हनिमून म्हटले की पूर्वी लोणावळा-खंडाळा, माथेरान-महाबळेश्वर अशी ठिकाणं मराठी माणसाच्या नजरेसमोर यायची. खिशात थोडे पैसे अधिक असतील तर मग म्हैसूर, उटी, कोडाईकनाल किंवा मग सिमला-कुलू मनाली अथवा भूतलावरचा स्वर्ग म्हणून काश्मीरला पसंती असायची. आता जग बदललंय आणि मराठी माणूसही बदलला आहे. हातात दोन पैसे अधिक खुळखुळू लागले आहेत; त्यामुळे आता ‘हटके पर्यटन’ म्हणून इतर राज्यांनाच नव्हे तर थेट विदेशातील हनिमून डेस्टिनेशन्सनाही पसंती दिली जाते. म्हणूनच या खेपेस ‘लोकप्रभा’ने ‘पर्यटन विशेषांका’तील ‘हनिमून स्पेशल’मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी हटके  ठिकाणे दिली आहेत. शिवाय ज्यांना महाराष्ट्रातच जायचे आहे, त्यांच्यासाठीही काही नवीन हनिमून डेस्टिनेशन्स सुचविलेली आहेत.

अलीकडची पिढी केवळ पर्यटनासाठी म्हणून नव्हे तर हनिमून डेस्टिनेशन म्हणून देशांतर्गत ठिकाणांमध्ये केरळ, गोवा आणि काश्मीरला पसंती देताना दिसते. या सर्वच ठिकाणांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी पर्यटकांना उत्तमोत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातही काही ठिकाणे ही ‘हनिमून स्पेशल’ म्हणून खास विकसित केली आहेत. नागरकोईलहून मुन्नार तसे दूर आहे. मात्र स्टेशनवर उतरल्यानंतर मुन्नारला जाण्यासाठी दिवसाच्या कोणत्याही प्रहरी विश्वासार्ह टॅक्सीसेवा तिथे उपलब्ध असते. अशी स्थिती महाराष्ट्रात नाही. शिवाय महाराष्ट्रातील अमुक एका ठिकाणी इतर राज्यांतील पर्यटक ‘हनिमून डेस्टिनेशन’ म्हणून येतात, असे सांगायचीही सोय नाही, कारण तसे कोणतेही ठिकाण राज्य सरकारने विकसित केलेले नाही. पर्यटनाच्या बाबतीत बोलायचे तर शेजारचे गोवाही आदर्श ठरावे. पर्यटन हा केवळ व्यवसाय नाही, तर यानिमित्ताने माणसेही संस्कृतीशी जोडली जातात, हे आपण लक्षात घ्यायला हवे. इतर राज्यांतील जोडप्यांसाठी हनिमून डेस्टिनेशन ठरावे अशी ठिकाणे महाराष्ट्रातही आहेत. मात्र आपण अद्याप त्यांच्या विकासाकडे लक्षच दिलेले नाही. त्यामुळे सोयीसुविधांच्या नावाने या ठिकाणी बोंबच आहे.

असो, दर खेपेस ‘पर्यटन विशेषांका’मध्ये आजवर न आलेले असे काही वेगळे, वैशिष्टय़पूर्ण देण्याची ‘लोकप्रभा’ची परंपरा आहे. याही अंकात ती कायम असून आम्ही देशविदेशातील १० वैशिष्टय़पूर्ण व हटके  ठिकाणे दिली आहेत. यात न्युझिलंडच्या वायटोमो या जमिनीखालच्या गुहांमधील काजव्यांची लुकलुक, व्हिएतनाममधील कंदिलांचे शहर अशा अनेकविध आणि काही ना काही वैशिष्टय़ जपणाऱ्या ठिकाणांचा समावेश आहे. या वर्गवारीत फिट्ट बसेल असे ठिकाणही आपल्याला राज्यात विकसित करता आलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानिमित्ताने एवढा धडा घेता आला, तरी पुरे!
vinayak-signature
विनायक परब – twitter – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com