News Flash

असतील शिते…

आपण मराठी माणसं वडय़ाचं तेल वांग्यावर काढतो, नमनाला घडाभर तेल ओततो, दुधाची तहान ताकावर भागवतो, शिळ्या कढीला ऊत आणतो आणि शितावरून भाताची परीक्षाही करतो...

| November 14, 2014 01:11 am

01prashantआपण मराठी माणसं वडय़ाचं तेल वांग्यावर काढतो, नमनाला घडाभर तेल ओततो, दुधाची तहान ताकावर भागवतो, शिळ्या कढीला ऊत आणतो आणि शितावरून भाताची परीक्षाही करतो…

आज बँक हॉलिडे असल्याने सगळे आरामात चालले होते. आधी गादीत लोळत पडत उशिराने उठणे, मग इडली-सांबारचा भरपेट नाश्ता करत उशिराने अंघोळ उरकणे असे सर्व केल्याने साहजिकच दुपारच्या जेवणालाही उशीरच झाला होता. आज प्राजक्ताने खास बेतही ठरवला होता. वांग्याची भजी, ताकाची कढी व जोडीला बटाटय़ाची भाजी व पोळ्या. गोड म्हणून सोबत उकडीचे मोदकही बनविणार होती. हे सर्व प्रकार करेपर्यंत खूप वेळ जाणार असल्याने आम्ही जेवणाच्या टेबलवरच पद्मजाची शिकवणी उरकण्याचे ठरविले.

पद्मजाला म्हटले की, आज आपण जे काही जेवणात खाणार आहोत ना त्याविषयीच शिकू या. आज प्राजक्ता वांग्याची भजी करत आहे त्यावरून मला पहिला वाक्प्रचार सुचला आहे, असे सांगून ब्रिंजल म्हणजे वांगे व ऑइल म्हणजे तेल हे शब्द तिला सर्वप्रथम समजावून सांगितले. ‘वडय़ाचे तेल वांग्यावर’ म्हणजे एका व्यक्तीचा राग दुसऱ्या कोणावर काढणे, असे सांगून आम्ही शिकवणीचा श्रीगणेशा केला.

तेलावरून मग मी ‘तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे’ हा वाक्प्रचार पद्मजाला सांगायचा ठरविले. तूप म्हणजे घी असे सांगून, तिला म्हटले, ‘‘कधी कधी आपण एकाच वेळी दोन गोष्टींच्या पाठी लागतो, पण हाती काहीच न लागता निराशा पदरी पडते तेव्हा वरील म्हण वापरतात.’’

तेलावरूनच मला दुसरी म्हण आठवली व ती म्हणजे नमनाला घडाभर तेल. एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीवरच जरुरीपेक्षा जास्त वेळ दवडला गेला की लोक वरील वाक्य म्हणतात, असे मी पद्मजाला सांगितले.

‘डोळ्यांत तेल घालून पहारा देणे’ याचा अर्थ मात्र तूच शोधून काढायचा, असे तिला सांगून मी तेलपुराण आवरते घेतले.

आजचा दुसरा मेन्यू होता ताकाची कढी; त्यामुळे ताक म्हणजे बटर मिल्क व कढी म्हणजे करी असे अर्थ मी पद्मजाच्या डायरीमध्ये लिहून दिले. पोटात भुकेने कावळे ओरडायला लागल्यामुळे सौमित्र व नूपुरही आता जेवणाच्या टेबलवर आले. त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मी नूपुरला ताक व सौमित्रला कढी या शब्दांवरून म्हणी सुचवायला सांगितले.

नूपुर म्हणाली ताई ताकावरून खूप म्हणी आहेत; जशा की ताकाला जाऊन भांडे लपविणे, दुधाची तहान ताकावर भागविणे, दूध गरम लागले म्हणून ताकही फुंकून पिणे, त वरून ताकभात समजणे वगैरे वगैरे.

पहिल्या म्हणीचा अर्थ होणार ज्या गोष्टीसाठी आपण आलो आहोत त्याबद्दलचे कारणच लपविण्याचा निष्फळ प्रयत्न करणे. दुधाची तहान ताकावर भागविणे म्हणजे नाइलाज झाल्याने किंवा अपेक्षित गोष्ट न मिळाल्याने त्याच्यापेक्षा हीन असलेल्या गोष्टीवर समाधान मानून घेणे म्हणजे चायनीजची गाडी बंद झाल्याने वडापाववर समाधान मानणे, असेच ना.. ही कोपरखळी आमच्या सौमित्रची होती, हे एव्हाना तुम्हाला कळले असेलच. ताक फुंकून पिणे हे मला काकाने फुंकणे हा शब्द शिकविताना समजावून सांगितले आहे. तेव्हा नूपुर मला शेवटचा अर्थ सांग, असे पद्मजाने सांगताच नूपुर म्हणाली, ‘‘इथे अर्थ होणार छोटय़ाशा क्लूवरून अख्खी गोष्ट क्षणार्धात समजणे.’’

‘‘नूपुरताई, तू खूप फुटेज खाल्लेस; आता मला सांगू दे कढीबद्दल.’’ असे म्हणत सौमित्रने आपली वटवट चालू केली. ‘शिळ्या कढीला ऊत आणणे’, ‘कढी पातळ होणे’ व ‘बोलाची कढी अन् बोलाचाच भात’ असे तीन वाक्प्रचार त्याने एका दमात सांगून टाकले.

शिळ्या कढीला ऊत आणणे म्हणजे जुनेच मुद्दे पुन्हा उकरून काढणे असा अर्थ सौमित्रने पद्मजाच्या डायरीमध्ये लिहिला. कढी पातळ होणे म्हणजे तब्येत बिघडणे किंवा परिस्थिती बिकट होणे हे समजवण्यासाठी सौमित्रने उदाहरण दिले ते चायनीज कंपनीचे. चीनची सेमीकंडक्टर क्षेत्रातली घोडदौड पाहून भल्याभल्या सेमीकंडक्टर कंपन्यांची कढी पातळ झाली आहे. या संदर्भात प्राइस वॉटर हाऊस कूपर्स (पीडब्ल्यूसी) चा २०१२ जुलैमधला हा अहवाल पाहायलाच हवा, असे भले मोठे स्टेटमेंट त्याने आमच्या सर्वाच्या तोंडावर फेकले.

बोलाची कढी अन् बोलाचाच भात यामुळे कोणाचेही पोट भरत नाही असे सांगून सौमित्र म्हणाला की इथे अर्थ होणार नुसतीच खोटी आश्वासने देऊन कोणाचेही भले होत नाही.

आता भाताचा विषय निघाला म्हणून मी पद्मजाला म्हटले, भात म्हणजे कुक केलेला राइस. यावरून आता वेगवेगळे वाक्प्रचार माझी आई सांगेल. आई म्हणाली, ‘‘पद्मजा, लिहून घे तुझ्या डायरीमध्ये. ‘शितावरून भाताची परीक्षा’ म्हणजे छोटय़ाशा परीक्षेवरून पूर्ण गोष्टीबद्दल अचूक अनुमान काढणे. उदाहरणादाखल मी तुला तीन-चार नवीन शब्द सांगेन. ते वापरून तू मराठीमधील एक अर्थपूर्ण वाक्य बनवलेस तर मी समजेन की तुला मराठीचे ज्ञान बऱ्यापैकी झाले आहे. यालाच म्हणतात शितावरून भाताची परीक्षा. पुढची म्हण आहे ‘असतील शिते तर जमतील भुते.’ म्हणजेच जर तुझ्यापासून इतरांना काही फायदा होणार असेल तर मतलबी लोक तेवढय़ापुरतेच तुझ्याशी जवळीक साधतात.’’ आई पद्मजाला पुढे म्हणाली, ‘‘आता तू म्हणशील की, शित हा शब्द तुला माहीत नाही; तर मी सांगते, शित म्हणजे शिजवलेल्या भाताचा एक दाणा.’’

एवढय़ात सौ. म्हणाली, आता पाच मिनिटांमध्ये मी पाने वाढायला घेत आहे, तेव्हा शिकवणी आवरती घ्या. मी म्हटले, ‘‘मिठाशिवाय जेवणात लज्जत येत नाही तेव्हा पद्मजा मीठ म्हणजे टेबल सॉल्ट याबद्दल सांगून आपण बाकीची शिकवणी रात्री पूर्ण करू या.’’

मिठावरून आठवणारी म्हण म्हणजे ‘नावडतीचे मीठ अळणी’. याचा अर्थ होतो- जेव्हा एखादा माणूस आपल्याला आवडत नसतो तेव्हा त्याची प्रत्येक गोष्ट भले ती अयोग्य असो की योग्य, आपल्याला बिलकूल आवडत नाही.

दुसरी म्हण आहे ‘खाल्ल्य़ा मिठाला जागणे’, म्हणजे जेव्हा एखादा माणूस आपल्यावर उपकार करतो तेव्हा त्याची जाणीव सदैव मनात ठेवून वेळ पडल्यास त्या उपकारांची सव्याज परतफेड करणे.

‘दुधात मिठाचा खडा टाकणे’ असाही एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ होतो कोणत्या तरी चांगल्या कामात खोडा घालणे किंवा कोणाला तरी निरुत्साही करणे.

माझे हे बोलणे संपत असतानाच गरमागरम जेवण टेबलवर आलेदेखील. मग काय, हाता-तोंडाची गाठ पडताच आमची बोलती आपसूकच बंद झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2014 1:11 am

Web Title: marathi language 5
Next Stories
1 हत्तीच्या पावलांनी…
2 म्हशीने रांधले…
3 चोरावर मोर आणि पोपटपंची
Just Now!
X