scorecardresearch

पावसाळा विशेष : कुठून द्यावी पावसाची प्रसन्न कविता?

पावसाची मर्जी नसलेल्या या दुष्काळी प्रदेशात का बरं जन्मलो असं कधी-कधी वाटतं. आडाचं, नळाचं पाणी भरण्यात सरलेलं बालपण आठवतं.

पावसाळा विशेष : कुठून द्यावी पावसाची प्रसन्न कविता?

औरंगाबाद
पावसाची मर्जी नसलेल्या या दुष्काळी प्रदेशात का बरं जन्मलो असं कधी-कधी वाटतं. आडाचं, नळाचं पाणी भरण्यात सरलेलं बालपण आठवतं.

‘आमच्या कुळातला
कोण पापी माणूस मुतलाय
खळखळ झऱ्यात’
म्हणून आम्हाला
स्वच्छ वाहतं पाणी
नजरेलाही पडत नाहीय,
नदीची खणा- नारळानी
ओटी भरत राहिलो
नदीही येत राहिली
माहेरवाशीण लेकीसारखी,
अंगावर तरंग खेळवणारं
तुडुंब पाणी नांदलंच नाही कधी’

तर हे आमच्या पावसाळय़ाचं भागधेय. पाऊस येतच नाही असं नाही. पाऊस येतो. पण बेजबाबदार बेवडा बाप रात्री झोकांडय़ा खात उशिरा खोपटाकडे परतावा तसा पाऊस येतो. अशा पावसाच्या भरोशावर काय करणार? तरी वाट पाहणं थांबत नाही. दरवर्षी मान्सूनच्या अंदाजामुळे उगीच आशा जागी होते. रोजच्या हवामान खात्याच्या अंदाजात उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला असताना मराठवाडय़ात मात्र तुरळक सरी कोसळणार असतात. आणि तुरळकच सरी कोसळतात. मान्सूनचा जोर इथपर्यंत राहतच नाही.
बेभरोशाचा म्हणून का होईना कसा तरी पाऊस येतो. जीवघेण्या उन्हामुळे भाजून निघालेली सृष्टी पावसात ओलीचिंब होते. तृषार्त माती न्हातीधुती होते. बिया मातीत रुजतात आणि सृजनाचा हिरवा रंग वाऱ्यावर पसरतो, पण त्याआधी मराठवाडय़ातल्या प्रचंड उन्हामुळे मनाला नैराश्य यायला होतं. एकदाचा पाऊस आला की पुन्हा एकदा मन ताजतवानं होतं. पाऊस न आवडणारा माणूस सापडणं अवघड. मलाही पावसाचं खूप अप्रूप आहे. उघडखांबी माडीत गोधडी पांघरून पत्र्यावर वाजणारा पाऊस ऐकत रात्री झोपी जाण्यातली मजा काही औरच असते. कवितांमधून, चित्रपटांच्या गाण्यांमधून बरसणारा पाऊस हवाहवासा वाटतो. पण असा मनसोक्त पाऊस आमच्याकडे कोसळत नाही. पडतो कामापुरता. बरेचदा तर दुष्काळच असतो. आलाच पाऊस एखाद्या वर्षी तर मग अतिवृष्टी. सगळी नासधूस. इथल्या जगण्यावर याचा परिणाम होतो. दुष्काळामुळे दुबार-तिबार पेरणी शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेली. मधेच कधी अतिवृष्टीमुळे पिकं हाती लागत नाहीत. बऱ्याच गावांत पिण्याच्या पाण्याचीही बोंबाबोंब. अशा अनुभवातून पावसावरची प्रसन्न कविता लिहून होत नाही. विरहातल्या कवितांसारख्या पावसाच्या उदास कविता उमटतात.
आपल्याकडं नाही म्हणून काय झालं, भोवताली पडतोय धुवाँधार. बाकी लोक पावसाचा आनंद घेतायत. अशा वेळी आपण पावसाचा उदास राग आळवू नये हे मलाही कळतं. बारशाला गेल्यावर लेकराला ‘नकटं’ म्हणू नये याची मलाही जाणीव आहे. पण काय करणार पाऊस आमच्याशी वागतोच वाईट. पावसाच्या प्रसन्न आठवणी फारशा गोळा होत नाहीत. जमिनीला भेगा पडलेल्या, शेतकरी आभाळात डोळे लावून बसलाय. प्यायलासुद्धा पाणी नाही, डोक्यावरून ढग नुसतेच तरंगत जातात, वारा सुटतो, पाऊस बेपत्ता होतो, नद्या खळाळून वाहत नाहीत, पाऊस यावा म्हणून महादेवाचा गाभारा पाण्यानं भरलाय, कमरेला कडुलिंबाचा पाला बांधून त्यावर उलटे बेडूक अडकवलेत. आणि तोंडाने ‘धोडी धोंडी पाणी दे’ अशी आर्त मागणी केली जातेय, गावभर उदासी पसरलीय, माणसं सैरभैर होतात. चारा-पाण्याच्या अभावी ढोरांच्या डोळय़ांतली भूक बघवेना, जगणं निरस होतं. आभाळ मेल्यामुळे.. पाऊस नसल्यामुळे. अशा काळात पाऊस पुरवणीसाठी प्रसन्न पावसाळी कवितेची मागणी करणारा संपादकाचा निरोप येतो. कुठून द्यावी अशी पावसाची प्रसन्न कविता? आजही धबधब्याच्या पाश्र्वभूमीवर साबणाच्या जाहिरातीत थिरकणारी सुंदर तरुणी पाहिल्यावर तिची आकर्षकता लक्षातच येत नाही. उलट वाटतं, असा धबधबा आपल्या गावात असता तर किती बरं झालं असतं. पाण्यामुळं कोलमडलेली आमची गावं सोडून नोकऱ्यांच्या निमित्तानं आम्ही शहरात येऊन लपलोय म्हणून ठीकय. आजही छोटय़ा गावात डोक्यावर हंडा घेऊन बायकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. एवढं कशाला, नोकरीसाठी मी आधी चौदा वर्षे जालन्याला राहत होतो. जालना हे मराठवाडय़ातलं व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यचं ठिकाण. इथे नळाला आठवडय़ातून एकदा पाणी यायचं. उन्हाळ्यात तर आनंदी आनंद! २०१२ साली मे महिन्यात जालन्यातल्या नळाला ३५ दिवस पाणी आलेलं नव्हतं. स्वातंत्र्य मिळून साठी उलटून गेली पण प्यायला नीट पाणी मिळत नाही हे भयावह सत्य आहे. जालना जिल्ह्याला (निर्मितीला) पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून एक चॅनलवाला मित्र ‘सांस्कृतिक जालना’ विषयावर बाइट घ्यायला आला. (तेव्हा मी तिथे राहत होतो) प्यायला पुरेसं स्वच्छ पाणी जिथे मिळत नाही तिथे बकाल संस्कृतीच असते असं मी उद्वेगाने बोललो. त्या चॅनलने माझा बाइटच दाखवला नाही. संस्कृती वगैरे गोष्टी पोट भरल्यानंतरच्या असतात. पार नव्वद किलोमीटरवरून गावात येणारी पाण्याची पाइप लाइन रस्त्यातले गाववाले लोक फोडतात. प्यायला पाणी घेतात. अशा गुन्हय़ात कुठली शिक्षा देणार? काळय़ा पाण्याची? मराठवाडय़ात गावोगाव टँकर फिरत असतात. या टँकरने पाणी वाटपाचाही मोठा व्यवसाय झालाय. खासगी टँकरचे उन्हाळय़ात चढलेले भाव. सरकारी टँकर असेल तर नगरसेवकांची पैसे कमावण्यासाठी मरमर. दुष्काळी चारा छावण्या. पाण्यासाठीच्या मारा मारीत लोकप्रतिनिधींची उदासिनता. या वातावरणात एक सत्ताधारी पुढारी म्हणतो, ‘‘आम्हाला नगरपालिकेची सत्ता दिली असती तर आम्ही पार दिल्लीहून निधी आणला असता.’’ या अमानुषतेला काय म्हणावं? पाण्यासाठी सार्वजनिक नळावर भांडणं होतात. डोकी फुटतात. भर पावसाळ्यात पाणीटंचाई अवतरते. पावसाची मर्जी नसलेल्या या दुष्काळी प्रदेशात का बरं जन्मलो असं कधी-कधी वाटतं. आडाचं, नळाचं पाणी भरण्यात सरलेलं बालपण आठवतं. ‘डिस्कव्हरी’, ‘नॅशनल जिओग्राफी’ चॅनेलवर वाहणाऱ्या नद्या, हिरवीगार वनराई पाहताना काही आक्षेपार्ह पाहतोय असं वाटतं.
भारतापेक्षा एक वर्षांने उशिरा स्वतंत्र झालेला मराठवाडा म्हटलं की रझाकाराचा अन्याय-अत्याचार पुढे येतो. तेव्हा शोषक म्हणून बोट दाखवायला एक परकीय सत्ता होती. पण भीषण पाणीटंचाईतल्या उपाययोजनांतही पैसा कमवू पाहणाऱ्या आपल्या ‘देशी’ रझाकारांचं काय करावं? थोडय़ाफार फरकानं मराठवाडय़ात पावसाअभावी सारखेच हाल आहेत. असलेल्या नद्यांचे नाले झाले. शरीरात कोलेस्ट्रॉल साठावा तसा धरणांतून गाळ साचलाय. राजकीय स्पर्धेत योजना मंजूर होतात, पण अस्तित्वात येत नाहीत. आल्या तरी घोटाळ्यात अडकतात. या कमी व लहरी पावसावर मात करण्यासाठी कुणाजवळ उपाययोजना असल्याचं जाणवत नाही. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या दूरगामी विचारातून साकार झालेला जायकवाडी प्रकल्प सोडला, तर इथल्या राजकीय नेत्याने महत्त्वाकांक्षी विचार केलेला दिसत नाही. आज हा जायकवाडी प्रकल्प उद्योग-शेतीपेक्षा पिण्याचं पाणी साठवलेला मोठा हौद झालेला आहे.
हे पावसाअभावी तयार झालेलं वातावरण कुठंही गेलं तरी डोक्यात असतं. मागे एकदा मुंबईत एस्सेलवर्ल्डला भाच्यांना घेऊन गेलो होतो. तिथं वॉटर पार्कमध्ये निळंशार पाणी पाहून मन चरकलं. ऐन मे महिन्यात जलक्रीडेसाठी एवढं पाणी. पोरं पाण्यात मस्ती करीत होती. मी मात्र पाण्याला स्पर्शही करू शकलो नाही. उलट गावाकडची दृश्यं डोळय़ांसमोर तरळत होती. डोक्यावर हंडा घेऊन वणवण फिरणाऱ्या बायका, टँकरमागे भांडी घेऊन पळणारी माणसं, चौकाचौकातल्या पाणपोया, खोल विहिरीच्या तळाशी शिल्लक बकेटभर पाण्याभोवती वळवळणारे पोहरे, स्टेशनवर रेल्वे थांबली की डब्यातल्या संडासच्या नळाला पाइप लावून पाणी घेणारे लोक , असं काय काय आठवत होतं. पाण्यात मस्ती करणाऱ्या भाच्यांना काठावर कोरडा बसून राहिलेला मामा कदाचित अरसिक वाटला असेल. जसं की पावसाळी जल्लोषात हे माझं रडगाणं विसंगत वाटत असेल. पण करणार काय? एक छानसा पावसावर प्रसन्न लेख लिहिण्याचं मीही ठरवलं होतं. पण आठ दिवसांपूर्वीच बीडकडे जाताना रस्त्यात झाडाच्या शेंडय़ावर कावळ्याने घरटं केलेलं पाहिलं आणि मन खट्टू झालं. कारण खेडय़ातल्या माणसाचा एक जुना संकेत आहे. कावळा जेव्हा गर्द फांद्यांत घरटं तयार करतो तेव्हा पाऊसकाळ चांगला असतो. पण कावळय़ाने झाडाच्या टोकाला घरटं केलं की पाऊसकाळ कमी असतो. ठीकय आमच्याकडच्या कावळय़ांना झाडाच्या टोकालाच घरटं बांधणं आवडू लागलंय असं समजू या. बांधू देत त्याला हवं तिथं घरटं. वागू देत लहरी पावसाला बेजबाबदारपणे. यामुळे जगणं थोडंच थांबलंय. सण-उत्सव होतात. पंचमीचे झोके आभाळावर चढतात. नदी कशीही वागो पण तिची भक्तिभावे खणा-नारळांनी ओटी भरली जाते. पोळय़ाचे बैल गावभर मिरवतात. भंडाऱ्यात अन्नदान होतं. आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे आजही निरागस पोरं ‘येरे येरे पावसा’ म्हणून अंगणात नाचत असतात. आणि माझ्यासारखा एखादा पावसावर प्रसन्न लेख, झिम्माड कविता लिहिण्यासाठी कावळ्याने झाडाच्या फांदीत घरटं करण्याची वाट पाहत असतो.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-08-2014 at 01:24 IST

संबंधित बातम्या