मित्र-मैत्रिणींनो आपण जेव्हा चित्रपटात, एखाद्या कार्यक्रमात, टीव्हीवर एखादे नृत्य बघतो तेव्हा त्यामध्ये आपण नक्की काय बघतो? तर नृत्यप्रस्तुती करणारा कलाकार कोण आहे? कोणत्या गाण्यावर नृत्यप्रस्तुती होत आहे, कोणती नृत्यशैली आहे आणि शेवटचा मुद्दा त्याचा कोरिओग्राफर कोण आहे? पण त्या नर्तिकेची वेशभूषा फारच अप्रतिम होती. ती कोणी केली होती याचा शोध घेतो का आपण कधी? खरेतर नृत्यात वेशभूषेला फारच महत्त्व आहे. ते नसते तर सर्वत्र साध्या वेशातीलच नृत्यप्रस्तुती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. मग आपण असेही म्हटले असते की, ‘असा काय ड्रेस घातलाय?’ कदाचित वेशभूषा चांगली नाही म्हणून जे नृत्य सादर होत असेल ते कितीही सुंदर असले तरी त्याची वेशभूषा तितकी खास नाही म्हणून ती नृत्यप्रस्तुती आपल्याला आवडणार नाही किंबहुना रुचणार नाही. म्हणूनच नृत्यसादरीकरणामध्ये ‘वेशभूषा’ हा प्रयोग घटक अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक छोटय़ा छोटय़ा बाबतीत आपल्याला वेगळेपण दिसून येते. त्याला ‘नृत्य’ही अपवाद नाही. सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यशैली, सर्व प्रादेशिक लोकनृत्य, वेस्टर्न डान्स, बॉलीवूड डान्स, बाहेरच्या देशातून आलेले, परंतु आता स्वतंत्ररीत्या ज्यावर प्रयोग होत आहेत असे हिप-हॉप, बेलीडान्स, टॅपडान्स, फ्लेमिंगो, सालसा इत्यादी इत्यादी. अशा सर्व नृत्यशैलींच्या केवळ वेशभूषेचा विचार केला असता ही व्याप्ती केवढी आहे याचा आपल्याला नक्कीच अंदाज येईल. वर नमूद केलेल्या प्रत्येक नृत्यशैलीची स्वत:ची अशी विशिष्ट वेशभूषा ठरलेली आहे. प्रत्येक प्रांतानुसार ही वेगळी आहे. त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थितीनुसारसुद्धा या वेशभूषेमध्ये वेगळेपण दिसून येते. त्या त्या शैलीचा सर्व बाजूंनी अभ्यास करूनच वेशभूषा ठरवली गेली आहे.
नृत्य कलाकारांमध्ये, संरचनाकारांमध्ये वेशभूषेच्या बाबतीत खूपच जागरुकता निर्माण झाली आहे. खूप बारकाईने त्यावर विचार केला जातो. नृत्याची थीम काय आहे त्याप्रमाणे कापडाची निवड केली जाते, त्याप्रमाणे ड्रेस डिझाइन केला जातो. त्याला लेस लावायची, पेंटिंग करायचं की आणखी काही अशा अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट असतात. ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरू शमा भाटे यांनी कथक नृत्याच्या महासागरात अफाट काम केले आहे. त्यांनी कथकच्या माध्यमातून आजवर अनेक विषय हाताळले आहेत. शमाताई कायमच नृत्यसंरचनेबरोबर संगीत, वेशभूषा, प्रकाशयोजना या घटकांना समान महत्त्व देतात. या प्रयोग घटकांना समान न्याय देऊन जर नृत्यसंरचना केली तर ती अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकते, किंबहुना पोहोचते. ‘‘मला माझ्या कथानकातून/ विषयातून काय सांगायचे आहे, सूचित करायचे आहे त्यावर वस्त्र आणि रंग अवलंबून असतो. साधारणत: मी भारतीय वस्त्रपद्धती वापरते. कारण माझ्या सर्व हालचाली मुळात कथक या नृत्यप्रकारातून घेतल्या आहेत,’’ असं ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरू शमा भाटे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे आता फ्युजनचा जमाना आहे. दोन भिन्न नृत्यशैलींची एकत्रित सांगड घालून होणारी नवनिर्मिती म्हणजे फ्युजन असे ढोबळमानाने म्हणू शकतो. जसे नृत्यामध्ये, संगीतामध्ये फ्युजन केले जाते तसे वेशभूषेच्या बाबतीतही फ्युजनचे वेड आपल्याला दिसून येते. उदा. एखाद्या कलाकाराची जर नृत्यसंरचना आणि संगीत इंडो-वेस्टर्न असेल तर त्याची वेशभूषाही त्याच पद्धतीने तयार केलेली दिसून येते. हाही एक वेगळा प्रयोग नक्कीच म्हणता येईल.
मुंबई-पुणे यासारख्या मोठय़ा शहरांच्या ठिकाणी केवळ नृत्याचे पोषाख शिवणारे अनेक कारागीर आहेत. नृत्याची वेशभूषा तयार करणे हे खरेतर अवघड काम आहे. कारण प्रत्येक नृत्यसंरचनेचा विषय वेगळा असतो. थीम डोळ्यासमोर ठेवूनच ते डिझाइन केले जातात. कुठल्या कापडाचा वापर करायचा अथवा टाळायचा याचा सूक्ष्म विचार केला जातो. नृत्य संरचनाकाराची जी मागणी असते त्यानुसारच काम करावे लागते. येथे तो पोषाख शिवणाऱ्या कारागिराने स्वत:चे डोके चालवले तर काम बिघडू शकते. अर्थात नृत्यरचना समजून घेतली, अभ्यास केला तर मात्र नक्कीच त्याची मदत होऊ शकते. वेशभूषा करताना ती नृत्यापेक्षा प्रभावी ठरणार नाही याचाही विचार करणे गरजेचे असते. कपडय़ांचे रंग हेसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. त्याचा रचनेशी आणि सूत्रांशी संबंध असायला हवा. कारण चुकीचे रंग वापरले तर निर्मितीच्या हेतूलाच त्यातून बाधा पोहोचते. माधुरी दीक्षित ही एक उत्तम नृत्यांगना आहेच, तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्यामुळेच तिच्या सर्व चित्रपटातील तिने केलेली नृत्ये आतापर्यंत ‘हिट’ झाली आहेत. ‘देवदास’मधील ‘काहे छोड’, ‘मार डाला’, ‘आजा नचले’चं टायटल साँग, ‘पुकार’मधील ‘के सरा सरा’ किंवा अगदी आता आलेला ‘घागरा’ ही आणि कित्येक गाणी माधुरी दीक्षितसाठी पुन:पुन्हा पाहावीशी वाटतात. परंतु या सगळ्यामध्ये तिने परिधान केलेले सर्व पोषाखही तितकेच आकर्षक होते. सगळी गाणी प्रसिद्ध होण्यामागे नृत्य, संगीत, संरचनाकार या सगळ्यांबरोबरच वेशभूषा हा अत्यंत महत्त्वाचा घटक होता असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
वेशभूषेच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नृत्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे पोषाख भाडेतत्त्वावर उपलब्ध होणे. हा एक महत्त्वाचा आणि उपयुक्त व्यवसाय आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली अशा ठिकाणी नृत्याचे पोषाख भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय करणारे आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांचे, आकारानुसार, नृत्यशैलीनुसार नृत्याचे पोषाख भाडय़ाने मिळतात. हे पोषाख भाडय़ाने घेताना अनामत रक्कम आकारली जाते. ज्या नृत्याच्या वेशभूषेची मागणी आहे त्याप्रमाणे त्याचे भाडे आकारले जाते. बरेचदा एखादे नृत्य बसवले की ते नृत्य एकदाच सादर केले जाणार आहे हे माहीत असते. त्यावेळेला कापड विकत आणून, डिझाइन करून ते शिवून घेणे खर्चीक आणि वेळखाऊ असते. अशा वेळी या दुकानात जाऊन ठरावीक पोषाख भाडय़ाने घेतला की झटक्यात काम फत्ते होते. म्हणूनच हा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना आमच्यासारख्या कलाकारांकडून सलाम!
आधुनिक काळात संरचना हे तत्त्व आल्यावर अनेक नवीन विषय हाताळले गेले. पौराणिक विषयांबरोबर सामाजिक विषयही आले. त्यामुळे विषयानुरूप, नर्तकीला सोयीचे असे परंतु विषयाला बाधा न आणणारे असे नवीन पोषाख वापरात येऊ लागले. म्हणजे नृत्याची बांधणी अधिक आकर्षित करण्यासाठी विषयानुरूप वेशभूषेची निवड केली जाते.
शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com