हिंदी सिनेमा आणि पावसाचं एक अतूट नातं आहे. वेगवेगळ्या सिनेमांमधून ते कसं उलगडलं आहे?

हिंदी सिनेमातील पाऊस हा केवढी तरी मुसळधार दृश्य-मालिका सांगणारा विषय आहे. चित्रपटाचे नाव (बरसात, बारीश, बरसात की एक रात), ‘बारीश गाणी’ (अशी किती सांगायची? ‘ओले’ छायागीत होईल), चिंब नायिका (चलती की नाम गाडीच्या ‘मधुबाला’पासून ‘आशिकी २’च्या श्रद्धा कपूपर्यंत, प्रत्येक काळात नायिका भिजली आहे.. त्यामुळे जी ‘कोरडी’ राहिली तिच्याबाबत रसिकांना ‘ओलावा’ वाटला नसेल) पावसात मारहाण (येथे ‘अ‍ॅक्शन दिग्दर्शक दिसतो’ असे म्हणू या का?) वगैरे वगैरे वगैरे. नायकांत राजेश खन्ना सर्वाधिक वेळा पावसात भिजलाय. (अजनबी, अपना देश, रोटी, प्रेमनगर, प्रेम कहाणी.. चित्रपटांची यादी वाढत जाईल.) नायिकांत झिनत अमानने पावसात भिजण्याचा उत्स्फूर्त आनंद घेतलाय. (रोटी कपडा और मकानच्या अरे हाय हाय यह मजबूरी या गाण्यात ती कोसळणारा पाऊस विसरून नाचलीय.. अजनबी, सत्यम शिवम सुंदरम इत्यादी चित्रपटांतूनही पावसाने तिला चिंब केले.) शिल्पा शिरोडकरला भिजवण्याची हौस दिग्दर्शकांनी अनेकदा पूर्ण केली आहे. तिलक, गोपी कृष्ण, त्रिनेत्र, कृष्ण कन्हय्या अशी शिल्पा भिजलेल्या चित्रपटांची यादी वाढत जाते.

.. या साऱ्या पावसाळी हुकमी दृश्यांव्यतिरिक्तही हिंदी चित्रपटांतून पाऊस आला, न आला..
त्याच वेगळय़ा पावसाचे काही थेंब.. दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’मध्ये पाऊस लांबल्याने हवालदिल झालेले शेतकरी आणि त्यामुळे कर्ज फिटवता येत नसल्याने ते वसुलीसाठीचा जमीनदाराचा त्रागा या कोंडीतून कथानक सुरू होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी एक व्यथित शेतकरी (बलराज साहनी) आपल्या कुटुंबासह कोलकता (पूर्वीचे कलकत्ता) शहरात येतो. आणि तेथे तो रिक्षा ओढण्याचा (मानवी रिक्षा) व्यवसाय करतो. भर उन्हात त्याला ते कष्ट उपसावे लागतात. शहरातील उद्धटपणाचाही त्याला काही वेळा अनुभव घ्यावा लागतो. गावी परतावे तर पावसाअभावी शेती खोळंबलेली, अशा विचित्र कोंडीतून तो सहकुटुंबपणे जगण्याचा प्रयत्न करतो.
आर. के. फिल्मच्या चित्रपटात ‘बरसात’ व त्यात चिंब होणारी नायिका हे समीकरण जणू ठरलेले. दिग्दर्शक राज कपूरच्या पडदाभरच्या दृश्य सौंदर्यातील हा मनोरंजनाचा जणू हुकमी एक्का. ‘बरसात’ (नार्गिस) या चित्रपटापासून ‘मेरा नाम जोकर’ (पद्मिनी) या चित्रपटापर्यंत राज कपूरने आपल्या ‘शोमन’ दिग्दर्शनशैलीत आपल्या नायिकांना भिजवले. ‘जोकर’नंतर राज कपूरने स्वत:च्या दिग्दर्शनात स्वत: ‘नायक’ साकारणे थांबवले (तेव्हाच्या त्याच्या वयाची व काळाची ती गरज होती.) ‘बॉबी’पासून राज कपूरमधल्या दिग्दर्शकाने नायिकांचे सौंदर्य अधिक पारदर्शक व ‘देखणे’पणाने साकारले. ‘सत्यम शिवम सुंदरम’- मधील बेभान पावसात भिजण्याचा रूपा (झिनत अमान) मनसोक्त आनंद घेते. (राज कपूरच्या दिग्दर्शनात ‘अभिनय’ साकारताना नायिका स्वत:ला व कॅमेऱ्याला सहज विसरत, असे म्हणण्याजोगे चित्र नेहमी स्पष्ट दिसे. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असे कौतुकाने म्हणू या.) असाच एकदा प्रचंड मुसळधार पाऊस पडतो, त्याचे रौद्र रूप थांबायचे नाव घेत नाही आणि त्याच पावसाच्या तडाख्याने गावाचा बांधच फुटतो, गावात पाणी शिरते, बांध असा फुटला कसा अशा विचाराने इंजिनीअर (शशी कपूर) हवालदिल होतो, पाऊस इतका पडायला नको होता असे वाटायला लागते..
आर.के. फिल्मच्या रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना’ मधील पावसाचा कथेतील सहभाग थोडा वेगळा (बराचसा फिल्मीच!) आपल्या चांदनीसोबतच्या (अश्विनी भावे) लग्न ठरण्याच्या सोहळय़ासाठी राज वेगाने गाडी चालवत घरी यायला निघतो. पण जोरदार पावसाने त्याला अडथळय़ाचा मुकाबला करावा लागतो. रस्त्यावर पडलेले वृक्ष, सोसाटय़ाचा वारा यामधून तो कसाबसा रस्ता काढतो, पण दुर्दैवाने गाडीला अपघात होतो. गाडी नाल्यात पडते व वाहत वाहत भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात जाते, अपघाताच्या धक्क्याने राजची दुर्दैवाने स्मृती गेलेली असते, आपण कोण हे त्यालाच सांगता येत नाही. तो त्या गावाचा रहिवासी होतो व तेथे हीना (झेबा बख्तियार) त्याच्या प्रेमात पडते. ही प्रेमकथा रंगात येते व या दोघांचे लग्न करण्याचे ठरते. नेमक्या त्याच दिवशी मुसळधार पाऊस सुरू होऊन राजची स्मृती परत येते (येथे दिग्दर्शक दिसतो असे कसे म्हणायचे?) आणि त्याला आपले ‘पहिले प्रेम’ आठवते. (पण चित्रपटाचे नाव ‘हीना’ असल्याने चित्रपटाचा शेवट कसा होतो, हे वेगळे सांगायला नको.)
आर.के. फिल्मच्या राजीव कपूर दिग्दर्शित ‘प्रेमग्रंथ’ या चित्रपटातील पाऊस पुन्हा वेगळा. बेभान पाऊस. त्यामुळे निर्माण झालेला चिखल. अवघड झालेली वाट. उद्ध्वस्त झालेले गाव. यातून गरोदर नायिकेला (माधुरी दीक्षित) संघर्ष करत करत मार्ग काढावा लागतो. (नायिकेचे गरोदर राहणेदेखील कथेनुसार धक्कादायक असते.. त्यात पावसाचा धक्का. नायिकेला काही सहानुभूती दाखवाल की नाही?)
विजय आनंद दिग्दर्शित नवकेतन निर्मित ‘गाईड’मधील पाऊस खूप वेगळा. खरं तर ही राजू गाईड (देव आनंद) व रोझी (वहिदा रहेमान) यांच्या कळत-नकळतपणे गुंतत-गुंफत गेलेल्या नात्याची प्रेमकथा. रोझी आपल्या पतीसोबत (किशोर शाहू) पुरातन लेणी पाहायला सहलीवर आली आहे. पती या साऱ्याच्या अभ्यासात गुंतला आहे. पत्नीकडे त्याचे दुर्लक्ष झालेले आहे. पत्नी मात्र जीवनानुभव घेण्यासाठी आसुसलेली आहे. आणि तो अनुभव व आनंद राजूच्या सहवासातून तिला मिळतो. त्याच सहवासातून त्यांचे प्रेम जमते. एका विवाहित स्त्रीशी असे नाते निर्माण झाल्याने राजूला काहीसे अपराध्यासारखे वाटते आणि अशातच या वर्षीचा पाऊस लांबतो, त्यामुळे पर्यटकही येत नाहीत. नैसर्गिक दुष्काळ व व्यावसायिक दुरवस्था यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड हैराण होतात. राजू हे सगळे पाहून हवालदिल होतो. आणि पावसासाठी देवाची प्रार्थना करण्याकरिता उपोषणाला बसतो. ‘अल्ला मेघ दे, पानी दे’ अशी विनवणी केली जाते. बऱ्याच कालावधीनंतर पाऊस येतो, एव्हाना पतीची साथ सोडून राजूची संगत करण्याचा रोझीने निर्णय घेतलेला असतो.
एम. एम. सत्यू दिग्दर्शित ‘सुखा’ या चित्रपटातीलही पाऊस खूप वेगळा.. खरं तर यामध्ये पाऊसच येत नाही अणि तो न आल्याने पडलेल्या दुष्काळाचे राजकारण केले जाते आणि त्या गावात दोन गटांत दंगल होते. या चित्रपटातील पाऊस हा असा अगदी वेगळा. पाऊस न आल्याने हवालदिल झालेल्या गावकऱ्यांना- शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी स्थानिक राजकारणी या साऱ्याचे आपल्या स्वार्थासाठी भांडवल करतात.
सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘चमेली’ या चित्रपटातील पाऊसही वेगळा ठरला.
अचानक पाऊस आल्याने नायक (राहुल बोस) आडोशाला उभा राहतो, इतक्यातच पाऊस थांबेल असा त्याचा आशावादही खोटा ठरतो. प्रत्यक्षात पावसाचा जोर वाढल्याने त्याला बराच काळ तेथेच उभे राहावे लागले. नेमक्या त्याच वेळी त्या भागात शरीरविक्रय करणारी चमेली (करिना कपूर) ‘बहता है मन कही’ असे मनसोक्त गायल्यावर गिऱ्हाईकाच्या हेतूने हटकते, या मुसळधार पावसात तो जाणार तरी कुठे? क्षणभर त्याला वाटते, तीदेखील आपल्यासारखीच असहाय आहे. तिचा बोलण्यातला पुढाकार व त्याची तिला समजून घेण्याची वृत्ती यातून त्यांचा संवाद वाढतो. ती कोण हे माहीत पडल्यावरही त्याची तिच्याबाबतची सहानुभूती कायम राहते, एक नवी ओळख मैत्रीचे नवे रूप घेते, पाऊस थांबल्यावर ते पुन्हा भेटायचे ठरवतात, आणि तसे ते भेटत राहिल्याने एक वेगळे कथानक आकार घेते. मुसळधार पाऊस त्यांची पहिली भेट घडवतो, एकादा पाऊस असेही एखादे निमित्त ठरू शकतो.
राहुल खेर दिग्दर्शित ‘अर्जुन’मधील पाऊस पुन्हा वेगळा..
अर्जुन (सनी देवल) व त्याचे मित्र सुशिक्षित बेकार. मध्यमवर्गीय चाळीत त्यांचं आयुष्य सरतंय, अशातच काही कारणास्तव त्यांची काही गुंड टोळय़ांशी दुश्मनी निर्माण होते. एकदा प्रचंड पावसात काही गुंड या वस्तीत शिरतात. त्या दिवशी अक्षरश: तुफान पाऊस असल्याने छत्री अथवा रेनकोटशिवाय पावसापासून बचाव करण्याचा अन्य मार्ग नव्हताच, गुंड टोळी याच परिस्थितीचा फायदा उठवते, ते छत्राचा तीक्ष्ण हत्यारासारखा वापर करतात आणि पाऊस, गर्दी, छत्र्या याचा फायदा उठवून एका चाळकरी युवकाचा खून करतात.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ (२००१) या चित्रपटाचे कथानक देखील पावसाच्या दीर्घकालीन प्रतीक्षेनेच सुरू होते. १८९३ म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी गुजरातमधील चंपानेर या एका दूरवरच्या खेडय़ात ही कथा घडते. बराच काळ पाऊसच न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत, शेतकरी हवालदिल झाले आहेत, आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत, ‘काले मेघा, काले मेघा’ असे गात गात सामूहिकपणे देवाची प्रार्थनादेखील करून झाली.. पण पाऊस पडला नसला तरी ब्रिटिश सरकारकडे नेहमीप्रमाणे शेतसारा (लगान) तर भरायला हवाच ना? तो माफ करायला गोरेसाहेब तयार नाहीत. ते दुष्काळाची पर्वा न करता खुशालपणे क्रिकेट खेळत आहेत. भुवन (आमिर खान) व त्याच्या सहकाऱ्यांना या चेंडूफळीच्या खेळाबाबत विशेष उत्सुकता व आकर्षण वाढते. पण त्यांनी कधी क्रिकेट खेळलेले नाही. पाऊस पडत नसल्याचे दु:ख ते गोऱ्यासाहेबाला सांगतात, त्यावर तो सहजी द्रवत नाही (माणुसकी दाखवत नाही.) पण भुवन व कॅप्टन अ‍ॅन्ड्रू रसेल यांच्या चर्चेतून एक वेगळाच सामना खेळायचे ठरते. त्यात चंपानेरच्या गावकऱ्यांचा विजय झालाच, तर त्यांना शेतसारा माफ. हा सामना असतो क्रिकेटचा! गोऱ्यांच्या या खेळाची चंपानेरच्या गावकऱ्यांना साधी ओळखदेखील नसते, पण भुवन त्यांच्यात आत्मविश्वास जागवतो, अगदी क्रिकेटची बॅट, स्टम्प्स तयार करण्यापासून भुवनच्या संघाची तयारी सुरू होते. त्यात ते क्रिकेट शिकत जातात व चक्क सराईत इंग्रज खेळाडूंवर मातदेखील करतात, त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यांचा शेतसारा माफ होतो. आणि तेव्हाच भरपूर पाऊस पडून त्यांच्या आनंदात सहभागी होतो.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने वेळेवर पाऊस न पडल्याने हवालदिल होणाऱ्या ग्रामीण जीवनाची या कथेतून कल्पना दिली. (क्रिकेटचा सामना त्या आशयाच्या वरचढ झाला, हा भाग वेगळा.)
अमोल पालेकर दिग्दर्शित ‘थोडासा रूमानी हो जाए’ या चित्रपटातील पाऊस खूप खूप वेगळा व काव्यात्मक. या कथेचा नायक बारीशकर (नाना पाटेकर) आहे. तो ‘स्वप्न दाखवण्याचे’ (भासवण्याचे) काम करतो. आशावादी माणसाची आशा जागी ठेवतो, तर निराशावादी माणसामध्ये नवी आशा जागी करतो. तो स्वत: पावसाचा चाहता आहे, पावसात न्हाऊन निघावे, मनाने चिंब व्हावे, हृदयाला ओलावा मिळावा अशी त्याची काव्यमय कल्पना आहे. म्हणूनच तर तो बारीशकर आहे. त्याच्या काव्या-काव्यातून हे वेगळे कथानक घडत जाते. पावसाचा असा चित्रपटातील वापर अथवा सहभाग एकादाच.
रामगोपाल वर्माच्या ‘सत्या’मध्ये वेगळा पाऊस पाहायला मिळाला..
सत्या (चक्रवर्ती) या गँगस्टरच्या प्रेमात पडलेली गीता (ऊर्मिला मातोंडकर) आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यात पावसाचा शिडकावा हा आनंदाचा थेंब मानते, मध्य मुंबईच्या चाळीत राहणारी गीता सत्याच्या प्रेमात पडलीय आणि अशातच आलेल्या पावसात ती ‘गिला गिला पानी’ गात आपल्या ‘प्रेमभावना’ मोकळी करते. आपल्या रुपेरी वाटचालीतील ऊर्मिला मातोंडकरने सत्कारलेल्या काही सर्वोत्तम दृश्यांतील हे एक.
याच सत्यातील टोळी युद्धात अधूनमधून येणारा पाऊस कळत नकळतपणे त्या संघर्षांचा एक भाग होतो. टोळीयुद्धाला मुंबईतील पावसाचा अडथळा येऊ शकत नाही असे दिग्दर्शकाला सुचवायचे असेल.
पाऊस लांबल्याने अथवा बराच काळ न आल्याने विदर्भातील काही शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत बरेच वाढले. या सामाजिक समस्येचे प्रतिबिंब चित्रपटातून पडणे अगदी स्वाभाविक होते. गाभ्रीचा पाऊस, झिंग चिक झिंग, गोष्ट छोटी डोंगराएवढी अशा काही चित्रपटांतून त्या दु:खद कहाण्या पाहायला मिळाल्या. झिंग चिक झिंगमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची भूमिका भरत जाधव याने साकारली व त्याला या भूमिकेच्या अभिनयासाठी प्रथमच राज्य शासनाचा सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
वाट बघायला लावणारा, त्यासाठी आतूर करणारा, हुरहुर लावणारा पावसाळा हा आपल्यासारख्या कृषीप्रधान देशातला महत्त्वाचा ऋतू. इतका की आपल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनात त्याचं प्रतिबिंब स्पष्टपणे पडत असतं. सिनेमाची तर गोष्टच वेगळी. तिथे तर पाऊस पडत नसताना पाऊस दाखवायचा असतो. तसा हुकमी पाऊस पाडणारे व्यावसायिक जसे बॉलिवूडमध्ये आहेत, तसंच पावसाची बहारदार गाणी लिहिणारे गीतकार आहेत. तो रोमँटिक मूड व्यक्त करणारे कलाकार, तो कॅमेऱ्यात अलगद पकडणारे सिनेमॅटोग्राफर अशा सगळ्यांनी सिनेमातला पाऊस असा अलवारपणे आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. इथे दिलेले सिनेमांचे उल्लेख उदाहरणादाखल आहेत. त्याशिवाय इजाजतसारखे आणखी कितीतरी सिनेमे आहेत, ज्यांच्यामधला पाऊस आपल्या मनात कायमचा मुक्कामाला येऊन राहिलेला आहे.