response.lokprabha@expressindia.com

पावसाळा कृषीप्रधान देशाच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतो. त्यामुळे आपल्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा ऋतु. यंदा सरासरीइतका पाऊस पडेल या दिलासादायक पूर्वानुमानाबरोबरच आपल्याकडचा पावसाचा मुक्काम वाढायला लागला आहे, पावसाळा काहीसा लांबायला लागला आहे असंही हवामान विभागाचा अभ्यास सांगतो आहे. भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी केलेलं विश्लेषण-

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

सध्याच्या करोनाकहरामुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांसाठी यंदा पाऊस सरासरीइतका पडेल ही खरोखरच दिलासादायक बातमी आहे. यंदा संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर या काळात सरासरीइतका पाऊस पडेल असं पूर्वानुमान आहे. पावसाची सरासरी असं म्हटलं जातं तेव्हा ती ९६ ते १०४ टक्के इतकी असते. ती १०४ च्या वर असेल तर तिला सरासरीपेक्षा जास्त असं म्हटलं जातं. ९६ च्या खाली असेल तर तिला सरासरीपेक्षा कमी असं म्हटलं जातं. गणिती प्रारूपांच्या आधारे ही सरासरी काढली जाते. तर यंदा संपूर्ण देशात सरासरी ९८ टक्के पाऊस अपेक्षित आहे. आपल्या संपूर्ण देशाचा सरासरी पाऊस हा ८८ सेंटीमीटर आहे. १९६० ते २०१० या ५० वर्षांच्या काळात संपूर्ण भारतात जून ते सप्टेंबर या काळात जो पाऊस पडला त्याच्या आकडेवारीवरून हा आकडा निश्चित केला आहे. यंदा पाऊस सरासरी ९८ टक्के असेल, हे मांडताना हवामान विभाग जे गणिती प्रारूप वापरतं, ते शेतकऱ्यांसाठी वेगळं असतं, आपत्ती नियंत्रणासाठी, विमानसेवेसाठी वेगवेगळं असतं. तसंच पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानासाठीदेखील वेगळं प्रारूप असतं. त्याला सांख्यिकी प्रारुप म्हटलं जातं.

पावसाचं पूर्वानुमान दोन टप्प्यात प्रसिद्ध केलं जातं. पहिला टप्पा एप्रिल महिन्यात प्रसिद्ध केला जातो.त्यात पावसाचा अंदाज घेण्यासाठी पाच मापदंड (पॅरॅमीटर) आहेत. त्यात  १) युरोपमधल्या जमिनीवरच्या तापमानातील जानेवारी महिन्यातील फरक, २) विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील उष्ण पाण्याची व्याप्ती, ३) उत्तर पश्चिम प्रशांत महासागर आणि उत्तर पूर्व अटलांटिक समुद्र यांच्या पाण्याच्या तापमानातील  डिसेंबर-जानेवारी महिन्यातील फरक, ४) विषुववृत्तीय दक्षिण पूर्व हिंदी महासागराचं फेब्रुवारी महिन्यातील पाण्याचं तापमान आणि ५) पूर्व आशिया खंडातील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामधला हवेचा दाब यांचा समावेश आहे. दीर्घकालीन पूर्वानुमान देण्यासाठीच्या  प्रारुपतील हे पाच दूरस्थ घटक आहेत. या पाच घटकांचा मान्सूनवर प्रभाव असू शकतो हे बऱ्याच वर्षांच्या अभ्यासातून आढळलं आहे.

मान्सूनच्या पूर्वानुमानाचा दुसरा टप्पा ३१ मे रोजी प्रसिद्ध केला जातो. त्याच्या मापदंडांमध्ये तीन घटकांचा समावेश असतो. पहिला घटक आहे प्रशांत महासागरातील निनो ३.४ चं तापमान. निनो ३.४ हा प्रशांत महासागरामधला वैज्ञानिकांनी निश्चित केलेला भाग आहे. त्याच्या तापमानावरून अल निनो असेल की नाही ते ठरवलं जातं. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अल निनोचा प्रभाव आपल्या मान्सूनवर प्रत्येक वेळी होतोच असं नाही, पण बऱ्याचदा होतो. त्यामुळे अल निनो कुठल्या वेळी तयार होतो, तो कधी संपेल, त्याचं शिखर कधी गाठलं जाईल या सगळ्यावर भारताचा पाऊसही अवलंबून असतो. खूपदा अल निनो असा उल्लेख जरी झाला तरी सगळे हवालदिल होतात, यंदाचा पावसाळा हातातून गेला असं लोकांना वाटतं. पण दरवेळी असं काही नसतं. यंदाच्या परिस्थितीबद्दल सांगायचं तर यंदा अल निनो सक्रीय नाही.

या मापदंडातील दुसरा घटक आहे उत्तर अटलांटिक समुद्रामधला हवेचा दाब आणि तिसरा घटक आहे प्रशांत महासागरातील वाऱ्यांबद्दलची माहिती. हे तीन घटक जूनमधल्या म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील पूर्वानुमानामध्ये समाविष्ट केले जातात.

वर उल्लेख केलेल्या पावसासंदर्भातल्या पाच मापदंडांवर हवामान विभागानं एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्याचं पूर्वानुमान दिलं होतं. त्यात म्हटलं की संपूर्ण देशात यंदा सरासरीइतका पाऊस असेल. त्यानंतर साधारण ३०-३१ मेपर्यंत पूर्वानुमान देण्याचा दुसरा टप्पा येईल. त्यात पुढचं पूर्वानुमान असेल. हवामान विभाग अशा पद्धतीने हवामानाचं पूर्वानुमान दोन टप्प्यांत देतं. पहिला एप्रिलच्या मध्यावर तर दुसरा टप्पा मे अखेर ते जूनच्या पहिल्या आठवडय़ात असतो. पहिल्या टप्प्यात सगळ्या देशात सरासरीच्या किती टक्के पाऊस पडेल याची माहिती दिली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण देशात सरासरी पाऊस किती असेल हे परत एकदा सांगितलं जातं. कारण तोपर्यंत पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतो. एप्रिलमध्ये दिलेल्या पूर्वानुमानानुसारच परिस्थिती आहे की त्यात काही बदल आहे, हे दुसऱ्या टप्प्यात तपासलं जातं. त्याशिवाय दक्षिण भारत, मध्य भारत उत्तर पश्चिम भारत आणि इशान्य भारत या देशाच्या चार भौगोलिक भागांत किती पाऊस पडेल हेही दुसऱ्या टप्प्यात सांगितलं जातं. त्याबरोबरच या दुसऱ्या टप्प्यात जुलै- ऑगस्टमध्ये किती पाऊस पडेल हे सांगितलं जातं. याचा फायदा शेतकऱ्याला त्याचं नियोजन करण्यासाठी होऊ शकतो. धोरणकर्त्यांना धोरणं ठरवण्यासाठी होतो. उद्योगधंद्यांना त्यानुसार आखणी करता येते. सर्वसामान्यांनाही त्यातून यंदाचा पाऊस कसा आहे आणि त्यावर आधारित यंदाचं वर्ष कसं जाईल हे समजतं.

याशिवाय पावसाविषयी आणखी एक पूर्वानुमान आम्ही देतो, ते म्हणजे पाऊस केरळमध्ये कधी दाखल होईल. पाऊस कसा असेल याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असते. ते कळल्यावर तो कधी येणार ही उत्सुकता असते आणि मग केरळमध्ये कधी येणार हे कळल्यावर महाराष्ट्रात कधी येणार हा प्रश्न असतो. केरळमध्ये मान्सून सहसा १ जूनच्या आसपास येतो. यंदा तो थोडा लवकर म्हणजे ३१ मे राजी येईल असा अंदाज आम्ही वर्तवला आहे. त्याचंही गणिती प्रारूप असतं. त्याच्या अंदाजानुसार तीनचार दिवसांचा पुढेमागे फरक पडू शकतो. कदाचित तो २७-२८ मे किंवा २-३ जूनपर्यंत येऊ शकतो. पण यंदा असं दिसतं आहे की तो सरासरीपेक्षा थोडासा लवकर येण्याची शक्यता आहे.

अंदमानला तो सहसा मे महिन्याच्या २२ तारखेला येतो. यंदा तिथे तो २१ तारखेला येईल असं पूर्वानुमान मांडलं होतं. त्याप्रमाणे तो आला. अंदमानमधून त्याची केरळकडे वाटचाल सुरू झालेली आहे. तो केरळमध्ये आला की पुढच्या दोन दिवसांत परिस्थिती किती अनुकूल आहे, त्यावर तो उत्तरेकडे कुठल्या भागात कसकसा पुढे सरकेल ते हवामान विभाग सांगू शकतो. ३१ तारखेला मान्सून केरळमध्ये आला तर महाराष्ट्रात तो त्यानंतर लगेचच चार- पाच दिवसांत येईल का असं अनेकदा लोक विचारतात. या प्रश्नाचं उत्तर असं की त्या दिवसांमधील हवामानाच्या परिस्थितीत जसा बदल होईल तसतसा पाऊस पुढे सरकतो.

चक्रीवादळं

अलीकडच्या काळात चक्रीवादळं वाढली आहेत का असा प्रश्नही विचारला जातो. पण हवामानाबद्दल बोलायचं तर गेल्या १५० वर्षांपेक्षा जास्त काळाचा अभ्यास आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वादळं वाढली आहेत का याचं उत्तर द्यायचं तर असं म्हणता येईल की अरबी समुद्रात तशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात हे खरं आहे. पुढची काही र्वष हे सातत्याने होत राहिलं तर कदाचित आपल्याला असं म्हणता येईल की आता अरबी समुद्रदेखील सक्रीय व्हायला लागला आहे आणि आपल्यालाही आता त्यानुसार नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामुळे चक्रीवादळांच्या संदर्भात लगेचच असा काही निष्कर्ष काढता येणार नाही. हवामान विभाग त्या अनुषंगाने काम करत आहे. निष्कर्षांपर्यंत यायला अजून वेळ आहे. उदाहरणार्थ गेल्या दोन वर्षांत राज्यात खूप चांगला पाऊस पडला तर पुढची पाच वर्षेदेखील तसाच पडेल का असं जर कुणी विचारलं तर ते सांगता येत नाही, असंच उत्तर असू शकतं. त्यामुळे चक्रीवादळांच्या संदर्भात आत्ताच असा काही निष्कर्ष काढणं घाईघाईचं आणि अशास्त्रीय ठरेल.

पावसाचा मुक्काम वाढला

हवामान विभागाने गेल्या वर्षी केलेल्या अभ्यासानुसार असं दिसतं की मान्सून येण्याच्या वेळेत फारसा फरक पडलेला नाही. त्याची केरळमध्ये येण्याचीही वेळ बदललेली नाही. पण संपूर्ण देशाला व्यापण्याची त्याची प्रक्रिया लवकर व्हायला लागली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा परतीचा प्रवासही आता उशिरा व्हायला लागलेला आहे. आपल्याकडे मान्सूनचा कालावधी सहसा जून ते सप्टेंबर असतो. पण आता परतीचा पाऊस लांबून तो ऑक्टोबपर्यंत गेला आहे. पावसाची राजस्थानला पोहोचण्याची वेळ थोडी अलीकडे आली आहे. आणि तिथून परतण्याची वेळ लांबायला लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळ्याचे दिवस वाढले आहेत, असं म्हणता येईल. पाऊस पडल्याच्या तारखा आणि पावसाचं मोजमाप करून केलेलं हे गणित आहे. यात संपूर्ण देशातल्या पावसाचा १५० वर्षांचा अभ्यास आहे. त्यातून हे कळलं की पावसाचे दिवस वाढले आहेत. हे चांगलंच आहे. त्यामुळे पाणीसाठी वाढायला मदत होते. त्याचा फायदा खरिपानंतरच्या हंगामाला, रब्बी पिकांना होतो. अशा पद्धतीने बदलणाऱ्या गोष्टींशी जुळवून घेत टिकण्यासाठी काही गोष्टी बदलणं गरजेचं असतं. उदा पीक पद्धत. काही ठिकाणी पाऊस कमी होतो आहे, काही ठिकाणी वाढतो आहे. अशा वेळी तिथल्या शेतक ऱ्यांनी कुठली पिकं घ्यायची ते बघितलं पाहिजे. मध्य महाराष्ट्रात ऊस घेतात. त्याला पाणी जास्त लागतं. कोकणात भात घेतात. त्यालाही पाणी जास्त लागतं. तिथल्या पावसाचं प्रमाण बदललं तर त्या शेतकऱ्यांनी कुठलं पीक घ्यायचं हे ठरवावं लागेल. बदलतं ऋतुमान, पावसाची बदलती वेळ आणि प्रमाण यानुसार काही पिकांमध्ये बदल करण्याची गरज आहे. अशा प्रकारचे सल्ले कृषी विद्यापीठंही शेतक ऱ्याला वेळोवेळी देत असतात. वाढलेल्या पाऊसकाळाची आम्ही काढलेली आकडेवारी आमच्या गणिती प्रारूपांमधून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. काय होतं आहे हे आम्ही शोधलं आहे, हा पहिला टप्पा आहे. हा अभ्यास गेल्या ५०-६० वर्षांच्या पावसावर आधारलेला आहे. हे काय होतं आहे, का होतं आहे, पुढे अजून किती होणार आहे ते शोधणं हा पुढचा टप्पा आहे. या अभ्यासाचा फायदा देशातल्या शेतक ऱ्यांना, त्यांच्याशी संबंधित यंत्रणांना होणार आहे. त्यांना पावसाचं नवीन वेळापत्रक मिळालं आहे. आता त्याप्रमाणे त्यांना त्यांचं नियोजन करता येईल.

नवी हवामान केंद्रं

भारतीय हवामान विभागाचं संपूर्ण देशासाठी मान्सूनचं जे पूर्वानुमान असतं ते रोजच्या पूर्वानुमानापेक्षा वेगळं असतं. रोज दिलं जातं त्या पूर्वानुमानाला अल्पकालीन पूर्वानुमान  म्हणतात. ते साधारण पाच ते सात दिवसांसाठीचं जिल्हास्तरीय पूर्वानुमान असतं. त्यात काही शहरांचंदेखील हवामानाचं पूर्वानुमान असतं. त्याव्यतिरिक्त एक महिन्यासाठीचं विस्तारित पूर्वानुमान असतं. या दोन्हीच्या मधलं  मध्यमकालीन पूर्वानुमान असतं. दहा ते पंधरा दिवसांसाठीचं हे पूर्वानुमान मुख्यत: कृषी क्षेत्रासाठी असतं. ते दर मंगळवारी आणि शुक्रवारी दिलं जातं. त्यात पुढच्या पाच दिवसांत हवामानात काय बदल होणार आहे याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळण्यासाठी ते आता तालुका पातळीवर सुरू केलं आहे. त्यासाठीची प्रारुपं, निरीक्षण केंद्रं उभी करण्यात येत आहे. मान्सून सुरू व्हायच्या आत ती लावण्याचा प्रयत्न आहे. त्यातली बरीच लागलेलीही आहेत. हवामान विभागाचा हा नवीन उपक्रम आहे.

देशात हवामान विभागाचं स्वयंचलित हवामान केंद्रांचं जाळं आहे. त्यातून दर १५ मिनिटांनी हवामानाची माहिती थेट मोबाइलमध्ये किंवा वेबसाइटवर मिळू शकते. फक्त हवेची गती किंवा हवेची दिशा, पाऊस, तापमान, हवेचा दाब एवढंच नाही तर त्याबरोबरच कृषी क्षेत्रासाठी लागणारे हवेची आद्र्रता, जमिनीची ओल, मातीची आद्र्रता हे बाकीचे घटक  मोजणारी यंत्रणा आम्ही उभारली आहे. या यंत्राला स्वयंचलित कृषी हवामान केंद्र (ऑटो व्हेदर स्टेशन- अ‍ॅग्रो एडब्ल्यूएस ) असं नाव दिलं आहे. ही यंत्रणा आपल्याकडे तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही २०० यंत्रं लावली जातील. त्यातली १०० च्या वर लावून झाली आहेत. त्यातली महाराष्ट्रात सोलापूर, नंदुरबार, औरंगाबाद मधील १० कृषी विद्यापीठ केंद्रांमध्ये लावली जाणार आहेत. शेतकरी संपूर्ण वर्षभर वेगवेगळी पिकं घेत असतो. त्याला हवेची दिशा, आद्र्रता, तापमान, पाऊस, अवेळी पडणारा पाऊस, जमिनीची ओल ही सगळी माहिती वर्षभर लागते. या यंत्रांमधून मिळणारी कृषीविषयक तसंच हवामानविषयक माहिती कृषी विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लागते. या सगळ्यांसाठी हवामान विभाग हा वेगळा उपक्रम यंदाच्या वर्षी घेऊन आलं आहे. ही अतिशय आधुनिक यंत्रणा आहे. दर १५ मिनिटांनी ही माहिती वेबसाइटवर अपडेट होत राहील. गरज पडली तर ती त्याहीपेक्षा अगदी दर पाच मिनिटांनी त्यातून माहिती मिळू शकेल. ही यंत्रणा कृषी विद्यापीठ केंद्रात लावलेली आहे. ही विद्यापीठं शेतकऱ्यांना संलग्न आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्फत ती माहिती शेतकऱ्यांना मिळेल. त्या पुढच्या टप्प्यात संपूर्ण देशात ३०० च्या वर ही स्वयंचलित कृषी हवामान केंद्र लावायचं नियोजन आहे. त्याचबरोबर आम्ही संपूर्ण देशात आणखी ४०० स्वयंचलित हवामान केंद्रांचा समावेश करतो आहोत. त्यातली काही महाराष्ट्रात असतील. त्याचाही फायदा शेतकऱ्यांबरोबर इतर उद्योगधंद्यांना तसंच सामान्य लोकांना होईल.

स्वयंचलित आणि मानवचलित अशा दोन पद्धतींनी हवामानाचं निरीक्षण केलं जातं. मानवचलित निरीक्षण केंद्रांमध्ये आमची माणसं २४ तास निरीक्षणं घेत असतात. तर स्वयंचलित निरीक्षणं घेण्यासाठी आमच्याकडे तीन प्रकारची यंत्रं आहेत. एक आहे स्वयंचलित पाऊस मापन (ऑटोमेटिक रेन गेज- एआरजी) ते फक्त पाऊस मोजतं. ते दर १५ मिनिटांनी पाऊस किती पडला ते मोजतं आणि मुख्य केंद्राला कळवतं. दुसरं आहे स्वयंचलित हवामान केंद्र (ऑटोमेटिक व्हेदर स्टेशन) ते पाऊसही मोजतं आणि त्याचबरोबर हवेचा वेग, त्याची दिशा, दाब, तापमान मोजतं. ही एआरजीपेक्षा थोडी वरच्या पातळीवरची यंत्रणा आहे. मग आलं कृषी स्वयंचलित हवामान केंद्र (अ‍ॅग्रो ऑटोमेटिक व्हेदर स्टेशन्स) हे याआधीच्या यंत्रणांची सगळी कामं करतं. त्याबरोबर ते शेतकऱ्यांना लागणारी सगळी हवामानाची माहिती गोळा करतं. या माहितीची नोंद घेण्यासाठी त्यात सेन्सर असतात.

देशात गेली १५० वर्षे मानवचलित निरीक्षण केंद्रांच्या आधारे हवामान निरीक्षणाचं काम सुरू आहे. त्यातून हवामानात होणाऱ्या बदलांचा अभ्यास  करता येतो. स्वयंचलित हवामान केंद्रं असताना तुम्ही मानवचलित हवामान केंद्रामधून माहिती का घेता असं काही लोक विचारतात. पण मानवचलित हवामान केंद्राचं कामदेखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या दोन्हीमधले सेन्सर्स वेगवेगळे आहेत. त्यांच्या आकडेवारीमध्ये फरक होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. सर्व मानवचलित केंद्रांचं वर्षभरात एकदा संपूर्ण तपासणी केली जाते. तर स्वयंचलित केंद्रांची दर तीन महिन्यांनी तपासणी केली जाते. आमच्याकडे त्यांच्यासंदर्भात काही मानकं आहेत. ही यंत्रं किती पाऊस किंवा ऊन मोजताहेत, त्यांचे सेन्सर्स धुळीत पडलेले नाहीत ना, त्यात कचरा अडकलेला नाही ना, गवत, झाडं वाढलेली नाहीत ना, मोबाइल जोडणी नीट आहे ना, स्वयंचलित केंद्राची बॅटरी (ते सौरउर्जेवरील बॅटरीवर चालतं.) खराब झाली आहे का, ती लवकर उतरते आहे का, या सगळ्या गोष्टी वार्षिक तसंच तिमाही तपासणीमध्ये बघितल्या जातात. त्यामुळे सहजासहजी त्रुटी राहात नाहीत. आणि हे सगळं करूनही अचानक एखादा सेन्सर खराब झालाच तर आजूबाजूच्या ठिकाणची दुसरी मोजमापं तपासून खात्री करून घेता येईल अशी यंत्रणा आमच्याकडे आहे. एखादी माहिती आमच्या सव्‍‌र्हरमध्ये येतो तेव्हा ती अनेक प्रकारच्या तपासण्यांमधून जाते. अशी मानकं जगामधले सगळे हवामान विभाग वापरतात. आलेली माहिती अचूक आहे हे निश्चित झालं की तिचा संकेतस्थळावर समावेश केला जातो.

वाढतं जाळं

हवामानविषयक जेवढी जास्त माहिती उपलब्ध असेल, तेवढं अचूक पूर्वानुमान देणं शक्य होतं. समजा माझ्याकडे पुण्याचं एक निरीक्षण आहे आणि मुंबईचं एक निरीक्षण आहे आणि मधलं काहीच नाही. आणि मला मधलं पूर्वानुमान द्यायचं आहे. असं असेल तर त्यात अचूकता राहणार नाही. पण पुणे- मुंबईच्या मध्ये हवामान निरीक्षण केंद्रं असेल आणि तिथून सातत्याने माहिती मिळत असेल तर त्या संपूर्ण भागाचं जास्त अचूक पूर्वानुमान देता येईल. कामाचं जाळं, व्यापकता वाढवत जाणं (डेन्सिफिकेशन ऑफ नेटवर्क) ही न संपणारी प्रक्रिया आहे. उदाहरण द्यायचं तर काही वर्षांपूर्वी मुंबईत कुलाबा आणि सांताक्रूझ ही दोन हवामान निरीक्षण केंद्रं होती. गोरेगावच्या किंवा दादरच्या माणसाला नेमकं हवामान पाहिजे असेल तर त्यासाठीची यंत्रणा तेव्हा हवामान खात्याकडे उपलब्ध नव्हती. गेल्या काही वर्षांत हवामान खात्याने मुंबई महापालिकेच्या साहाय्याने १०० पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्रं सुरू केली आहेत. त्यातून जास्तीत जास्त विभागांचं निरीक्षण केलं जातं. त्यासाठी ‘मुंबई लाइव्ह’ नावाचं एक अ‍ॅप तयार केलं आहे. त्यात दर त्या त्या ठिकाणचं १५ मिनिटांनी अपडेट मिळतं. त्यात ठाणे, दहिसर, नवी मुंबईपर्यतचा परिसर समाविष्ट झाला आहे. यामुळे पावसाच्या काळात वगैरे लोकांना त्यानुसार नियोजन करता येतं. आणि दर १५ मिनिटांनी ही माहिती मिळाल्यामुळे पूर्वानुमानात अचूकता येते. अर्थात हे मुंबईत केलं असलं तरी सगळ्या ठिकाणी ते शक्य नाही कारण ते अवाढव्य काम आहे. काही शहरांचा व्याप, महत्त्व यांच्या अनुषंगाने ते केलं आहे. मुंबईत खूप पाऊस पडला, अतिवृष्टी झाली तर होणारं नुकसान आणि एखाद्या गावात होणारं नुकसान यात मोठी तफावत आहे. त्यामुळे मुंबईसाठी महानगर पूर्वानुमान यंत्रणा (मेगासिटी फोरकास्ट सिस्टिम) विकसित केली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या मोठय़ा शहरांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे तिथे हवामानविषयक प्रश्नांमुळे परिणाम होणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. त्यांच्यासाठी अशा प्रकारे जाळं वाढवत जाणं हे हवामान विभागाचं सतत सुरू राहणारं काम आहे.

वेगवेगळी अ‍ॅप

तंत्रज्ञानाबरोबर हवामान विभागात अद्ययावतीकरण केलं जात आहे. पूर्वी हवामानाची माहिती मोबाइलमध्ये मिळत नव्हती. पण आता त्यासाठी अ‍ॅप तयार केली आहेत. काही अ‍ॅप कृषीसाठी आहेत, काही अ‍ॅप गडगडाटासह पाऊस कधी, कुठे पडेल ते सांगतात. ‘दामिनी’सारखं अ‍ॅप गेल्या पाचदहा मिनिटांत वीज कुठे पडली आणि कुठे पडू शकेल ते सांगतं. ‘उमंग’, ‘मेघदूत’, यांच्याबरोबरच भूकंपाच्या पूर्वानुमानासाठी ‘भूकंप’ हे अ‍ॅप आहे. काही लोक उघडय़ा माळरानात काम करतात. कुठे गडगडाटासह पाऊस पडेल याची हवामान खात्याने सूचना दिलेली असते. पण शेतकरी काम थांबवत नहीत. त्यांना ‘दामिनी’ अ‍ॅपचा उपयोग होतो. दोनतीन वर्षांपूर्वी हवामान विभाग समाजमाध्यमांचा वापर करत नव्हता. आता आम्ही काळाची गरज ओळखली आहे आणि व्हॉट्सअ‍ॅप, ब्लॉग, ट्विटर, यूटय़ूब या समाजमाध्यमांचा वापर जास्तीत जास्त करतो आहेत. आमच्या प्रत्येक ऑफिसचं स्वत:चं ट्विटर, फेसबुक अकाउंट आहे. त्यांना त्यांच्या विभागातलं हवामानाचं पूर्वानुमान, इशारे यांच्या घडामोडी समाजमाध्यमात टाकणं त्यांच्यासाठी सक्तीचं आहे. शेतकऱ्यांचे वेगवेगळे ग्रुप केले आहेत, स्थानिक भाषेत या ग्रुपवर सचित्र तसंच व्हिडीओसहित माहिती टाकली जाते.

लोकसहभाग

लोकांकडून हवामानाची माहिती घेऊन तिचा समावेश करणं हा आणखी एक नवा उपक्रम हवामान विभागाने सुरू केला आहे. त्याला आम्ही पब्लिक व्हेदर इन्फॉर्मेशन असं म्हणतो. त्यासाठी आमच्या अ‍ॅपवर, वेबसाइटवर एक पान तयार केलं आहे. त्यात तुमच्या भागात पाऊस असेल, गारा पडत असतील किंवा हवामानात तीव्र बदल होत असतील तर सोबतच्या चित्रावर खूण करा किंवा त्या बदलांबाबत लिहून पाठवा, असं आवाहन केलं आहे. त्यात लोक माहिती पाठवतात. बऱ्याच लोकांना हवामान विभागाला हे कळवण्याची इच्छा असते, हे त्यातून लक्षात येतं. ही माहिती आल्यावर आम्हालाही कळतं की आपल्या पूर्वानुमानानुसार घडतं आहे. प्रत्येक ठिकाणी हवामानाच्या नोंदी घेणं शक्य नाही. त्यामुळे लोकांकडून आलेली माहिती आम्ही आमच्या डेटाबेसमध्ये ठेवायला सुरुवात केली आहे. हवामान विभाग एकटा काही करू शकत नाही. त्याला इतर सरकारी विभागांबरोबर लोकांचीही गरज आहे. लोकही हवामान विभागाने त्याच्या कामात सहभागी होण्याची संधी दिल्यामुळे खूश आहेत. आमच्याकडे गारा पडल्या, पाऊस पडला, मळभ आहे, खूप वारे, विजा चमकताहेत, खूप गरम होत आहे असं ते कळवतात. या पद्धतीने देशाच्या कानाकोपऱ्यात काय होत आहे याची माहिती यापुढच्या काळात हवामान खात्याला मिळू शकेल. या माहितीची उलटतपासणी करण्याचेही निकष आमच्याकडे आहेत. कुणी आमच्याकडे खूप पाऊस पडतो आहे असं सांगितलं तर उपग्रहाद्वारे मिळणारी छायाचित्रे घेऊन ते पडताळून पाहता येतं.

निरीक्षण जेवढं जास्त तेवढं पूर्वानुमान अचूक. त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. काही काळापूर्वी आम्ही जे पूर्वानुमान द्यायचो त्याची व्याप्ती अगदी कमी होती. आता आम्ही तीन किलोमीटरच्या परिसरात काय होऊ शकतं ते सांगू शकतो. हे सांगणं पूर्वी कठीण होतं पण आता तशी गणितं विकसित झाली आहेत. दुसरं म्हणजे संगणकामुळे या सगळ्याला खूप मोठा हातभार लागला आहे. हवामान विभागात सुपर कॉम्प्युटिंग सुविधा आहे. त्यात ठिकठिकाणाहून येणाऱ्या असंख्य नोंदींचं विश्लेषण करून त्यातून वेगवेगळ्या घटकांसाठी लागणारं पूर्वानुमान दिलं जातं. शेतकऱ्यांना लागणारं वेगळं, सामान्य लोकांना लागणारं वेगळं, संरक्षण विभागाला लागणारं वेगळं, आपदा नियंत्रण व्यवस्थापनाला लागणारं पूर्वानुमान वेगळं, शिपिंग, विमानसेवा, कृषी, आरोग्य, क्रीडा, पर्यटन, रेल्वे यांची प्रत्येकाची गरज वेगळी असते. त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्या त्या वेळी पूर्वानुमान लागतं.

आपल्या देशात अत्यंत भिन्न भौगोलिक परिस्थिती आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, काही ठिकाणी कडक पावसाळा, काही ठिकाणी बर्फ, काही ठिकाणी डोंगराळ भाग, तर कुठे समुद्रकिनारे, कुठे जंगलभाग तर कुठे दाट लोकवस्ती असे वेगवेगळे घटक पाहायला मिळतात. या पद्धतीने हवामान विभागासमोर या सर्वाना लागेल ती माहिती मिळवण्याचं आव्हान असतं. या सर्वासाठी दीर्घकालीन पूर्वानुमान असतं. ते फक्त मान्सूनचं नसतं तर हिवाळा, उन्हाळा या सगळ्याच ऋतूंसाठी असतं. पण लोकांना सहसा पावसाचं पूर्वानुमान हवं असतं. कारण शेतीसाठी, देशाची पाण्याची गरज भागवली जाण्यासाठी पावसाळा हा महत्त्वाचा ऋतू आहे. त्याची पावसाळ्याच्या या चार महिन्यांत तजवीज होते. पावसाळ्यावर परिणाम झाला तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. पण गमतीत का होईना पावसाळा हा आपल्या देशाचा अर्थमंत्री आहे, असं म्हणायला हरकत नाही!

१५ महिन्यांचा पावसाळा

अलीकडच्या काळात १५ महिन्यांचा पावसाळा अनुभवायला मिळतो आहे, अशा आशयाची एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने थोडीफार चर्चाही झाली. पण त्यासंदर्भात मी असं सांगेन की वर्षभराच्या वेगवेगळ्या काळात पाऊस पडणं ही काही नवीन आणि वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे १५ महिन्यांचा पावसाळा असं म्हणणं ही थोडीशी अतिशयोक्ती आहे. महाराष्ट्रात साधारणपणे मार्च – एप्रिल महिन्यात पाऊस पडताना दिसतो. या वर्षीही १ मार्च ते २६ मेपर्यंत पाऊस पडला. मार्चमध्ये महाराष्ट्रात संध्याकाळी पाच-सहानंतर सोसाटय़ाचे वारे, विजांचा लखलखाट, मेघगर्जनांसह पाऊस, गारपीट हे चित्र होतं. या अवेळी पावसाचे काही फायदेही आहेत. गुरांना चारा मिळतो, जमिनीला ओल मिळते.  या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे छोटी छोटी तळी भरतात. त्यामुळे खेडोपाडी या काळातला पिण्याच्या पाण्याचा प्रष्टद्धr(२२४)न सुटतो. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाची गेल्या १५० वर्षांची आकडेवारी आमच्याकडे आहे. त्यामुळे मार्च ते मे या काळात पडणाऱ्या पावसाची आकडेवारीही आमच्याकडे आहे. त्यातून दिसतं की पाऊस फक्त मान्सूनच्या काळात नाही तर मार्च ते मे या काळात म्हणजे उन्हाळ्यातही पडतो. पण म्हणून त्याला अवेळी पाऊस म्हणायचं खरं तर कारण नाही. पूर्वी कदाचित या पावसाकडे लोकांचं लक्ष नसावं.  हुशार शेतकरी तेवढय़ा पावसावर दहा-बारा दिवसांचं छोटंसं पीक घेतो. मार्च-एप्रिल महिन्यात पाऊस पडणार हे शेतक ऱ्याला माहीत असतं. त्यामुळे १५ महिन्यांचा पावसाळा असं म्हणण्यापेक्षा, जानेवारी महिन्यातही आपल्याकडे पाऊस होता असं म्हणता येईल.

अवेळी पाऊस

अवकाळी पावसाबद्दलही लोक सातत्याने विचारतात. पण मुळात त्याचा उल्लेख अवेळी पाऊस असा केला जावा असं माझं मत आहे. हवामानमध्ये होणारे जे बदल आहेत, ते फक्त भारतातच नाही तर सगळ्या जगात घडताना दिसतात. त्यात एक म्हणजे तीव्र बदलांची संख्या वाढली आहे. दुसरं म्हणजे या बदलांची तीव्रतादेखील वाढली आहे. तिसरं म्हणजे त्यांचा कालावधी वाढला आहे. उदाहरण द्यायचं तर पूर्वीपेक्षा जास्त उष्ण लहरी येताना दिसतात. त्यांची तीव्रताही जास्त आहे. त्यांचा येण्या-जाण्याचा कालावधीही जास्त आहे. त्यामुळे हवामानात होणाऱ्या अशा प्रकारच्या बदलांचे पडसाद संपूर्ण जगात आपल्याला दिसतात. त्याचे परिणामही आता दिसायला लागले आहेत. म्हणूनच अशा प्रकारचं बदलतं हवामान आणि आपलं नेहमीचं हवामान यांचा अभ्यास करून केलेलं पूर्वानुमान फक्त शेतकऱ्यालाच नाही तर इतर सगळ्याच क्षेत्रांना देण्यासाठी हवामान विभाग प्रयत्नशील आहे. शेतीबरोबरच आरोग्य, पर्यटन, आपत्ती निवारण व्यवस्थापन, विमानसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना हवामानाच्या पूर्वानुमानाची गरज असते. त्यासाठी हवामान विभागाला काळाबरोबर चालण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न करतो.

(शब्दांकन- वैशाली चिटणीस)