शिक्षणासाठी रोज जाऊन-येऊन सोळा किलोमीटरची पायपीट करणाऱ्या नासरीचा संघर्ष फक्त स्वत:पुरता नाही. तिला गावातल्या मुलांना शिक्षण मिळवून द्यायचंय. आदिवासी शेतकऱ्यांना शेतीबाबत जागरूक करायचंय..

तिचं नाव नासरी. मेळघाटातील आदिवासी पाडय़ात कायम हातपाय पसरणाऱ्या कुपोषण, गरोदर मातामृत्यू, बालमृत्यू यांसारख्या प्रश्नांवर यशस्वी मात करत तिने आदिवासींच्या जीवनात एक नवी प्रकाशवाट निर्माण केली आहे.
नासरीच्या वाटय़ाला जीवनात प्रखर संघर्ष आला, पण त्यातून तिला कधीच निराशा आली नाही. उलट संघर्ष हाच तिला प्रेरणा देऊन गेला, मात्र याच संघर्षांतून प्रेरणा घेत आज नासरीने आदिवासी पाडय़ामध्ये कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, बालमजुरी, निरंतर शिक्षण या समस्यांवर मात करत आदिवासींच्या जगण्यात एक नवी पहाट फुलविली आहे. यामुळे संपूर्ण आदिवासी पाडय़ामध्ये लहान मुलांसह मोठय़ा माणसांपर्यंत सगळेच तिला प्रेमाने ‘गुड मॉर्निग ताई’ या नावाने हाका मारतात.
अकोला जिल्हय़ातील आकोट शहराजवळ तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा हे गाव आहे. मेळघाटाच्या पायथ्याशी सातपुडय़ाच्या कुशीत असलेले हे छोटेसे गाव हे शंभर टक्के आदिवासी शेतकरी व शेतमजुरांचे गाव. कोरकू आणि भिलाला या इथल्या जमाती. शिक्षणाचे महत्त्व आणि प्रमाण इथे तसे कमीच. त्यामुळे इथला आदिवासी शेतकरी हा आधुनिक शेतीबद्दल तसा अनभिज्ञच. त्यातही इथल्या आदिवासी शेतकऱ्यांची भाषा ही कोरकू. त्यांचे मराठीचे ज्ञान अत्यल्प. त्यामुळे इथल्या सामाजिक विकासात कायमच अडथळे, परंतु बोरव्हा हे गाव याला अपवाद ठरले आहे. भिलाला या आदिवासी जमातीच्या शेकडय़ा चव्हाण यांची मुलगी नासरी ही त्यांच्या समाजात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली एकटीच मुलगी आहे. शिक्षणासाठी नासरीला अनेक खडतर आव्हानांना तोंड द्यावे लागेल. चौथ्या वर्गापर्यंत जि.प. शाळा बोरव्हा येथे शिकलेल्या नासरीला पुढील शिक्षणासाठी हिवरखेड या गावापर्यंत जाण्यासाठी रोज नदी, नाले, ओढे, जंगल पार करत रोज जाऊन-येऊन १६ किमी पायपीट करावी लागायची. या प्रवासात शाळेला जाताना कित्येकदा तिची अस्वल, कोल्हा, लांडगा, रानडुकरे, साप, अजगर, िवचू, खेकडे यांच्याशी गाठ पडायची. कधी शाळेतून परताना ती पावसात अडकून पडायची. कित्येकदा नदीला पूर आला की, नदीचे पाणी ओसरेपर्यंत तिला वाट पाहावी लागायची. शेवटी वडील तिला अंधारात नदी परिसरात शोधायला निघायचे.
शाळेला जाताना कित्येकदा तिच्याकडे जेवणाचा डबा नसायचा. तरीपण आनंदी नासरी रानमेव्याची चंगळ करायची. आठ मैल चालत शाळेला जाणारी नासरी वाटेत रानमेव्याची न्याहारी करायची. त्यामध्ये संत्री, चिंचा, बोरं, कवठं, आंबा, चिकू, पपई, जंगली पेरू, जांभूळ आदींची मेजवानी असायची. शाळेत ‘खरी कमाई’सारख्या उपक्रमांमध्ये इतर विद्यार्थी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावायचे, तर नासरी आपल्या रानमेव्यांचं दुकान मांडायची. यातनं मिळालेले पसे ती गावात वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य खरेदी यावर खर्च करायची. नासरी ही भिलाला या आदिवासी जमातीची. तिची मातृभाषा निमाडी आणि गावात निम्मी लोकवस्ती ही कोरकू भाषकांची, पण नासरीची निमाडी, कोरकू, िहदी, मराठी, भिलाला या भाषांवर पकड असल्याकारणाने ती पंचक्रोशीतील आदिवासी गावातील लोकांशी सहज संवाद साधू शकते.
बोरव्हा हे अगदी लहान गाव. ४०० घरांच्या लोकवस्तीचे. गावाचा आठवडी बाजार दर सोमवारला भरणारा. म्हणायला आठवडी बाजार, पण बाजारात दुकाने किती? तर मोजून तीन. या तीन दुकानांच्या बाजारातूनच काय ते खरेदी करायचे. नाही तर हिवरखाड या मोठय़ा गावी बाजाराला जावं लागणार किंवा तालुक्याला. बरं ही तीन दुकाने म्हणजे ग्रामीण शॉिपग मॉलच. एकाच दुकानात भाजीपासून तर किराणा मालापर्यंत, नॉव्हेल्टीपासून तर कपडय़ांपर्यंत सगळं. यातील काही दुकानदारांचं म्हणणं ऐकलं तर पटते. त्यांच्या म्हणण्यानुसार आदिवासींची आíथक क्रयशक्तीच कमी असल्याने, गरिबी असल्याने बाजारात फार काही उलाढाल होत नाही.
नासरीला शेतीची उपजत आवड आहे. सातव्या वर्गात असतानापासूनच नासरी वडिलांना शेतीकामात मदत करायची. वडिलांसोबत ती शेतात वखरं, डवरे वाहायची तेव्हा गावातील मुली, लोक तिला मुलगी असून अशी माणसाची कामं करते म्हणून चिडवायचे. कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत चार वर्षांपूर्वी सर्ग विकास समितीने गावात शेतकऱ्यांची शेतीशाळा सुरू केली. शेतीची उपजत आवड असणाऱ्या नासरीने हिरिरीने प्रत्येक शेतीशाळेला हजेरी लावली. कमी खर्चाची शेती होऊ शकते यावर विश्वास बसल्यामुळे सेंद्रिय शेतीसंबंधी बायोडायनॅमिक तंत्रज्ञान अवगत करून घेतले. पहिल्या वर्षी स्वत:च्या घरून बायोडायनॅमिक पद्धतीला (सेंद्रिय शेतीला) सुरुवात केली. नासरीने स्वत: पुढाकार घेत गावातील सर्व उकिरडय़ांचे शास्त्रशुद्ध बायोडायनॅमिक कंपोस्ट करून घेतले. यामुळे घरच्या घरीच कंपोस्ट खत तयार होत असल्याने गावातील स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्नदेखील सुटला आहे. शिवाय बायोडायनॅमिक पॉलिकल्चर र-९ (एस नाइन) हे गावातच घरोघरी तयार होत असल्यामुळे बीजप्रक्रिया, कंपोस्टिंग जैविक कीडनाशके आदींची निर्मिती होत आहे. त्यामुळे नासरीच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा जैविक कीडरोधक व टॉनिक घरोघरी तयार करण्यात येत आहे. बाजारातील रासायनिक कीडनाशकांऐवजी आता याचा वापर होतो आहे. त्यामुळे नासरीच्या प्रयत्नातून शेतीवरील खर्च कमी झाला असून विषारी रसायनांचा वापर टाळला आहे. २०११ या साली एका संस्थेने बालमजुरीविरोधी अभियानांतर्गत नासरीच्या गाव परिसरात जनजागृतीचे कार्य सुरू केले. नासरीही त्या संस्थेसोबत जनजागृती कार्य करू लागली. नासरीने शिक्षणातील अडथळे, कमतरता जवळून बघितल्या असल्यामुळे, अपुऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांमुळे शिक्षणात येणारा खंड, अवहेलना तिला थांबवायची होती. चार वर्षांपर्यंत संबंधित संस्थेने हे कार्य केले, पण संस्थेचा कार्यकाळ संपल्यावर वर्ग वाऱ्यावर सोडला. नासरीने स्वत: हे शिवधनुष्य पेललं. आदिवासींच्या जीवनात होणारे स्थलांतरण, गरिबी, शैक्षणिक कार्य शासकीय कागदपत्रांची कमतरता आदींमुळे आदिवासींमध्ये शिक्षणाची जाणीव नाही. त्यांना ते समजावताना तिला सुरुवातीला खूप त्रास झाला. आदिवासी म्हणायचे, आमच्याकडे जातीचा दाखला, जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, रेशनकार्ड नाही. त्यामुळे शिक्षण मिळत नाही, नोकरी मिळत नाही. मग शिक्षण काय कामाचं? नासरीने मात्र याच आदिवासी बालकांना त्यांच्या भाषेत शाळा शिकवली. रोज संध्याकाळी खुल्या आभाळाच्या छताखाली नासरीची शाळा भरते. आज नासरीच्या शाळेत ४० मुलंमुली आहेत. या शाळेत खेळ, गाणी, गप्पा, गोष्टी, नाच, नाटक यांच्या माध्यमांतून हसतखेळत शिक्षण मिळतं. त्यामुळे या शाळेत मला मुलांना रागवावं लागत नाही, असं नासरी सांगते. नासरीला ही मुले गुड मार्निग ताई म्हणूनच ओळखतात. ही सर्व मुलं आधी रोजंदारीने आजूबाजूच्या शेतावर, वीटभट्टय़ांवर बालमजुरी करायची, पण नासरच्या शाळेने हे थांबवलं. आता तर एखादय़ा मुलाला त्याच्या घरच्यांनी जबरदस्तीने मजुरी करायला पाठवलं, तर तो चटकन म्हणतो, ‘‘मी ‘गुड मॉìनग ताईला’ तुमचं नाव सांगून टाकीन. मी मजुरी करणार नाही.’’ गावात पूर्वी बालविवाह व्हायचे, पण आता या शाळेने हे थांबवले आहेत आणि जर का कुठे बालविवाह होत असेल, तर नासरी आणि तिची ही मुक्तशाळेची बालफौज धडक द्यायला तयारच असते. या शाळेची आणखी एक उपलब्धी म्हणजे नासरीने यातल्या दहा मुलांना नियमित शाळेत प्रवेश मिळवून दिला. शिक्षणापासून वंचित मुलांची ही विशेष शाळा म्हणूनच खास बाब ठरते आहे. आदिवासी पाडय़ामध्ये कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, गरोदर मातामृत्यू यांचे प्रमाण हे जास्त असते. नासरी गावातील गरोदर स्त्रियांसह बालकमातांना सकस आहार, लसीकरण, कुटुंब नियोजन आदींचे ज्ञान हे त्यांच्याच आदिवासी भाषेत देते. कुपोषणावर मात करण्याकरिता नासरीने घरोघरी सीताफळ, पेरू, आंबा, िनबूची परसबाग निर्माण केली आहे. नासरीचे कार्य बहुआयामी असून कृषी, समाज, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदीबाबत मोलाचे ठरते आहे. कीटकनाशकांच्या रिकाम्या डब्यांचा वापर आदिवासी गावकरी आंघोळ करताना पाणी घेण्यासाठी व शौचालयासाठी वापरत असत. अशा डब्यामध्ये कीटकनाशकांचे अंश शिल्लक राहत असल्यामुळे अनेक आजार होत असत. नासरीने घरोघरी जाऊन याविषयी जनजागृती करून असे डबे जमा करून नष्ट केले आणि गावकऱ्यांना स्वत: १२० नवीन प्लास्टिक डबे मग पुरविले. आता तर नासरीच्या पुढाकाराने गाव हागणदारी मुक्तीच्या वाटेवर आहे. तिच्या या अभिनव प्रयोगामुळे गावकऱ्यांत तिच्या कामाविषयी आदर व विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.
इंटरनॅशनल फार्मर्स डायलॉगअंतर्गत १२ पेक्षा जास्त देशांतील शेतीतज्ज्ञ, शेतकरी, शास्त्रज्ञ नासरीचं कार्य पाहून गेलेत. याच फोरमसाठी तिला लौकरच परदेशात जायचं आहे. त्यासाठी ती अकोल्यात इंग्रजी संभाषणाचे धडे गिरवीत आहेत. त्याकरिता नासरी पहाटे चारच्या अंधारात तिच्या गावाहून निघते. आठ किलोमीटर चालत जाऊन रेल्वे स्टेशन गाठते आणि अकोल्याला जाते. तिचा संघर्ष हा आजही सुरूच आहे.
संतोष विणके – response.lokprabha@expressindia.com