01prashantफेसबुकवरच्या त्या फोटोमध्ये टुमदार घर, अंगण, कुंपण बघून मला चटकन माझं गावचं घर आठवलं. मग, घराच्या विविध भागांवरून असलेल्या म्हणी, वाक्प्रचारांनी पद्मजाची शिकवणी सुरू केली.

आज माझा मित्र, अनिशने त्याच्या फेसबुक पेजवर रत्नागिरीच्या घराचे सुंदर चित्र पोस्ट केले होते. जुन्या घराप्रमाणे त्यात ओसरी, आड, कुंपण घातलेले अंगण होते. हे बघून मला माझ्या उंबरगावच्या घराची आठवण आली. तितक्यात माझी शिष्या पद्मजा तिथे आली. तिलाही ते टुमदार घर फारच आवडले. ती पटकन म्हणाली, ‘‘काका सुरेख घर आहे ना! आज माझ्या शिकवणीचा विषय काय असणार आहे? का या घरावरूनच काही सुचत आहे का तुला?’’ माझ्या मनात तसे काहीही नव्हते, पण पद्मजाच्या त्या बोलण्यामुळे मला कल्पना सुचली. मी पद्मजाला म्हटले, ‘‘नॉट अ बॅड आयडिया.’’

मी पद्मजाला म्हटले, ‘‘घराच्या विविध भागांवरूनही अनेक म्हणी किंवा वाक्प्रचार मराठीमध्ये आहेत. ’’

जुन्या घरांच्या पुढे अंगण, तुम्ही इंग्रजीमध्ये कोर्ट यार्ड म्हणतात ते असायचे. यावरून मराठीतली प्रसिद्ध म्हण म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे.’ याचा अर्थ होतो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जमत नसते तेव्हा ते अपयश हे आपले आहे हे वास्तव न स्वीकारता त्याचे उत्तरदायित्व इतर कोणत्या तरी गोष्टीवर ढकलण्याचा प्रयत्न करणे.

चित्रामधलं कुंपण दाखवत मी पद्मजाला म्हटले, ‘‘पूर्वी जनावरे, श्वापदे घरात घुसू नयेत म्हणून कुंपण, इंग्रजीत फेन्स बांधण्याची रीत होती. यावरूनही एक वाक्प्रचार आहे. कुंपणानेच शेत खाल्ले तर जाब कुणाला विचारायचा.’’

शिकवणीत सामील होत सौमित्र म्हणाला, ‘‘ताई, याचा अर्थ होणार ज्या व्यक्तीला आपल्या आर्थिक रक्षणाची जबाबदारी दिली आहे, त्या व्यक्तीनेच अपहार करणे किंवा चोरी करणे व अशा परिस्थितीमध्ये आपण तक्रार कोणाकडे करावयाची हा प्रश्न पडणे.’’

‘स्वत:भोवती कुंपण घालून घेणे’ असा दुसरा एक वाक्प्रचार मी पद्मजाला डायरीमध्ये लिहून घेण्यास सांगितले. जेव्हा एखादा माणूस जाणीवपूर्वक आपल्याला इतरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वत:च्या क्षमतेबद्दल शंका घेत आपल्याला एका मर्यादेमध्ये बांधून घेतो तेव्हा हा वाक्प्रचार वापरतात असे मी तिला समजाविले.

नंतर मी पद्मजाला चित्रातील आड दाखवला. आड व त्या आडातून बैलांद्वारे पोहऱ्यात पाणी कसे खेचतात हे मी दाखवत असताना नूपुर म्हणाली, ‘‘बाबा, यावरून म्हणी मी सांगते पद्मजा ताईला. ताई, पहिली म्हण आहे ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार व दुसरी आहे इकडे आड तिकडे विहीर.’ पहिली म्हण आई नेहमी बाबांना व आम्हाला उद्देशून म्हणते.’’

त्यावर माझी पत्नी म्हणाली, ‘‘पद्मजा, तुझे काका नूपुर व सौमित्रला घरात पसारा करण्यावरून ओरडत असतात, पण स्वत: मात्र तेच करतात. सगळीकडे ऑफिसच्या फाइल्स, लिखाणाचे कागद. म्हणूनच मी म्हणते, आडात नाही तर पोहऱ्यात कुठे येणार.’’

पद्मजा म्हणाली, ‘‘काकू कळला अर्थ! अजून शाळा नको घेऊ माझ्या काकाची.’’

‘इकडे आड तिकडे विहीर’ याचा अर्थ ‘कुठल्याही मार्गावर जा, सगळीकडे संकटेच आहेत,’ असे सांगून नूपुरने पद्मजाचे कुतूहल शमविले. ‘भटाला दिली ओसरी अन् भट हातपाय पसरी’ ही मजेदार म्हण सांगत स्नेहा आजीने आपली धमाकेदार एंट्री घेतली. एखाद्याला मदत करायला जाणे व त्यानेच त्याचा गैरफायदा घेणे असा अर्थ पद्मजाच्या डायरीमध्ये आपसूकच विसावला. चित्रातील ओसरी न्याहाळताना पद्मजाच्या शोधक नजरेने भिंतीवरचा खुंटपण शोधून काढला. तेव्हा स्नेहा आजी म्हणाली, ‘‘पूर्वी घरात शिरताना घरातील कर्ता पुरुष त्याचे पागोटे, फेटा किंवा पगडी खुंटीवर टांगून मगच घरात शिरायचा. ‘खुंटीवर टांगणे’ ही खुंटीवरची म्हण. याचा अर्थ होणार एखादी समाजमान्य गोष्ट बाजूला सारून ठेवणे. उदा- श्रावणामध्ये मांसाहार न करण्याचे व्रत सौमित्रने खुंटीवर टांगून ठेवायचे ठरविले आहे.’’

ओसरीवरून मुख्य घरात शिरायला असलेल्या दरवाजावरून म्हण सांगण्याची पद्मजाने विनंती केली.

मी म्हटले, आहे ना! ‘न्हाणीत बोळा अन् दरवाजा मोकळा.’ याचा अर्थ इंग्रजीमध्ये होईल ‘पेनी वाईज पाउंड फुलीश.’ छोटय़ा गोष्टीतील भ्रष्टाचार संपविताना किंवा छोटा खर्च आटोक्यात आणताना मोठय़ा भ्रष्टाचाराकडे किंवा मोठय़ा वायफळ खर्चाकडे दुर्लक्ष होणे असा एक ढोबळ अर्थ मी पद्मजाला सांगितला.

दरवाजाला असलेली कडी दाखवून मी पद्मजाला म्हटले, ‘‘या कडीवरूनदेखील एक थोडीसी वात्रट म्हण आहे. ती आहे ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली.’ याचा अर्थ पद्मजानेच शोधून काढावा.’’ अशी अट घालूनच मी शिकवणी पुढे रेटली.

एवढय़ात प्राजक्ता म्हणाली, ‘‘घरापुढील तुळशी वृंदावन, परसातली नारळी-पोफळीची झाडे, डोंगर यावरूनही काही म्हणी सांगा ना’’

मग मी पहिली म्हण, ‘भांगेतील तुळस’ ही निवडली. दुर्जनांच्या गराडय़ात सापडलेल्या सज्जन माणसाला उद्देशून ही म्हण वापरली जाते असे समाजावून मी नारळाच्या झाडांकडे वळलो. ‘देवाची करणी अन् नारळात पाणी’ हा होमवर्क असे सांगून मी पुढे काही सांगणार इतक्यात माझा मित्र लक्ष्मीकांत घरी आला. थोडे कुत्सितपणेच म्हणाला, ‘‘गुरु-शिष्येची शिकवणी झाली का?’’

मी म्हटले, ‘‘लक्ष्या, घाबरू नको मी कबूल केल्याप्रमाणे येणार आहे तुझ्याबरोबर. फक्त मला दोन मिनिटे दे.’’ पद्मजाला म्हटले, ‘‘एका मिनिटासाठी एक या नात्याने या घे दोन शेवटच्या म्हणी. पहिली आहे ‘दुरून डोंगर साजरे’ व दुसरी आहे ‘वळचणीला जाणे.’ पहिल्या म्हणीचा अर्थ होणार काही गोष्टी दुरूनच चांगल्या वाटतात, पण त्यांच्या जवळ गेल्यास त्या गोष्टीमधील उणीव दिसून येते. तर दुसऱ्या म्हणीचा अर्थ, एखाद्या व्यक्तीच्या आश्रयास जाणे. उदा- निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष क्षणिक लाभांसाठी राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला जातात. पद्मजा म्हणाली, ‘‘आता शिकवणी आवरती घेऊया कारण मित्राला ताटकळत ठेवणे बरे नाही काका.’’

मीदेखील म्हटले, ‘‘जातो मी आता. नाहीतर इतर मित्र माझी खेटराने पूजा करायला कमी करणार नाहीत.’’ अर्थात या म्हणीचा अर्थ काय हे प्रश्नचिन्ह पद्मजाच्या चेहऱ्यावर तसेच ठेवत मी काढता पाय घेतला.