विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
तेलंगणामध्ये काँग्रेसचे १८ पैकी १२ आमदार पक्षाला रामराम करून तेलंगण राष्ट्र समिती या सत्ताधारी पक्षामध्ये दाखल झाले. पक्षाचे आमदार सोडून जाणार आहेत याची शक्यता वर्तविली जात होती, मात्र पक्षनेतृत्वाने त्याची फारशी दखलही घेतली नाही. जणू काही काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने त्या साऱ्याला मूकसंमती दिल्यासारखीच अवस्था होती. काँग्रेसने राजस्थानजिंकले खरे, पण तिथेही मोठय़ा कुरबुरी सुरूच आहेत. प्रदेश काँग्रेसाध्यक्ष सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यामधून विस्तवही जात नाही, अशी अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ स्वतचा मुलगा लढत असलेल्या जोधपूर मतदारसंघावरच सारे लक्ष केंद्रित केले त्यामुळे पराभव पत्करावा लागला, असा जाहीर आरोप पायलट यांनी केला, तर पलटवार करत मुख्यमंत्री गेहलोत यांनी पराभवाचे अपश्रेय पायलट यांच्या पदरात टाकले.

एका बाजूला हे सारे सुरू असताना पलीकडे पंजाबही अस्वस्थच आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट फटकेबाजी करत कप्तान मुख्यमंत्र्यांचीच गोची केली. त्यांच्यामधूनही विस्तव जात नाही, अशी स्थिती आहे. कर्नाटकातही तेथील स्थानिक नेत्यांनी जेडी (एस) – काँग्रेस युतीच्या सरकारसमोर अडचणींचे डोंगरच आपल्या कृतीने उभे केले आहेत. एकुणात काय तर काँग्रेसमध्ये सध्या यादवीसदृश वातावरण आहे. तेही अशा अवस्थेत की, ज्यावेळेस लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा जवळपास सफाया झाला आहे, मोदी सरकार पूर्ण आणि जोरदार बहुमताने सत्तेत आले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे नीतिधैर्य खच्ची झाले आहे. केवळ एकमेव आशेचा किरण म्हणून सारे काँग्रेसजन पुन्हा एकदा गांधी घराण्याकडे म्हणजेच विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे डोळे लावून बसले आहेत. आणि त्यांनी मात्र आता नेहरू-गांधी घराण्याशिवायचा काँग्रेसाध्यक्ष हवा असे म्हणून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

या अवस्थेत ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी तोंड उघडले, पक्षातील बेशिस्त मोडून काढल्याशिवाय किंवा त्यावर कारवाई केल्याशिवाय राहुल गांधी पक्षाध्यक्षपद सोडू शकत नाहीत किंवा सोडायचेच असेल तर त्यांनी सुयोग्य व्यक्ती शोधावी आणि मग पक्षाध्यक्षपद सोडावे, असे मोईली यांनी जाहीररीत्या सुचविले. आजवरचा अनुभव असे सांगतो की, काँग्रेसमध्ये गांधी घराण्याविरोधात कुणीच काही ऐकून घेण्यासाठी तयार नसते. त्यामुळे राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्ष राहावे, असा त्याचा अर्थ लावण्यात आला.

मोईली यांना नेमके काय सुचवायचे आहे, याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात आले. मोईलींच्या विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी घटनाक्रम समजून घेणेही तेवढेच आवश्यक आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न झाले. दरम्यान, सोनिया गांधी यांची निवड काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी करण्यात आली. हे सारे सुरू असताना पक्षामध्ये बंडाळी माजल्यासारखी अवस्था आहे. ही बंडाळी किंवा मोईली म्हणतात त्या प्रमाणे बेशिस्त हाताळण्याचा प्रयत्न कोणत्याही नेत्याने केलेला नाही. त्यामुळे जे आहे ते जोरदार सुरू आहे. नेतृत्वहीन जहाज भरकटते आहे, असे त्यांना सुचवायचे होते. पण पंचाईत ही आहे की, जहाज नेतृत्वहीन आहे हे मान्य करायलाच काँग्रेसची मंडळी तयार नाहीत!