वसुंधरेची स्मिता कन्यका,
माझी भारतमाता;
अभिमानाने वंदन करिते ,
तुजला गे आता ।। ध्रु।।
कितीक वस्त्रें, कितीक टोप्या,
कितीक भाषा, कठीण सोप्या;
भाषाभाषांतुनी घुमतसे सूर एक ओघवता;
वसुंधरेची स्मिता कन्यका माझी भारतमाता ।।१।।
कितीक चेहरे
गोरे काळे,
टवटवीत कधि
कधि सुकलेले;
कधि थंडीने
कुडकुडलेले,
कधि घामाने
चिंब भिजलेले;
जीवन देतो परि सर्वाना हाचि विचार समर्था’
वसुंधरेची स्मिता कन्यका,
माझी भारतमाता ।।२।।
किती धर्म अन्
किती प्रार्थना,
किती मंदिरे
देवहि नाना;
अल्ला, येशू,
नानक, किस्ना
अनुसरणारे भक्त बघाना;
या सर्वातून नटली ही कमला,
सहस्रदल मानवता;
तीच असे ही
स्मिता कन्यका,
माझी भारतमाता ।।३।।
डोंगरदारी, कडीकपारी,
गीत गातसे, झरी निर्झरी;
हसते सृष्टी
नवरसधारी,
कुठे वेदना,
कुठे उभारी;
भिन्न् भावनेतून
उभरते,
एक दिव्य भावुकता;
वसुंधरेची स्मिता कन्यका,
माझी भारतमाता ।। ४।।
कितीक रचिले
देश प्रभुने,
रंगविले अन्
समर्थतेने;
परि कन्या जाणुनी
आवडती ही,
सजविले तिला कल्पकतेने
सर्व रंग एकत्र विखरुनी,
साजुकली सुंदरता ।
वसुंधरेची स्मिता कन्यका,
माझी भारतमाता ।। ५।।
वसुंधरेची स्मिता कन्यका,
माझी भारतमाता,
अभिमानाने वंदन करिते,
तुजला गे आता।।
शिवांगी नाईक
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2015 रोजी प्रकाशित
माझी भारतमाता
वसुंधरेची स्मिता कन्यका, माझी भारतमाता; अभिमानाने वंदन करिते , तुजला गे आता ।। ध्रु।।

First published on: 14-08-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poem