News Flash

नातं : चांगल्या विचारांसाठी चीअर्स

आपण कुठलाही मार्ग निवडला तरी आपली मूल्ये आणि विचार यांना घडवायला हवं, तरच आपण घडू आणि आपला मार्गही घडेल आणि मुख्य म्हणजे तो शेवटपर्यंत तसाच

| February 27, 2015 01:10 am

01youthआपण कुठलाही मार्ग निवडला तरी आपली मूल्ये आणि विचार यांना घडवायला हवं, तरच आपण घडू आणि आपला मार्गही घडेल आणि मुख्य म्हणजे तो शेवटपर्यंत तसाच पक्का राहील, याची त्या पाचही जणांना जाणीव झाली.

‘‘केक्या, ही फाइल जरा सरांच्या टेबलवर नेऊन ठेव.’’
‘‘बरं. ठेवतो. पण सरांनी विचारलं विनय कुठेय तर काय सांगू?’’
‘‘हं.. सांग. त्याला घरी लवकर जायचं होतं म्हणून तो निघाला.. नाहीतर सांग, त्याला कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर होतं म्हणून गेलाय.. जाऊ दे ना केक्या. यार तुला काय करायचंय? माहीत नाही म्हणून सांग. उद्या मला विचारलं की मी सांगेन.’’
विन्याने टेबलावरचं होतं नव्हतं तेवढं सगळं बॅगेत कोंबलं. फाइल प्यूनच्या हातात ठेवली. हेल्मेट हातात लटकवलं आणि सुटला. दाराकडे आल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो त्याचं पाकीट टेबलवरच विसरलाय. पुन्हा तो टेबलपाशी आला. त्याची ही अशी घाई बघून त्याच्या आजूबाजूच्यांच्या डोळ्यांची बुबुळं तो फिरतोय त्या दिशेला आणि त्याच्याइतक्याच गतीने फिरत होती. ते पाहून त्याला ओशाळल्यासारखं झालं. पण कुणालाच उत्तरं द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. आज घडय़ाळाचे काटे जरा भरभरच फिरत होते. त्यात विन्याही स्थिर नव्हता. खालच्या मजल्यावर येऊन तो पुन्हा वर आला. वॉशरूममध्ये शिरला. स्वत:च्या अवताराकडे बघून किंचित हसला. तोंडाला फटाफट पाणी मारलं. तेवढय़ात फोन वाजला. कसेबसे पँटला हात पुसून त्याने फोन उचलला. समोरची व्यक्ती जवळजवळ ओरडलीच, वर शिव्यांची लाखोली वाहिली गेली. तरीही विन्या मख्खपणे म्हणाला, ‘‘होय.. आलो.. बाइक बंद पडलीये.. पोहोचतोय.’’ फोन ठेवल्यावर त्याने एकदा स्वत:कडे आणि एकदा फोनकडे पाहिलं. हसू की रडू हेच त्याला कळेना. तेवढा विचार करण्याएवढा वेळही नव्हता म्हणा त्याच्याकडे. भराभर तोंड पुसून, भसाभसा बॉडी स्प्रे मारून तो एकदाचा बाहेर पडला.
इकडे अप्पू कपाटातले सगळे कपडे बेडवर पसरवून त्यांच्याकडे एकटक पाहत बसली होती. तिला व्हॉट्सअ‍ॅपवर ताईला फोटो पाठवून यातला कुठला ड्रेस घालू असं विचारणंही मूर्खपणाचं वाटत होतं. इतक्यात तिची एकाग्रता भंग करणारी फोनची रिंग वाजली.. तीही घराच्या फोनची. ‘म्हणजे आपण मोबाइल उचललेला नाही. त्यात उशीर.. वाट..’ असं मनात म्हणत घाबरतच तिने फोन उचलला. तिलाही शिव्यांचा फटका. आता काय? तिने एक जीन्स-टॉप काढला. बाकीचे सगळे कपडे कपाटात कोंबले. आईने कपाट उघडल्यावर कपडे तिच्या अंगावर कोसळणार नाहीत याची व्यवस्थित काळजी घेऊन तिने कपाटाचा दरवाजा लावला आणि निघालीसुद्धा.
एकीकडे भाग्या सायलीच्या ऑफिसखाली बाइकवर बसून तिची वाट बघत होता.
इथे मंग्या ठरलेल्या स्पॉटवर कधीच येऊन पोहोचला होता आणि सगळ्या लोकांना फोन करून, शिव्या घालून कावला होता. मंग्याने दुपारीच एका फेमस हॉटेलमध्ये ‘टेबल फॉर फाइव्ह’ असं बुक करून ठेवलं होतं. त्यातला मंग्याच फक्त हजर होता. सगळ्यांची वाट बघता बघता वेटरने आणून ठेवलेल्या पाचही ग्लासमधलं पाणी त्याचं पिऊन झालं होतं. आता वेटरला पुन्हा हे ग्लास भर असं तो सांगायला जाणार तेवढय़ात चौघांनी एकत्र त्याला हाक मारली.
विन्या, मंग्या, भाग्या, सायली आणि अप्पू हे कॉलेजचे मित्र. पाचही जण एकमेकांत छान मिसळून गेले होते. सगळ्यांची सगळी लफडी करून झाली होती. प्रेमात पडण्यापासून ते कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या केबिनला भेट देण्यापर्यंत सगळं. एकमेकांना सावरून घेता घेता कधी ते एकमेकांचे होऊन गेले ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही. पाचही जण यंदा कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला होते. विन्या, मंग्या आणि सायली कॉलेज करता करता जॉब करत होते. अप्पू आणि भाग्या यांना कॉलेजच्या बातम्या नोट्ससकट पुरवण्याची जबाबदारी विनासायास पार पाडत होते. प्रत्येक शनिवारी कुठेतरी बाहेर जायचं असा प्लॅन ठरलेला होता. कारण पाचही जण फक्त पहिल्या दोन लेक्चर्सनाच एकत्र असायचे. मग विन्या, मंग्या आणि सायली जॉबसाठी निघून जायचे. आठवडय़ाभराच्या बातम्या आणि त्यावर चर्चा हा ठरलेला आणि महत्त्वाचा कार्यक्रम. घरच्यांसाठी नोट्सचं कारण. असो. असाच आताचाही त्यांचा प्लॅन होता; पण त्यातही बातम्यांपेक्षाही महत्त्वाचं कारण होतं ते विन्या, मंग्या आणि सायली यांचे पगार आणि तेही पहिले. आपला पहिला पगार झालाय असं वाटलं पाहिजे म्हणून विन्या इतका तयार होत होता आणि आज तो पहिल्यांदाच आपलं कार्ड स्वाइप करणार होता.
विन्या. बडबडय़ा पण स्मार्ट होता. अप्पू एकदम टिपिकल मुलगी होती. भाग्या एकदम बिनधास्त; पण विचारी. महाचिकित्सक. मंग्या वयापेक्षा लवकर मोठा झालेला. कॉलेजमध्ये गमतीने कधी कधी लोक त्याला दादा म्हणत. कॉलेजमध्ये कुणाचाही ब्रेकअप झालं की सगळे आधी ‘दादा’कडे येणार. सायली फुल ऑन टपोरी. रस्त्यात कुणाशीही भांड, शिव्या घाल; पण मनाने प्रचंड हळवी. आता मंग्याला हाक मारतानाही तिचाच आवाज सगळ्यात मोठा होता.
मंग्या चौघांच्या आवाजाने दचकून खुर्चीतून पडणारच होता; पण सावरला. चौघांना बघितल्यावर त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला. गळाभेटी झाल्यावर पाचही जण आसनस्थ झाले.
‘‘ए.. मला तुम्हाला एक महत्त्वाची खबर सांगायचीये.’’ अप्पूने बातम्या पुरवायला सुरुवात केली.
‘‘बोला.’’
‘‘आज की ताजा खबर.. अम्या आणि प्रीतीचं ब्रेकअप.’’
‘‘काय सांगतेस? चला, आता माझी लाइन क्लीअर.’’ सायलीचं काहीतरी वेगळंच.
‘‘ए.. गप गं. का गं?’’ मंग्याचा उगाच काळजीचा सूर.
‘‘ए.. थांबा.. चला आधी स्टार्टर्स मागवा.’’ भाग्याला सगळं माहीत असल्यामुळे त्याला खाण्यात जास्त रस होता.
‘‘चला आता मुद्दय़ावर या.’’ मागवून झाल्यावर विन्याने मुद्दय़ाची आठवण करून दिली.
‘‘हां.. तर त्यांचं ब्रेकअप का झालं.. अम्याला म्हणे बिझनेस करायचाय. नोकरी करायची नाहीये.’’ अप्पूने एकदाच सांगितलं.
‘‘ये बात..! चांगलंय की मग.’’ इति सायली.
‘‘ए.. सायली.. थांब जरा. आवर..!’’ मंग्याला कारण ऐकायची घाई.
‘‘तू सांग गं अप्पू.’’
‘‘अरे.. बिझनेस म्हणजे फायनान्शिअल सिक्युरिटी नाही आणि त्याच्यात जम बसेपर्यंत हाल हाल.’’
‘‘अरे बापरे.. केवढा विचार? आतापासूनच..? आता एन्जॉय करायचं सोडून हे काय भलतंच?’’ विन्या विचार करायला लागला.
‘‘तुझ्यासारखं प्रत्येक जण नसतं विन्या.’’ सायलीला विन्याची खेचायला चान्सच हवा होता.
‘‘तू गप गं जरा..’’ विन्या वाद घालणार इतक्यात गाडीत पेट्रोल घातल्यावर गाडी जशी धावायला लागते, तसं सूपचा एक घोट गेल्यावर भाग्याचं डोकं चालायला लागलं. ‘‘विन्या.. तिच्याशी वाद घालण्याआधी मला सांग, जर प्रीती एवढा विचार करतेय असं तुला वाटतंय तर तुम्ही का जॉब करताय? तुम्ही पण करा की एन्जॉय.’’
‘‘हे बघ! स्वत:चं कार्ड स्वाइप करण्याची मज्जा काही औरच असते. एक तारखेला एवढी एवढी रक्कम तुमच्या अकाऊंटला जमा झाली आहे, हा मेसेज वाचायला जी काय मज्जा येते ना. अहाहा!!!.’’ विन्याचा सूपचा पहिला घोट आणि भाग्याचा घोट यात जमीन-अस्मानाचा फरक होता.
‘‘मला लवकरात लवकर सेटल व्हायचंय.’’ सायलीने थोडक्यात संपवलं.
‘‘मला विचारशील तर आई-बाबा काही महिन्यांत रिटायर होतील. त्यांच्या पेन्शनवर काही घर चालणार नाही. अशात मी फुकट घरी बसून खाणं मला नाही पटत. ‘‘मंग्या नेहमीप्रमाणेच मोठय़ा माणसांसारखा बोलला.’’
‘‘अरे हो.. पण तुझ्या एकटय़ाच्या पगारात तरी कसं भागणारेय?’’ सूपचा परिणाम अप्पूवरही झाला.
‘‘पण मी कुठे इथेच वर्षांनुर्वष राहणार आहे? पुढच्या वर्षी दुसरी नोकरी. तिथे दोन र्वष झाली की मग परत नोकरी बदलायची. ‘‘सूप संपवून पुन्हा मेन्यूकार्ड हातात घेत मंग्या म्हणाला.
भाग्या आणि अप्पूला त्यांच्या या अ‍ॅप्रोचचं जरा आश्चर्य वाटलं. दोघांनी एकमेकांकडे बघितलं.
‘‘आश्चर्य वाटलं ना? हे बघ, माणसाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी जरी कोणी आणून दिली ना तरी तो चांदीचं अंडं देणारी कोंबडी शोधणारच. जी कंपनी पगार जास्त देईल त्या कंपनीकडे जायचं. तुम्हाला कॉलेजमधून बाहेर पडल्यावर समजेल. बाहेर सारख्या सारख्या नोकऱ्या बदलणाऱ्याला जास्त भाव आणि मान आहे. चार वर्षांपेक्षा जास्त एका ठिकाणी राहिलो ना की लोक ‘बघा, दुसरे कोणीच घेत नाहीत म्हणून इथे आलेत आणि चिकटून राहिलेत’ असं म्हणतात.’’ सायली पोटतिडकीने बोलत होती.
‘‘आणि कसं आहे माहितीये का? ज्या माणसाला त्याचा आवडीचा जॉब मिळतो तो तिथे बराच काळ टिकून राहू शकतो; पण आज जगायचं असेल तर जो पहिला जॉब मिळेल तो स्वीकारायचा. त्यामुळे मग इंटरेस्ट कमी कमी होत जातो आणि नवीन काहीतरी खुणावत राहतं.’’ विन्याने विचारी उत्तर दिलं.
‘‘तुम्ही खूप मोठे झाला आहात असं वाटतंय यार.. काही महिन्यांपूर्वी असे नव्हतात.’’ अप्पू कळकळीने बोलत होती.
‘‘हं.. मग आता काय चला.. आता मोठा माणूस म्हणून माझं ऐकाल का? मेन कोर्स ठरवून सांगू या आता.’’ गालातल्या गालात सगळे हसले. भाग्या आणि अप्पू सोडून सगळ्यांनी मेन्यूकार्डमध्ये डोकं खुपसलं. जेव्हा हे नोकरी करत नव्हते तेव्हा त्यांच्या नजरा फक्त पदार्थावरच खिळलेल्या असायच्या. आता त्यांच्या नजरा पदार्थाच्या किमतींवरही फिरायला लागल्या. म्हणूनच त्यांची काय मागवायचं यावर बराच वेळ चर्चा चालू होती. भाग्या आणि अप्पूची नजर अजूनही पदार्थावरच होती, त्यामुळे त्यांचं पटकन ठरवून झालं.
‘‘तुमचा हिशेब करून झाला असेल तर मागवा आता. भूक लागलीये.’’ भाग्या न राहवून बोललाच.
तिघंही मनापासून हसले आणि एकदाची सगळ्यांनी ऑर्डर दिली.
‘‘किती कंजूष झाला आहात रे!’’ अप्पूची कळकळ संपलीच नव्हती.
‘‘येशील थोडय़ाच महिन्यांत तू पण लाइनीवर.’’ सायली म्हणाली.
‘‘आणि बाय द वे, हा कंजूषपणा नाहीये. हे सेव्हिंग आहे.’’ मंग्याने आपली बाजू क्लीअर केली.
भाग्याला पाणी पिता पिता ठसकाच लागला.. कसाबसा ठसका थांबवत तो हसत हसत म्हणाला, ‘‘हे तू बोलतोयस मंग्या? अरे.. त्या ईशावर इम्प्रेशन मारायला किती पैसे खर्च करायचास? तेव्हा आम्हीच सांगायचो, नको इतका खर्च करूस. तर आम्हालाच हाणायचास, वर शिव्याही हासडायचास.’’
‘‘तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता असं करून नाही चालणार आणि तेव्हाही तिच्या नावाने वेगळे पैसे काढून ठेवलेले असायचे. तुम्हाला ते माहीत नव्हतं.’’ मंग्याच्या तोंडून खरं बाहेर पडलं.
या वाक्यावर एकच हशा पिकला. सगळ्यांचे घसे एकत्रच खवखवायला लागले आणि सगळ्यांचे एकत्र ‘हं’चेही सूर लागले. मंग्याही चक्क लाजला. नशीब, इतक्यात जेवण आलं. नाहीतर आज काही मंग्याचं खरं नव्हतं.
अप्पूच्या पोटात घास गेल्यावर पुन्हा तिला प्रश्न पडला, ‘‘नोकरी करायला लागल्यावर आपण इतके कॅल्क्युलेटिव्ह का होतो?’’
‘‘अगं सरळ आहे ‘आपले’ पैसे असतात म्हणून.’’ भाग्या..
‘‘असं काही नाही हां भाग्या.’’ सायली सुरू झाली. ‘‘मी खूप लहान असल्यापासून आहे अशी. माझं माझ्या आईने मी दहा वर्षांची असतानाच एका बँकेमध्ये अकाऊंट ओपन केलं होतं. पैसे कसे वाचवायचे, बँकेचे व्यवहार कसे करायचे हे शिकवायला. मला वाढदिवसाला मिळालेले पैसे, दिवाळीला मिळालेले पैसे हे त्यात असायचे. मग मला काही वस्तू किंवा कपडे घ्यायचे झाले तर मी बघायचं की माझ्याकडे आहेत का एवढे पैसे? मग आई-बाबांकडे कुठून असणार? त्यामुळे मी कधीच हट्ट केला नाही आणि तेव्हापासून पेन्सिलच्या लेडपासून ते पैशांपर्यंत कॅल्क्युलेट करतेय प्रत्येक गोष्ट.’’
‘‘हां, म्हणजे माझं काही अकाऊंट वगैरे नव्हतं. पण माझ्याकडे पिगी बँक होती. रोज एक-एक रुपया टाकायचो त्यात, आईकडून घेऊन. चार-पाच दिवसांनी सगळा पिगी उलटा करून आई मोजायला लावायची. गणित पक्कं व्हावं म्हणून. मग तेव्हापासून अर्धे भाग पण कळायला लागले. दादाने थोडे म्हणून मागितले कधी तर बरोबर अर्धे करून मी त्याला द्यायचो.’’ विन्यालाही आपलं बालपण आठवलं.
‘‘अरे, तेव्हाचं काय आताही आपण मोजतोच की. ही सवय आहे. आजही आपण अर्धा-अर्धा मार्क वाढवायला शिक्षकांशी भांडत असतो. कुठल्या कॉलेजमध्ये लिस्ट किती मार्काना क्लोज होतेय हेही आपल्याला माहीत असतं. मेडिकल आणि इंजिनीअिरगवाले आजही किती मार्क किती वेळात कमवायचेत याचं कॅल्क्युलेशन करतातच आहेत. ऑफिसमध्ये तर डेडलाइन्सची रांगच असते. मग आता अचानक कुणी म्हटलं की किती हिशेबी आहात तर आपण कसं बदलायचं?’’ मंग्याने प्रॅक्टिकल उत्तर दिलं.
‘‘अरे, मी आपण बदलूया असं नाही म्हटलं. मी सहज विचारलं. ’’ अप्पूने आपली बाजू मांडली.
‘‘हो. तुझा प्रश्न बरोबर आहे. फक्त हा बदल आता अचानक झालेला नाही. आधी अंगवळणी पडलेल्या सवयींचा हा योग्य वापर आहे, असं आम्हाला म्हणायचंय.’’ विन्याने सगळ्यांची उत्तरं थोडक्यात पटवून दिली. भाग्या आणि अप्पूला उत्तरं पटली.
‘‘आणखी एक सांगू का? भीती वाटते.. उद्या घर नाही घेऊ शकलो, रस्त्यावर राहावं लागलं तर? बुडत्याला काडीचा आधार. आपण आता कमावतोय ना. थोडं थोडं साठवून उपाशी राहणार नाही याची तरी खात्री पटते.’’ मंग्याने आपली बाजू मांडली.
‘‘आपल्या आई-बाबांना आपण बघितलं की. सेटल होताना त्यांच्या किती नाकीनऊ आले आणि त्याचे परिणाम कुठे आणि कसे झाले. म्हणून आतापासूनच चालेली ही धडपड.’’ सायलीही मन मोकळेपणाने बोलली.
‘‘पण या सगळ्यात आपलं भेटणं किती कमी होतंय. तुम्ही तुमच्या आई-बाबांना कधी वेळ देता? आणि स्वत:ला?’’ बिचारी अप्पू. तिचे प्रश्न संपतच नव्हते.
‘‘अगं, आता उलट आई-बाबांच्या जास्त जवळ गेल्यासारखं वाटतं. हिशेबाच्या गोष्टीत सामील होता येतं, शिवाय ऑफिसच्या माणसांची उणी-धुणीसुद्धा एकत्रच काढली जातात. सगळीकडे माणसं सारखीच असतात. आपण कमी भेटतो; पण भेटतो तरी. आम्ही ऑफिसमध्ये असे मित्र नाही जमवू शकलो. प्रत्येक जण कामापुरतं बोलतं. बॉसबद्दल गॉसिप करायला काय ते सगळ्यांचं एक मत होतं. प्रत्येकालाच असे ऑफिसबाहेरचे मित्र असतात.’’ विन्या पहिल्यांदाच इतका वैचारिक बोलत होता.
‘‘आणि स्वत:ला वेळ द्यायचं म्हणशील तर ऑफिसमध्ये फक्त आपण स्वत:च असतो. तिथे खूप वेळ मिळतो. प्रत्येक जण एखाद्या गोष्टीकडे कसं बघतोय आणि त्याचा वापर कसा करून घेतोय यावर असतं.’’ मंग्या म्हणाला.
पानात असलेल्या वेगवेगळ्या पदार्थासारखे प्रत्येकाचे वेगवेगळे विचार अप्पू आणि भाग्याला जाणवत होते. प्रत्येक पदार्थाच्या वेगवेगळ्या चवीप्रमाणे ते त्यांना आवडतही होते. जेवण झाल्यावर विन्याने ठरल्याप्रमाणे आपल कार्ड स्वाइप केलं. सगळ्यांनाच बरं वाटलं. अप्पू आणि भाग्याची नजरानजर झाली. दोघांच्याही नजरेत आत्मविश्वास होता की पुढच्या वेळी आपण आपलं कार्ड स्वाइप करू. बाहेर पडून सगळ्यांनी आइसक्रीम घेतलं. आइसक्रीम पाचही जणांचा वीक पॉइंट. हॉटेलमधल्या चर्चेने सगळेच जरा पुन्हा काळजीत पडलेले. आपण निवडलेला रस्ता बरोबर की चूक याबाबत ते साशंक होते. आइसक्रीमवाल्याला त्या कोनमध्ये आइसक्रीमचा स्कूप नीट रचताना बघून त्यांच्या डोक्यात काही तरी हललं.
पाचही जणांना कोनाचा शेवटचा तुकडा खायला खूप आवडायचा. कारण जर वर स्कूप नीट रचलेला असेल तर तो शेवटच्या टोकापर्यंत चविष्ट लागतो. खरं तर तो टोकालाच जास्त चविष्ट लागतो. आपण जसं काहीही सुरू करताना ‘चीअर्स’ म्हणतो तसं हे फक्त आइसक्रीम खाताना शेवटच्या तुकडय़ापर्यंत पोहोचले की चीअर्स करायचे आणि मग तो तुकडा एकत्र खायचे.
आज सगळेच त्या टोकाला येऊन थोडा जास्त वेळ थांबले. सगळ्यांनाच, आपण कुठलाही मार्ग निवडला तरी आपली मूल्यं आणि विचार यांना घडवायला हवं तरच आपण घडू आणि आपला मार्गही घडेल. मग तो शेवटपर्यंत तसाच पक्का राहील. याची जाणीव झाली आणि मग त्यांनी मोठय़ांदा ‘चीअर्स’ म्हटलं. त्या थंडाव्याने त्यांना खोलवर शांतता मिळाली.
ऋतुजा फडके

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 1:10 am

Web Title: relation
टॅग : Relation,Story
Next Stories
1 फॅशन पॅशन : ‘अनारकली’वर केसांचं काय करू?
2 नवे कोरे स्मार्टफोन…
3 नाचू आनंदे : रिअ‍ॅलिटी शो.. एक मायाजाल
Just Now!
X