मुलाखत : मला वाटायचं माझं आत्मचरित्र कोण, कशाला वाचेल?

‘अँड देन वन डे’ या नसीरुद्दीन शहा यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्याचे अनेक पैलू समोर येतात. त्यांचं त्यांच्या वडिलांशी, इतर कुटुंबीयांशी असलेलं नातं, एनएसडीचा काळ, त्यांची जिद्द, अभ्यास अशा…

lp13‘अँड देन वन डे’ या नसीरुद्दीन शहा यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्याचे अनेक पैलू समोर येतात. त्यांचं त्यांच्या वडिलांशी, इतर कुटुंबीयांशी असलेलं नातं, एनएसडीचा काळ, त्यांची जिद्द, अभ्यास अशा त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंचं दर्शन या आत्मचरित्रातून होतं. त्यात नसीरुद्दीन शहा यांनी उल्लेखलेल्या वेगवेगळ्या आठवणी, संदर्भ, घटना याविषयी लेखक-दिग्दर्शक-अभिनेता रजत कपूर यांनी नसीरुद्दीन शहांशी मारलेल्या गप्पा-

’ आत्मचरित्र लिहिणं म्हणजे एखादा स्मरणशक्तीचा खेळ खेळण्यासारखंच होतं, असं तुम्ही प्रस्तावनेत म्हटलं आहे..

– हो. आपल्याला आपल्या आयुष्यातल्या घडून गेलेल्या गोष्टी आठवतात का ते शोधत राहणं हे तसं अवघडच आहे. तरीही ते आठवण्यात एक गंमतही आहे. त्यामुळे ते आठवत मी लिहीत गेलो. कधी कधी मी सगळं तसंच ठेवून द्यायचो. अगदी वर्षभरसुद्धा. त्याकडे बघायचोही नाही. नंतर, मला काही आठवलं की मी म्हणायचो, अरे, हे मला लिहायला हवं.

’ आता तुमचं पुस्तकंही प्रसिद्ध झालंय. ते पुस्तक आता लोक वाचताहेत, याचं कुठे तरी दडपण वाटतंय का?

– नाही. लोक आता माझं पुस्तक वाचताहेत म्हणून मला दडपण वाटत नाही. खरं तर मला वाटत होतं की, माझं आत्मचरित्र कोण कशाला वाचेल.. (हसतात.) एक खरं की, आत्मचरित्र लिहिताना मी माझ्या प्रेक्षकांचा- वाचकांचा विचार करून अजिबात लिहिलेलं नाही. मला वाटलं ते तसं लिहीत गेलो. तसा मी फारसा भूतकाळात रमत नाही; पण हे आत्मचरित्र हा भूतकाळात डोकावण्याचा एक चांगला बहाणा मात्र ठरला. या आत्मचरित्राच्या निमित्ताने मला असं वाटलं की, कोणत्याही गोष्टीबाबतीत अतिउत्साहित होण्याच्या माझ्या सवयीला बाजूला ठेवून मला शक्य आहे तेवढय़ा गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तटस्थपणे आणि नेमकेपणाने माझे आयुष्य नोंदवले पाहिजे आणि हे सगळं मला आत्मचरित्रातून बऱ्यापैकी साधलं आहे, असं मी आता म्हणू शकतो. उदाहरणच द्यायचं तर आतापर्यंतच्या वेगवेगळ्या मुलाखतींमधून मी कधीच माझ्या मुलीबरोबर म्हणजे, हिबाबरोबरच्या (नसीरुद्दीन शहा यांच्या पहिल्या बायकोची मुलगी) नातेसंबंधावर बोलू शकलो नाही, पण आत्मचरित्रात मात्र मी त्याबाबत लिहिताना बऱ्यापैकी मोकळा झालो आहे. वडिलांशी असलेलं माझं नातं माझ्यासाठी कायमच त्रासदायक होतं. ते कधीही बरं नव्हतं, नाही आणि शेवटपर्यंत तसंच राहिलं या गोष्टीचा मला आजही त्रास होतो. त्या नात्यात खूप कडवटपणा होता; पण त्याबद्दल आत्मचरित्रात लिहिल्यानंतर आता मला असं वाटतं आहे, की तो कडवटपणा बराचसा कमी झाला आहे. मुळात मी त्या सगळ्या गुंतवणुकीतून बाहेर आलो आहे आणि त्या सगळ्याकडे नव्याने पाहू शकतो आहे.

’ आत्मचरित्रात तुम्ही असा उल्लेख केलाय की, तुमच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तुमचा त्यांच्याशी खरा संवाद सुरू झाला. याचा अर्थ तुमच्यात कुठे तरी एक प्रकारची जवळीक होती; पण आता तर तुम्ही म्हणता आहात की, तशी जवळीक तुमच्या दोघांच्यामध्ये कधीच नव्हती..

– काही प्रमाणात हो.. तशी जवळीक होती आमच्यात; पण तरीही आजही त्या नात्यातला ताण माझ्यावर येऊन आदळतो आणि मला त्याचा त्रास होतो. मला माझी मुलं झाली तेव्हा तर मला आमच्यात असू शकणाऱ्या बाप आणि मुलाच्या नात्यातल्या सगळ्या शक्यता दिसतात आणि मी आणि माझ्या वडिलांनी दोघांनीही आमच्या नात्यात काय गमावलं याची जाणीव होते. मला हे माहीत आहे की, तो काळ वेगळा होता. आतासारखं त्या काळी कुणी वडिलांच्या खांद्यावर हात टाकून एखाद्या मित्रासारखा वागू शकत नसे. उलट आणखी टोकाची बाब म्हणजे माझे वडील त्यांच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना, ‘सरकार’ म्हणायचे आणि त्यांना वडिलांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घ्यावी लागायची. त्यामुळे माझ्या बाबतीत आपण वडील म्हणून खूप मोकळेढाकळे आहोत, असं त्यांना वाटत असणार, असं मला आता वाटतं. अगदी तसंच आता मला माझ्या मुलांच्या बाबतीत वाटतं. तरीही मी हेही सांगेन की, माझ्या वडिलांनी वडील म्हणून माझ्या बाबतीत ज्या चुका केल्या, अगदी त्याच चुका कदाचित प्रमाण कमी असेल, पण मीही माझ्या मुलांच्या बाबतीत केल्या आहेत. मला त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा होता म्हणून नव्हे, तर मला त्यांना शिस्त लावायची होती म्हणून; पण तरीही माझ्याकडून त्या चुका झाल्या.

’ तुमचे वडील खूप मोठी स्वप्नं बघत असणार.. कारण त्यांना इंग्लंडमध्ये एक हॉटेल सुरू करायचं होतं, असा तुम्ही पुस्तकात उल्लेख केला आहे.

– मला वाटतं हो.. त्यांची खूप स्वप्नं होती; पण ते त्यांची स्वप्न स्वत:जवळच ठेवायचे. माझ्या पत्नीने, रत्नाने (अभिनेत्री रत्ना पाठक शहा) एकदा माझ्या लक्षात आणून दिलं की, वडील कसे असावेत याबाबत माझ्या वडिलांच्या मनात त्यांची स्वत:ची एक प्रतिमा होती. त्यानुसार ते कायमच वागत राहिले आणि त्यामुळे बाप आणि मुलगा या नात्यातलं प्रेम त्यांना मिळालं नाही. खरं तर त्यांनी ते मिळवण्याची संधीच गमावली. मी त्यांना तेव्हा जाणून घेऊ शकलो नाही; पण जसजसा मी मोठा होत गेलो तसंतसं मी त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला लागलो आणि ते समजून घ्यायला अगदी साधे होते, असंही कालांतराने मला वाटू लागलं; पण त्या वेळी मी लहान होतो आणि एका मर्यादेनंतर आमच्यामधलं नातं कधीही सांधलं जाऊ शकलं नाही. आम्हा दोघांमधली दरी कमी होणारी नव्हती.

’ अर्थात ते त्या काळात जसं वागत होते, त्या काळात पुरुषाने तसंच वागायची पद्धत होती. पुरुषांनी असंच असलं पाहिजे, वागलं पाहिजे असेच दंडक होते.. पुरुषत्वाच्या कल्पनाच तशा होत्या..

– माझे सगळे मामा माझ्यासाठी हिरो होते. माझ्या दृष्टीने पुरुषाने कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे सगळे मामा होते. बंदूकबिंदूक, गर्लफ्रेंड, लेदर जॅकेट, जीन्स, गॉगल्स, सिगरेट, ट्रॅक्टर, घोडे अशा वातावरणात मी मोठा झालो. बंदुका चालवणं, काळ्या हरणांची शिकार, ‘आंब्याची बाग इतक्या पैशाला गेली’ असल्या चर्चा हे सगळं वातावरण माझ्याभोवती होतं. ते सगळं माझ्यासाठी आजही एखाद्या स्वप्नासारखंच होतं आणि आहे.

’ मग या सगळ्यापासून तुम्ही कसे लांब आलात?

– नाही.. मला वाटतं त्यातल्या अनेक गोष्टी आजही माझ्यासोबत आहेत.

’ कसं?

– कधी कधी मी काही गोष्टींना तर्कविसंगत प्रतिसाद देतो (हसतात). आपल्या पद्धतीने अनेक गोष्टी करणं, भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा कुंपणावर बसून राहणं वगैरे..

’ तुम्ही तसं करता?

– हो केलंय.

’ तुमच्या कुटुंबातील इतर कोणाला अभिनय क्षेत्रात रस होता का?

– माझ्या कुटुंबातले अनेक जण कलाकार व्हायला हवे होते. माझे आजी-आजोबा (आईचे आई-बाबा), सगळे मामू.. ते सगळे तर कसलेले अभिनेते होते (हसतात). त्यांचा आवाज इतका मोठा होता की, सरधानाच्या lp14(उत्तर प्रदेशातील मीरतजवळचं गाव. तिथे नसीरुद्दीन यांचे आजी-आजोबा, मामा राहत.) एका टोकापासून दुसऱ्या टोकाला ऐकायला जायचा आणि त्या सगळ्यांचं जगणंही तसंच होतं. अर्थातच ते सगळे उत्तम प्रकारे कथा सांगायचे. ते सगळेच्या सगळे कुठल्याही कथानकात व्यक्तिरेखा म्हणून फिट बसतील असे होते. माझ्या वडिलांकडच्या नातलगांपैकी काही लोकही चक्रम होते; पण नाटक-सिनेमात काम करणं हा विचारही त्या काळात केला जाणं शक्य नव्हतं. ‘नाटकात काम करणार? नट होणार?’ हे तुच्छपणे विचारलं जायचं. माझ्या वडिलांसाठी तर अभिनय वगैरे पचायला थोडं जडच गेलं. ते आयएएसची समकक्ष अशा नागरी सेवेत होते. त्यांच्याशी असलेलं नातं सुधारता आलं नाही, असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे माझ्यातल्या क्षमता बघण्याइतकं आयुष्यच त्यांना लाभलं नाही.

’ तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या विशीपर्यंतच्या काळाबद्दल लिहिलं आहे ते बऱ्यापैकी गुंतागुंतीचं आहे असं वाटतं. नंतरच्या काळाबद्दल लिहिलं आहे, ते बऱ्यापैकी सरळ आणि स्पष्ट आहे. आपल्या बालपणातल्या भावजीवनाशी याचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का?

– याचं कारण असं असू शकेल की, काही घटना माझ्या खूप जवळच्या आहेत, की त्याविषयीच्या माझ्या भावनांमध्ये झुलणं मला नको होतं. ज्या घटना आपल्यापासून दूर असतात त्यांच्याविषयी बोलणं हे केव्हाही सुरक्षित. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भावुक न होणं हा माझा स्वभाव नाही. दुसरं म्हणजे ज्या गोष्टी माझ्यापासून दूर आहेत त्यांच्याबाबत मला खूप काही वाटत राहतं. त्या उलगडून बघणं हे मला फारसं धोकादायक वाटत नाही. अशा अनेक घटना आहेत ज्या मी आजही उलगडलेल्या नाहीत. मला कोणाला दुखवायचं नाही. मी भूतकाळात कधीच याबाबत काळजी केली नाही; पण मला वाटतं ही गोष्ट शेवटपर्यंत टिकणार आहे. एखाद्या गोष्टीवर झालर घालणं चालतं; पण एखाद्याला दुखावणं नाही. तुमच्याजवळ चांगलं बोलण्यासारखं काहीही नसेल तर निदान काहीही बोलू तरी नका.

’ पण, तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक होतात. जगाला तुम्ही कसे होता, कसे आहात हे सांगण्याचं धाडस लागतं.

– पण, तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल लिहीत असाल तर तुम्ही नाही का करणार असं? वाचकांना जे वाचायला द्यायला हवं तेच तुम्ही द्याल ना?

’ तुम्ही तुमचं पुस्तक तुमची मुलं, इमाद आणि विवान यांना अर्पण केलंय. तुमच्या कुटुंबातल्या या दोन सदस्यांचा या पुस्तकात उल्लेख नाही. या पुस्तकाबाबत त्यांची प्रतिक्रिया काय होती?

– त्या दोघांनीही माझं आत्मचरित्र वाचलेलं नाही आणि मला नाही वाटतं ते दोघं पुढची किमान दहा र्वष तरी हे पुस्तक वाचतील.

’ तुमच्या करियरमध्ये नशीब या घटकाचा हात किती होता असं तुम्हाला वाटतं?

– नशीब ही वेगवेगळ्या घटकांची एकत्रित अशी गोष्ट आहे. मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. ज्या प्रकारचे सिनेमे त्या वेळी बनत होते तेव्हा मला असं जाणवतं होतं की, माझ्यासारख्या कलाकाराला या सिनेमांमध्ये असायलाच हवं. जेव्हा ‘भुवन शोम’ (१९६०), ‘सारा आकाश’ (१९६९) हे सिनेमे बघितले तेव्हा मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये होतो. नंतर ‘तिसरी कसम’ (१९६६), ‘अंकुर’ (१९७४) हे सिनेमे बघितले. तेव्हा मला वाटलं की, मला अशा सिनेमांमध्ये काम मिळणारच. लेट मी ट्राय टू बी देअर..!

’ सिने इंडस्ट्रीत येणाऱ्या अनेकांकडे कौशल्य आणि चिकाटी असते; पण इथे येणाऱ्या शंभरांपैकी काहींनाच आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते..

– ज्या एक-दोघांना संधी मिळते ते योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचू शकतात म्हणून त्यांना ती संधी मिळालेली असते असं मला वाटतं आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं हा अजिबातच नशिबाचा भाग नाही. एनएसडीमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा मला समजलं की, मला रोजीरोटी कमवायची आहे, तर ती सिनेमांमधूनच कमवावी लागणार. तर हे कसं होणार? तर समजा मला एखाद्या इन्स्पेक्टरची भूमिका जरी मिळाली तरी मी ती करेन.

ओम पुरीचं उदाहरण घ्या. तो जरी पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये गेला नसता तरी गोविंद निहलानींनी अगदी पाताळातून ओमला शोधून आणलं असतं. अभिनेता म्हणून तुमचं तुम्हाला शिकत जायचं असतं. तुम्हाला तुमचं काम माहीत असेल, तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही, कारण शेवटी चांगल्या अभिनेत्यांना काम मिळतं हे सत्य आहे.

’ पण, नवाजुद्दीन सिद्दीकी जवळजवळ वीस र्वष स्ट्रगल करत होता, तेव्हा कुणीही त्याची दखल घेतली नाही आणि आता प्रत्येकाला त्याला आपल्या सिनेमात घ्यायचं. असंच काहीसं इरफान खानच्या बाबतीतही झालं होतं.

– त्या वीस वर्षांत या दोन्ही कलाकारांनी स्वत:वर खूप मेहनत घेतली. नाही तर, त्यांची योग्य वेळ आल्यावर ते त्यांचा उत्तम परफॉर्मन्स देऊ शकले नसते. मला त्या दोघांबद्दल प्रचंड आदर वाटतो. त्यांच्यातल्या चिकाटीसाठी नाही, तर त्यांनी हार मानली नाही म्हणून. छोटय़ा भूमिका करून ते आज इथवर पोहोचले आहेत. त्यांनी त्यांची जिद्द कुठेही कमी होऊ दिली नाही.

’ हे सांगण्याचा माझा मुद्दा हा होता की, इंडस्ट्रीत असे खूप कुशल आणि हुशार कलाकार असतील.

– असे असते तर चांगली गोष्ट आहे; पण इतक्या जिद्दीने, स्वत:वर विश्वास ठेवणारे लोक इथे नाहीत. लोक चुकीची निवड करतात.

’ पण, तुम्हीही चुकीच्या गोष्टी निवडल्या होत्या.

– मी अनेकदा चुकीची निवड केली, अगदी गंभीर सिनेमांमध्येसुद्धा; पण मी कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकांमध्ये स्वत:ला अडकवून ठेवलं नाही. मी फक्त मुख्य भूमिका करणार, असा आग्रहही कधीच धरला नाही. अशा पद्धतीचं कुंपण काही कलाकार स्वत:भोवती घालून घेतात. मी फक्त अमुकच करणार, तमुकच करणार नाही, असं तुम्ही तुमच्या मनात धरून ठेवता. तसं होता कामा नये. मी कधी कधी विचार करायचो की, जर मी मोठा स्टार झालो असतो, तर कसा असला असतो.. एक तर मी चांगलं गाऊ शकत नाही, दिसायलाही मी तसा तगडा नाही. धर्मेद्रसारख्या भूमिका मी करू शकत नाही. मग मी विचार करायचो, की कदाचित मला ऐतिहासिक सिनेमांमध्ये पंतप्रधानांची भूमिका मिळेल. मी स्वत:ला समजवायचो की, तशा भूमिकांसाठीही मी स्वत:ला तयार करून ठेवलं पाहिजे, कारण जर खरंच अशी वेळ आली तर माझी तयारी हवी.

’ तुम्ही पदार्पण केलेला ‘निशांत’ हा सिनेमा मला आठवतो. तुमच्या परफॉर्मन्सने सगळे प्रभावित झाले होते.

– हो, फिल्म इंडस्ट्री वगळता सगळ्यांनीच माझ्या कामाची दखल घेतली होती. या सिनेमाबद्दल मला इतकी उत्सुकता होती की, मी तो थिएटरमध्ये जाऊन बघितला आणि मी थिएटरमध्ये जाऊन बघितलेला हा एकमेव सिनेमा आहे. प्रेक्षकांच्या सिनेमातल्या माझ्या व्यक्तिरेखेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळेही मी खूप उल्हसित झालो होतो. खरं तर तेव्हा मी अडखळत बोलायचो. ‘सजाये मौत’ (१९८१, दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा) आणि ‘आक्रोश’ (१९८०, दिग्दर्शक, गोविंद निहलानी) या सिनेमांमध्येही मी अडखळतच बोललो आहे, कारण त्या वेळी मी डस्टीन हॉफमन यांच्या ‘द ग्रॅज्युएट’मधल्या भूमिकेने प्रचंड प्रभावित झालो होतो आणि मला त्यांचं अनुकरण करायचं असायचं.

’ तुम्ही व्यावसायिक सिनेमे करत नाही हे माहीत असूनही व्यावसायिक सिनेमांचे दिग्दर्शक तुमच्याकडे ऑफर्स घेऊन येतात तेव्हा तुमच्यातला व्यवहार, बोलणं-चालणं नेमकं कसं असतं?

– खरं तर माझं नेमकं काय करावं हे त्यांना कळत नाही, कारण एक तर मी गल्ला भरण्याची हमी असलेला अभिनेता नाही. त्यामुळे मला व्यावसायिक सिनेमात तशा महत्त्वाच्या भूमिकाही मिळत नाहीत. इतर कुणीही करणार नाही किंवा करू शकणारच नाही अशा भूमिकांमध्ये मी फिट बसतो.

’ पण, तरीही व्यावसायिक सिनेमे तुमच्याकडे येतच राहतात ना..

– ‘माणूस हट्टी आहे, पण अभिनय चांगला करेल’ असा विचार करून ते येत असतील माझ्याकडे कदाचित.

’ तुमच्या करिअरमधल्या गेल्या दोन दशकांवर लिखाण करायचा विचार आहे का?

– मला माहीत नाही. ते खूप रूक्ष होईल असं वाटतं. त्यामध्ये सिनेमा, नाटकांची केवळ वर्णने येतील. कदाचित मी या दशकांबाबत एखादं फिक्शन लिहीन. खरं तर आता लिहिलेलं पुस्तकंही मी तृतीय पुरुषी पद्धतीने लिहिणार होतो; पण शेवटी मी ती कल्पना रद्द केली. अनेक वर्षांपासून मी विकसित केलेल्या अभिनय व्यायामावरही पुस्तक लिहावं असाही मी विचार केला होता; पण ते खूपच टेक्निकल होईल म्हणून मी तेही बाजूलाच ठेवलं.
(‘एक्सप्रेस आय’मधून)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Naseeruddin shah autobiography

ताज्या बातम्या