सहय़ पर्वताची भलीमोठी, अवाढव्य डोंगररांग पाहिली की आपण निसर्गापुढे किती खुजे आहोत याची कल्पना येते.

साधारण दीड-दोन वर्षांपूर्वी आम्ही एक भन्नाट ट्रेक केला होता. बोराटा नाळ! या ट्रेकमध्ये रायलिंग पठारावरून झालेलं लिंगाण्याचं भेदक दर्शन, बोराटा नाळेतले ते दोन दिवस आणि रात्री अचानक घडलेला मुक्काम सगळं आजही आठवतात. देशावरुन कोकणात उतरणारी बोराटा नाळ ज्या दापोली गावात जाऊन कोसळते, त्या गावात पोहोचायला आम्हाला दुसरा दिवस उगवला होता. पण उगवतीचा सूर्यनारायण आमच्या भटक्या टोळीसाठी एवढी ऊर्जा घेऊन येईल, जी आजतागायत टिकून आहे, असं कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर एक छानसा जिवाभावाचा ग्रुपच तयार झाला, मग काय ट्रेकचा जो सपाटा सुरू झाला. असो.
तर बोराटा नाळेतल्या रात्रीच्या त्या मुक्कामाला जबाबदार होती ती लिंगाण्याकडे जाणारी रायलिंगच्या कातळातली आडवी वाट. उत्साहाच्या भरात आम्ही ती चुकलो आणि आमची वाट लावून घेतली. पण तेव्हाच लिंगाण्याचा अभेद्य सुळका मनात घर करून बसला. त्याच्याकडे पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांत शिखर सर केल्याची झाक उमटत होती, ती स्वप्नवत! किंबहुना सगळ्यांनी ते बोलून पण दाखवलं, ‘आपण कधी सर करणार, लिंगाणा?’
पण तो दिवस उगवायला वेळ लागला नाही. नुकताच प्रसाद आणि निखिल बेसिक माउंटेनिअिरग कोर्स करून आलेले, उत्साहाला उधाण आलेलं, पावसांच्या सरींनी आमचा प्रिय सहय़ाद्री चिंब भिजलेला, एकंदरीत वातावरण भारावलेलं. आता माघार नाही. प्रश्न होता तो प्रस्तरारोहणाच्या महागडय़ा सामानाचा. तोही सुटला, प्रत्येकाकडून समान रक्कम गोळा करून सामानांची जुळवाजुळव झाली. अख्खा पावसाळा धबधब्यांच्या रॅपलिंगमध्येच सरला अणि मग वेध लागले ते सुळका चढाईचे.
बेत तर आधीच ठरलेला होता, लागलीच तयारी सुरू झाली मोहीम लिंगाण्याची. उत्साह आणि धाकधूक एकाच वेळी मनात प्रवेश करते झाले. सगळ्यांच्या आठवडी सुट्टय़ा, दांडय़ा, नातेवाईकांचे आजारपण, गेलेल्यांना परत श्रद्धांजली अशी एकाहून एक सरस कारणे देऊन सुट्टय़ांचा ताळमेळ जमवला आणि दिवाळीतल्या गुलाबी थंडीत एका शनिवारच्या रात्री निघायचं ठरलं.

मी आणि इंद्रा वारजे फ्लायओवरजवळ एका हॉटेलात बिल वाढवत बसलो होतो, थोडय़ाच वेळात प्रसाद, निखिल, अतुल, सचिन, राहुल, सागर आणि प्रसन्न सामानांनी गच्च भरलेल्या एका सफारीने येऊन धडकले. आत डोकावलं तर माणसे सॅक धरून बसली होते की सॅक माणसांना. काही कळेना! रोप, कॅराबिनर, डीसेंडर, हार्नेस, टेंट, इत्यादी इत्यादींनी काठोकाठ भरलेल्या सॅक आणि माणसांचं पुरण भरलेली सफारी जी सुसाटली ती जाऊन थांबली थेट चेलाडी फाटय़ावर हॉटेल जय भवानीमध्ये!
सगळ्यांनी यथेच्छ हादडलं आणि मोठमोठे ढेकर देऊन पुढच्या प्रवासाला लागलो. नसरापूर, मार्गासनी, साखर, गुंजवणे फाटा मागे टाकत, आठवणींना उजाळा देत वेल्हा गाठला आणि भट्टी घाटाने मार्गस्थ झालो. दोन्ही बाजूंनी कारवीनी भरलेलं गच्चं रान, तोरण्याला अर्धप्रदक्षिणा घालणारी ही वाट नेहमीच भुरळ घालते. तोरण्याच्या बुधला आणि विशाळा टेकडीचे अगदी जवळून दर्शन होते, रात्री तर सोडाच दिवसाही येथे किर्र एकांत अनुभवता येतो. कोण जाणे मला या छोटय़ाशा घाटाबद्दल विलक्षण आकर्षण आहे? कदाचित बोराटानाळेच्या ट्रेकने पहिल्याच भेटीत भट्टीशी गट्टी जमली असावी! असो. तर केळद खिंडीतून उजवीकडे वळलो आणि लाल धुळीने आमचे दणक्यात स्वागत केले. गाडीच्या हेलकाव्यांमध्ये समरस होऊन मोहरीकडचा प्रवास सुरू होता, तेवढय़ात रात्रीच्या थोडय़ाफार प्रकाशात लिंगाण्याने आम्हाला पहिले दर्शन दिले आणि आमची पाचावर धारण झाली. कसा चढणार, कुठून चढणार, जमेल का? अशा अनेक प्रश्नांनी डोक्याची मंडई झाली. पण ‘उद्या लिंगाणा सर होणार’ हा एकच विचार डोक्यात ठेवून बाकीच्यांची हकालपट्टी झाली. रात्रीच्या गारठय़ात थोडा वेळ सगळे जण शेकोटीसमोर बसलो आणि उबदार टेंटमध्ये शिरलो ते पहाट होईपर्यंत.
आणि ती रम्य पहाट! अख्खी बॉडी व्हायब्रेशन मोडमध्ये गेलेली. कुड-कुड-कुड. ड्रायव्हर पण दचकला, एवढय़ा अंधारात कसे चढणार? ‘परत आल्यावर सांगतो’, असे सांगून ड्रायव्हरचा निरोप घेतला आणि वेळ न घालवता, मोठाल्या सॅक पाठीवर चढवून आमचा चमू महाराष्ट्रातल्या ‘मॅटर हॉर्न’कडे ट्रेकस्थ झाला. मोहरी गाव शांत निजलं होतं. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं, कदाचित प्रत्येक जण लिंगाण्याच्या सुखद स्वप्नात हरवला असेल! विशिष्ट लयीमध्ये प्रत्येकाची पावले पडत होती. थोडय़ाच वेळात नाळेच्या तोंडापाशी येऊन थांबलो. क्षणात दीड वर्षांआधीचे दोन दिवस डोळ्यांसमोर तरळून गेले. हा तसा व्यापाराचा जुना मार्ग. महाडच्या खाडीवरला माल उतरवून या नाळेमार्गे तो घाटावर पोहोचवला जात असेल कदाचित, शिवराय आणि त्यांचे मावळे पण याच घाटाने प्रवास करीत असतील का? कसा असेल तेव्हा? पण आता प्रत्येक आकार-उकाराची लहान-मोठी असंख्य दगडाची रास, अशी बोराटानाळेची ख्याती! सोबतीला तीव्र उतार. हे दिव्य पार करून रायलिंगच्या कातळातला धोकादायक ट्रॅव्हर्स गाठायचा म्हणजे डोकं शांत ठेवून, न घाबरता, खाचा-खोबण्यात पाय ठेवून पुढे जाणे. हे झालं की लिंगाण्याचं अजून एक रूप आपल्यासमोर उभं राहतं. पुढे जाताच टेपाडावरून लांबच लांब सहय़ रांगेने दर्शन दिले आणि सुखावून गेलो. सुसाट वारा सुटला होता, उगवतीला नारायण वर येत होते.
थोडय़ाच वेळात खिंडीमध्ये पोहोचलो आणि आरोहणाची तयारी सुरू केली. प्रसादने आवश्यक त्या सूचना दिल्या आणि बाप्पाचे नाव घेऊन आमचा लिड क्लायंबर- निखिलने आरोहणास सुरुवात केली. बोल्ट्समध्ये कॅराबिनरच्या साहय़ाने रोप ओवत तो पुढे सरकत होता. अतुल बिले देत होता. आता थोडाफार रोप ओवून झालाय, इशारा मिळताच आम्ही आरोहणास सुरुवात केली. एकामागून एक कॅराबिनर रोपमध्ये अडकवून पहिला मुरमाड भाग चढायला सुरुवात झाली. घसारा संपून थोडेफार सोप्या श्रेणीतले रॉक पॅच चढून गुहेत दाखल झालो आणि एक लांब सुस्कारा सोडला. अबब! रायलिंगचं पोट काय दिसत होतं म्हणून सांगू!! एका फ्रेममध्ये मावेच ना. रायलिंग आणि लिंगाण्याच्या दरीतली भीषणता आता जाणवायला लागली होती. आजूबाजूची भिरभिरती नजर ढळू न देता बसकण मांडली. क्लायम्बिंगची पहिलीच वेळ असल्यामुळे हातापायांना चांगलाच ताण जाणवत होता. गुहेत डेरेदाखल झालो. येथून पुढचा मार्ग किंचितसा अवघड. सरळसोट सुळका. कदाचित निवांत बसण्यास पुढे जागा नाहीच आणि सुळक्याच्या पोटात सगळ्या बाजूने खोदलेल्या गुहा. कुठे पाण्याची टाकी, तर कुठे कैद्याची जागा. असा हा किल्ले लिंगाणा म्हणजेच शिवकालीन कारागृह. एकदा कैदी गडादाखल झाला की शिडय़ा काढून घ्यायच्या आणि त्याला मरण्याचं स्वातंत्र्य बहाल करून टाकायचं. कोणी-कोणी उपभोगला असेल हा कारावास? शिवकाळात तर नाही माहीत, पण पेशवेकाळात! बरीच नावं आहेत. पैकी मोरोजी संकपाळ, गोपाळ सोनार, सखाराम बोकील इत्यादी. सुळक्याच्या पोटात असलेल्या बारमाही पाण्याच्या टाक्यातले गार-गार पाणी पोटात रिचवले आणि नव्या उमेदीने चढाईस सज्ज झालो. आता खरी कसोटी येथून लागणार होती. मामला एकदम कठीण. अवघड टप्प्यांची सुरुवात. आतापर्यंतच्या चढाईमध्ये रोपला धरलं की विनाकारण एनर्जी जाणार हे कळून चुकलं होतं.

थोडं लिंगाण्याविषयी…
युरोपीय आल्प्स पर्वतराजीतील अवघड असलेल्या ‘मॅटर हॉर्न’ शिखराशी स्पर्धा करू पाहणाऱ्या, सह्य़ाद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला रांगडा सुळका. साधारण साडेनऊशे मीटर उंचीच्या माथ्यावर पंचवीस ते तीस जण उभे राहतील इतकीच जागा. जागा सुटली की तीन हजार फुटांवर खाली सरळ कपाळमोक्षच. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची २९६९ फूट. आरोहण मार्गाची उंची सुमारे १००० फूट. शिवकाळात गंभीर गुन्हे करणाऱ्या कैद्यास इथल्या गुहेत ठेवत असत. गडावर पाहण्यासारखं म्हणजे ४०-५० राहू शकतील अशी एक प्रशस्त गुहा, थंडगार पाण्याचे टाके, जननी व सोमजाई देवीचे मूळ ठाणे, इंग्रजांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले बांधकाम व पायऱ्या आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा अफाट सहय़ाद्री! लिंगाणा सुळक्यापर्यंत जायला साधारण दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे कोंकणात महाड-पाने गावातून लिंगणमाची गाठायची. तिथून सुळका व रायलिंग पठार यांच्यामधील खिंडीपर्यंत यायचे. दुसरा मार्ग हा देशावरल्या मोहरी गावातून. त्यासाठी वेल्हय़ावरून साधारण २५ किमी मोहरी गावात यायचं. गावातून अर्धा तास चालून रायलिंग पठारावरून बोराटय़ाच्या नाळेने खिंड गाठायची.

पुढय़ातला सरळसोट कातळटप्पा येंगायचा होता. एकदा प्रयत्न केला, निष्फळ. ग्रीप मिळत नव्हती. प्रसन्नाला धाडला पुढे. परत प्रयत्न केला. कुठे खोबणीत हात ठेवून, कुठे दोराला घट्ट पकडून वर आलो तर तिथे निखिल बसला होता. जमलं. एक टप्पा पार झाला. जसं वर चढतोय तसं आजूबाजूचा परिसर डोळ्यांत मावेनासा होत होता. अशा तऱ्हेने मग दुसरा, तिसरा आणि मग चौथा सर सर चढून गेला. शिखर टप्प्यात आलं. मग काय आनंदाला पारावर नव्हता. तेवढय़ात सागरने प्रसादचा अंतिम टप्पा चढतानाचा फोटो टिपून घेतला. आणि एक-एक करून आमची भटकी टोळी लिंगाण्याच्या माथ्यावर दाखल झाली. पोहोचल्या पोहोचल्याच पहिली नजर गेली असेल ती दुर्गदुर्गेश्वर रायगडाकडे! काय दिसत होतं म्हणून सांगू? गडावरील नगारखाना दरवाजा, छत्रपती शिवरायांची समाधी आणि श्री वाडेश्वराचे (जगदीश्वराचे) लख्ख दर्शन झालं. त्याच्याच बाजूला कधी एके काळी रायगडचा जिवाभावाचा मित्र आणि नंतर इंग्रजांना मिळालेला पोटल्याचा डोंगर. वडीलधारे राजगड-तोरणा डोकावताहेत. शिंगापूर-बोराटा नाळेतून दापोली गावाकडे जाणारी वाट पुन्हा एकदा खुणावत होती. पलीकडे कोंकणदिवा, कुर्डूगड, दोहोंमधली बोचेघोळ नाळ, कोंकणदिव्याशेजारील कावळ्याची खिंड अप्रतिम, खरंच सुंदर! सह्य़ पर्वताची ही भलीमोठी, अवाढव्य डोंगररांग पाहिली की आपण निसर्गापुढे किती खुजे आहोत याची कल्पना येते. काय अनुभवलं असेल लिंगाण्याने? हजारो वर्षांपासून इथे पाऊसकाळात कोसळणारा धो-धो पाऊस, उन्हाळ्यात लाही लाही करणारा डोईवर तळपणारा सूर्य, सुसाटणारा भन्नाट वारा, एवढंच? नाही, हे तर तो अजूनही अनुभवतो आहे. त्याचा जळफळाट होतो आहे तो पोटल्यावरून रायगडावर आग ओकणाऱ्या इंग्रजांच्या तोफांचा. दहा दिवसांत झालेली रायगडाची लचकेतोड आणि नंदनवनाची मसणवाट पाहून हा रांगडा गहिवरला असेल नाही.
आमच्या परीने आयुष्यातली एक स्वप्नपूर्ती झाली होती, याचसाठी चालला होता ना कित्येक दिवसांपासून अट्टहास! रायगडाला साष्टांग मुजरा झाला, एकमेकांचं अभिनंदन झालं. तहानलाडू-भूकलाडू संपवले आणि परतीची वेळ येऊन ठेपली. आता उतरायचं म्हणजे रॅपलिंग या तंत्राचा वापर. भरपूर सराव झाला असल्यामुळे तंत्र सगळं माहिती. फरक एवढाच की इथे खोली जास्त होती. मग डीसेंडर, पिटॉन असा तांत्रिक साधनांचा जामानिमा तयार केला. पठ्ठय़ा निखिल एका कडय़ाच्या टोकावर बसला आणि एकेकाच्या डीसेंडरमध्ये रोप अडकवून हुकूम सोडू लागला. एकामागून एक सगळे जण झर झर उतरू लागले. खिंडीमध्ये पोहोचलो तेव्हा अंधार व्हायला सुरुवात झाली होती. बोराटय़ाचा धोकादायक ट्रॅव्हर्स पार केल्यानंतर प्रसाद बोलून गेला ‘आता आपण नाही मरू शकत. मग होऊन जाऊ दे, एक घोट-घोट पाण्याचा!’ पाण्याचा ब्रेक घेऊन आम्ही नाळ चढायला सुरुवात केली.
अशीच घडु दे डोंगरयात्रा तुझ्या माथ्यावर ।
अशीच मिळु दे संधी क्षणोक्षणी,
खेळण्यास तुझ्या अंगा-खांद्यावर ।।
असेच असो उपकार आजन्म
तुझ्या या पामरावर ।।