lp02दिवाळी २०१४
आपलं नाक थोडं वर हवं होतं आणि डोळे थोडे मोठे, असं वाटणारे प्लॅस्टिक सर्जनच्या मदतीने आपल्या रंगरूपात हवा तसा बदल करून घेतात; पण त्याची खरंच गरज असते का? सौंदर्य नेमकं कशात असतं? शरीराच्या अवयवांमध्ये की आपल्या मनात?

‘माझं नशीबच वाईट! टिपटॉप कपडे करून इंटरवूला जात होतो. रिक्षाने चिखल उडवला तो नेमका माझ्या लाइट ब्लू शर्टावर! बदलायला वेळच नव्हता. तसाच गेलो. सगळे त्या डागांकडेच बघत होते! इतकं ओशाळं वाटलं! काही सुचेचना! गेला इंटरवू वाया!’
कपडय़ांवरच्या डागांमुळे राकेशचा आत्मविश्वास ढासळला. इंटरवू बिघडला. पुढच्या इंटरवूला तो टॅक्सीने गेला आणि जिंकून आला.
कुठेही जाताना कपडे व्यवस्थित नाहीत असं वाटत असलं तर आत्मविश्वास डळमळीत होतो. काही जणांना आपल्या रूपाबद्दल तसं वाटत असतं. देखण्या हरिणाक्षीला तिच्या गालांवरचे मुरमांचे खड्डे खुपतात. स्मार्ट रवींद्रला त्याचा पुढे-पुढे करणारा खालचा जबडा सतावतो. जाडजूड दंड झाकायला शर्वाणी नेहमी लांब हाताचे कपडे घालते. शेखरच्या भव्य, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची समोरच्यावर पाहताक्षणी छाप पडते, पण त्याला मात्र आरशात बघताना आपलं जरासं वाकडं नाकच दिसतं. समोरचा आपल्या नाकाकडेच बघतोय याची त्याला खात्रीच असते.
त्या साऱ्यांना आरशात बघताना न्यून तेवढंच दिसतं, जाचतं आणि त्यांचा आत्मविश्वास घटवतं. बाकी नाकीडोळी नीटस असलेल्या माणसात एकच ठसठशीत व्यंग असलं तर ते इतरांच्याही नजरेत अधिक भरतं. नकळत नजरा त्या व्यंगाकडे वळतात. आरशात पाहिल्यावर मनात ठसठसणारं तेवढंच व्यंग झाकता किंवा नाहीसं करता आलं तर आत्मविश्वासाला उभारी मिळते, व्यक्तिमत्त्व प्रभावी बनतं. तो कमीपणा दूर करणं कपडे बदलण्याइतकं सोपं नसतं, पण तरी ते साध्य करायचा आटापिटा चालूच असतो.
आपल्या रूपात काही उणं नसावं ही इच्छा प्रत्येकाला असते. समाजात मानमरातब मिळावा, हवा तो जोडीदार पटकावता यावा वगरे अनेक कारणांसाठी बहुतेक माणसांना सुंदर दिसायचं असतं तर काही कलावंतांना आपली कला वापरून इतरांचं रूप खुलवायचीच हौस असते. रूपाच्या सुशोभीकरणाची ही देवाणघेवाण जुनीच आहे. पुरातत्त्व, साहित्य आणि कला यांच्यात तसे दाखले जागोजागी मिळतात. आपल्याकडे गुप्त काळातले श्रीमंत पुरुष तर केवळ हौसमौज म्हणून नट्टापट्टा करत. काजळ, आळिता, मेंदी, गोंदवण यांसारखं नटणं-मुरडणं पुरातन काळापासून चालत आलं आहे. प्राचीन रोमन दरबारातल्या सुंदऱ्या डोळ्यांत धोतऱ्याचा अर्क घालून ते गडद करत. ज्या त्या प्रसंगाला साजेसा नट्टापट्टा केला की चारचौघांत वावरायचा आत्मविश्वास वाढतो. क्लीओपात्रा, नेफरटिटीसारख्या इजिप्शियन राण्यांच्या नखऱ्यांचे साद्यंत वृत्तांत मिळतात. त्यांनी आपल्या रूपसंपदेच्या जोरावर संपत्ती, सत्ता आणि आनंदही मिळवला. क्लीओपात्रेचा तर मृत्यूनंतरही सुंदर दिसायचा अट्टहास होता.
lp03
पायथागोरसने सौंदर्याची मोजमापं गणितात बसवायचा असफल प्रयत्न केला. सौंदर्याच्या कल्पना सर्वस्वी मोजमापांवर, रंगावर अवलंबून नसतात. त्या मुख्यत्वे पारंपरिक संदर्भावर आधारलेल्या असतात. ब्रह्मदेशातल्या कायान जमातीत गळ्याभोवती कडय़ांचे वेढे घालून मान लांब करतात. तशी लांब मान हे तिथलं सौंदर्यचिन्ह आहे. चिनी मुलींच्या तान्हेपणापासून त्यांचे पाय कुस्करून, घट्ट बांधून त्यांची वाढ खुंटवली जाई. चालायला कुचकामाचे असणारे ते पावलांचे मुटके त्या काळच्या पुरुषांना मादक वाटत! आफ्रिकेतल्या बायका भांगातली त्वचा कोरून, तिच्यात रंग भरून, वर तापलेली इस्त्री फिरवून भक्कम बहुभांगी केशरचना करत. तिच्यावर त्यांचे नवरे फिदा असत! अलीकडे शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटरने मिसळलेले मानवी चेहरे आणि त्यांच्याबद्दलच्या माणसांच्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास केला. आपल्याच समाजातल्या चारचौघांसारखा, सर्वसामान्य तोंडवळा बहुतेक माणसांना अधिक आकर्षक वाटतो हे त्याच्यावरून समजलं.
कुठल्याही संदर्भाची वरचेवर उजळणी झाली की मेंदूलाही तेच निकष पटायला लागतात. त्यांची नोंद ठेवणारी मज्जातंतूंची जाळी जोपासली जातात. विचारांची वहिवाट ठरते. सौंदर्याचा सामाजिक, सांस्कृतिक दृष्टिकोन वैयक्तिक नजरेच्या अंगवळणी पडतो, पण आता जग लहान होत चाललं आहे आणि वेगवेगळ्या वंशांचे, रंगांचे चेहरेमोहरे एकाच समाजात मिळूनमिसळून राहातात. त्यांना एक सरासरी चेहरा असत नाही. त्यामुळे सौंदर्यदृष्टी अधिक व्यापक बनत चालली आहे.
पशुपक्षी आपला जोडीदार निवडताना मुख्य निकष सशक्तपणाचा लावतात. मानवातही ते भान नकळत राखलं जातं आणि ते निकष आकर्षक बनतात. ३६’’-२४’’-३६’’ ही ‘वाळूघडय़ाळी’ फिगर असलेल्या रमणीला प्रसूती आणि पान्हा या दोन्ही भावी मातृकर्तव्यांत अडचण येत नाही असं सामाजिक गृहीतक असतं. त्यामुळे ती रमणी रमणीय वाटते. गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत क्षयावर इलाज नव्हता. क्षयरोगी कृश असत. अनुषंगाने सुदृढपणा हा उत्तम तब्येतीचा पुरावा होता. ती ग्वाही सुखद, आकर्षक होती. म्हणून राजा रविवम्र्याच्या नायिकांची गोलाई हे सौंदर्याचं लक्षण होतं. एकविसाव्या शतकात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार वगरे मॉडर्न खलनायकांची सद्दी आली. प्रकृतिस्वास्थ्याचं नातं सडपातळ देहयष्टीशी जुळलं. बार्बी डॉलची पतली कमरिया मनभावन झाली.
क्वचित दिसणाऱ्या गुणधर्माना केवळ ते वेगळे, नवलाईचे म्हणून सोनं लागतं. म्हणून भारतीयांना गोरेपणाचा हव्यास असतो तर युरोपीयनांना उन्हात खरपूस भाजलेली त्वचा सुंदर वाटते. तुळतुळीत त्वचेच्या मंगोलियन समाजात अंगभर दाट लव असलेली, मिशीवाली मुलगी आकर्षक ठरते. त्याउलट आपल्या अंगावरची कोवळी मखमल मुळापासून उपटून त्वचा तुकतुकीत करून घ्यायला भारतीय मुली नियमितपणे वॅिक्सगच्या वेदना सोसतात. जगभरातल्या तरुणाईच्या मनावर पाश्चात्त्य सिनेमांचा पगडा बसल्यामुळे अतिपूर्वेच्या युवतींना मोठय़ा डोळ्यांचा हव्यास वाटतो आणि आफ्रिकेतल्या बालिकांना लांबसडक, सरळ केसांचा सोस असतो.
lp05
सौंदर्याबद्दलच्या अपेक्षांमध्ये सामाजिक पूर्वग्रहांचा भाग तर असतोच; पण आयुष्यातल्या अनुभवांचा, व्यक्तिगत आवडीनिवडीचा आणि भावनांचाही वाटा असतो. म्हणून तर ललाचं लावण्य मजनूच्या डोळ्यांतूनच दिसतं. एखाद्या व्यक्तीकडे बघताना तिच्या रूपातून वेगवेगळ्या लोकांना अनेक निरनिराळे संदेश मिळत असतात. ते शब्दांत सांगता येत नाहीत. स्पष्टपणे समजतही नाहीत; पण त्यांच्यामुळे मनात आनंद, समाधान, स्पर्धा, ईर्षां, असूया, धाक वगरे विभिन्न प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात. क्वचित कधी विकृत कल्पनांचे डोलारेही उभे राहातात. स्वत:चं रूप आरशात बघतानाही तशा भल्याबुऱ्या प्रतिक्रिया होतात. म्हणून काही माणसांना आपलं रूप बदलायची तीव्र इच्छा असते. शिवाय ‘एवढं नाक सरळ केलं तर मी कशी दिसेन?’ या कुतूहलाचाही त्या इच्छेला हातभार लागतो.
गेल्या पिढीपर्यंत रूपातले दोष जास्तीत जास्त जाच करत ते लग्नाच्या वयात. त्या वेळी नकार देताना नकटय़ा नाकाला नाकं मुरडली जात. अपमान होई. मग प्रत्येक वेळी आरशातलं नकटं नाक पाहून त्या अपमानांची आठवण होई आणि नाकाबद्दलचा राग त्या नाकाच्याच शेंडय़ावर मुक्कामाला येई; पण सतराशेसाठ विघ्नं पार पडून एकदा का कुणी त्यांना त्या नाकासकट स्वीकारलं तर नाकावरचा सगळा राग जन्मभरासाठी विरून जाई.
सध्याच्या नव्या पिढीत लग्नाच्या वयात तर नाकाचं मोल वाटतंच, पण एरवीही सुंदर दिसणं महत्त्वाचं असतं. सुंदर व्यक्तींना तोंडी परीक्षांत झुकतं माप मिळतं; इंटरवूत अनुकूल कौल मिळतो आणि समाजातही विनासायास मान मिळतो. यातलं प्रत्येक विधान विश्वविद्यालयांच्या अभ्यासांतून सिद्ध झालेलं आहे. सुंदर बायकांच्या नवऱ्यांना बऱ्यापकी जास्त पगार मिळतो असंही चीनमधल्या एका सर्वेक्षणात स्पष्टपणे दिसून आलं आहे! ‘सौंदर्य महत्त्वाचं असतं’ हा मुद्दा निर्वविाद आहेच आणि तो सामान्यज्ञानाचाच भाग आहे. शिवाय पूर्वी सौंदर्याचे निकष ‘यमीच्या सहापट गोरी’ यासारखे भोवतालच्या चारचौघींपुरते मर्यादित होते. आता छोटय़ा पडद्यावरच्या अप्सरा तिन्हीत्रिकाळ घरात येतात, कंबर लचकवतात आणि पडदाभर चेहरा मिरवतात. सुंदर नाकांचे अनेक नमुने डोळ्यांसमोर नाचत राहातात. दर वेळी आपल्या नकटय़ा नाकाला मिरच्या झोंबतात. एका सेंटिमीटरच्या चपटय़ा नाकामुळे नाक सतत खाली घालावंसं वाटतं, आत्मविश्वास ढळतो आणि एकंदरीतच व्यक्तिमत्त्वाला गालबोट लागतं. तशा माणसांना जर तेवढं नाक त्यांच्या मनासारखं दुरुस्त करून मिळालं तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि आयुष्यात फार मोठा फरक पडतो.
कुणाचाही सुंदर चेहरा पाहिला की मेंदूच्या मागच्या भागाला जाणीव पोचते. त्या जाणिवेला पूर्वग्रह, अनुभव, भावना वगरे निकष लावायचं काम दुसरे काही भाग करतात. त्यांच्यात मेंदूच्या पुढच्या भागाचा वाटा मोठा lp04असतो. जाणीव अशी कसाला लावून जेव्हा ती आनंददायी असल्याचा निवाडा होतो तेव्हा मेंदूच्या वळ्यांच्या घडीत दडलेलं आनंदकेंद्र जागं होतं. ऐश्वर्याचा चेहरा पाहून जो आनंद होतो तसा आरशात स्वत:कडे बघतानाही मिळावा, अशी सुप्त आस प्रत्येकाच्या मनात असते.
दुसऱ्या-तिसऱ्या इयत्तेपासूनच मुलांना आरशात पाहून आपल्यातल्या उणिवा जाणवतात. दहा मिनिटांपेक्षा अधिक काळ आरशात स्वत:ला निरखत राहिलं तर सर्वसाधारण माणसांनाही आपलंच रूप खुपायला लागतं आणि न्यूनगंड निर्माण होतो, असं लीड्स युनिव्हर्सटिीमधल्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात दिसलं. तसा न्यूनगंड दूर करायला केशभूषा, त्वचेचं पोषण, मेक-अप वगरे सांभाळणारे कॉस्मेटॉलॉजिस्ट्स असतात. खास आपल्या व्यक्तिमत्त्वाला उठावदार करणाऱ्या डिझायनर कपडय़ांसाठी सल्लाही मिळतो आणि तसा कपडेपट बनवूनही दिला जातो. मेकअप, केशभूषा, कपडे, दागिने, साजशृंगार यांनी रूपातल्या त्रुटी झटकन झाकता येतात. तसे वरवरचे उपाय कमी पडतात तेव्हा काही अधिक करायची गरज असते. त्याही सेवेसाठी आता मुबलक तंत्रं उपलब्ध झाली आहेत. चार वर्षांपूर्वी वॉिशग्टनमध्ये झालेल्या एका सौंदर्यविषयक कॉन्फरन्समध्ये त्यांच्याबद्दल ऊहापोह झाला. ‘आता सौंदर्य दैवदत्त राहिलं नाही. स्वत:च्या मनाजोगं रूप स्वत:च्या हींमतीवर, धडपडून कमावता येतं. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी बजावायचा तो लोकशाही हक्क झाला आहे,’ असं त्या सभेत प्रतिपादन केलं गेलं. तो हक्क मिळवायचे अनेक मार्ग आहेत. त्या साऱ्यांचा मिळून एक अवाढव्य सौंदर्य-उद्योगच आता प्रस्थापित झाला आहे. त्यांच्यातले काही व्यवसाय पूर्वापार चालत आलेले आहेत, तर काही प्रगत शास्त्रांवर आधारलेले, आधुनिक आहेत.
अंगावर लेवून मिरवता येणारी कला म्हणजे गोंदवण. आल्प्समध्ये सापडलेल्या, साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या आइस-मनच्या अंगावरही सत्तावन्न ठिकाणी गोंदवण होतं. सौदी बेदुइन बायकांचा चेहरा गोंदवणाने भरलेला असे. हल्लीच्या दीपिका-प्रियांका-कंगनांच्या अंगावर मात्र एखाद्दुसराच फॅन्सी टॅटू असतो. अगदी पक्का गोंदलेला असला तरी त्यांची लहर फिरली की तो लेझरने काढून टाकता येतो; पण तो सगळा कलाविष्कार गोंदणारी सुई र्निजतुकच असायला हवी. नाही तर एड्स आणि दुष्ट प्रकारच्या काविळींसारखे भयानक संसर्ग होऊ शकतात.
विरळ होत जाणाऱ्या केसांमुळे नव्वदीतल्या पुरंध्रीही खंतावतात. गंगावन वापरायची पद्धत आपल्याकडे काही शतकांपासून आहे. सतराव्या शतकात युरोपमध्ये केसांचे टोप घालायची फॅशन होती. हल्ली टक्कल पडत असलं तर डोक्यावरचे उरलेसुरले केस एकमेकांत विणून (वीिव्हग) त्यांना त्याच छटेचे नवे केस चिकटवतात किंवा त्यांच्यावर क्लिपांनी बसवतात. त्यामुळे माथेरान दाट असल्याचा आभास निर्माण होतो. तो आभास त्या विणकामाची मुळं वाढेपर्यंत, म्हणजे दोन-तीन महिने टिकतो. मग पुन्हा गोफ विणावे लागतात. हे तंत्र नवं वाटतं; पण प्राचीन इजिप्तमध्येही तशा विणकामाची प्रथा होती. नवी आली आहे ती केसांची लावणी. डोक्याच्या मागच्या घनकेशी भागातल्या त्वचेचं पुढल्या दर्शनी विरळ भागात रोपण केलं की नव्याने उगवणारे दाट केस माथा छान झाकतात. मात्र तशी लावणी लाखमोलाची असते! आपल्या खिशाचं भान राखायला हवं!
जसे नवे केस लावून मिळतात तसेच हनुवटीवरचे, गालांवरचे, काखेतले नकोसे केस लेझरने कायमचे काढूनही टाकता येतात. सौंदर्यवृद्धीचे इतरही अनेक सोपस्कार आता उपलब्ध झाले आहेत. त्वचेचे वरचे थर रसायनांनी किंवा खरवडून काढले की त्वचेचा खडबडीतपणा, तिच्यावरचे वण आणि डाग नाहीसे होतात. पातळ ओठांमध्ये हायल्युरॉनिक अ‍ॅसिड किंवा कोलॅजेनसारख्या लुसलुशीत रसायनांची इन्जेक्शनं देऊन त्यांचा ठसठशीतपणा वाढवून मिळतो. पोटावरची, दंडां-मांडीवरची किंवा दक्षिण-विभागातली अतिरिक्तचरबी कंपनाने वितळवून शोषून घेता येते. बारीक झाल्यावर कपडे ढिले होतात. पोलक्याला टाके घालावे लागतात. तशीच चरबी काढून टाकल्यावर कातडी सलावते आणि तिचं फिटिंगही टाके घालून परफेक्ट होतं. तो प्लास्टिक सर्जरीचा भाग आहे.
प्लास्टिक सर्जरी म्हणजे मऊ, लवचीक मांसाला, त्वचेला हवं तसं वाकवून, वळवून मनाजोगा आकार देण्याचं शल्यशास्त्र. मानवी शरीराला कातीव, सुघड आकार देणारे ते कलाकार माणसांच्या नेमक्या न्यूनगंडावर चपखल उतारा बेतायचा प्रयत्न करतात.
फताडय़ा नाकाची शस्त्रक्रियेने बेतीव चाफेकळी करायचा प्रयत्नही इजिप्शियनांनी पाच हजार वर्षांपूर्वी केला. प्राचीन भारतात नाक कापायची शिक्षा सर्रास दिली जाई. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या सुश्रुताने अशा माणसांसाठी पानावर नाक बेतून, त्या मापाची गालाची त्वचा वापरून नवं नाक घडवायची शस्त्रक्रिया केली. तशी यशस्वी शस्त्रक्रिया १७९२** (१८०५) मध्ये भारतात झाल्याची सचित्र बातमी लंडनच्या ‘जन्टलमन्स’ मॅगझीनमध्ये छापून आली होती. आता तर कुशल शस्त्राकर्माच्या सोबतीला पुढारलेलं अ‍ॅनॅस्थेशियाचं तंत्र आणि प्रगत अँटिबायॉटिक्स वापरून त्वचेचा थोडा भाग जवळूनच कापून, सोडवून, फिरवून घेता येतो. अ‍ॅसिड-अ‍ॅटॅकने विद्रूप झालेल्या मुलींना दाखवण्याजोगं तोंड मिळतं. जन्मापासून गायब असलेले कान, फाटके ओठ, चिकटलेली बोटं वगरे सारं दुरुस्त करणं जमतं. शस्त्राच्या शास्त्रोक्त कलाकुसरीमुळे हल्ली नकटीचं नाक वर उठतं. तिच्या लग्नाला विघ्नं येत नाहीत. पोटावरची चरबी उसनी घेऊन खुरटय़ा lp06वक्षस्थळाला गणितबद्ध मादक उभारी देणं साधतं. वक्षाची उभारी टिकवायला स्तनांमध्ये गुबगुबीत उशांसारखे मीठपाण्याचे किंवा सिलिकॉनचे इम्प्लान्ट्सही घालता येतात.
मवाळपणे माघार घेणाऱ्या हनुवटीला चरबीच्या इम्प्लान्टने करारी पुढारलेपण गवसतं; पण जेव्हा पूर्ण जबडा फारच पुढे आलेला असतो तेव्हा तो दंतशल्यक्रियेच्या शास्त्रशुद्ध प्रक्रियांनी मागे नेऊन वरच्या-खालच्या जबडय़ांची दातमिळवणी बेमालूम साधता येते; दातांचं आयुष्य वाढतं. हाडांवर ऑर्थोपेडिक सर्जरीचं प्रगत सुतारकाम करून थोडासा लांब किंवा आखूड असलेला पाय गरजेनुसार कापता-वाढवता येतो. त्यामुळे चाल सुधारते. पर्यायाने सांध्यांवर आणि मणक्यांवर पडणारा ताण टळतो. आरशातल्या रूपासोबत आरोग्यही सुधारतं.
आरशात पांढऱ्या केसांचा कृतान्तकटकामलध्वज दिसायला लागला की बाटलीतला काळिमा मदतीला धावतो; पण त्या काळ्याभोर केसांच्या शेजारी चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांचं जाळं विजोड दिसतं. लेझरने किंवा ट्रेटिनॉइनसारख्या रासायनिक लेपांनी त्वचेचे वरचे ढिले थर हटवून त्या चुण्या पुसल्या तरी त्या काही दिवसांतच फिरून उमटतात. त्वचा सलावते आणि तिला सुरकुत्या पडतात त्या तिच्याखालच्या चरबीचा थर वयोपरत्वे निघून गेल्यामुळे. त्या चरबीची जागा भरून काढायला कोलॅजेनसारखी द्रव्यं तिथे इंजेक्शनाने, मोठय़ा कौशल्याने भरता येतात; पण त्यांचा परिणामही काही महिन्यांपुरताच टिकतो. म्हणून शास्त्रज्ञांनी इतर युक्त्या शोधल्या.
आपल्या चेहऱ्यात साधारण बेचाळीस स्नायू असतात. ते आवश्यक हालचालीही करतात आणि भावभावनाही दाखवतात. त्यांच्यातला काही भावनांचा भाग मिटवला तर ललाटावरच्या उभ्याआडव्या आठय़ा, डोळ्यांच्या बाजूचे कावळ्याचे पाय वगरे चुण्या इस्तरल्या जातात. याच तत्त्वानुसार संशोधकांनी फक्त तेवढय़ाच भावनिक स्नायूंना विकल करायचं ठरवलं. काही जंतू बोटॉक्स नावाचं जालीम विष बनवतात. त्याने स्नायूंना पॅरॅलिसिस होतो. ते विष वापरून शास्त्रज्ञांनी माणसांच्या चेहऱ्यावरच्या रागदु:खादी भावांसह सुरकुत्यांचा बीमोड केला. प्रसिद्ध अमेरिकन नट आर्नोल्ड श्वात्झन्रेगर याने ‘टर्मिनेटर’ सिनेमात रोबॉटचा भावनाशून्य चेहरा इतका हुबेहूब वठवला की त्याने बोटॉक्सची इंजेक्शनं घेतल्याबद्दलच्या अनेक कंडय़ा पिकल्या. आपल्या भारतभूषणच्या चेहऱ्यावरची तर माशीही हालत नसे. त्या काळात बोटॉक्स नव्हतं म्हणून; नाही तर त्याच्याबद्दल तशा अफवा सहज पसरू शकल्या असत्या! बोटॉक्स विष चुकून इतरत्र पसरलं तर बोलणं, खाणंपिणं, श्वास घेणं वगरे अत्यावश्यक क्रियांना धक्का बसू शकतो. म्हणून ती चेहऱ्याची इस्त्री तज्ज्ञ व्यक्तींनाही फार काळजीपूर्वक करावी लागते. काही महिन्यांनी त्या विकल स्नायूंमधलं विष उतरतं. lp08सुरकुत्या पुन्हा अवतरतात. चेहरा कायम गुळगुळीत ठेवायला ती महागडी इंजेक्शनं पुन:पुन्हा घेत राहावी लागतात.
आता प्लास्टिक सर्जरीचं शास्त्र इतकं प्रगत झालं आहे की, कुठल्याही वयात ढिल्या चेहऱ्याची जास्तीची त्वचा तंत्रशुद्ध शिलाईने काढून टाकून नितळ रूप मिळवता येतं. पण त्यानंतरही वय वाढत जातंच. काळानुसार ती ताणून बसवलेली त्वचाही नव्याने ढिली पडते. पुन्हा कापाकापी, शिलाईचा सिलसिला जारी होतो.
एकविसाव्या शतकात अवयव छापण्याच्या तंत्राचा बोलबाला होतो आहे. पंचविशीतल्या चेहऱ्याचा संगणकीय साचा करून ठेवला, की त्या तंत्रानुसार आयुष्यभरात कधीही, स्वत:च्याच स्टेमसेल्स वापरून तस्सा ताजा चेहरा, अगदी खालच्या चरबीच्या अस्तरासकट छापून घेणं शक्य होणार आहे. तसं झालं तर सध्याच्या बारीकसारीक कापाकापीची कटकटच टळेल.
पण त्यासाठी आपलाच पंचविशीतला चेहरा आवडायला मात्र हवा. काही जणांच्या स्वत:च्या रूपाकडून अवास्तव अपेक्षा असतात. रोज आरशात बघून त्या चेहऱ्यातले नवनवे दोष शोधायचा छंद एकदा लागला, की रिकामटेकडं मन त्यातच गढून जातं. कधीकधी तर त्याच विकृत छंदाचा अतिरेक होतो. स्वरूपातल्या दोषांनी झपाटण्याचा एक मानसिक आजारच आहे. आपल्या रूपाच्या बाबतीत ईश्वराने त्याचं काम नीट केलं नाही अशी त्या माणसांची खात्रीच असते. तसे काही जण वरचेवर वैद्यकीय शिल्पींकडून स्वत:ला वेगवेगळ्या शस्त्रक्रियांची छिन्नी मारून घेत राहतात. मग त्यात जिवाचे कितीही हाल झाले तरी त्यांना तमा नसते. अनेक शस्त्रास्त्रांशी झुंजूनही त्यांचा आरसा त्यांना सर्वागसुंदरतेचं सर्टििफकेट देत नाही! त्याला ‘बॉडी डिस्मॉíफक डिसॉर्डर’ म्हणतात आणि त्याच्यासाठी खास औषधंही आहेत.
सौंदर्याच्या सापेक्षतेचा दुसराही एक पलू आहे. जेनीफर ग्रे या अत्यंत लोकप्रिय नटीला त्या सापेक्षतेचा अनपेक्षितपणे प्रत्यय आला. तिला तिचं भलंमोठं नाक मुळीच आवडत नसे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने ते नाक प्लास्टिक सर्जरीने आपल्या मनासारखं घडवून घेतलं; पण तिच्या मनासारखं ते देखणं नाक तिच्या असंख्य चाहत्यांच्या नजरेला मुळीच आवडलं नाही. त्यांनी तिच्यावर बहिष्कार टाकला! तिची करियर संपली! त्याउलट कायरा नाइट्लीचे पुढे आलेले दात तिच्या खिजगणतीतही नसतात. भूमिकेशी तद्रूप होऊन केलेल्या तिच्या आत्मनिर्भर अभिनयामुळे प्रेक्षकांना ते दात सुंदरच वाटतात.
सौंदर्याच्या कृत्रिम घडामोडीत ‘मनासारखं’ या विशेषणाला फार महत्त्व आहे. िशप्याकडे पोशाख शिवायला टाकताना आपल्या मनात त्या कपडय़ांबद्दल एक ठरावीक अपेक्षा असते; पण ते बेतताना िशप्याच्या मनात काही वेगळाच बेत असतो. आपली अपेक्षा आणि त्याचा बेत हे दोन्ही चांगले असले तरी सुसंगत असतीलच असं नाही. तसं कपडय़ांच्या बाबतीत झालं तर तात्पुरता हिरमोड होतो; पण निदान तडजोड करणं जमतं. सलूनमध्ये हेअरस्टाइल भलतीच केली गेली तरी ती काही दिवसांनी बदलता येते; पण ईश्वराने दिलेलं नाक नाकारून प्लास्टिक सर्जनकडून साकारून घेतलेलं नवं नाक पुन्हा सहज बदलता येत नाही. त्यात आणखीही एक गोम आहे. पोशाख िशप्याच्या आणि हेअरडू सलूनवाल्याच्या मनासारखा तरी नक्की साधू शकतो. प्लास्टिक सर्जनने कितीही जीव ओतला तरी त्या नव्या घडीव नाकावर ‘ईश्वरेच्छा बलीयसी’ असा शिक्का अटळ असतो. शिवाय साऱ्या सौंदर्यवर्धक तंत्रांना त्यांचे दुष्परिणामही असतातच. कधी त्वचा डागाळते, कधी भलभलत्या जंतूंची लागण होते, तर कधी वणच फोफावतो आणि त्याची कुरूप गाठ बनते. स्तनातलं lp07सिलिकॉन त्याच्या उशीबाहेर ओघळलं तर फार यातना होतात. त्वचेखालची इन्जेक्शनं वेडीवाकडी पसरून त्यांची ओबडधोबड गठ्ठेदार गादी होते. शिवाय त्या सगळ्या प्रक्रिया महागडय़ाही असतात; खिसा रिकामा होतो.
तरीही तरुण वयात, एखाद्याच दोषासाठी कायमस्वरूपी इलाज करून घेणं ठीक आहे; पण िशगं मोडून वासरांत शिरायला एकंदर निसर्गनियमांच्याच विरोधात उभं ठाकून कायमचं युद्ध ओढवून घेणं योग्य नाही. नटनटय़ांची गोष्ट वेगळी. त्यांचं पोट त्यावर अवलंबून असतं; पण निदान इतरांनी तो हट्ट घेऊ नये. सौंदर्यप्रसाधनांच्या आणि काही शल्यतंत्रांच्या अवास्तव जाहिरातबाजीमुळे मुली तिशीलाच चेहरे उचलू पाहातात. त्याची काहीच गरज नसते. पन्नाशी-पंचावन्नीपर्यंत चेहऱ्यात फारसा फरक पडत नाही. त्यानंतर पडला तरी तो बाकी रूपाला, वागणुकीला शोभूनच दिसतो. िपजारलेल्या पांढऱ्या केसांच्या आइनस्टाइनच्या चेहऱ्यावर लावण्याचा लवलेश नसतानाही त्याचं रूप पाहणाऱ्याला भारून टाके.

Video Rice Papad Marathi Recipe In Cooker Becomes Four Times After Frying Khichiya Papad Dough Making Papad Khar At Home
कुकरच्या एका शिट्टीत बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड, लाटायची गरजच नाही, बघा सोपा Video
how to make sabudana papad at home recipe
Recipe : वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड कसे बनवावे? पापडाचे वाळवण कसे घालावे? पाहा हे प्रमाण
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
mouthwash
श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका हवीये? मग घरी बनवलेल्या माउथवॉशने करा गुळण्या, तुमचा श्वास नेहमी राहील ताजा

जुन्या ग्रीक भाषेतल्या ‘सुंदर’ या अर्थाच्या ‘ोरायोस’ या विशेषणाचा मूळ अर्थ आहे ‘वयात आलेला’ किंवा ‘वयाला साजेसा’. तो शब्द मोसमातल्या रसरशीत फळाला वापरता येई, षोडशवर्षी तरुणीला खुलून दिसे आणि षष्टय़ब्दीपूर्तीच्या तृप्त, कृतकृत्य उत्सवमूर्तीलाही शोभून दिसे. खरं सौंदर्य तसं असायला हवं.
आकर्षक रूपाचे सामाजिक फायदे असतात हे खरं; पण आकर्षक रूप म्हणजे केवळ कोरीव चेहरा आणि कातीव बांधा नव्हे. ती केवळ निसर्गाची उधारी असते. तो माल आंतरिक भांडवलाच्या जोरावर आपलासा करावा लागतो. डॉ. जीकल आणि मि. हाईड यांचं बाह्य़रूप एकसारखंच असावं. फक्त वृत्तीतल्या फरकामुळे जीकल आकर्षक वाटे आणि हाईड भेसूर दिसे. मोत्यांसारखे दातही विचकले तर हिडीसच दिसतात. आपुलकीच्या स्मितामुळेच त्या मोत्यांना खरी किंमत येते. ज्ञान, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा वगरे इतर अनेक गुणांनी व्यक्तिमत्त्व अधिकाधिक प्रभावी बनत जातं आणि जन्मजात रूपाला नवनवे पलू पडतात. नेफरटिटी, क्लीओपात्रा, नूरजहान वगरेंनी राजकारणावर छाप पाडली; पण ती केवळ त्यांच्या लावण्यामुळे नव्हे. त्यांनी सत्ता गाजवली ती त्यांच्या चातुर्याने, खंबीरपणाने आणि मुत्सद्देगिरीने! आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरच त्या स्त्रिया इतिहासात ‘लावण्यवती’ या बिरुदासह अजरामर झाल्या.
जागतिक लावण्यस्पर्धाच्या अंतिम फेरीत बौद्धिक-वैचारिक परीक्षा घेणाऱ्या प्रश्नांची फैर झडते. ती बाजी जिंकणारी प्रगल्भ युवतीच जगाची सौंदर्यसम्राज्ञी व्हायला लायक ठरते. आपल्या रूपातच मग्न असलेली स्त्री कितीही रेखीव असली तरी मोहक दिसत नाही. त्याउलट नकटय़ा नाकाचा विचारही न करता आपल्या रोजच्या कामात स्वत:ला झोकून देणारी स्त्री तिच्या आंतरिक सौंदर्याने नेहमीच आकर्षक दिसते. तिच्या रूपातल्या उणिवाही बघणाऱ्यांच्या नजरेला त्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग म्हणूनच आवडतात. बाळाकडे वात्सल्याने बघणारी आई स्वत:ला पूर्णपणे विसरलेली असते. म्हणूनच तिच्यावर नजर खिळून राहते. एका गुजराती नटीने म्हटलंच आहे, ‘‘आरशाकडे पाठ फिरवून जेव्हा मी प्रेक्षकांच्या नजरेतून स्वत:कडे पाहायला लागले तेव्हाच मी खरी सुंदर दिसायला लागले.’’ बाहेरची, मीपणाच्या धुळीची पुटं घासून काढली तरच आतली, आपणच जीव ओतून घडवलेली व्यक्तिमत्त्वाची मूर्ती प्रकट होते, झळाळून उठते.