कव्हरस्टोरी
श्रद्धेने केली जाणारी कोणतीही गोष्ट म्हणजे श्राद्ध, ही संकल्पना आपल्यापैकी किती जणांना माहीत असते?
दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध घालायचे ही परंपरा मुळात आली कुठून?
श्राद्ध हा प्रामुख्याने ‘विधी’ म्हणून समाजात ओळखला जात असला तरी त्यापलीकडे एक वैशिष्टय़पूर्ण संकल्पना म्हणून तिचे महत्त्व विशेषत्वाने आहे. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण व पूजन करण्यासाठी प्राचीन धर्मशास्त्रकारांनी ही संकल्पना मांडली. विविध देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करणे, देवतांचे पूजन करणे यांसारख्या कृतींचे आचरण केले जाऊ लागले. त्याचप्रमाणे दिवंगत पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या स्मरण-पूजनाची स्वतंत्र व्यवस्था श्राद्धाच्या माध्यमातून योजली गेली असावी.
िहदू धर्मसंस्कृतीतील प्राचीन ग्रंथ म्हणून मान्यता पावलेल्या संहितामध्ये पितरांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. व्यक्तीच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या दहनकर्मप्रसंगी केलेल्या प्रार्थना ऋग्वेदामध्ये आहेत. मृत झालेल्या व्यक्तीला कोणताही त्रास न होता त्याच्या शरीराचे दहन व्यवस्थित पूर्ण व्हावे अशी भावना त्यामागे आहे. पितरांनी वैभवाचा उपभोग घ्यावा. पृथ्वीवरील भक्तांचे रक्षण करावे अशा प्रार्थनाही वैदिकांनी केल्या आहेत. यजुर्वेदामध्ये पितरांसाठी यज्ञामध्ये काही विशिष्ट आहुती देण्यास सांगितले गेले आहे. अथर्व वेदामध्ये पितरांना नमस्कारपूर्वक िपड अर्पण करण्याचे सुचविले आहे.
देवतांप्रमाणेच आपल्या दिवंगत पूर्वजांबद्दल जो आदर वैदिकांच्या मनात होता त्याचे प्रकटीकरण करायला येथे सुरुवात झाली असावी. कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर पितरांकडून अभय, सुख, संतती, संपत्ती याची अपेक्षाही वैदिकांनी केलेली दिसते.
संहितामधील विविध संकल्पना ब्राह्मण ग्रंथ नावाच्या साहित्यातून व्यक्त केल्या गेल्या. शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व शतपथ ब्राह्मण या ग्रंथाने पितरांसाठी स्वतंत्रपणे पिण्ड पितृ यज्ञ नावाचा विधी मांडला. या विधीमध्ये मांडल्या गेलेल्या सव्य-अपसव्याच्या संकल्पना आजही श्राद्ध विधीचा महत्त्वाचा भाग आहेत. िपड पितृ यज्ञाच्या माध्यमातून दिवंगत वडील, आजोबा, पणजोबा यांच्यासाठी िपड देणे, वस्त्राची दशी अर्पण करणे, अग्नीत आहुती देणे यांसारख्या क्रियाकलापांना प्रारंभ झाला.
गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे यांसारख्या वाङ्मयांमध्येही पितरांसाठी स्वतंत्रपणे करावयाच्या विधीची मांडणी केली गेली. विविध काळातील आश्वलायन, बौधायन गौतम इ. सूत्रकारांनी पितरांसाठी विधीचे स्वरूप वर्णन केले. या विधीच्या जोडीनेच श्राद्धप्रसंगी कुलीन, वेदज्ञ, सदाचारी ब्राह्मणांना भोजनास बोलविण्याची संकल्पना पुढे आली. या जोडीने अशौच विचार म्हणजेच सुतकाची संकल्पनाही मांडली गेली.
श्रद्धा महत्त्वाची
आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण आपण साग्रसंगीत विधीपूर्वक करावे पण काही अपरिहार्य कारणाने तसे करणे शक्य नसेल तर श्राद्ध तिथीला करण्यासारखे विविध पर्याय धर्मशास्त्र नमूद करते. गाईला गवताचा भारा घालणे, श्राद्ध विधीचे वाचन करणे, गरजूला दान देणे, हे ही जमले नाही तर चक्क दक्षिण दिशेला तोंड करून रडावे! असे हे पर्याय होत. आधुनिक काळाचा विचार करता आपण आपल्या सोईने दिवंगतांचे स्मरण केले तर तेही उपयुक्त होईल. फक्त तसे करताना दिवंगताविषयीचा प्रेम, जिव्हाळा, आदर व श्रद्धा आपल्या मनात असणे अत्यंत आवश्यक आहे.
श्राद्ध प्रसंगी समाज व पर्यावरण उपयुक्त दाने देण्यास पुराणांनी सुचविले आहे. त्यासाठी ’गरजू ओळखून दान करावे. आपल्या दिवंगत पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केलेले असते त्यामुळे आपण गुणवत्तापूर्ण आयुष्य जगू शकतो. आपल्या वंशजानांही जर असे चांगले आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी पर्यावरण रक्षण ही काळाची गरज बनली आहे. श्राद्ध प्रसंगी वृक्षारोपण अनाथ प्राण्यांना दत्तक घेणे, पाण्याच्या साठवणीच्या उपाय योजनांना सहाय्य असे उपक्रमही करता येतील. समाजाच्या हितासाठी रक्तदान, नेत्रदानाचे संकल्पही दिवंगतांच्या स्मरणार्थ करणे शक्य आहे.
रामायण व महाभारत या महाकाव्यांमध्येही श्राद्ध विधीचे विकसित स्वरूप आढळून येते.
राजा दशरथाच्या निधनानंतर श्रीराम वनवासात असताना भारताने दशरथाचे औध्र्वदेहिक संस्कार व श्राद्ध संपन्न केले. ब्राह्मणांना अनेक मौल्यवान दाने दिली. वनवासात श्रीरामाला ही वार्ता समजताच वनात त्याला जे सहज उपलब्ध झाले त्याचा वापर करून रामाने आपल्या वडिलांसाठी तर्पण व श्राद्ध केले.
महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्मांनी युधिष्ठिराला श्राद्ध विधीचे महत्त्व विशद केले.
स्मृती ग्रंथापकी मनू, याज्ञवल्क्य, नारद, शंख लिखित देवल अशा विविध ग्रंथकारांनी श्राद्ध विधीचे महत्त्व सांगून श्राद्ध विधीचे विकास पावलेले स्वरूप मांडले. श्राद्धाचे स्वरूप यावर मनूने सांगितले आहे की, कितीही शक्यता असली तरी श्राद्धाचा अधिक विस्तार करू नये. स्मृती ग्रंथांनी त्या त्या सामाजिक, धार्मिक परिस्थितीचा विचार करून समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी अनेक नियम आपल्या ग्रंथातून मांडले आहेत.
यानंतर पुराण ग्रंथांनीही श्राद्ध विधीला महत्त्व दिले. विशेषत: गरुड पुराण व्यक्तीच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या सर्व क्रियाकलापांची विशेषत्वाने मांडणी केली. पुराण ग्रंथांनी श्राद्धप्रसंगी दिवंगताच्या संतोषार्थ विविध दाने ब्राह्मणांना देण्यास आवर्जून सांगितले. गरुड पुराणाचा प्रेतकल्प (उत्तरार्ध) व्यक्तीच्या निधनानंतर वाचण्याची प्रथा आहे. त्यामुळे ते पुराण अशुभ मानले जाते. तथापि गरुड पुराणाच्या पूर्वार्धात आयुर्वेद, रत्नशास्त्र अशा विविध उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन आहे. पण त्याकडे आपले लक्षच जात नाही.
पितरांच्या प्रार्थनापासून सुरू झालेला हा प्रवास अशा प्रकारे विस्तृत श्राद्ध विधीपर्यंत येऊन पोहोचतो. खरे तर हा विषय प्रबंधाच्या मांडणीसाठी योग्य असल्याने येथे अगदीच सारांश रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या सर्व विवेचनाचा मथितार्थ असा आहे की, श्राद्ध ही श्रद्धेने करावयाची उदात्त संकल्पना आहे. आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून या संकल्पनेकडे पाहायचे झाल्यास असे म्हणावेसे वाटते की, श्राद्ध ही भावना जर पवित्र मानली जाते तर ज्या श्रद्धेतून श्राद्ध संकल्पना अस्तित्वात आली ती श्राद्ध संकल्पना अशुभ, अपवित्र का मानली जावी?
आपल्यामध्ये वर्षांनुवष्रे वावरणारी, आपल्या मायेने, प्रेमाने आपल्यापकीच एक असणारी व्यक्ती तिच्या निधनानंतरही आपल्यावर तितकाच स्नेहभाव बाळगेल ना? त्यामुळे आपल्या दिवंगत पूर्वजाविषयी आपल्याला भय वाटण्याचे कारण काय? जिवंतपणी आस्थेने एखाद्या व्यक्तीच्या इच्छा जाणून घेऊन त्या त्यांच्या हयातीतच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी निधनानंतर कोणत्याही पक्ष्याच्या / प्राण्याच्या सहाय्याची गरज का भासावी?
ज्ञान प्रबोधिनी या संस्थेमध्ये श्राद्धाकडे या भावात्मक भूमिकेतून पाहण्यास सुचविले जाते. सर्व कुटुंबीयांनी, स्नेहीजनांनी एकत्र येऊन दिवंगताच्या चांगल्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करावे व त्यांचा आदर्श पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असा ज्ञान प्रबोधिनीचा यामागील हेतू आहे.
पिढय़ान्पिढय़ा परंपरेनुसार श्राद्धविधी केले जातात. व्यक्तीच्या निधनानंतर केले जाते ते श्राद्ध आणि शुभकार्याच्या आरंभी पूजनात दिवंगतांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून केले जाते तेही नांदी ‘श्राद्ध’च. वस्तुत: श्रद्धय़ाकृतं तेन श्राद्धम्। म्हणजेच श्रद्धापूर्वक केलेले कृत्य म्हणजे श्राद्ध.
प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत दिवंगत पूर्वजांचे स्मरण, प्रार्थना केली जात असे. नंतर काळाच्या ओघात या प्रार्थनांच्या जोडीने पितरांसाठी काही विशिष्ट कृत्य केले जाऊ लागले. त्यानंतर केवळ दिवंगतांसाठी केल्या जाणाऱ्या विधीला ‘श्राद्ध’ असे स्वतंत्र नाव मिळाले.
दिवंगतांच्या स्मरणार्थ विविध श्राद्धे संपन्न करण्यास धर्मशास्त्रकारांनी मार्गदर्शन केले आहे. व्यक्तीच्या निधनानंतर केली जाणारी श्राद्धे, दरवर्षी निधनतिथीला केले जाणारे वर्षश्राद्ध, पितृ पंधरवडय़ात केले जाणारे महालय, तीर्थक्षेत्री गेल्यावर करावयाची तीर्थश्राद्धे अशी विविध श्राद्धांची योजना आढळून येते.
भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष याला ‘महालय’ म्हटले जाते. या पंधरा दिवसांमध्ये दिवंगत पितर पितृलोकातून पृथ्वीलोकात राहण्यासाठी येतात असे मानले जाते. त्यामुळे त्यांचे स्मरण-पूजन होणे आवश्यक मानले गेले आहे. मध्ययुगीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षांचा प्रारंभ होत असे. त्यापूर्वीचे मागील वर्षांचे शेवटचे दोन आठवडे पितरांच्या पूजनासाठी योजून ठेवले जात. ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे ज्यांची ज्यांची आपल्याला मदत झालेली असते अशा सर्व दिवंगतांचे स्मरण हा आपल्या संस्कृतीतील हृद्य भाग मानावा लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञतेचे महत्त्व विशेष आहे व ते पितृपक्षाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते.
महालय श्राद्धामध्ये आपले दिवंगत, आप्तस्वकीय, आपल्या कुटुंबात राहून गेलेले पशु-पक्षी, सेवक या सर्वाबद्दलच कृतज्ञता व्यक्त केली जाते. आई-वडील, काका-काकू, आत्या, मामा-मामी, भाऊ-बहीण, सावत्र नातेवाईक, सेवक, पशु-पक्षी या सर्वासाठी पिंडदान केले जाते. इतकेच नव्हे तर धर्मपिंडही दिले जातात. ज्यांच्यावर निधनानंतर कोणताच संस्कार झालेला नाही असे आपल्याला ज्ञात-अज्ञात असलेले सर्व जण, पशु-पक्षी, किडे-मुंगी, झाडे अशा सर्वच दिवंगत आप्तांसाठी हे धर्मपिंड दिले जातात. ‘हे विश्वचि माझे घर’ हीच भावना महालय श्राद्धामध्ये दिसून येते. अलीकडे कुटुंबांमध्ये फार तर तीन पिढय़ांपर्यंतचे आप्त माहिती असतात. त्याव्यतिरिक्त अन्य आप्तांचा इतिहास जाणून घेणे, आपला वंशवृक्ष समजून घेणे, त्यातील सदस्यांचा आदर करणे हाही महालयातील एक वैशिष्टय़पूर्ण हेतू म्हणता येईल.
ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने महालयामध्ये श्राद्धविधी केले जातात. त्यातले केवळ दिवंगत वडील-आजोबा, पणजोबा किंवा आई-आजी, पणजी यांच्यासाठी पिंडदान प्रामुख्याने केले जाते. गेली दोन वर्षे पुण्यात सर्वशास्त्रीय ब्राह्मण सेवा संघाच्या माध्यमातून सामूहिक पिंडदानाचे आयोजन केले जाते. पुरुषांच्या जोडीने त्यात स्त्रियांनीही सहभाग घेऊन पिंडदान केले.
विविध श्राद्धांच्या निमित्ताने विविध दाने देण्यासही आपल्या संस्कृतीने महत्त्व दिले आहे. अध्ययन- अध्यापन व पौरोहित्य यावर चरितार्थ अवलंबून असणाऱ्या गरजू ब्राह्मणांना उपयुक्त ठरतील अशी दाने दिली जात. कोरडा शिधा, वस्त्र, जानवे, छत्री, चपला, बिछाना, पाण्याचा घडा, दिवा अशीही दाने आहेत. याच जोडीने श्राद्धाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांला- ब्राह्मणाला ग्रंथ देणे, वृक्षारोपण, उद्याने बांधणे, जलाशय बांधणे, अनाथ प्राण्यांचे रक्षण करणे अशी समाज व पर्यावरणाला उपयुक्त दानेही पुराणग्रंथांनी सांगून ठेवली आहेत. त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन आधुनिक काळात आवश्यक आहे.
बदलत्या काळाचा विचार करता श्रद्धेने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या स्मरणार्थ गरजू व्यक्ती वा संस्थांना उपयुक्त दान करणे यातून मिळणारे समाधान खचितच विशेष आहे.
(लेखिका ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील पौरोहित्य उपक्रमाच्या प्रमुख आणि धर्मशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)