विनायक परब, twitter –  @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com
जन्म आणि मृत्यू या माणसाच्या आयुष्यातील दोन्ही महत्त्वाच्या घटना. या दोन घटनांमध्येच त्याचे अवघे आयुष्य आकारास येते. मात्र या दोन्ही घटनांविषयी त्याच्या मनामध्ये अश्मयुगापासून ते आज २१ व्या शतकापर्यंत कुतूहल, जिज्ञासा आणि भीती कायम आहे. अगदी सुरुवातीच्या काळात या दोन्ही घटनांच्या अनाकलनीयतेमुळे त्याच्या मनात आधी भीतीने घर केले आणि नंतर त्यातूनच देव या संकल्पनेचा जन्मही झाला.

या जगामध्ये धर्म नावाची संकल्पनाही अस्तित्वात नव्हती, त्या वेळेस म्हणजे इतिहासपूर्व कालखंडात, अश्मयुगात माणसाच्या मनात निर्माण झालेल्या पहिल्या श्रद्धेचे जगभरात सापडलेले पुरावे हे मृत्यूशी संबंधित आहे. त्याच पायावर नंतर जगभरात विविध संस्कृतींचा पाया रचला गेला आणि विविध तत्त्वज्ञान आचरण करणारे धर्मही अस्तित्वात आले. आजही २१ व्या शतकात विज्ञानयुगात मृत्यूशी संबंधित श्रद्धा अस्तित्वात आहेत व सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर पाळल्या जातात. मरणातच जग जगते! म्हणूनच यंदा पितृपंधरवडय़ाच्या निमित्ताने त्याचा साकल्याने विचार व्हावा, या उद्देशाने ‘लोकप्रभा’ने त्यावर सविस्तर लेख प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला.

जगभरातील काही धर्मानी स्वर्ग-नरक अशा संकल्पनांचा स्वीकार केला तर काहींनी पाप-पुण्य. विविध संत-महात्म्यांनी चांगले कर्मच महत्त्वाचे हे आवर्जून सांगितले. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी
मना सज्जना हेचि क्रिया धरावी
मना चंदनाचे परी त्वां झिजावे
परी अंतरी सज्जना निववावे

मात्र मानववंशशास्त्र सांगते की, भीतीने मनात घर केलेल्या माणसाला कर्मकांडांचा आधार हवासा असतो. आज २१ व्या शतकात काही मंडळींनी त्यात थोडा बदलही केलेला दिसतो. श्राद्धकर्म टाळून त्याचे पैसे गरजूंना दान केले जातात. या पाश्र्वभूमीवर एक बुद्धकथा सूचक ठरावी.

एक अनुयायी त्याच्या आईच्या निधनानंतर भगवान बुद्धांकडे आला आणि म्हणाला की, स्वप्नामध्ये मृत आई सातत्याने येत असून बहुधा तिला गती प्राप्त झालेली नाही. ती माझी आई आहे, तिच्या या स्थितीमुळे मी अस्वस्थ आहे. तर असे काय करता येईल की, त्यामुळे तिला स्वर्गती प्राप्त होईल.. आईला स्वर्गती प्राप्त करून देणारे कर्मकांड त्याला अपेक्षित होते. अनुयायी खूपच मागे लागल्यानंतर भगवान बुद्धांनी त्याला एक मातीचे मोठे भांडे आणून त्यात लहान-मोठे दगड घालण्यास सांगितले आणि शिवाय त्यात तूपही घालण्याचा सल्ला दिला. वरच्या बाजूने एका फडक्याने ते बंद करण्यास सांगितले आणि नंतर त्याला तलावाच्या काठावर घेऊन गेले. तलावाच्या पाण्यात ते सोडल्यानंतर मोठय़ा काठीने त्या भांडय़ावर प्रहार करण्यास सांगितले.. भांडे फुटले आणि त्यातील जड दगड तलावाच्या तळाशी गेले तर तूप तलावाच्या पाण्यावर तरंगू लागले. अनुयायाने बुद्धांना विचारले, झाले का? आता आईला स्वर्गती मिळेल ना नक्की?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की, भांडे फुटल्यानंतर काय झाले? त्यावर तो अनुयायी म्हणाला की, जड असलेले दगड खाली गेले आणि हलके तूप अद्याप तरंगते आहे. त्यावर बुद्ध म्हणाले की, माणसाचेही असेच असते. स्वर्ग-नरक अस्तित्वात नाही. पाप-पुण्यही नसते. फक्त कुशल किंवा अकुशल कम्म (कर्म) तेवढेच अस्तित्वात असते. चांगले कर्म तरंगते आणि कर्म वाईट किंवा अकुशल असेल तर ते जड दगडाप्रमाणे तळाशीच जाणार. कोणतीही कर्मकांडे इतर कुणीही करून त्या गेलेल्या व्यक्तीच्या स्थितीमध्ये कोणताही बदल होत नाही. त्या व्यक्तीचे कर्मच सारे काही असते!