दिवाळी २०१४
कोयना विद्युत प्रकल्पाचा उल्लेख नेहमीच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असा केला जातो. १९६२ साली प्रथम वीजनिर्मिती सुरू झालेला हा प्रकल्प आजही अभियांत्रिकीचा चमत्कारच राहिला आहे. उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा अधिकाधिक वापर करण्याचे भगीरथ प्रयत्न आजही सुरूच आहेत..

दिनांक : १० ऑक्टोबर २०१४
वेळ : दुपारी ३.३० वा.
स्थळ : शशिकांत नामदेव पोवार, उपमुख्य अभियंता, कोयना जलविद्युत केंद्र संकुल यांचे पोफळी येथील ‘महानिर्मिती’चे कार्यालय.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Maharera, housing projects, Maharera news,
राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

कोयना विद्युत प्रकल्प हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा तर आशिया खंडातील सातव्या क्रमांकाचा अतिमहत्त्वाचा प्रकल्प असल्याने येथील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे. हा प्रकल्प म्हणजे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे हृदय आहे. याची जाणीव दहशतवाद्यांनाही आहे. त्यामुळे ‘महानिर्मिती’च्या कडक सुरक्षा व्यवस्थेत बिलकूल कसर ठेवली जात नाही. निमित्त असते ते हीरक महोत्सव साजरा करणारा आणि आजही तब्बल ६० वर्षांनंतर अभियांत्रिकीचा चमत्कार राहिलेला हा प्रकल्प वाचकांसमोर उलगडणे.. त्यासाठीचे भगीरथ प्रयत्न समजून घेणे. सह्य़ाद्रीच्या पोटात सुमारे १५ ते २० मजले खोल अशा ठिकाणी ही विद्युतनिर्मिती गेली ६० वर्षे अव्याहत सुरू आहे. त्यात वाढच झालेली आहे. आणि भविष्यकाळात त्यात वाढच होणार आहे..
विद्युत प्रकल्पाच्या भेटीचे सुरक्षा पासेस येतात आणि गाडी प्रकल्पाच्या बोगद्याच्या दिशेने रवाना होते. प्रवेशद्वारावरच मोबाइल, कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षा चौकीत जमा कराव्या लागतात. समोर एक आणि डाव्या हाताला दुसरा बोगदा नजरेस पडतो. साहाय्यक अभियंता अवधूत ठाकूरदेसाई सोबत असतात.. ते सांगतात.. समोरचा बोगदा हा प्रकल्प एक आणि दोनच्या दिशेने जाणारा आहे तर डावीकडचा चौथ्या प्रकल्पाकडे जो अद्ययावत आहे, आपण तिथेच प्रथम जाणार.. त्यानंतर सुरू होतो तो तब्बल अडीच किलोमीटर्सचा बोगदा. डोंगरच्या पोटातील बोगद्यांमधून जाण्याची सवय असलेल्यांनाही हा बोगदा वेगळा आहे, हे लगेचच जाणवते.. मागे आणि पुढे दोन्हीकडे दिव्यांची एक माळ फक्त नजरेस पडते.. बाकी सारा अंधार. डोंगराच्या पोटात खोल नेणारा.. सुमारे अडीच किलोमीटर्सच्या प्रवासानंतर आपण ‘वेलकम’ असे लिहिलेल्या एका महाद्वाराच्या समोर उभे असतो. बोगद्याच्या शेवटी दरवाजाजवळ गाडी वळविण्याइतकीच जागा असते. बाजूला असलेल्या नकाशाच्या मदतीने आपण नेमके काय पाहणार आहोत, याची कल्पना ठाकूरदेसाई देतात. तिथे नकाशावर कोयनेचे चारही टप्पे एरिअल व्ह्य़ू आणि डोंगराचा काढलेला उभा काप या पद्धतीने चित्रित केलेले असतात. आपण नेमके कुठे आहोत, डोंगराच्या पोटात खोल.. प्रकल्पाच्या महाकाय असण्याची कल्पनाही याच वेळेस नेमकी येते. कृष्णेचा उगम महाबळेश्वरला होतो आणि तिथून सुमारे ६४ किलोमीटर्सचा प्रवास करून ती कोयनेला येते, ठाकूरदेसाई सांगतात. तिथेच आपण तिला अडवून धरण बांधून शिवाजीसागर तलावाची निर्मिती केली आहे. या तलावाच्या एका बाजूला नवजा नावाचे गाव आहे. तिथून वीजनिर्मितीसाठी पाणी घेतले जाते. प्रकल्पाची सुरुवात १९६२ ला प्रथम विजनिर्मितीने झालेली असली तरी प्रत्यक्षात याला इतिहास आहे तो तब्बल १९१० पासूनचा. तेव्हा पहिली पाहणी झाली होती. त्यानंतर टाटांचा खोपोलीचा प्रकल्प १९१५ साली सुरू झाला. पहिल्या महायुद्धामुळे हे काम थांबले. नंतर त्याला सुरुवात झाली १९३०-३१ साली, पण परत एकदा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस प्रकल्पाचे काम रेंगाळले. तोपर्यंत हे विद्युतकेंद्र जमिनीवरचे असणार होते. पण १९५०च्या सुमारास तंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आणि डोंगराच्या पोटात विद्युतनिर्मिती करण्याचे तंत्र समोर आले. १९५३ साली सह्य़ाद्रीच्या पोटात विद्युतनिर्मिती करण्याच्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि त्यासाठी स्वित्झर्लंडच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. अतिशय बारकाईने त्याचे डिझाईन करण्यात आले. कारण संपूर्ण प्रकल्पासाठी त्या वेळेस डोंगराच्या पोटात सात- आठ बोगदे करावे लागणार होते. एक माणसांना आत येण्यासाठी, दुसरा पाणी आत घेण्यासाठी आणि तिसरा वीजनिर्मितीनंतर पाणी बाहेर नेण्यासाठी, चौथा अचानक पाणी साचल्यास ते बाहेर ढकलण्यासाठी. पाचवा व सहावा वायुविजनाची सोय म्हणून आणि सातवा वीजवाहक तारा बाहेर नेण्यासाठी. दगडामध्ये केलेल्या कामात चूक झाली तर नंतर बदल करता येत नाही. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊ न त्याचे डिझाइन करण्यात आले. यासाठी सह्य़ाद्रीच्या नैसर्गिक रचनेचा वापर करण्यात आला. कोयनेचे पात्र समुद्रसपाटीपासून ५७९ मीटर्स उंचीवर आहे. तर विद्युतनिर्मिती करणारे पोफळी हे ठिकाण ५०० फूट खाली. त्यामुळे या उताराचा फायदा घेऊन डोंगरातून बोगदा करत सुमारे ४५ अंशांच्या कोनात पाणी खाली विद्युतनिर्मिती केंद्रात आणण्यात आले. या बोगद्याचा आकार महाकाय आहे. एखादा ट्रक तिथे उभा असले तर तो अगदीच खेळण्यातील वाटावा, असेच चित्र नजरेस पडते. हे पाणी प्रचंड वेगात खाली येते. त्याच वेगाचा वापर करून प्रत्येकी १४.५ ते २० टन वजनाची टर्बाइन्स फिरवली जातात आणि या टर्बाइन्सना मिळालेल्या वेगातूनच अखेरीस वीज निर्मिती होते. या यंत्रनेचे एकूण वजन २०० टनांच्या वर जाते. एव्हढय़ा वजनाची टर्बाइन्स त्याच्यावर कोसळलेल्या पाण्यामुळे एका सेकंदाला ३०० हून अधिक फेरे एवढय़ा वेगात फिरतात. यावरून पाण्याच्या वेगाची कल्पना येईल.. विद्युतनिर्मितीनंतर टेलरेज टनेलच्या मार्फत हे पाणी पुन्हा बाहेर नेले जाते. मध्यंतरी विजेची गरज वाढल्यानंतर प्रकल्प एक- दोन व चारमधून बाहेर आणलेले पाणी डोंगराच्या पोटातील बोगद्यातून कोळकेवाडी येथे एकत्र करण्यात आले आणि तिथे एका जलाशयाची निर्मिती करून त्या जलाशयातील पाण्यावर विद्युतनिर्मिती करणारा प्रकल्पाचा तिसरा टप्पा विकसित करण्यात आला. या टप्प्यातील वापरानंतर मात्र हे पाणी चिपळूणच्या वशिष्ठी नदीमध्ये सोडून देण्यात येते. या चारही प्रकल्पांमध्ये मिळून अनुक्रमे ६००, ३२०, १००० आणि ३६ मेगावॉट अशी एकूण १९५६ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येते.. ठाकूरदेसाई बोलतच होते. याच नकाशावर दोन बोगदे वरती उंच आकाशाच्या दिशेने येत असल्यासारखे दिसत होते. हे बोगदे कोणते? त्यावर ते म्हणाले, या सर्जवेल्स आहेत. म्हणजे उल्लोळक विहिरी. विजनिर्मितीकडे जाणारे पाणी अचानक अडले तर ते तेवढय़ाच वेगात मागे फिरेल आणि वाटेत येणाऱ्या सर्वच गोष्टींचा विनाश करेल. त्या वेळेस होऊ शकणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी या विहिरी करण्यात आल्या आहेत. हे पाणी मागे फिरून या विहिरींमधून बाहेर येऊ शकते. आजूबाजूला काही किलोमीटर्सचा परिसर निर्मनुष्य असल्याने कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. प्रकल्पाचा आवाका, त्याची डोंगराच्या पोटातील खोल उभारणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सारे काही थक्क करणारेच होते.. आता प्रतीक्षा होती ती त्या महाद्वारातून आत प्रवेश करून हे सारे पाहण्याची!
महाद्वाराला असलेल्या एका छोटेखानी दरवाजातून आपण प्रवेश करतो, तेव्हा जमिनीच्या वर दोन्ही बाजूंना दोन अशी चार गोलाकार यंत्रांची लहानशी टोके बाहेर आलेली दिसतात. हाच वीजनिर्मिती करणाऱ्या टर्बाइनचा वरचा भाग आहे, म्हणजे वीजनिर्मिती अजून खोलवर सुरू आहे तर, त्यावर ठाकूरदेसाई म्हणाले.. अर्थातच. इथेही साधारण १० ते १५ मजले खोल एवढी रचना करण्यात आली आहे.
या निर्मितीमधला अवाक् करणारा भाग म्हणजे हे सारे निर्माण करण्यात आले ते ६०च्या दशकात ज्या वेळेस तंत्रज्ञान आजच्या इतके प्रगत नव्हते. आज जीपीएस आणि जीआयएससारख्या यंत्रणांच्या माध्यमातून सारे काही अचूक करता येते. पृथ्वीच्या वर आणि पोटातही! त्यातही महत्त्वाचा भाग म्हणजे हा प्रकल्प साकारणारे इंजिनीअर्स हे भारतीयच होते. त्यांच्यावर देखरेख करत होते ते स्वीडिश तंत्रज्ञ आणि अभियंता. हा प्रकल्प पाहण्यासाठी आजही देशविदेशातील तज्ज्ञ आवर्जून येतात. त्याचे महत्त्व त्यांना पक्के समजले आहे पण महाराष्ट्रात मात्र त्याचे महत्त्व म्हणावे तितके लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. कारण पूर्वीचे एमएसईबी हे नावच आजही लोकांच्या मनात आहे. विजेच्या संदर्भात काही झाले की, केवळ एमएसईबीच्या नावे खडे फोडण्याचे कामच आपण करत असतो. पण वीजनिर्मितीसाठी घेतलेले भगीरथ प्रयत्न कधीच लोकांसमोर येत नाहीत.
या प्रकल्पांमधून फिरताना एक एक करत अनेक गोष्टी आपल्यासमोर येत असतात. कधी सलग ६० वर्षे कार्यरत असलेले टर्बाइन्स आपण पाहतो तर कधी तेवढीच वर्षे कार्यरत असलेली बटन्स आणि इतर यंत्रणा. पाहताक्षणी ही यंत्रणा खूप जुनी असल्याचे लक्षात येते मग आपण प्रश्न विचारतो त्या वेळेस कनिष्ठ अभियंता संतोष पुरोहित सांगतात, यापैकी अनेकांचे स्पेअर पार्टस् बंदच झाले आहेत. पण तरीही यंत्रणा आमच्या कर्मचाऱ्यांनीच सुरू ठेवल्या आहेत. कधी त्यावर मात करणारी क्लृप्ती शोधली आहे तर कधी चक्क त्याला सुयोग्य पद्धतीने बसतील, असे स्पेअर पार्टस् स्वतच इथे तयार केले आहेत.
..एरवी या भूगर्भातील विद्युतनिर्मिती केंद्राला भेट देणारी बाहेरची माणसे विरळाच. त्यामुळे बाहेरून आलेल्यांचे कौतुक येथील सर्वानाच असते. आपल्यालाही बोलायचे असते. असंख्य प्रश्न मनात असतात. भूगर्भात खोलवर असे काम करताना भीती नाही का वाटत इथपासून ते आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास काय याचा विचार कसा करता इथपर्यंत. त्यात काही साधे प्रश्नही असतात कार्यालयात काम करताना दोन- तीन तासांनी चहा प्यावासा वाटतो मग काय करता? कारण इथे सुरक्षिततेमुळे कॅन्टीनची सोय नाही. मग कर्मचारी दिलखुलासपणे बोलतात. भीतीचा तर लवलेशही त्यांच्या बोलण्यात नसतो. सुरक्षिततेची खात्री त्यांच्या मनात आहे. तेच उलट आपल्याला प्रश्न करतात की, तुम्हीच फिरा आणि सांगा कुठे भीती वाटते का मनात? फक्त त्यांच्या मनात एकच खंत डोकावत असते ती म्हणजे शासन गुणवंत पुरस्कार देताना सर्वानाच एकाच पातळीवर आणून विचार करते. खरेतर अशा प्रकारे वेगळ्या वातावरणात काम करणाऱ्यांचा विचार थोडा वेगळा व्हायला हवा!
मध्येच टर्बाइनजवळ थांबून संतोष पुरोहित आपल्याला आणखी एक अवाक् करणारी माहिती देतात. खरे तर ते त्यांच्या पद्धतीने कोयनेच्या या चौथ्या टप्प्याचे महत्त्व देशासाठी आणि राज्यासाठी काय आहे ते सांगत असतात.. ते म्हणतात, हे देशातील एकमेव विद्युतनिर्मिती केंद्र आहे की, ग्रिड पूर्णपणे बंद पडले तर आदेश येताच ९० व्या सेकंदाला वीजनिर्मितीला सुरुवात होते. हे सुरुवात वेगवान असलेले देशातील पहिल्या क्रमांकाचे केंद्र आहे.
या चौथ्या टप्प्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ संतोष पुरोहित यांनी सांगितले, या टप्प्यात पाणी घेण्यासाठी बोगदा शिवाजी सागर जलाशयाच्या खालच्या बाजूस असलेल्या कातळापर्यंत आणण्यात आला. त्यानंतर तिथे असलेल्या कातळामध्ये स्फोटके बसवून लेक टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला. म्हणजेच स्फोटकांनी कातळ उडवून जलाशयाला एक छिद्र पाडण्यात आले आणि पाणी बरोबर खाली असलेल्या बोगद्यातून विद्युत केंद्राच्या दिशेने वाहते झाले. १३ मार्च १९९९ साली हा डबल लेक टॅिपगचा प्रयोग प्रथम करण्यात आला तेव्हा अशा प्रकारे जलाशयाला छिद्र पाडण्याचा आशिया खंडातील तो पहिलाच प्रयोग होता.. यानंतर आणखी एकदा लेक टॅिपगचा प्रयोग करण्यात आला तोही याच प्रकल्पासाठी २५ एप्रिल २०१२ रोजी. त्याला स्टेज फोर बी असे नाव देण्यात आले. पूर्वी लेक टॅपिंग केलेल्या ठिकाणी असलेली पाण्याची पातळी खाली गेली तर काय, असा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळेस विद्युतनिर्मिती बंदच करावी लागेल. तशी वेळ येऊ नये म्हणून नवजाच्या थोडेसे पुढच्या बाजूस पाण्याची पातळी खाली असलेल्या ठिकाणी आणखी एक लेक टॅिपग करायचे आणि तो बोगदा पहिल्या बोगद्याला आणून जोडण्याचा निर्णय झाला व लेप टॅिपग करण्यात आले.
हा चौथा टप्पा अनेक अर्थाने अद्ययावत आहे. कारण इथेच सर्वप्रथम जीआयएस म्हणजेच गॅस इन्सुलेटेड स्विचयार्डचा प्रयोग डोंगराच्या खोलवर पोटात करण्यात आला. विद्युतनिर्मिती केंद्रांच्या बाहेर आपल्याला मोठे स्विचयार्ड नेहमीच नजरेस पडते. तिथे बाहेर धोक्याची सूचना असलेले फलक लावलेले असतात. साधारणपणे सात ते आठ एकरांवर हे स्विचयार्ड पसरलेले असते. कारण तिथे विद्युतवाहक तारांमध्ये सुमारे १८ मीटर्सचे अंतर राखलेले असते, अन्यथा वीजप्रवाह एकत्र येऊन व्यवस्थाच कोलमडण्याचा धोका असतो. यासाठी खूप मोठी जागा लागते. पण डोंगराच्या पोटातील चौथ्या टप्प्यामधील हे जीआयएस अत्याधुनिक असून त्यासाठी केवळ अर्धा एकर एवढीच जागा लागली आहे. हा त्या वेळेस केलेला अनोखा प्रयोग होता. त्यासाठी वीजवाहक तारा संपर्कात येऊ नयेत म्हणून विशिष्ट गॅसचा वापर इन्सुलेटर किंवा रोधक म्हणून करण्यात आला आहे. निर्मिती आणि स्विचयार्ड दोन्ही डोंगराच्या पोटात खोल.. असा हा अनोखा यशस्वी प्रयोग आहे! खरे तर हे सारे पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की, मग हे सारे राखायचे आणि चालवायचे तर माणसेही तेवढीच लागत असणार? त्यावर पुरोहित आणि ठाकूरदेसाई सांगतात की, अवघे १२६ कर्मचारीच या चौथ्या टप्प्याचे काम पूर्णपणे पाहतात. यापैकी कोणत्याही टप्प्यात तुम्ही आत शिरलात की, बाहेर कोणता प्रहर सुरू आहे, याचे भान राहत नाही. केवळ हातावरचे घडय़ाळच काय ते आपल्याला प्रहराची कल्पना देते. अन्यथा इतर ऑफिसेसमध्ये बाहेरचा प्रकाश कमी झाला आणि दिवे लागले की, वेळेची कल्पना येते. इथे निर्मितीच विजेची होते आणि २४ तास उजेडही वीजच देते!
अडीच किलोमीटर्सचा प्रवास करून पुन्हा आम्ही विद्युत केंद्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या दिशेने रवाना झालो तेव्हा साधारणपणे रात्रीचे आठ वाजले होते.. बोगद्याबाहेर पडल्यानंतरच्या किर्र काळोख आणि रातकिडय़ांच्या आवाजामुळे त्याची जाणीव झाली. या प्रकल्पाकडे जाणारा टप्पा हा ८०० मीटर्सचा आहे. इथे प्रवेश केल्यानंतर आजूबाजूच्या भिंतींवर कोयना प्रकल्पाचे काम सुरू असताना तत्कालीन पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांनी दिलेल्या भेटींची कृष्णधवल छायाचित्रे पाहायला मिळतात. या प्रकल्पाविषयी तेव्हा सर्वानाच देशभरात आकर्षण होते, कारण स्वतंत्र भारतातील हा पहिलाच विद्युतनिर्मिती प्रकल्प होता!
टर्बाइनच्या दिशेने जाणाऱ्या पुरुषभर उंचीपेक्षाही अधिक मोठय़ा अजस्र पाइप्सच्या बाजूला आपण उभे असतो, त्या वेळेस ठाकूरदेसाई कल्पना देतात की, आपण व्हॉल्व हाऊसमध्ये आहोत. मग तेच म्हणतात, पाण्याची गळती अचानक झाली तर, असा प्रश्न तुम्ही मगाशी विचारलात, त्याचे उत्तर देतो. त्यासाठी थोडे खाली वाकून पाहावे लागेल. जिथे उभे आहात तिथेच थोडे खाली वाकून पाहा.. पाहिले तर तिथे एक मोठ्ठय़ा आकाराचा अजस्र बोगदा होता.. पाणी विद्युतनिर्मिती केंद्रात येऊ नये म्हणून केलेली ही सोय आहे.. समोरच टर्बाइनचा वरचा भाग दिसणारा एक विभाग दिसतो, तिथे टर्बाइनचे एक अजस्र पाते ठेवलेले दिसते.. ‘या पात्याचे वजनच साडेचौदा टन आहे. हे पेल्टनव्हिल प्रकारातील आहे, तर नवीन फ्रान्सिस टर्बाइनच्या पात्यांचे वजन २० टन आहे. यंत्रणा पूर्ण हलवायची तर तिचे वजन २०० टनांच्या आसपास असते.’ मग हे उचलतात कसे? त्यावर ठाकूरदेसाई वरच्या दिशेने बोट दाखवतात, तिथे एकाच वेळेस दीडशे ते दोनशे टन उचलण्याची क्षमता असलेल्या दोन अजस्र क्रेन्स पाहायला मिळतात. हे सारे डोंगराच्या पोटात खोलवर आणले कसे? त्यावर ते म्हणतात, याचे डिझाईन करणाऱ्या मंडळींचे गणित, नियोजन आणि विज्ञान पक्के होते म्हणून तर आता बोगदा तर खणला; पण यंत्रणा आत कशी नेणार, असे प्रश्न त्या वेळेस पडले नाहीत!
इथेही वीजनिर्मिती बंद पडली तर.. मग ते आपल्याला एका छोटेखानी यंत्राच्या दिशेने नेतात, त्यावर लिहिलेले असते ‘ब्लॅक स्टार्ट युनिट’. हे छोटेखानी यंत्र विद्युत जनित्रांना सुरुवात करण्यासाठी लागणारी वीजनिर्मिती करून ती पुरविण्याचे काम करते.. प्रश्न आणि शंका वाढताना पाहून ठाकूरदेसाई म्हणाले, काळजी करू नका, इथे सुरक्षेची काळजी पुरेपूर घेण्यात आली आहे. म्हणून तर डोंगराच्या खोल पोटातही लोक निर्धोक आणि बिनधास्त काम करताहेत! मग एक छोटेखानी बोगदा ज्याच्या फक्त वर जाणाऱ्या पायऱ्याच दिसत होत्या आणि सोबत वीजवाहक तारांचे जाळे.. फार नाही साडेआठशे पायऱ्या असतील.. या उत्तराने पुन्हा तोंडाचा आ वासला होता!
त्यानंतर थेट गेलो ते नियंत्रण कक्षात. तिथे गेल्यावर लक्षात आले की, विद्युतनिर्मिती किती करायची हे इथे ठरत नाही तर ते ठरते कळव्याच्या लोड डिस्पॅच सेंटरमध्ये. त्यांच्याशी राज्यातील सर्व केंद्रे हॉटलाइनने जोडलेली आहेत. राज्यातील विजेची मागणी लक्षात घेऊन ते आदेश कळव्याहून येतात त्यानुसार वीजनिर्मिती केली जाते. ‘जलविद्युतचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ इथे लक्षात घेतले पाहिजे,’ पुरोहित सांगतात.. वाढलेली मागणी पहिल्या दहा मिनिटांत पूर्ण करण्याची क्षमता फक्त जलविद्युतनिर्मिती केंद्रात आहे. म्हणून कोयनेचे महत्त्व आज साठ वर्षांनंतरही कायम आहे. कारण आपली मदार कोयनेवरच असते. म्हणून तर तिला राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणतो आपण!
‘पण फोन यंत्रणाच नादुरुस्त झाली तर..’ पत्रकार म्हणून मनात येणाऱ्या शंकांना सुरुवात झाली. त्यावर ठाकूरदेसाई तयारच होते. त्यांनी सांगितलेली माहिती पुन्हा अवाक् करणारी होती. वीजवाहक तारांमधून सांकेतिक पद्धतीने संदेश पाठविण्याची पद्धती त्यांनी विकसित केली आहे. त्यामुळे फोन यंत्रणा बंद पडली तरीही संदेश इच्छितस्थळी वेळेतच पोहोचतो!
रात्री ११ वाजता या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या बोगद्यातून बाहेर आलो. तेव्हा चर्चा झाली ती कोयना अभयारण्यातील वन्यप्राण्यांवर. बिबळ्या, तरस, कोल्हा आदी प्राणी अधूनमधून दर्शन देत असतात त्याची. आता हा परिसर व्याघ्र प्रकल्पाचा म्हणून संरक्षित जाहीर झाला आहे. साप तर नेहमीचेच आहेत, इथले सुरक्षा कर्मचारी सांगतात.
दुसरा दिवस सुरू झाला तो सकाळी ८.३० वाजता. कोयनेचा तिसरा टप्पा असलेल्या कोळकेवाडीहून नंतर प्रत्यक्ष धरणावर जायचे होते. कोळकेवाडीहून धरणाच्या दिशेने जाणारा मार्ग हा तसा शॉर्टकट आहे, पण तो फक्त शासकीय वाहनांसाठीच असून त्यासाठीही विशेष परवाना लागतो. सर्व प्रक्रिया आधीच पूर्ण झालेल्या होत्या. वाटेत एके ठिकाणी थांबवून ठाकूरदेसाईंनी पुन्हा माहिती दिली ते म्हणतात.. इथेही कुंभार्ली घाट आणि परिसरातील पाणी एके ठिकाणी गोळा करून पुन्हा तिथेही डोंगराच्या पोटातून एक मोठा बोगदा तयार करून पाणी कोळकेवाडी धरणात प्रकल्प तीनसाठी आणून सोडले आहे!
अजस्र कोयना धरणाजवळ गाडी थांबली तेव्हाच मनात कुतूहल जागे झाले होते.. कारण पुन्हा एकदा धरणाच्या भिंतीच्या आत जाण्याची संधी मिळणार होती. म्हणजे एका बाजूस शिवाजीसागर जलाशय, दुसरीकडे धरणाच्या पलीकडचा भाग आणि धरणाच्या बरोबर िभतीमध्ये आपण! हा अनुभवच विलक्षण असतो. आतमध्ये वातावरण केवळ पाच ते सहा अंश सेल्सियसच्या आसपास असते अनेकदा. ज्या चिंचोळ्या लांबलचक भागातून आपण फिरतो त्याला इन्स्पेक्शन गॅलरी म्हणतात. धरणाचे दरवाजे, मोजमाप करणाऱ्या यंत्रणा आदी सारे इथेच असते. त्यात भूकंपमापन यंत्रणेचाही समावेश आहे. एक किलोमीटर लांबीचे असे हे धरण आहे. त्याचा पायाच रुंदीला २५५ फूट एवढा अजस्र आहे, तर वरच्या बाजूस धरणाच्या भिंतीवरून दोन मोठय़ा गाडय़ा एकाच वेळेस जाऊ शकतील एवढी रुंदी आहे. धरण ताब्यात असते ते पाटबंधारे खात्याच्या. त्यांचेही अधिकारी तत्परतेने माहितीसाठी पुढे आले. इथे कनिष्ठ अभियंता एस. बी. नांगरे दीर्घकाळ कार्यरत आहेत. ते म्हणतात.. महाबळेश्वरला उगम झाल्यापासून सुमारे ६४ किलोमीटर्सचा प्रवास करून ही नदी कोयनेला येते. धरणामध्ये जलसाठा साधारणपणे किती असतो, यावर ते सांगतात आकडेवारीमध्ये सांगितले तर अनेकदा सामान्य माणसाला गोंधळून जायला होते. कारण किती अब्ज घनमीटर म्हणजे नेमके किती पाणी हे त्याला कळत नाही. तर सामान्य माणसासाठी सांगायचे तर प्रत्येक माणसाला रोज दोन बादल्या पाणी लागते असे साधे गणित पकडले तर ६० लाख लोकवस्तीच्या शहराला तब्बल १० वर्षे पुरेल एवढा हा पाणीसाठा या धरणामध्ये आहे. मात्र त्यातील सर्वच्या सर्व पाणी आपण विद्युतनिर्मितीसाठी वापरू शकत नाही, कारण त्याच्या वापरावर बंधने आहेत. या नदीवर पुढच्या बाजूस असलेला कराड आदी महाराष्ट्राचा भाग आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील शेतकरीही अवलंबून आहेत. त्यामुळे आपण धरणातील केवळ १०५ दशलक्ष घनफूट (टीएमसी) पैकी केवळ ६७.५ टीएमसी पाणीच वीजनिर्मितीसाठी वापरू शकतो. उर्वरितपैकी २५ टीएमसी शेतीसाठी सोडले जाते.
धरण पूर्ण भरल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय होतो का? या प्रश्नावर नांगरे घेऊन जातात ते धरणाच्या भिंतीवरच असलेल्या एका तक्त्यासमोर. तिथे वर्षांच्या किती तारखेला धरणाची पातळी किती असणे आवश्यक आहे, त्याचे गणितच तारखेनुसार मांडलेले असते. ही पातळी ओलांडली की, मग त्यानंतरच धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय होतो. त्यातही दरवाजे उघडण्याचा क्रम ठरलेला आहे. त्यामागे विज्ञान आहे. ते पाळावेच लागते, अन्यथा धरणाच्या भिंतीवरील दाब वाढून तिला तडे जाण्याचा किंवा मग दरवाजेच त्या दाबाने निखळण्याचा धोका असतो. या धरणाचे दुसरे एक वैशिष्टय़ म्हणजे त्या काळी रबल काँक्रीटमध्ये केलेले म्हणजेच दगड आणि काँक्रीटचा एकत्रित वापर करून केलेले हे देशातील पहिलेच धरण होते. त्यामुळे त्याची मजबुती वादातीत आहे. म्हणून तर १९६७ साली ११ डिसेंबरला झालेल्या भूकंपाचे धक्के ते सहज पचवू शकले! त्या भूकंपानंतर धरणे आणि भूकंप यांचा काही संबंध असल्याची खूप चर्चा झाली, पण त्यानंतर झालेल्या शास्त्रीय अभ्यासात असे लक्षात आले की, जगभरात साडेचार हजार धरणे आहेत. त्यांचा व भूकंपांचा काहीही संबंध नाही. त्या वेळेस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धरणाच्या मजबुतीकरणासाठी एक समिती नेमण्यात आली आणि आधारिभती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा एकूण ४३ आधारिभती बांधून धरण अधिक मजबूत करण्यात आले. आता त्याला कोणताही धोका नाही!
हा परिसर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा परिसर आहे. त्यामुळे पाणी असतेच असते. अगदी ७३-७४ साली झालेल्या भीषण दुष्काळाच्या वेळेसही इथे पाऊस व्यवस्थित झाला आणि तीन चतुर्थाश धरण भरलेलेच होते, नांगरे सांगतात.. धरणाच्या पाणलोट क्षेत्राची अवाढव्यता विचारता, ते पुन्हा म्हणाले आकडेवारी टाळतो आणि व्याप्ती लक्षात येईल, असे सांगतो.. मोटारलाँचने साधारण वेगात जायचे म्हटले तर या जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचायला तब्बल सात तास लागतील. हा ६४ किलोमीटर्सचा टप्पा आहे. जिथून पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या टप्प्यासाठी पाणी घेतले जाते ते नवजा हे गावही इथून १० किलोमीटर्सच्या अंतरावर आहे. खरे तर धरणाच्या दिशेने येतानाच ठाकूरदेसाईंनी गाडी थांबवून नवजाचे लेक टॅिपग झालेले ठिकाण, तिथे असलेले दरवाजे आदी सारे काही दाखविलेले होते. धरणाच्या सर्वात वरच्या मजल्यावर जायचे होते आणि आम्ही होतो मिडगॅलरीत. ज्याच्याकडे लिफ्टची चावी तो कर्मचारी जेवायला गेलेला. मग पर्याय होता तो पायऱ्या चढून जाण्याचा. चला तर फिटनेसचा कस लागणार! असा विचार मनात आला पण तोवर कर्मचारी धावत आला आणि मग ६० वर्षे जुन्या लिफ्टने वरती गेलो त्या वेळेस लक्षात आले की, इथले मजले हे इमारतींच्या मजल्यांपेक्षा मोठे आहेत. आणि धरणाची उंची एकूण लक्षात घेतली तर किती मजले? नांगरे म्हणाले, २० मजले!
सामान्य माणसाने धरणावरचा अटीतटीचा प्रसंग पाहिलेला असतो तो ‘सत्यम शिवम सुंदरम्’मध्ये. असा एखादा सर्वाधिक अटीतटीचा क्षण सांगू शकाल का? त्यावर नांगरे म्हणतात, सामान्यांसाठी पाऊस म्हणजे चिखल किंवा पावसाळी मजामस्तीची सहल! पण इथे मात्र सर्वासाठीच २४ तास डोळ्यात तेल घालून पाहण्याचे महिने. कारण पावसाचा वेग वाढला की, धरणातील पाण्याची पातळी वाढते. प्रत्येक क्षण हा युद्धप्रसंगच असतो. काही वेळेस धरणाची पातळी वाढली की, धरणाच्या भिंतीतून आत येणारे पाणीही वाढते. मग पंप कामाला लावून ते पाणी पुन्हा बाहेर काढावे लागते. तुफान पावसाच्या अशा अनेक रात्री प्रतिवर्षी इथे अनुभवल्या जातात, त्या फक्त तुमच्यापर्यंत येत नाहीत इतकेच!
धरणाचे दरवाजे हे काही घरच्या दरवाजांसारखे सरळसोट नसतात, ते वक्राकार असतात. पाण्याच्या दाबाचे त्या मागे असलेले विज्ञानही नांगरे सांगतात.. पावसाळ्यात धरणावर काम करणाऱ्या कुणालाच उसंत नसते! हे सारे इथेच थांबत नाही. मग धरणाच्या भिंतीवरूनच ते आपल्याला पुढच्या टप्प्याचे सुरू असलेले काम दाखवतात आता धरणाच्या डाव्या बाजूस नवीन बोगदा केला जात आहे. कारण विजेची मागणी वाढतेय.. पाणी तेवढेच आहे. करणार काय? म्हणून आता अशी रचना केली जात आहे की, धरणातून पाणी घ्यायचे पायथ्याशीच नवे विद्युत केंद्र स्थापून आणखी विजनिर्मिती करायची आणि पाणी परत धरणात सोडायचे. नैसर्गिक स्रोतांचा पुनर्वापर!
एक अजस्र आश्चर्य पाहून परतीच्या मार्गावर असतानाच एका मोठय़ा धबधब्याजवळ अवधूत ठाकूरदेसाई गाडी थांबवतात. डोळ्याचे पारणे फेडणारा धबधबा! मग आता इथेही वीजनिर्मिती करणार का? या प्रश्नावर ठाकूरदेसाई होकारात्मक उत्तर देतात.. ते म्हणतात, इथेही वरच्या बाजूस एक छोटा जलाशय करणे प्रस्तावित आहे. धबधब्याचे ३२० मीटर्सचे कोसळणे वापरायचे आणि छोटे विद्युतनिर्मिती केंद्र उभारायचे. हे पाणी विजेची मागणी अधिक असताना धरणातून इथे वरती जलाशयात आणून आणि त्यावर ४०० मेगावॉट निर्मिती करण्यात येईल आणि कमी मागणीच्या वेळेस टर्बाइन्स उलटी फिरवून पंपाप्रमाणे त्याचा वापर करून पाणी पुन्हा धरणात सोडण्यात येईल! ही तर भगीरथ प्रयत्नांची पराकाष्ठाच ठरणार आहे!
तब्बल ६० वर्षे अर्थात हीरक महोत्सव साजरा केल्यानंतरही कोयना विद्युत केंद्र संकुलांना देशभरात असलेले महत्त्व हे ‘महानिर्मिती’च्या या भगीरथ प्रयत्नांमुळेच कायम आहे, हे लक्षात आले आणि हात आपोआपच जोडले गेले. निसर्गाच्या देणगीला मानवाने भगीरथ प्रयत्नाने दिलेली ही आगळ्या सलामी समोर नतमस्तक होऊनच अखेरीस तिथून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.. तेव्हा वसंत कानेटकर यांनी अभिप्राय वहीत लिहिलेला संदेश डोळ्यांसमोर तरळत होता.. ‘‘कोयनेच्या या प्रचंड विद्युतगृहाला भेट देण्याचा योग आला. इथले सगळेच भव्य, प्रचंड आणि अफाट आहे! वैफल्यग्रस्त माणसांनी या केंद्राला भेट द्यावी. त्याच्या आशावादाची आणि जीवनोत्साहाची बॅटरी या भूगर्भात हिंडता फिरता आपोआप चार्ज होईल!’’