News Flash

समर्थ माणसांचं गाव

<span style="color: #ff0000;">उपक्रम</span><br />‘निवांत’कडे असलेली मुलं अंध आहेत, पण ती डोळस माणसांपेक्षाही सक्षम आहेत. ती उत्तम प्रतीची चॉकोलेटस् बनवतात.

| September 20, 2013 01:01 am

उपक्रम
‘निवांत’कडे असलेली मुलं अंध आहेत, पण ती डोळस माणसांपेक्षाही सक्षम आहेत. ती उत्तम प्रतीची चॉकोलेटस् बनवतात. त्यांनी सॉफ्टवेअर पुरवणारी टेकव्हिजन नावाची संस्था सुरू केली आहे.  मुलं इथे येऊन आपल्या पायांवर उभं रहायला शिकतात. त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांमागे आहेत, मीरा आणि आनंद बडवे या जोडप्याचे डोळस प्रयत्न..
‘‘मला माझ्या मुलांकडे बघून खूप अभिमान आणि कौतुकही वाटते. त्यांच्यातील कलागुण बघून डोळस लोकांनाही आश्चर्य वाटते पण मुलं मात्र लोकांना का आश्चर्य वाटते याचे नवल करतात. एके काळी माझे विद्यार्थी असलेली पोरं आता माझ्या खांद्याला खांदा लावून शिकवतात,’’
 मीराताई त्यांच्या अंध मुक्त विकासालयातील विशेष दृष्टी असलेल्या मुलांचं कौतुक करायला मागेपुढे पाहत नाहीत. पण मुलांच्या या यशामागे त्यांचा किती महत्त्वाचा वाटा आहे हे मात्र त्या सांगत नाहीत. ही काही त्यांची स्वत:ची मुलं नव्हेत. पण पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत सुमारे पंधराशेच्या वर अंध मुलांना शिकवून मोठे केले आहे, स्वत:च्या पायावर उभे केले आहे.
मुलगी मोठी झाल्यावर स्वत:च्या आयुष्याचा काहीतरी चांगला उपयोग करावा म्हणून त्यांनी परत शिकवायला सुरुवात करायचं ठरवलं. मीराताईंचे यजमान आपल्या वाढदिवसाला रक्तदान करायचे व कोरेगाव पार्कातील अंधशाळेला देणगी द्यायचे. एके दिवशी मीराताईही त्यांच्याबरोबर गेल्या. त्या दिवशी त्यांनी जिन्यावरून धडपडत जाणाऱ्या छोटय़ा मुलांची रांग पाहिली. त्यातील एक चिमुकला मीराताईंना येऊन धडकला आणि मिठी मारून रडू लागला. त्याला वाटलं आपण आपल्या आईला मिठी मारून रडतो आहोत. हाच क्षण मीराताईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. शाळेतून बाहेर पडताना त्यांनी आपणही या मुलांसाठी काहीतरी करायचं हे ठरवून टाकलं. त्यांच्याकडे शिकवायचा अनुभव होता. याच अनुभवाचा उपयोग करून अंधशाळेत इंग्रजी शिकवायचं असं मीराताईंनी ठरवलं. ‘निवांत’च्या उदयाची ती पहिली पायरी होती हे त्या वेळी त्यांनाही माहीत नव्हते. १९९६ मध्ये त्यांनी अंधशाळेतल्या इवल्यांना शिकवायला सुरु वात केली. पण शिकवणार कसं? मुलांना डोळस लिपी येत नाही आणि यांना ब्रेल लिपी येत नाही. केवळ सहा ठिपक्यांमधून ब्रेल तयार होते. शेवटी मुलांनीच त्यातून उपाय शोधला. त्यांचे इयत्ता सातवीचे विद्यार्थीच त्यांना ब्रेल लिपी शिकवायला लागले. मुलांचा इंग्रजीचा आणि मीराताईंचा ब्रेल लिपीचा अभ्यास एकाच वेळी सुरू झाला. त्यांची मुलांशी छान गट्टी जमली. पण मुलं मोठी झाली तशी त्यांची बेपर्वाई वाढली. मिळणाऱ्या सोयींची किंमत कळेनाशी झाली. मीराताईंचा जीव गुदमरू लागला आणि त्यांनी शाळा सोडून दिली. पण शाळा सोडली तरी एवढय़ा सहजासहजी त्या नातं तोडू शकल्या नाहीत. शाळेतला त्यांचा एक विद्यार्थी सिद्धा (सिद्धार्थ गायकवाड) त्यांच्या दारात येऊन उभा राहिला. त्याला इतर काही नको होतं. तो केवळ शिक्षणाच्या अपेक्षेने आला होता. ‘निवांत’ची सुरुवात सिद्धार्थपासून झाली. सिद्धार्थसारखे अनेक जण ‘निवांत’च्या दारात येऊन उभे राहू लागले आणि १९९६ साली  ‘निवांत अंध मुक्त विकासालया’ची स्थापना झाली.
कायद्याप्रमाणे व्यक्ती अठरा वर्षांची झाली की सज्ञान होते. बऱ्याच अंध मुलांचे पालक तर आपल्या पाल्याची जन्मनोंद करण्याचेही कष्ट घेत नाहीत. ही मुलं वयाची अठरा र्वष पूर्ण होईपर्यंत अंधशाळेत सुरक्षित राहतात पण नंतर त्यांनाही कोणी वाली राहत नाही. मीरा आणि आनंद बडवे अशाच कित्येक मुलांचा आधारस्तंभ बनले. त्यांचा राहता बंगला ‘निवांत’ बडवे कुटुंबीयांबरोबरच अनेक दृष्टिहिनांचे हक्काचे घर झाले. ‘निवांत’मध्ये एवढय़ा वर्षांत अनेक जण आले आणि गेले. या सगळ्यांची त्या मीरामाय झाल्या. मुलांना शिस्त लावणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना मार्ग दाखवण्याचं कामही त्याच करतात. अंध मुलं-मुली ‘निवांत’मध्ये येऊ लागली तेव्हा त्यांना शिस्त नव्हती, वेळेचं भान नव्हतं. त्यांना वेळेचं महत्त्व पटवून द्यायचं कामही मीराताईंनीच केलं.
मीराताईंचे यजमान आनंद आणि मुलगी उमा हे पडद्यामागचे कलाकार. ‘निवांत’च्या हिशेब आणि तंत्रज्ञान यांसारख्या टेक्निकल गोष्टींची जबाबदारी आनंद बडवेंकडे असते. ‘निवांत’शी संलग्न असणाऱ्या ‘टेकव्हिजन’ या मायक्रोसॉफ्ट डेव्हलपमेंट कंपनीची जबाबदारीही त्यांचीच आहे. बडवेंची मुलगी उमा ‘निवांत’च्या मुलांबरोबरच लहानाची मोठी झाली. ‘‘निवांतमध्ये येणारा प्रत्येक जण माझा मित्र आहे. त्यांच्यामुळे घर नेहमी भरलेलं असतं. त्याची आता सवय झाली आहे. घर रिकामं असलं की कसंतरीच वाटतं,’’ असं उमा बडवे सांगतात. संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली  इनसाइट अकॅडमीची संकल्पनाही उमा यांचीच होती.
‘निवांत’ची मुलं विविध मार्गानी स्वत: पैसे कमवून शिकत आहेत. स्वत:च्या शिक्षणाचा खर्च ते स्वत:च करतात. ‘चोको निवांत’ हे असेच एक मुलांचे स्वयंरोजगाराचे माध्यम आहे. मुलं स्वत: चॉकलेट्स तयार करतात. त्यांना वेष्टनात गुंडाळून त्यांची सजावट करतात आणि विकतातही. ‘निवांत’च्या मुलांना चॉकलेट तयार करण्याचं प्रशिक्षण नीता मुंद्रा यांनी दिलं. त्यांनी चॉकलेटचा बेस कसा तयार करायचा, मोल्डमध्ये चॉकलेट कसं भरायचं इथपासून चॉकलेट रॅप करून पिशवीत भरण्यापर्यंत सारं काही शिकवलं. पण त्याच शिक्षणातूनच चॉकलेट मेकिंगचा व्यवसाय करता येईल हे आधी ‘निवांत’मध्ये कोणाच्याच लक्षात आले नाही. पण एकदा बाहेरच्या कोणीतरी सहज चॉकलेटची चव बघितली आणि चॉकलेट्स विकत मागितली. तिथून ‘निवांत’चा चॉकलेट मेकिंगचा व्यवसाय सुरू झाला. मीराताईंनी स्वत: चॉकलेट पॅकिंगचे अनंत प्रकार शिकवले. संपूर्ण दृष्टिहीन मुलांना पॅकिंगसारख्या गोष्टी शिकवायच्या म्हणजे परीक्षाच होती. पण मीराताई त्या परीक्षेतही उत्तीर्ण झाल्या. चॉकलेट ताटातून अलगद कसं उचलायचं, त्यावर आपल्या बोटांचे ठसे उठू न देता ते कसं रॅप करायचं या गोष्टी त्यांनीच शिकवल्या. तयार झालेली चॉकलेट्स ठेवायला कागदी पिशव्या, निरनिराळ्या आकाराचे बॉक्स तयार करायलाही त्यांनी शिकवलं. मोठी ऑर्डर मिळाली की मुलांबरोबर रात्र-रात्र जागून त्यांनी चॉकलेट्सही तयार केली. आता मुलं सगळी खरेदी करण्यापासून ते चॉकलेट विकण्यापर्यंत सगळं स्वत:च करतात आणि यामधून मिळणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह आणि शैक्षणिक खर्च भागवतात. त्यांच्या स्वादिष्ट चॉकलेट्सच्या जोरावर ‘निवांत’ने क्रिस्टल होंडा, सीटी पंडोल्स, जिओमेट्रिक सॉफ्टवेअर, ऑल फॉर अ स्माइल यांसारख्या संस्था आणि कंपन्यांबरोबर करार केले आहेत. ‘निवांत’ने इतर संस्थांनाही चॉकलेट्स तयार करायला शिकवले आहे. चॉकलेट मेकिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक टक्का ते त्यांच्यापेक्षा अधिक गरज असणाऱ्यांना देतात. त्यांनी आत्तापर्यंत  स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन आणि ऑटिझम सेंटर या संस्थांना देणग्या दिल्या आहेत.
‘निवांत’मध्ये ब्रेल कार्ड्स, कागदी पिशव्या आणि खोटी फुलेही तयार केली जातात. मुलांच्या कविता करण्याच्या, चित्र काढण्याच्या आणि ब्रेल लिहिण्याच्या कलेचा एकत्रित वापर होण्यासाठी ब्रेल कार्ड तयार केले जाते. या कार्डवर अंध कलाकाराने काढलेले चित्र असते. कविता ब्रेल आणि डोळसांची भाषा अशा दोन्ही भाषांमध्ये दिलेली असते. या कार्ड्सच्या माध्यमातून मुलांना वर्षांला दहा ते पंधरा हजार रु पये मिळतात. स्टेप्लर, सेलोटेप्स यांचा वापर न करता कागदी पिशव्या तयार केल्या जातात. अनेक बेकऱ्यांमध्ये आणि ‘निवांत’च्या चॉकलेट स्टॉलवर या पिशव्या वापरल्या जातात. अनेक जण आपल्या फावल्या वेळात पिशव्या बनवून विकतात व आपल्या खाणावळीचं बिल भरतात. कापडी फुले तयार करण्याचे कौशल्यही ‘निवांत’च्या अंध मित्रांकडे आहे. त्याच्या माध्यमातूनही मुले पैसे कमावतात.
डोळस विद्यार्थी ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकतात त्याचप्रमाणे ‘निवांत’चे विद्यार्थीही विविध प्रकारचे शिक्षण घेत आहेत. त्यांना यासाठी प्रोत्साहित मीराताईंनीच केले आहे. त्यांनी शिकावे यासाठी वाणिज्य, कला, शास्त्र यांच्याबरोबरच कॉम्प्युटर सायन्स, लायब्ररी सायन्स, डान्सिंग थेअरी, परकीय भाषा याची शिक्षणाची साधने उपलब्ध करून दिली आणि गुरू शोधून दिले. त्या स्वत: अनेक मुलांना विविध प्रकारचे सुमारे २२ विषय शिकवतात. पण नुसत्या शिकवण्यावर त्यांचे काम थांबत नाही. मुलांबरोबर महाविद्यालयात जाऊन वर्गात बसून न समजलेला विषय समजावून घेऊन आणि तो मुलांना समजावून सांगितला. त्या विषयांचे रेकॉर्डिगही केले. प्रिंटर नव्हता तेव्हा हाताने ब्रेलमधील पुस्तके लिहून घेतली. त्या पुस्तकांचे डिक्टेशन, मुद्रितशोधन, ब्रेलमधील छपाई, संपादन, आणि पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रकाशकांना त्या भेटल्या. मुलांच्या वसतिगृहातील प्रवेश, शैक्षणिक प्रवेशासाठी संस्थाप्रमुखांच्या किंवा संबंधितांच्या भेटी घेणे आणि त्यांना मुलांच्या क्षमतेविषयी विश्वास निर्माण करून देणे, नोकऱ्या मिळाव्यात यासाठी मदत करणे यांसारखी अनेक प्रकारची मदत मीरामाय सतत करीत असते.
संदीप खरे यांचे ‘मौनांची भाषांतरे’, रंजना फडकेंचे ‘स्पंदन’, सुधा मूर्तीची पुस्तके, विंदा करंदीकरांचे ‘संहिता’, नारायण सुर्वेचे ‘माझं विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’ अशी अनेक पुस्तके त्यांनी मुलांच्या बरोबरीने ब्रेलमध्ये लिहिली आणि त्यांचे प्रकाशनही केले. मुलांनी लिहिलेल्या ‘माझं विद्यापीठ’ पुस्तकाची एक आवृत्ती नाशिकच्या नारायण सुर्वे प्रतिष्ठानला दिली गेली. आता ‘निवांत’कडे ब्रेल प्रिंटर आहेत, त्यामुळे काम जरा सोपे झाले आहे. ‘निवांत’च्या ग्रंथालयात मुलांनीच लिहिलेली अभ्यासाची आणि अवांतर अशी किती तरी पुस्तके आहेत. आत्तापर्यंत अनेक पुस्तकांचे ब्रेलमध्ये भाषांतर करून महाराष्ट्रभर ती पुस्तके पोचवली आहेत.
मीराताई मुलांनी त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात. ‘निवांत’मध्ये अकरावीनंतर आलेल्या समीना शेखची नृत्यातील आवड बघून त्यांनी तिला कथ्थक शिकायला प्रवृत्त केले. तिला शमा भाटेंसारखा गुरूही शोधून दिला. समीनाने घरातून कोणताही पाठिंबा नसताना मीराताईंच्या मदतीने नृत्यात बीए पूर्ण केले. आता अंध, मूकबधिर, अपंगांना नृत्य शिकवून जगाचा दृष्टिकोन बदलण्याचा ती प्रयत्न करणार आहे. वृषाली पानसरेने राज्यशास्त्रात बीए केले. आता ती लायब्ररी सायन्स शिकते आहे. ‘निवांत’च्या ग्रंथालयाची ग्रंथपालही तीच आहे. निशांत माने आणि सलीम अत्तार यांनी बेकरी कन्फेशनरीचा कोर्स पूर्ण केला आहे. ‘निवांत’चा चॉकलेट विभाग तेच सांभाळतात. यांच्यासारखे कित्येक तारे ‘निवांत’च्या माध्यमातून स्वत:च्या आयुष्याची गोष्ट स्वत: लिहीत आहेत.
मीराताईंनी या मुलांसाठी काय नाही केले? अंधांना अभ्यासासाठी लागणाऱ्या रेकॉर्डेड कॅसेट्स अभ्यासक्रम बदलला की कालबाहय़ होतात आणि टाकून द्याव्या लागतात. याच्यावर उपाय म्हणून ‘निवांत’ने मुलांना एमपीथ्री प्लेअर मिळवून दिला. मुलांना चित्रे काढायला प्रोत्साहन दिले. आणि त्यांची चित्रे समजूनही घेतली. मुलांना शिकवता यावं यासाठी हार्डवेअर, शरीरशास्त्र, अकाउंट्स, लॉ यांसारखे कितीतरी विषय त्या स्वत: शिकल्या. मुलांना ब्रेलमध्ये नोट्स काढायला मासिके लागतात म्हणून तीही मिळवून दिली. मुलांच्या अंधाऱ्या जगाशी ओळख व्हावी म्हणून त्यांनी डोळे बंद करून चालूनही पाहिले. त्यांच्या या निरपेक्ष कामाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
‘निवांत’मध्ये प्रवेश मिळवण्याची अटही अगदी साधी आहे. विद्यार्थी गरजू असला पाहिजे, तो ज्ञानपिपासू असला पाहिजे, स्वत: कष्ट करून आयुष्यात कोणीतरी बनायची आस असली पाहिजे, या अटींची पूर्तता होत असेल तर ‘निवांत’ त्या विद्यार्थ्यांसाठी झगडायला तयार आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार आहे. या ठिकाणी अंध मुले येतात आणि स्वावलंबी होऊन बाहेर पडतात. मीराताईंच्याच शब्दात सांगायचे झाले तर, येथे अंधत्वाचं भांडवल केलं जात नाही तर ‘निवांत’ हे समर्थ माणसांचं गाव आहे.  

१ी२स्र्ल्ल२ी.’‘स्र्१ुंँं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:01 am

Web Title: niwant andh mukta vikasalay meera and anand badve
Next Stories
1 उन्मादाचा इशारा..
2 कार्यकर्त्यांचा उत्साह ऊर्जा की उन्माद ?
3 काय आहे श्रीमद्मुद्गल महापुराण?