमचं मनोरंजन होतं. टी.व्ही.वर कशाला बघायचे विनोद, नाही का? प्रांजू, शी का काढत नाहीस म्हणजे जमिनीवर िडकीनं केलेली घाण स्वच्छ का करत नाहीस असं विचारलं मी. ती काही कुठून ओढून काढता येत नसते.’’
‘‘मी नाही अप्पा. मला वॅकवॅक होतं. घाण वास येतो. मी हवं तर तिला रोज खायला देईन, पण हे नाही करणार.’’ प्रांजलनं आपलं म्हणणं सांगितलं आणि ती खोलीत निघून गेली.
िडकीचा प्रश्न दिवसेंदिवस अवघड होत होता. शेवटी एक मीटिंग घ्यायची ठरली. आई, बाबा, अप्पा, प्रांजल, आजी आणि िडकी इतकी माणसं मीटिंगला जमली.
अप्पांनी मीटिंगची सुरुवात केली. म्हणाले, ‘‘िडकीची तब्येत बिघडतेय. तिच्यासाठी आपण जमलो आहोत. प्रत्येकानं आपापलं मत सांगा, मी सगळ्यात शेवटी बोलेन.’’
‘‘काय आहे अप्पा, प्रांजलला लळा लागलाय चांगला िडकीचा. घरातल्या सगळ्यांनाच लागलाय म्हणा ना! अहो, घरातलं कुणीही एकमेकांशी मोठय़ानं बोललं तरी काहीतरी चुकतंय असं वाटून ती भुंकायला लागते. मुक्या प्राण्यालाही भावना असतात. परदेशात म्हणे आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना सोबत म्हणून कुत्र्यांना ट्रेिनग दिलेलं असतं. नेत्रहीन माणसं किंवा व्हीलचेअरवर असणाऱ्या माणसांसाठी म्हणे तिकडं कुत्रा मित्राचं काम करतो, पण आपल्याकडं कुठं अशी सोय! िडकीचे दुधाचे दात पडल्यावर मला बाई कळेना काय करायचं ते. मी माझ्या परीनं व्हेटर्नरी डॉक्टरनं दिलेलं जंताचं औषध, पिसवांची पावडर मारते तिच्या अंगावर, पण नेहमी नाही लक्षात राहत. जमेल तसं बघते तिच्याकडं, पण जमत नाहीत हो आता नव्या जबाबदाऱ्या.. आणि पुढं तिला पिल्लंबिल्लं झाली तर कोण बघणार.’’ प्रांजलची आजी म्हणाली.
प्रांजल गप्पपणे ऐकत होती, पण काहीतरी वेगळं चाललंय असं तिला वाटत होतं. सगळे मिळून बोलताहेत म्हणजे िडकीला बोर्डिगमध्ये ठेवणार की काय असं वाटून तिला धस्स झालं. मधे कधीतरी आई बाबांना पेपरमधलं कुत्र्यांच्या बोर्डिगचं काहीतरी वाचून दाखवत होती. मुलांना शिकायला जसं हॉस्टेलवर ठेवतात तसं कुत्र्यांचं पण म्हणे हॉस्टेल असतं. तिकडं त्यांची काळजी घेतात. सुट्टी असेल तेव्हा आपापल्या घरातल्या पेट्सना तिथं भेटायला जायचं, खाऊ द्यायचा, प्रेम करायचं नि परत घरी यायचं. सुट्टीला घरी पण आणायचं नाही. आईबाबांच्या लक्षात राहायला नको म्हणून प्रांजलनं तो पेपर आठवणीनं फाडून लांबच्या कचराकुंडीत फेकून दिला होता. आता आई नेमकं तेच बोलते का हे ती धडधडत्या मनानं ऐकायला लागली.
‘‘आई बरोबर बोलताहेत. पण ते पुढचं. आता स्थिती बघा जरा िडकीची. असलं तर सूत नाहीतर भूत! दोन दिवस अशी मुटकुळं करून पडून राहते आणि पुढचे चार दिवस भुंकून नि उडय़ा मारून हैदोस घालते. बांधून ठेवायचं तरी शक्ती लागते हो. शाळेचं सांभाळून मी सारखी किती स्वच्छता करू सांगा? शाळेत जाण्याआधी व आल्यावर मी आपली कागद, फरशी पुसणं आणि फिनेल घेऊन कामाला लागते. आणल्यापासून तीन वेळा ताप आला तिला. सगळीकडं तिचे केस पडलेले असतात. प्रांजूला तर थोडा खोकल्याचा त्रास आहे, तरी ऐकत नाही. िडकीला अंथरुणात घेऊन झोपायचा हट्ट करते. मी घरी येईतो हे उद्योग पार पाडलेले असतात. सगळ्यांच्या तब्बेती नीट ठेवायच्या तर हौसेनं सांभाळायला घेतलेल्या िडकीची तब्येत नको का राहायला चांगली? माझं मत आहे की आपल्याला ही जबाबदारी आत्ता तरी घेता येत नाहीये.’’
‘जबाबदारी घेता येणार नाही.’ हे वाक्य ऐकून प्रांजलचा धीर सुटत चालला. तिचा चेहरा उतरला. पहिल्यांदा नीट लक्ष देऊन चर्चा ऐकणाऱ्या प्रांजलला त्यांचं बोलणं ऐकूयाच नको असं वाटायला लागलं. ऐकू येत असूनही ती इकडंतिकडं बघत, नखांशी काहीतरी चाळा करत, फ्रॉकचा धागा काढत बसून राहिली. तिची धडधड आणखी वाढली. िडकी आल्यापासून तिला जणू एक मैत्रीणच मिळाली होती. प्रांजल येण्याची वेळ झाली की िडकी तिची वाट पहात बसायची. फेऱ्या मारत राहायची आणि प्रांजल आली रे आली की तिच्यावर उंच उडी मारून तिच्याकडून लाड करून घ्यायची. तिचे खाली कललेले त्रिकोणी वाटणारे कान प्रांजल चुरगळायची. डोक्यापाशी माया करायची. भुऱ्या डोळ्यांकडं पहात पहात तिला खाऊ भरवायची. अभ्यास शिकवायची. आईबाबा घरी नसतानाही िडकीची सोबत असायची. आता मोठे लोक िडकीचं नेमकं काय करताहेत याचा तिला अंदाज करता येईनासा झाला होता.
‘‘अप्पा, तुम्ही म्हणता ना, हे फॅमिली पेट नाहीये. खरंच आहे. मुधोळ हाऊंड म्हणजे शिकारी किंवा शेतावरचं कुत्रं. ताकद भरपूर पण अंग टिकवण्यासाठी त्याला चालवावं लागतं, नाहीतर हाडं ठिसूळ होतात. मी ऑफिसच्या टूरवर गेलो की िडकीची आंघोळ राहाते. आठवडय़ातून किमान एकदा तरी तिला आंघोळ घालायला पाहिजे. ती आजारी पडली की सगळेच आजारी पडणार. नाही तर पाली, चिमण्या यांच्यावर झडप घालून िडकी त्यांना मारते, पण खात नाही. घरात आणून टाकते. तेव्हापासून आम्ही तिला बांधायला लागलो, पण माहितीए, या कुत्र्याला असं बांधून ठेवायचं नसतं. प्रेमळ आहे िडकी, पण प्रांजू अजून लहान आहे तोवर तिला िडकीचं काही करणं जमणार नाही. आमचेही व्याप आहेत. माझं चुकलंच! एखादं जनावर पाळायचं तर ते मुलाप्रमाणं सांभाळावं लागतं, त्याला वेळ द्यावा लागतो. हे सगळं शक्य आहे का हे बघूनच मी िडकीला आणायला हवं होतं. आता निर्णय घ्यायला हवा. चुकलंच माझं.’’
सगळ्यांकडं पहात आता अप्पा बोलायला लागले, ‘‘असं बोलू नका प्रांजलचे बाबा. चुकलं की शिकतो ना आपण! आपल्या प्रेमाचा त्रास कुणाला होत असेल तर थोडा विचार करायला हवा इतकंच मला म्हणायचंय. मला असं वाटतं की आपलं िडकीवर प्रेम असेल तर तिला नीट सांभाळू शकणाऱ्या शेतकऱ्याकडं तिला सोपवायला हवं. ती तिथंच छान वाढेल. मस्त जगेल. प्रांजल बेटा, सांग बरं, िडकीला आपल्याकडं त्रास होतोय ना? ती बोलू शकत नाही, पण ती आजारी पडते, भुंकते, खातपित नाही. यावरूनच समजायचं की ती सांगतेय, मी इथं नाही राहू शकत. आपण ते समजून घ्यायला हवं. बोल बरं..’’
अप्पांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच प्रांजलचे हुंदके सुरू झाले. ‘अगं बाळाऽऽ’ असं म्हणत आई तिच्याशी बोलायला गेली तर तिनं भोकाड पसरलं. िडकी बावरून प्रांजलकडं पाहायला लागली. तिला चाटायला लागली. हळूहळू रडणं कमी करत प्रांजू थांबत थांबत बोलायला लागली, ‘‘तुम्ही सग्गळे वाईट्ट आहे.. माझी आणि िडकीचीच दोस्ती झालीय.. हे तुम्हाला कुणालाच आवडत नाही. कारण.. कारण िडकी.. मला देते तसा तुम्हाला भाव देत नाही. ती फक्त.. माझी आणि माझीच मैत्रीण आहे. तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. तुमचं कुणाचंच नाहीये.. अजिबात! ती माझी बहीण आहे. मी तिला कुठ्ठंच जाऊ देणार नाही. अप्पा, तुम्हीच म्हणाला होतात ना, आता तूच तिची आई? मग, मी तिला कशी पाठवणार? ती अजून लहान आहे. तिची पूर्वीची आई आता तिला कशी सापडणार? तिला पाठवलं तर तिला कोण खायला देणार? जंताच्या गोळ्या कोण देणार? आंघोळ कोण घालणार.. ती माझी आहे. मी तिला देणार नाही. तुम्ही सगळे वाईट्ट आहात. व्हिलन! खूप घाणेरडे! िडकी कशी एकटी राहणार? मी सात वर्षांची असून एकटी रहात नाही आणि ती तर सहा महिन्यांचीच आहे. ती मरून गेली तर? मग माझ्यावर प्रेम कोण करणार?’’
पुढचा आठवडाभर प्रांजल कुणाशी फार बोललीच नाही. मुकाटय़ानं खायचं, अभ्यास करायचा, झोपायचं असं तिचं चाललं होतं. िडकीसुद्धा गप्प होती. िडकीकडं पाहताना प्रांजलला वाटलं की सानिकाच्या आईला बाळ झाल्यावर तिनं बँकेतून रजा घेतली. ती कायम बाळाजवळ असायची. सानिकाला राग यायचा पण तिला बाळ आवडायचंही. बाळाला मांडीवर घेऊन बसलं की ते तिचं बोट मुठीत पकडायचं ते तिला फार आवडायचं. िडकी घरी आल्यावर सुरुवातीला सुट्टी होती, पण नंतर तिच्यासाठी आपण कुठं रजा काढली? तिला ठेवून मी शाळेत गेले, तिला त्या वेळी करमलं असेल का हे लक्षातच आलं नाही. अप्पा म्हणतात तसं तिला फिरायला न नेल्यामुळं तिची हाडं ठिसूळ झाली, मोडली तर मग? कुत्र्याला चालता आलं नाही तर त्याला व्हीलचेअर कशी देणार? ती चालवायला हात हवेत. िडकीला बांधणं चुकीचं आहे असंपण म्हणतात. -िडकीला नीट न सांभाळल्यामुळं ती आजारी झाली आणि आजारी झाल्यामुळं सारखी गप्प राहाते. चिडते. तिला शेतावर सोडलं तर ती चांगली राहील का? खूश होईल का? हे विचार ती कुणाजवळ बोलून दाखवत नव्हती. तिचं मन नाजूक झालं होतं.
रविवारी सगळे पठारावर फिरायला गेले. िडकीलाही बरोबर नेलं. मोकळं पठार दिसल्या दिसल्या िडकी धावायला लागली.. असं वाटत होतं की ती विमानच झालीय. प्रांजलही तिच्यामागं धावायला लागली. प्रांजल आली की िडकी रस्ता बदलायची, प्रांजल मग तिच्या मागं पुन्हा धावायला सुरुवात करायची. शेवटी प्रांजल दमली, पण िडकी दमली नाही. जेवणाचे डबे काढल्यावर िडकीला घातलेली दूधभाकरी व पेडिग्री तिनं पूर्ण संपवली आणि पुन्हा पळायला लागली. धावायला मोकळं मैदान मिळाल्यामुळं िडकी खूप आनंदी वाटत होती. तिची बारीक शेपटी ती सारखी हलवत होती. प्रांजलनं ते पाहिलं आणि िडकीमागं धावत पुन्हा भोकाड पसरलं.. ‘‘िडकी, तुला असंच धावायला आवडतं ना? म्हणून तू खूश आहेस ना? तुझे हातपाय दुखतात नं एका जागी बसल्यामुळं? पण तू गेल्यावर तुला माझी आठवण आली तर? तू मला कसा निरोप देशील? त्यापेक्षा तू सुधाकरकाकाच्या शेतावर जा. तो ओळखीचा आहे. त्याचं शेत खूप लांब नाहीये. मग आपण हवं तेव्हा भेटू..’’
प्रांजलनं िडकीला सुधाकरकाकाच्या शेतावर पाठवताना एक अट घातली, ‘‘मी मोठी झाल्यावर, तिला सांभाळायला नेणार.. तिला कुण्णाला द्यायचं नाही.. आणि जेव्हा तिला पिल्लं होतील तेव्हा मला दाखवल्याशिवाय कुणालाच द्यायची नाहीत. खरंतर पिल्लं कुणाला द्यायचीच नाहीत, कारण मी पिलांची आजी आहे. त्यांना मी सांभाळीन.’’
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
प्रांजलची डिंकी…
‘मिड रोड गँग’ सिनेमातली माखाम, त्याची मित्रमंडळी आणि माखामची गर्लफ्रेंड नामकांग यांची गोष्ट पाहिल्यापासून प्रांजल एकदम रिचार्ज झाली होती.

First published on: 16-05-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids special
