भ्रष्टाचाराचे आव्हान नागरिकांनाच…

‘व्यापमं घोटाळ्याचा फास’ ही मुखपृष्ठकथा वाचली. घोटाळा उघडकीला येताना एकापाठोपाठ मृत्यू पावलेल्या आरोपी आणि साक्षीदारांचा तपशील संवेदना बधिर करणारा आहे.

lp59‘व्यापमं घोटाळ्याचा फास’ ही मुखपृष्ठकथा वाचली. घोटाळा उघडकीला येताना एकापाठोपाठ मृत्यू पावलेल्या आरोपी आणि साक्षीदारांचा तपशील संवेदना बधिर करणारा आहे. हल्ली आपल्या देशात भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनत चाललाय, याचे मोठे उदाहरण म्हणजे मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाचा (व्यापमं) घोटाळा. या लेखातल्या आणि इतरत्रही वाचनातून कळलेल्या आकडेवारीवरून याची व्याप्ती लक्षात आली तेव्हा अवाक् व्हायला झाले. अनेक जणांच्या संगनमताने आणि संधिसाधूपणाने रंगलेला हा व्यापमंचा डाव शेवटी चव्हाटय़ावर आलाच. जेव्हा एखाद्या गुन्ह्य़ात आर्थिक आणि स्वार्थी हितसंबंध गुंतलेले अनेक लोक सामील असतात तेव्हा तो गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून त्यातले आरोपी, तसेच साक्षीदार अडचणीचे ठरतात. मग अशा लोकांना संपवण्याचे, भूमिगत करण्याचे तसेच आयुष्यातून उठवण्याचे प्रकार सुरू होतात. तसेच याबाबतीत झालेले दिसतेय. ‘एखादी गोष्ट वारंवार घडते तेव्हा तो निव्वळ योगायोग राहत नाही, तर त्यामागे कटकारस्थानच असते.’ हे आपल्या लेखातले वाक्य त्यादृष्टीने महत्त्वाचे वाटते.
हे सारे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी आहेत. विकृत सामूहिक मानसिकता यातील गुन्हेगारांना पाठीशी घालणार, नाही तर संपवणार. आपल्याकडे तरी कुठे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडताहेत? हे आव्हान पोलीस किंवा सीबीआय यांच्यापुरते मर्यादित आहे असे म्हणता येणार नाही. हे आव्हान भ्रष्टाचाराने पोखरल्या गेलेल्या आपल्या देशाच्या सर्व राज्यांतल्या, प्रामाणिकपणे आणि शांतपणे जीवन जगण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आहे.
आता सीबीआय या गैरव्यवहारांचा, गूढ मृत्यूंचा छडा लावू शकेल अशी केवळ आशा करून न थांबता, अशा घोटाळ्यांना खतपाणी घातले जाऊ नये म्हणून सरकारने सरकारी नियुक्त्यांची पदभरती पारदर्शक करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. कुठल्याही क्षेत्रात गैरव्यवहाराचा वास आला की त्यात परीक्षार्थी किंवा उमेदवार म्हणून जाणाऱ्यांनी, त्यांच्या नातलगांनी आणि इतर सुजाण नागरिकांनी तत्परतेने (आपले काम होतेय ना मग बाकीचे मरू देत, असा स्वार्थी विचार न करता) योग्य त्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तिचे ताबडतोब निराकरण होण्यासाठी दबाव आणला पाहिजे. अशा साक्षीदारांना सरकारने पुरेसे संरक्षण देणेही गरजेचे आहे. तशी हमी अशा प्रत्येक प्रकरणात मिळाली तरच खरे गुन्हेगार सापडतील आणि मग शिक्षा वगैरे गोष्टी पुढच्या पुढे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे, ई-मेलवरून.

lp57हाच का आमचा पुरोगामी महाराष्ट्र?
‘दोन हजार पाचशे कोटींचा कुंभ’ वाचून मन उद्विग्न झाले. मराठवाडा, विदर्भ गंभीर दुष्काळात होरपळून निघत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि एवढे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यातले किती कोटी रुपये कोणाकोणाच्या खिशात जातील देव जाणे. चारुशीला कुलकर्णीना वाटते तसे जिल्ह्य़ातील पर्यटनाला चालना मिळेल, याबद्दल मी साशंक आहे. कारण सरकार कोणतेही असो, त्यांची कामे तकलादू असतात. पैसा असा खर्च होतोय. एकशेआठ दिवस दिवा अखंड तेवत ठेवण्यासाठी, साडे-तीन कोटीचे तेल लागेल. हे करून देव प्रसन्न होणार का? एवढा खर्च कशासाठी? प्रश्न अनुत्तरितच राहतो.
आता कुंभ म्हणजे काय? जसा सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो अगदी तसेच, दर बारा वर्षांनी सिंह राशीत गुरू, चंद्र येतात तेव्हा त्र्यंबक आणि नाशिक येथे कुंभ आयोजित केला जातो.
१९९१ पर्यंत सरकारने कधीही पैसे दिले नव्हते आणि एकदम सरकार राजा उदार झाला. शासनाने तीस कोटी रुपयांची उधळण केली. मग काय, सवयच लागली, रक्कम वाढतच गेली. शेवटी पैसे जनतेच्या खिशातूनच जाणार आहेत. त्यात मंत्री, सरकारी अधिकारी हात धुवून घेऊ लागले. हे कळायला सामान्य जनता नक्कीच दुधखुळी नाही. प्रश्न असा पडतो, यांना दगडातला देव दिसतो, मग माणसातला देव कधी दिसणार? तरीही आम्ही म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. फुले, आंबेडकर यांची नावे घेतली की झाला महाराष्ट्र पुरोगामी!!
प्रफुल्ल पुरंदरे, ई-मेलवरून.

lp58पुनर्विचार आवश्यक
‘लोकप्रभा’ साप्ताहिक अधिकाधिक वाचनीय होत आहे. दि. २६ जूनच्या अंकातील ‘व्यवस्थाच नापास’ हे कव्हरस्टोरीचे शीर्षक फारच बोलके आहे. आपली शिक्षण व्यवस्था ‘सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन’ या पेपरमध्ये पुरेसा अभ्यास न केल्यामुळे नापास झाली आहे. त्यामुळे हे मूल्यमापन कसे करावे हे सर्वसामान्य शिक्षकांना कळेनासे झाले आहे. आदेश आहे म्हणजे करायला तर हवेच! मग भरा तक्ते! अशी अवस्था झाली आहे. त्यातून एखाद्या विद्यार्थ्यांवर अन्याय तर होत नाही ना अशी खंत प्रामाणिक शिक्षकाच्या मनात असते. काही प्रयोगशील शाळा व शिक्षक हा उपक्रम तळमळीने अमलात आणत आहे हे खरे, पण इतर सामान्य शाळांतील शिक्षकांचे काय? प्रत्येक वर्गात ६०-६५ मुले असतील तर त्यांचे योग्य मूल्यमापन कसे करावे? विद्यार्थीसंख्येच्या समस्येला अनुसरून वर्गात इतरही उपसमस्या दररोज उभ्या राहतात त्यांची कल्पना शिक्षकच करू शकतील. प्रामाणिकपणे काम करण्याची शिक्षकांची इच्छा असते. पण शैक्षणिक धोरण व वास्तवता यांचा ताळमेळ जुळत नाही. यासाठी सर्वसामान्य शाळांतील शिक्षकांची अनेक चर्चासत्रे झाली पाहिजेत. जेथे शिक्षक, निर्भीडपणे आपल्या अडचणी मांडू शकतील. त्या चर्चामधून येणाऱ्या निष्कर्षांचा विचार करून नंतर र्सवकष मूल्यमापन पद्धती ठरवावी लागेल व त्यानुसार शैक्षणिक धोरण बदलावे लागेल अन्यथा पूर्वीची परीक्षापद्धतीच बरी, असे म्हणायची वेळ येईल.
शर्मिला पिटकर, चारकोप, कांदिवली.

lp56जैतापूर संकटच
‘जैतापूर संकट नव्हे संधी’ हा २६ जूनच्या अंकातील लेख वाचला. फुकूशिमा घटनेनंतर (जपानसह) क्रमाक्रमाने अनेक देशांनी आण्विक प्रकल्प बंद करून अनन्य स्रोतांचा आश्रय घेण्याचे ठरवले आहे. हे वास्तव डावलून जैतापूर प्रकल्प जनतेच्या इच्छेविरुद्ध का लादण्यात येत आहे. वर सत्ताधाऱ्यांची नरो-वा-कुंजरो ही भूमिकाही आहेच. हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवून पंतप्रधान मोदींनी देशात या विषयावर विश्वास निर्माण करावा हा उत्तम उपाय आहे. ज्यांच्या गरजा कमी त्याचे सुख जास्त या विचाराचा आमचा देश. युरोप अमेरिकेप्रमाणे आमचे राहणीमान नाही. आण्विक विजेमुळे सुखापेक्षा धोकाच अधिक संभवत आहे. हे युरोप, अमेरिकेने ओळखले आहे.
सूर्यकांत शानभाग.

आऊट ऑफ द बॉक्स
प्राची साटम यांचा ‘ ब्रेकअपनंतरचे प्रेम’ हा लेख वाचला. अस्वस्थ झालो. कदाचित नजीकच्या भविष्यकाळात घडू शकणाऱ्या गोष्टींची पूर्वसूचनाच (स्र्१३ील्ल३)! काही दिवसांपूर्वी लोकसत्ताच्या ‘चतुरंग’मध्ये मंगला सामंत यांचा ‘विवाहाचे ना हरकत प्रमाणपत्र’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात विवाहांतर्गत बलात्कार हा विषय होता. त्या संदर्भात त्यांनी फ्री सेक्सची कल्पना मांडली होती. ती साटम यांच्या गोष्टीत निराळ्या परिस्थितीने प्रत्यक्षात आलेली आहे. प्रेम, सेक्स, निष्ठा वगैरे वरील विचार धक्का देणारे आहेत. गोष्टीचा शेवट ‘हू केअर्स’ या शब्दांनी केला आहे. साटम यांचे आऊट ऑफ द बॉक्स विचारांबद्दल कौतुक वाटते.
सुरेश देवळालकर, हैदराबाद.

दुटप्पी वर्तन
‘उजळू दे अंधारवाटा’, हा वाचक-लेखक सदरातील नलिनी दर्शने यांचा लेख वाचला. आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेताना आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळेच अंधश्रद्धेस खतपाणी घातले जाते. बऱ्याच व्यक्तींचे राहणीमान अत्याधुनिक असते परंतु विवाह जुळवताना मात्र ते सर्रास पत्रिका बघतात. कित्येक उद्योगपती नवीन उद्योग सुरू करण्याअगोदर ज्योतिषांचा सल्ला घेतात. तसेच वास्तुशास्त्रावरसुद्धा अवलंबून असतात. निर्माते-दिग्दर्शक आपल्या चित्रपटांची आणि मालिकांची नावे ठरावीक अक्षरानेच सुरू होणारी असावीत याबद्दल कमालीचे आग्रही असतात. आपल्या समाजात कित्येक व्यक्ती स्वत:ला देवांचे सर्वश्रेष्ठ भक्त म्हणवतात, परंतु इतर व्यक्तींचा द्वेष आणि मत्सर करण्यात धन्यता मानतात.
केतन र. मेहेर, विरार, ई-मेलवरून.

लेख आवडले
‘तेलाबद्दल बोलू काही’ हा वैद्य खडीवाले यांचा लेख आवडला. कमी पैशात बाह्य़ोपचार झाल्यास कोणाला आवडणार नाही? गुडघेदुखी तर बहुतेकांना असतेच. वातावरचा उपायदेखील छान आहे.
याच अंकातील ‘चिंताजनक बालपण’ वाचले. पण त्यावर उपाय सुचवले असते तर बरे झाले असते. नातीगोती मस्त वाटली. पार्टटाइम देवदास वाचायला उत्सुक आहे. ‘खलनायिका हूं मैं’ आवडले. काही प्रसंग अति वाटतात. खऱ्या घरात अशा खलनायिका नकोत. नायिकेपेक्षा खलनायिका जिवंत वाटतात. पण.. मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. माहिती असून वाचायला मजा आली. एकूणच अंक सर्व बाबींनी छान आहे. दर्जेदार वाटला.
– रेखा केळकर, पुणे.

मयसृष्टी आवडली
‘ये तो सारी मयसृष्टी’ हा प्रा. प्रभाकर तांबट यांचा लेख खूप आवडला. खरोखरच चित्रांच्या रूपाने मयसभाच उभी आहे असे वाटते. कवीच्या कल्पनेने कुंचल्याच्या सामर्थ्यांने चित्रकाराने उभी केली आणि दिग्दर्शकांनी कल्पनाशक्तीने नायक आणि नायिकेच्या रूपाने धार्मिक, ऐतिहासिक पात्रे साकारली. यातून त्यांची जिद्द दिसून आली.
गीता लोकेगावकर, ई-मेलवरून

फोटो ओळी आवश्यक
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वर्गणीदार आहे. एका उणिवेबद्दल सांगावेसे वाटते. आपल्या अंकातील छायाचित्राबद्दलची माहिती एका ओळीत (कॅप्शन) अपेक्षित असते. पण बहुतांश वेळा अशी माहिती दिली जात नाही. कृपया अशी माहिती द्यावी.
– जयंत तिळवे, गोवा, ई-मेलवरून.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers response