धोनीच्या अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीनंतर अनेकांची विकेट उडाली. धोनीची निवृत्ती जितकी खळबळजनक ठरली तितकीच त्याची कारकीर्द चमकदार होती. सगळ्यात यशस्वी कॅप्टनचं बिरुद मिरवणाऱ्या धोनीच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप-

एक वादळ अनपेक्षितपणे यावं, त्यानं सारं काही कवेत घ्यावं आणि अचानक कुठेतरी गुडूप व्हावं, असं काहीसं महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. या वादळाने आपल्याला दु:ख नाही तर भरभरून आनंद दिला. त्याने आपल्या वावटळीत साऱ्यांना त्यांच्या विवंचना विसरायला लावल्या आणि स्वर्गीय आनंदाचे काही क्षण दिले. भारताला दोन विश्वचषक जिंकवून दिले. धोनीचे निर्णय नेहमीच गूढ वाटायचे. पण धोनी हा मुळात कसा आहे, हे सांगणे बऱ्याच जणांना जमत नाही, कठीण वाटते, अनाकलनीय. कारण धोनी कधी कोणत्या गोलंदाजाला किंवा फलंदाजाला पुढे आणेल, हे सांगता येत नव्हते.
धोनी हा मूळचा रांचीचा. एका साध्या मध्यमगर्वीय कुटुंबातला. मेहनती, हुशार, प्रामाणिक आणि आपल्या निर्णयांवर काहीही करून ठाम राहणारा. धोनी पाचव्या इयत्तेपासून बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळत होता. राज्यस्तरीय स्पर्धामध्ये त्याने बरीच पारितोषिकेही पटकावली होती. लहानपणापासूनच ‘आर्मी’ हा त्याचा आवडता विषय. आपणही सेनेत जावं आणि देशाची सेवा करावी, अशी त्याची इच्छादेखील होती. वाचनही जास्त करून त्याच विषयाचे सुरू असायचे. क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्धी मिळाल्यावर त्याने सेनादलाला भेटही दिली आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘शत्रू समोर असताना तुम्हाला एकही चूक करून चालत नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अचूक राहावे लागते. त्यामुळे जवानांना सतर्क राहावेच लागते, पण मैदानात चूक सुधारता येते आणि ती जिवावर बेतणारी नसते,’ असे धोनी नेहमीच म्हणतो.
लहानपणापासूनच त्याला तीन व्यक्ती आदर्श वाटत राहिल्या, त्या तीन व्यक्ती म्हणजे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर. पण एक यष्टिरक्षक, फलंदाज म्हणून त्याला ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट फार आवडायचा. याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला होता की, गिलख्रिस्टच्या आसपासही मी नाही. कारण त्याने क्रिकेटविश्वामध्ये यष्टिरक्षकाची एक नवीन भूमिका दाखवून दिली आहे. यापूर्वी बहुतांशी यष्टिरक्षक हे चांगली फलंदाजी करताना दिसले नाहीत. पण गिलख्रिस्टने यष्टिरक्षकही दमदार फलंदाजी करून सामना जिंकवून देऊ शकतो, हे दाखवून दिले.
लहान असताना स्पर्धा जिंकून आल्यावर घरी नेहमीच कौतुक व्हायचे. धोनी बारावीच्या परीक्षेला बसला होता, २४ तासांवर परीक्षा होती, पण परीक्षेच्या आदल्या दिवशी क्रिकेटचा महत्त्वाचा सामना होता. त्याला काय करावे हे सुचेना. वडील शिस्तप्रिय असल्यामुळे त्यांना तो घाबरायचा, पण त्यांना सांगून सामना खेळायला जाणे शक्य नव्हते. त्याने वडिलांना विचारले, उद्या परीक्षा आहे, पण आज रात्री एक सामना आहे, मी खेळायला जाऊ का? धोनीला वाटले की त्याचे वडील नाही म्हणतील. पण त्यांनी विचारले अभ्यास झालाय का? त्यावर धोनीने होकार दिला. त्यावर वडिलांनी खेळायला जा, पण उद्याचा पेपर चांगला जायला हवा, असे सांगितले. धोनीच्या घरातून खेळासाठी आडकाठी नव्हती, पण अभ्यासही महत्त्वाचा असल्याचे त्याच्यावर बिंबवले गेले होते.
२००० साली धोनीला रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून नोकरी लागली होती. त्या वेळी धोनी रेल्वेच्या ‘क्वॉर्टर्स’मध्ये राहायचा. तिथला सुरक्षारक्षक थोडासा हेकेखोर होता, त्याला घाबरवायचे धोनी आणि त्याच्या मित्रांनी ठरवले. रात्र झाली की धोनी आणि त्याचे मित्र पांढरी चादर अंगावर लपेटून भुताचा आवाज काढत सुरक्षारक्षकाकडे जायचे आणि त्याला घाबरवायचे.
२०००-२००३ पर्यंत त्याने रेल्वेची नोकरी केली, कारण ही नोकरी करत असताना त्याला क्रिकेट खेळायला मिळायचे. २००३-०४ सालची गोष्ट असेल. धोनी मुंबईतील एका जिमखान्यावर एक सामना खेळायला आला होता. हा सामना बघायला त्या वेळचे निवड समितीचे सदस्य दिलीप वेंगसरकरही हजर होते. धोनीने जी षटकारांची आतषबाजी केली, ते पाहून वेंगसरकर चकीत झाले आणि त्यानंतर धोनीसाठी भारतीय संघाची दारे उघडली गेली आणि त्यानंतर जो काही इतिहास त्याने लिहिला तो साऱ्यांपुढे आहेच.
धोनी क्रिकेटमध्ये आल्यावर त्याच्या हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध झाला होता. पाकिस्तानच्या तत्कालीन लष्करप्रमुखांनीही त्याची स्तुती केली होती, याबद्दल विचारल्यावर धोनी म्हणाला होता की, पूर्वी मी फुटबॉल खेळायचो तेव्हा माझे केस लांबसडक होते. गोलकीपरची भूमिका करत असताना मला ते आवडायचे. पण क्रिकेटमध्ये आल्यावर मात्र मला लांब केस ठेवावेसे वाटले नाही. फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू यांच्या ठेवणीमध्ये मी काही फरक पाहिले आणि त्यानुसार केस छोटे केले.
लग्न झाल्यावर आता तुझ्या आयुष्यात काय बदल झाले असे विचारल्यावर सामन्यात पराभूत झालो तर घरी गेल्यावर शिकवणी घेतली जाते, असे मिश्कील उत्तर त्याने दिले होते.
धोनीला मद्यपान करणे कधीच आवडले नाही. त्याने मद्यपान केले नाही अशातला भाग नाही. पण त्याची चव आवडत नसल्याचे सांगून तो बहुतांश वेळा मद्यपानापासून दूर राहिला.
बाइक चालवायला धोनीला नेहमीच आवडायचे. सामनावीराचा पुरस्कार म्हणून कधी बाइक मिळाली तर त्याची चावी धोनीच्या हातात असायची. धोनी मग त्या खेळाडूला घेऊन मैदानाची रपेट मारायचा. पण कालांतराने कर्णधार झाल्यावर त्याने ही गोष्ट बंद केली.
श्रीलंकाविरुद्ध जयपूरच्या सामन्यात धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला आणि तो चांगलाच यशस्वी ठरला. कारण या सामन्यात धोनीने नाबाद १८३ धावांची खेळी साकारली आणि यानंतर धोनीने त्याचे संघातील स्थान जवळपास निश्चितच केले. २००७ चा विश्वचषक हा धोनीसाठी सर्वात मोठा टर्निग पॉइंट ठरला. बीसीसीआयने सुरुवातीला ट्वेन्टी-२० क्रिकेटला विरोध दर्शवला होता. पण विश्वचषकासाठी संघ पाठवायचा होताच. अनुभवी खेळाडूंना आपल्याला या विश्वचषकापासून लांब ठेवले होते. त्यामुळे कर्णधारपद नेमके कोणाला द्यायचे हा पेच होताच. अखेर धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आणि त्यानंतर भारताच्या इतिहासात त्याचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. या विश्वचषकाच्या दरम्यान भारतीय माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी धोनीसह भारतीय संघावर टीका केली होती. पण अंतिम फेरीत दाखल होत धोनीने टीकेला उत्तर तर दिलेच होते, पण सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये धोनीने शास्त्री यांना या टीकेबद्दल सांगितले आणि आज माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त आनंद झाला असेल, अशी टिप्पणी करत सव्याज परतफेड केली.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीतीलही असाच एक किस्सा आहे. पाकिस्तानचा संघ समोर होता आणि अंतिम षटक फार महत्त्वाचे होते. हे षटक संघातील सर्वात अनुभवी म्हणजेच हरभजन सिंगने टाकावे, अशी धोनीची इच्छा होती. पण हरभजनने अखेरचे षटक टाकण्यासाठी नकार दिला. त्यानंतर धोनीने जोगिंदर सिंगसारख्या नवख्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला. त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रत्येक चेंडूगणिक तो त्याला सल्ले देत होता, कसे चेंडू टाकायला हवेत हे सांगत होता आणि अखेर हा सामना जिंकत भारताने विश्वचषक पटकावला.
या विश्वचषकानंतर धोनी यशस्वी कर्णधार होऊ शकतो, असे वाटायला लागले आणि धोनीनेही या विश्वासाला कधी तडा दिला नाही. ट्वेन्टी-२० कर्णधारपदानंतर त्याला एकदिवसीय आणि कसोटी संघाचेही कर्णधारपद देण्यात आले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनी नेहमीच अग्रेसर राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या चलाखीच्या जोरावर त्याने संघाला बरेच सामने जिंकवून दिले. कोणत्या खेळाडूला कधी, कुठे, कसे आणायचे हे त्याला नेमके माहिती होते. त्याची रणनीती ही अनपेक्षित होती, ती कोणालाही तात्काळ समजायची नाही, प्रत्येक जण बुचकळ्यात पडायचा आणि त्याचा निर्णय योग्य ठरल्यावर तो समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. पण कसोटीमध्ये म्हणाल तर धोनी परदेशात जास्त यशस्वी झाला नाही. धोनीने ६० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. त्यापैकी परदेशातील ३० सामन्यांमध्ये त्याला फक्त सहा विजय मिळवता आले. त्यामुळे परदेशातील कसोटी मालिकेत खेळताना धोनी टीकेचा धनी ठरत होता. टीकेवर मी कधीही लक्ष देत नाही, वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनेल पाहत नाही, असे म्हणणारा धोनी अखेर या टीकेमुळेच कुठेतरी व्यथित होता. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक असल्याने अतिरिक्त ताण आपल्यावर येईल, याची त्याला कल्पना होती. त्यामुळेच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. धोनी अखेरच्या कसोटी सामन्यानंतर निवृत्तीचा निर्णय जाहीर करेल, असे वाटत होते. पण तिसऱ्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्येही त्याने याबाबत एकही शब्द काढला नाही. त्याची निवृत्ती ही बीसीसीआयने जाहीर केली, यावर कोणतेच भाष्य धोनीने आतापर्यंत केलेले नाही, त्यामुळे आता सारेजण त्याच्या निवृत्तीमागची कारणे शोधण्यात व्यस्त आहेत. मैदानाप्रमाणेच मैदान सोडतानाही धोनीची खेळीही गूढ, अनाकलनीय अशीच होती, असे म्हणता येईल.
प्रसाद लाड