पावसाळ्याच्या सुरुवातीला मानवाने लागवड केलेल्या भाज्यांचा तुटवडा असला तरी निसर्गात रानभाज्यांचा मळा फुललेला असतो. त्याची कुणीही लागवड करीत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ऋतुकालोद्धभव खाणे’ हा आरोग्यमय जीवनाचा मूलमंत्र असतो. आपल्याकडच्या आयुर्वेदाने सांगितलेली ही आहारसंहिता आता आधुनिक वैद्यकशास्त्रानेही मान्य केली आहे. पावसाळ्याशी निगडित रोमँटिक आणि काव्यमय सुखचित्रांच्या रम्य स्वप्नाबरोबरच पुरेशी काळजी घेतली नाही तर साथीच्या रोगांमुळे आजारी पडण्याच्या वास्तवाचेही भान राखावे लागते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात मंडईमध्ये भाज्यांची आवक कमी असते. त्यामुळे त्यांचे भावही चढे असतात. पुन्हा बाजारात या काळात आढळणाऱ्या भाज्या कुठल्या पाण्यावर पोसलेल्या असतील, याचा नेम नसतो. त्यामुळे अनेकजण पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळून त्याऐवजी कढधान्ये वापरतात. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला मानवाने लागवड केलेल्या भाज्यांचा तुटवडा असला तरी निसर्गात रानभाज्यांचा मळा फुललेला असतो. त्याची कुणीही लागवड करीत नाही. पाऊस पडला की गावपाडय़ांबाहेरील रानात, डोंगररांगांवर या भाज्या उगवतात. त्यातली कोणती भाजी कधी, केव्हा आणि किती खावी हे स्थानिक आदिवासींना परंपरेने माहिती असते. काही महिला त्या भाज्या खुडून जवळील शहरात आणून विकतात. भाज्यांची चांगली पारख असेल तर सकाळी साधारण दहा ते बारा या वेळेत अगदी स्वस्तात रानातले हे हिरवे सोने मिळू शकते. मात्र ‘कशाला काय म्हणतात’ आणि ‘ते कशाशी खातात’ हे माहिती असणे गरजेचे असते. साधारणपणे शहरातील मंडळींना टाकळा, शेकटाचा पाला, हिरवेगार काटेरी फळ असणारे कंटोळी या भाज्या ठाऊक असतात.

निसर्गाचे मेडिकल स्टोअर
जरा काही दुखलं खुपलं की चला लगेच डॉक्टरकडे असे ग्रामीण भागात शक्य नसते. अनेक गावांत दवाखानेच नाहीत आणि असलेच तर तिथे उपचारांसाठी डॉक्टर्स अथवा औषधे असतीलच याचा नेम नसतो. त्यामुळे रानात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचाच त्यांना आधार असतो. भांगवाडीतील निसर्गदेवाच्या जत्रेत निसर्गातल्या औषधांचे दुकानही थाटण्यात आले होते. मोरवेल, नागदळण, रानचाफा, पळस, बेडशिंग, करंडा, हरडा, भुई कोल्हा आदी प्रकारच्या औषधी वनस्पतींचे जत्रेतील प्रदर्शनही उद्बोधक ठरले.

गेल्या महिन्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुरबाडमधील भांगवाडी या दुर्गम आदिवासी गावात श्रमिक मुक्ती संघटनेच्या पुढाकाराने निसर्ग देवाची जत्रा भरविण्यात आली होती. वनविभाग, जिल्हा परिषद यासारख्या शासकीय विभागांचे अधिकारी तसेच रोटरी, लायन्स आदी स्वयंसेवी संस्था या जत्रेत सहभागी झाले होते. जत्रा म्हणजे ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी आनंदाची पर्वणी. मात्र ही जत्रा काहीशी वेगळी होती. या जत्रेत निसर्गदेवाकडून मिळणाऱ्या वरदानाची महती स्थानिकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न झाला. या जत्रेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्यातील एक होता-रानभाज्यांच्या रेसिपीज्ची स्पर्धा. भांगवाडी पंचक्रोशीतील महिलांच्या गटांनी त्या परिसरात तेव्हा आढळून येणाऱ्या तब्बल २९ भाज्यांचे तब्बल ४२ प्रकार शिजवून आणले होते. शेवळे, कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रातळ्याचे कोंभ, टेंभरण, मोहदोडे, लोत, नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भािरगा अशा अनेक भाज्यांचे प्रकार त्या जत्रेत पाहता आणि चाखून पाहता आले. मिरची, कांदा, लसूण, मीठ आणि थोडय़ा तेलावर फोडणी दिलेल्या या भाज्यांची चव तोंडात पाणी आणणारी होती. पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील असणाऱ्या पश्चिम घाट परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन होण्याची आवश्यकता माधवराव गाडगीळ तसेच कस्तुरीरंगन या दोन्ही समित्यांनी व्यक्त केली आहे. सह्य़ाद्रीच्या खोऱ्यात वर्षभरात अशा प्रकारच्या तब्बल ६५ प्रकारच्या रानभाज्या आढळून येतात. फारशी अक्षरओळख नसलेल्या आदिवासी बांधवांकडे या भाज्यांच्या उपयुक्ततेची इत्थंभूत माहिती आढळते. उदा. भािरगा ही साधारण जून-जुलैमध्ये उगवणारी रानभाजी एक-दोनदा खाल्ली तरी वर्षभर पोटाचे विकार होत नाहीत. रानकेळी खोकल्यावर गुणकारी असतात. अशा रीतीने त्या त्या काळातील भाज्यांचा आहारात समावेश झाला तर ते आरोग्यवर्धक ठरते. या भाज्या नैसर्गिकरीत्या उगवत असल्याने साहजिकच सेंद्रिय असतात. त्यात कोणत्याही प्रकारची रासायनिक खते असण्याचा संभव नसतो. बाजारातील इतर शहरी भाज्यांच्या तुलनेत त्या कितीतरी स्वस्त असतात. या रानभाज्यांचे आहारमूल्य तपासून त्यांचे शास्त्रीयदृष्टय़ा दस्तऐवजीकरण होणे गरजेचे असल्याचे मत श्रमिक मुक्ती संघटनेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी व्यक्त केले आहे.
रानातल्या भाज्यांना शहरातील बाजारात हक्काचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शहरी भागातील स्वयंसेवी संस्थांनी केला. जिल्हा परिषदेनेही रानभाज्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आढळणारे कुपोषण हटविण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत मंडईतील रस्त्यांच्या आडोशाला अथवा रेल्वे पुलांच्या पायऱ्यांवर अनधिकृतरीत्या विकल्या जाणाऱ्या रानभाज्यांना बाजारात मानाचे स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रानभाज्यांबरोबरच रानातील तब्बल ९३ प्रकारच्या पानांवरून ते वृक्ष ओळखण्याची स्पर्धाही यावेळी भरविण्यात आली होती. पानांवरून त्यापैकी ६० वनस्पतींची नावे ओळखून दत्ता देवू लोभी यांनी वृक्षमित्र पुरस्कार पटकावला. इतर स्पर्धकांपैकी अनेकांनी ४० ते ४५ प्रकारच्या वनस्पती पानांवरून ओळखल्या.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon special
First published on: 01-08-2014 at 01:12 IST