17 February 2020

News Flash

मेघदूतम : कालिदासाचा एरियल व्ह्य़ू (लेखांक – ३)

रामगिरी ते अलका असा प्रवास पूर्ण करणाऱ्या मेघाला कालिदास उज्जयनी ते अलकानगरीपर्यंतच्या मार्गाचं विवरण करतो आहे.

| July 11, 2014 01:27 am

रामगिरी ते अलका असा प्रवास पूर्ण करणाऱ्या मेघाला कालिदास उज्जयनी ते अलकानगरीपर्यंतच्या मार्गाचं विवरण करतो आहे.

उन्हाळ्यात नद्यांची पात्रे अरुंद होणे हा निसर्गातला एक साधा क्रम, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा. मेघाच्या प्रवासात माळव्यातील गंभीरा ही तुलनेने छोटी नदी येते. तिच्या नावातच गंभीरत्व आहे. मुळात छोटी, त्यात उन्हाने पात्र अधिकच लहान झालेलं अशी गंभीरा. रेवा, सिंधू, वेत्रवती अशा महानद्या झाल्यावर गंभीरेसारख्या सामान्य नदीकडे पाहण्याची इच्छा कदाचित मेघाला होणार नाही म्हणून यक्ष त्याला अगदी स्पष्टच सांगतो, तुझी इच्छा असो वा नसो, तुला तिच्याकडे जावंच लागेल कारण,
तस्या किञ्चित्करधृतमिव प्राप्तवानीरशाखं
हृत्वा नीलं सलिलवसनं मुक्तरोधोनितम्बम्।
प्रस्थानं ते कथमपि सखे लम्बमानस्य भावि
ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थ:॥
उन्हाळ्यात पात्र लहान झाल्यामुळे गंभीरेचे तट उघडे पडले आहेत. तरीसुद्धा काही ठिकाणी बांबूच्या झुडपांतून पाणी साचून राहिलं आहे. हे पाहून कालिदास म्हणतो, ‘तटरूपी नितंबांवरून ओघळलेलं तिचं नीलवस्त्र वानीरशाखारूपी हातांनी ती धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत शृंगारसुखाचा अनुभव घेतलेल्या, लम्बमान म्हणजेच ओथंबून खाली आलेल्या तुला विवृतजघना अशा गंभीरेकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. प्रस्थानं ते कथमपि पुढे निघण्याचा तू कसाबसा प्रयत्न केलास तरी छायात्माऽपि प्रकृतिसुभगो लप्सते ते प्रवेशम् छायेच्या रूपात तू केव्हाच तिच्यात प्रवेश केलेला असशील.’ गंभीरेत शफर नावाचे पांढरे, चकाकणारे, चंचल मासे आहेत. कालिदासाला ते तरुणीच्या शुभ्र चमकदार डोळ्यांप्रमाणे भासतात. अशी विविध उद्दीपन गंभीरेकडे असल्याने तो म्हणतो तस्मादस्या: कुमुदविशदान्यर्हसि त्वं न धर्यान्मोघीकर्तु चटुलशफरोद्वर्तनप्रेक्षितानि गंभीरेच्या शुभ्र कमळासारख्या शफलरूपी चंचल नेत्रकटाक्षांना टाळणं तुला कधीच शक्य होणार नाही.
शृंगार हा काव्यात प्रधान असला तरी केवळ शृंगार म्हणजेच जीवन नाही याची जाणीव कालिदासाला आहे. त्यामुळे शृंगारसाबरोबर भक्तीचा झुळझुळ झरा सतत वाहत असतो. वाटेत येणाऱ्या नद्यांबरोबर शृंगार करणाऱ्या मेघाला तो आता काíतकेयाची भक्ती देतो. गंभीरेचा आस्वाद घेतल्यावर तो मेघाला देवगिरीवर जाण्यास सांगतो. ‘हाच तो देवगिरी जेथे तारकासुरावर विजय प्राप्त केल्यानंतर कुमार काíतकेयाने या देवगिरीला आपले कायमचे निवासस्थान केले आहे. येथे आल्यावर तू पुष्पाकार धारण कर आणि कुमाराला जलरूपी पुष्पांनी स्नान घाल. काíतकेयाचा जेथे निवास आहे तेथे त्याचे वाहन मयूरही आहे. तुझ्या गर्जनेने आनंदित झालेले मयूर वर्तुळात ताल धरून नृत्य करताना आपली पिसं गाळतील. त्याचे वाहन असणाऱ्या मयूरांची गळलेली पिसं पुत्रप्रेमामुळे पार्वती आपल्या कानांत धारण करेल. कालिदास निसर्गकवी आहे. त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास त्याला मान्य नाही म्हणून त्याने अगदी पार्वतीलासुद्धा कितीही पुत्रप्रेम असलं तरी मोराची पिसं कानात घालायची म्हणून ओढून न काढता, केवळ गळलेली पिसंच कानात घालायला लावली आहेत.
‘या देवगिरीवर काíतकेयाच्या पूजनासाठी सिद्ध आपली बासरी घेऊन आले आहेत. तुझ्या येण्याने त्या बासरीवर पाणी पडून त्यातून मधुर संगीत येणार नाही, अशी भीती त्या सिद्धांना आहे म्हणून या सिद्धांचा तू अडसर बनू नकोस,’ जाता जाता अशी स्पष्ट सूचना यक्ष करतो.
पावसाळ्याच्या दिवसात मेघ नदीवर ओथंबून येणं हा एक नसíगक क्रम. याच प्रदेशात चर्मण्वती नदी आहे. उन्हाळ्यात ‘वेणीभूत’ झालेल्या तिच्या प्रवाहावर मेघ ओथंबून खाली येईल ते त्याच्यातील कमी झालेलं पाणी भरून घेण्यासाठी. असा शुभ ्रनदी प्रवाहावर खाली आलेला कृष्णमेघ मोत्याच्या सरात मधोमध ओवलेला नीलमणी वाटतो. ह्य ठिकाणी कालिदास स्वत:ला फार उंच ठिकाणी ठेवून खालचं चित्र पाहत आहे असं वाटतं. आजच्या भाषेत सांगायचं तर कालिदास ‘एरियल वू’ देतो. कारण मोत्याच्या सरात ओवलेला हा नीलमणी जमिनीपेक्षा उंचावरूनच अधिक स्पष्ट होईल.
चर्मण्वतीला ओलांडून दशापूर प्रदेशातून जाताना पुन्हा एकदा तेथील स्त्रियांचे तिरके कटाक्ष मेघाला प्राप्त होणार आहेत. या उंचावलेल्या नेत्रकटाक्षांना उपमा देताना कालिदास म्हणतो, शुभ्रधवल डोळ्यांवरच्या काळ्याभोर पापण्या उचलल्या जातील तेव्हा ते शुभ्र कुंदकळ्यांवरील भ्रमरांसारख्या शोभून दिसतील.
चर्मण्वतीला ओलांडून पुढे गेल्यावर येतो तो सरस्वती आणि दृशद्वती नद्यांच्या मधील ब्रह्मावर्त प्रदेश. भौगोलिकदृष्टय़ा कुरुक्षेत्राच्या जवळ व हस्तिनापूरच्या आग्नेयेला असलेला प्रदेश. काíतकेयाच्या दर्शनाने प्राप्त झालेला भक्तिरस कालिदासाच्या मनात अजूनही तसाच आहे. येथे अनेक तीर्थक्षेत्र असल्याने कालिदास या प्रदेशाचे दर्शन घेण्यास सांगतो. तो मेघाला सांगतो,
ब्रह्मार्वत जनपदमथ च्छायया गाहमान:
क्षेत्रं क्षत्रप्रधानपिशुनं कौरवं तद्भजेथा:।
क्षत्रप्रधानपिशुन अशा ह्य ब्रह्मावर्तात तू छायारूपाने प्रवेश कर. हा प्रदेश तीर्थक्षेत्रांनी युक्त आहे. पण येथेच महाभारतही घडले आहे. हा इतिहास कालिदासाच्या मनात आहे. म्हणूनच तो या प्रदेशाचे क्षत्रप्रधानत्व व्यक्त करतो. पुढल्या दोन ओळीत मेघाला अर्जुनाची उपमा देताना तो म्हणतो, ‘तू वर्षांरूपी बाण कमलांवर मारतोस तसेच येथे आपले शेकडो धारदार बाण अर्जुनाने क्षत्रियांच्या मुखकमलावर मारले होते.’ यातील कमलावर जलवर्षांव झाला की ती ज्याप्रमाणे विदीर्ण होतात त्याप्रमाणे क्षत्रियांची मुखकमलं अर्जुनाच्या बाणांनी विदीर्ण झाली, ही खरी व्यंजना आहे.
या नंतर महत्त्वाचं तीर्थस्थळ येतं ते कनखल. या ठिकाणी जन्हुकन्या गंगा वेगाने फेसाळत आहे. नदी असो किंवा सागर त्याचा फेस हा त्या जलसाठय़ाचं हास्य मानला आहे. कालिदास पुराणातील कथेचा उपयोग करून फेसाच्या मिषाने गंगा कुणाला व का हसते आहे ते सांगतो. स्वर्गातून उतरलेली गंगा आपला मार्ग तयार करत वेगाने पुढे जात होती. तिच्या मार्गात जन्हुराजाची यज्ञस्थली आली. पण त्यालाही न जुमानता ती पुढे जाऊ लागल्यावर संतप्त जन्हुने तिला प्राशन केले. कालांतराने त्याचा राग शांत झाल्यावर त्याने गंगेला आपल्या कानातून मुक्त केले. तेव्हापासून गंगा जन्हुतनया झाली. पण मुळात स्वर्गातून पृथ्वीवर आली ती शंकराने आपल्या मस्तकावर धारण केली. तेव्हापासून ती त्याच्याच मस्तकावर आहे. गंगा आणि पार्वती या दोघी शंकराच्या पत्नी मानल्या गेल्या आहेत. पण दोघींमध्ये गंगेच स्थान उच्च कारण पार्वती शंकराच्या मांडीवर बसते तर गंगा त्याच्या मस्तकावर. स्वाभाविकच गंगा आपल्या फेनमिषाने पार्वतीला हसत आहे.
या गंगेला प्राशून घेण्यासाठी लंबाकृती मेघ खाली ओणावेल तेव्हा त्याचा सावळ्या वर्णामुळे व लंबाकृतीमुळे यक्षाला जणू काही तो गंगायमुनेचा संगम वाटतो.
गंगा यमुनेच्या संगमाचा आनंद लोकांना दिल्यावर मेघाला पुन्हा थोडं वरच्या दिशेला जायचं आहे. त्यानंतर येतो तो हिमालय. हिमालय कस्तुरीमृगांसाठी प्रसिद्ध. म्हणून यक्ष सांगतो, कस्तुरीमृगांच्या नाभीतून बाहेर पडणाऱ्या सुगंधाने सुगंधित झालेले खडक जेथे आहेत अशा त्या हिमालयाच्या शिखरांवर विश्रांती घ्यायला थांब. येथील कस्तुरीच्या सुगंधाने तूही सुगंधित होशील. शिवाय हिमालय म्हणजे प्रत्यक्ष शिवाचे वसतिस्थान आणि जिथे शिव तिथे नंदी. या नंदीला सवय आहे ती पायाने माती उकरण्याची त्यामुळे नंदीने आपल्या खुरांनी खणलेली हिमयुक्त माती येथे सर्वत्र पसरली आहे. तू येथे विश्रांतीसाठी थांबशील तेव्हा त्या शुभ्र मातीमुळे तुलाही शुभ्र तेज प्राप्त होईल.
यानंतर यक्ष मेघाला सज्जनत्वाचा उत्कर्ष साधण्याची संधी देतो. हिमालयावर सर्वत्र सरलद्रुम आहेत. यांच्या घर्षणाने वणवा पसरतो आणि चमरी जातीच्या हरिणींच्या रेशमासारख्या मुलायम शेपटय़ा पेटतात. अशा वेळी निराधार झालेल्या या हरिणींच्या शेपटय़ांची आग तुझ्या सहस्रधारांनी शमन कर कारण, आपन्नाíतप्रशमनफला: संपदो त्तमानाम् उत्तम लोकांची संपत्ती ही दु:खितांच दु:ख दूर करण्यासाठीच असते.
हिमालय आणि कालिदास यांचं अद्वैत आहे. कालिदासाच्या साहित्यात हिमालय कुठेना कुठे येतच असतो. शाकुंतल नाटकात शकुंतलेच्या दुष्टग्रहांची शांती करण्यासाठी कण्व हिमालयात गेलेले असतात तर रघुवंशात राजा दिलीप नंदिनीची सेवा करायला हिमालयात जातो. कुमारसंभवात सारी कथा घडते ती हिमालयात आणि मेघदूतातील यक्षाचे निवासस्थान आहे तेही हिमालयात. या हिमालयातील अनेक गोष्टींची वर्णनं कालिदास अगदी रंगून करतो. येथील देवदारूंवर हत्तींनी गंडस्थळं घासल्याने त्या वृक्षांतून बाहेर येणारा सुगंधी रस वातावरण सुगंधी करतो, सिंहांनी हत्तींची गंडस्थळं फोडल्यावर हिमालयातील मार्गावर त्यांच्या गंडस्थलांतील मोती विखुरली जातात आणि चमरी हरणांच्या शेपटय़ा अचलराज हिमालयावर चवऱ्या ढाळतात. या चमरी हरणांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या शेपटीचे केस पांढरेशुभ्र व अतिशय मुलायम असतात. त्यांच्यापासूनच देवाला किंवा राजाला ढाळायच्या चवऱ्या केल्या जातात.
कनखलजवळ असलेल्या ‘हर की पौडी’चा संदर्भ कालिदास देतो. या ठिकाणी असलेल्या हराच्या पदचिन्हाला प्रदक्षिणा घाल. त्या चिन्हाच्या केवळ दर्शनाने सर्व पापं दूर होतात, असा लोकांचा विश्वास आहे. येथील कीचक म्हणजे बांबूंमधून निर्माण झालेलं संगीत हे किन्नरींबरोबर केलेलं निसर्गाचं सहसंगीत आहे. येथे शिवाच्या त्रिपुरावरील विजयाने आनंदित झालेल्या किन्नरी गात आहेत. अशा वेळी तुझा आवाज तिथल्या गव्हरांतून निनादेल तेव्हा बासरी व पटध्वनी यांनी युक्त अशा पूर्ण संगीत जलशाचा भास निर्माण होईल. कालिदासाच्या काही कल्पना पुन्हा पुन्हा येताना दिसतात. अगदी अशीच कल्पना त्याच्या कुमारसंभवात येते. तेथेही मानवरूप धारण केलेल्या हिमालयाला किन्नरांबरोबर गाण्याची लहर येते आणि तो दऱ्यांच्या मुखातून उठणाऱ्या वायूद्वारे बांबूंची रंधं्र भरतो तेव्हा जे निसर्गसंगीत येतं ती हिमालयाची तान आहे, असं कालिदासाला वाटतं.
‘किन्नरी स्त्रियांबरोबर गाऊन झाल्यावर तू थोडा वरच्या बाजूला गेलास म्हणजे फार महत्त्वाच्या ठिकाणी पोचशील. रावण आपल्या पुष्पक विमानातून फिरत असताना त्याला नंदीने अडवलं. रावण संतापला व कैलासाचे शिखरच उपटू लागला. त्या वेळी शंकराने केवळ अंगठय़ाने ते दाबून ठेवले. कैलासाच्या स्फटिक शुभ्रतेमुळे त्याची शिखरं देव-स्त्रियांकडून दर्पण म्हणून वापरली जातात’. संस्कृत साहित्यात हास्य हे शुभ्र आहे म्हणून कालिदास सांगतो, राशीभूत: प्रतिदिनमिव त्र्यम्बकस्याट्टहास: शंकराच्या अट्टहास्याची राशीच अशा कैलासाचा अतिथी बनण्याचं भाग्य तुझ्या नशिबी आहे.
आपल्या नायिका रेखाटताना कालिदास फार हळवा होतो. त्यात पार्वतीच्या बाबतीत तो तटस्थ राहूच शकत नाही. तारकासुराने त्रासल्यामुळे निर्माण झालेली भयंकर परिस्थिती आणि त्या पाश्र्वभूमीवर पार्वतीच्या जन्माची नितांत आवश्यकता, मग स्थावर जंगम अशा सर्वाना आनंददायी ठरलेला तिचा जन्मदिवस, पार्वतीचं बालपण, तिचं मुग्धयौवन, तरुण पार्वती, शंकराची सेवा करताना स्वसौंदर्याचा किंचित अहंकार असलेली आणि त्यामुळेच शंकराला आपण सहज जिंकू असा विश्वास बाळगणारी, संतप्त शंकराने केलेला मदनदाह बघून थरथरणारी, उद्ध्वस्त पार्वती, काही कालानंतर शंकरापेक्षाही कठोर तप करून त्याला जिंकून घेईन असा कृतनिश्चय केलेली आणि अगदी तसंच वागणारी, शंकराची िनदा करणाऱ्या बटूवर संतापलेली, प्रत्यक्ष शंकराला समोर पाहून थांबूही न शकणारी आणि तिथून निघूही न शकणारी, तिचा हात धरून मी तुझा दास आहे असं म्हणणाऱ्या शंकरालाही दाता मे भूभृतां असं सांगून मला रीतसर मागणी घाल असं ठणकावून सांगणारी पार्वती, विवाहातील सलज्ज पार्वती, शंकराच्या बाहुपाशातील विलासिनी आणि अवघ्या सहा दिवसांच्या आपल्या पुत्राला युद्धावर निघालेला असताना मी वीरमाता आहे, शत्रूला मारून मला कृतार्थ कर असं सांगणारी कर्तव्यकठोर पार्वती अशी पार्वतीची अनेक रूपं त्याने कुमारसंभवात दाखवली आहेत. ज्या हळुवार तन्मयतेने कालिदासाने पार्वती रेखाटली आहे ते पाहून असं वाटतं जणू हाच हिमालय बनला आहे आणि आपल्या कन्येचं गुणवर्णन करतो आहे.
येथेही कैलास म्हटल्यावर पार्वती आलीच. पण कालिदासाला गरीब शंकराशी विवाह केल्यामुळे पार्वतीला होणाऱ्या कष्टांची जाणीव आहे. शंकरासह पायात काहीही न घालता फिरणाऱ्या पार्वतीच्या स्मरणाने अत्यंत हळुवार होत तो मेघाला त्याच्या सगळ्या सिद्धींचा वापर पार्वतीच्या सुखकर प्रवासासाठी करायला सांगतो,
तस्मिन्हित्वा भुजगवलयं शम्भुना दत्तहस्ता
क्रीडाशैले यदि च विहरेत्पादचारेण गौरी।
भङ्गी भक्त्या विरचितवपु: स्तम्भितान्तर्जलौघ:
सौपनत्वं कुरु मणितटारोहणायाग्रचारी॥
शिवाच्या हातात नेहमी सर्पाचं कडं असतं. पार्वतीचा हात हातात घेऊन फिरताना तरी त्याने ते काढावे अशी यक्षाची पर्यायाने कालिदासाची अपेक्षा आहे. म्हणून तो तस्मिन्हित्वा भुजगवलयं असं अगदी मुद्दाम सांगताना दिसतो. पण कडं काढलं म्हणून सगळे भोग संपत नाहीत. नवऱ्याबरोबर फिरताना तिच्या पायातही काही नसेल अशा वेळी हवा तो आकार घेण्याची सिद्धी लाभलेला तू आपल्यातील पाणी आवरून घेत पायऱ्यांसारखा आकार धारण कर. म्हणजे पार्वतीचं फिरणं सुखकर होईल.
यानंतर मेघाला दिसणार आहेत त्या सुरकन्या. या अत्यंत आनंदित झालेल्या सुरकन्या इंद्राच्या वज्राने आघात झालेल्या मेघाचा धारायंत्रासारखा (शॉवरसारखा) उपयोग करतील. कालिदास येथे थोडा खोडकर झाला आहे. तो मेघाला या कन्यांची चेष्टा करायला सांगतो. तो म्हणतो, तुझ्याकडील पाण्याने त्यांचा घाम दूर झाला नाही तरी तू तुझ्या गडगडाटाने त्यांना घाबरवण्याची मजा तू घे.
कुठे पार्वतीप्रती असलेली आपली भक्ती दाखवत तर कुठे सुरकन्यांच्या खोडय़ा काढत जरा पुढे गेल्यावर मेघाला दर्शन होणार आहे ते अलकेचं.
मेघदूत हे विरहकाव्य. यक्षाला सतत स्मरण होत आहे ते आपल्या प्रिय पत्नीशी केलेल्या शृंगाराचं. त्यामुळे निसर्गातील गोष्टींतसुद्धा ज्याला आपण पारखे झालो ते सुख शोधण्याचा प्रयत्न यक्ष पुन्हा पुन्हा करताना दिसतो. भारतीय परंपरेत मेघ हा पुरुष व नदी ही त्याची पत्नी असा संकेत आहे. म्हणूनच वाटेतील प्रत्येक विरहार्त नदीला तो मेघाला तृप्त करायला सांगतो. स्त्री आणि पुरुष हा संकेत केवळ नदी आणि मेघापुरता न राहता यक्षाला अलका आणि कैलास हेदेखील प्रेमी युगुल भासते.
तस्योत्सङ्गे प्रणयिन इव स्त्रस्तगङ्गादुकूलां
न त्वं दृष्ट्वा न पुनरलकां ज्ञास्यसे कामचारिन्।
या व: काले वहति सलिलोद्गारमुच्चर्वमिाना
मुक्ताजालग्रथितमलकं कामिनीवाभ्रवृन्दम्॥
पर्वताच्या उतारावर वस्ती वसते. इथेही कैलासाच्या उतारावर ‘उच्च: विमाना’ अशी अलकानगरी वसली आहे. विमान शब्दाचा एक अर्थ व्योमयान अर्थात अवकाशातील यान असा आहे तर दुसरा अर्थ सप्तभूमिक भवन असाही आहे. येथे अलका सातमजली प्रासादांनी युक्त अशी नगरी आहे. पण कालिदासासाठी अलका आणि कैलास होतात नायिका आणि नायक. पूर्वी नगरीतील प्रासाद शुभ्र रंगांचे असत हे लक्षात घेऊन यक्ष म्हणतो, तुझ्यासारखे अनेक मेघ जेव्हा या अलकेवर पसरतील तेव्हा त्यांतून अधूनमधून दिसणारे शुभ्र प्रासाद काळ्या केसांत गुंफलेल्या शुभ्र मोत्यांप्रमाणे भासतील. अशी ही केसात मोती माळलेली अलका, गंगारूपी रेशमी वस्त्र आपल्या अंगावरून झुळझुळत सोडून देत आपल्या भव्य अशा कैलास प्रियकराच्या अंगावर मुक्तपणे पसरली आहे.
येथे पूर्वमेघ संपतो. कालिदासानेच तेराव्या श्लोकात सूचकपणे आपल्या या खंडकाव्याचे दोन भाग असल्याचे सांगितले आहे,
मरग तावच्छृणु कथयतस्त्वत्प्रयाणानुरूपं
संदेशं मे तदनु जलद श्रोष्यसि श्राव्यबन्धम्॥
तुझ्या जाण्यास योग्य असा मार्ग तू प्रथम ऐक आणि त्यानंतर तू माझा श्रवणीय असा संदेश ऐकशील. याचाच अर्थ पहिला भाग आहे मार्गाचा व दुसरा आहे तो प्रत्यक्ष संदेश. त्यामुळे रामगिरी ते अलका असा प्रवास आता मेघाने पूर्ण केला आहे. अलकेत आल्यावर आता काय काय घडणार आहे आणि यक्षाचा आपल्या प्रिय पत्नीला दिलेला काय संदेश आहे ते आता ऐकायला मेघ उत्सुक आहे..
या लेखातील ‘मेघदूता’ची चित्रे ‘कालिदासानुरूपम्’ या वासुदेव कामत यांच्या चित्रमालिकेतील आहेत.
१ी२स्र्ल्ल२ी.’‘स्र्१ुंँं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे

First Published on July 11, 2014 1:27 am

Web Title: meghadoot 3
टॅग Monsoon
Next Stories
1 मान्सून डायरी : काझीरंगा आणि माजोली!
2 मुलाखत : कलाकार म्हणून मी नेहमी असमाधानीच – अमिताभ बच्चन
3 अर्जुन कधीच म्हातारा होणार नाही!
Just Now!
X