एम. के. रैना – response.lokprabha@expressindia.com
ही गोष्ट आहे १९६७ची. याच वर्षी मी एनएसडीमध्ये (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) प्रवेश घेतला होता. मी त्या वेळी काश्मीरमधून आलेला अगदी कोवळा तरुण मुलगा होतो, तर इब्राहिम अल्काझी एनएसडीचे संचालक होते. त्यांचा प्रचंड दबदबा होता. मी तोवर जेमतेम दोन किंवा तीन वेळाच दिल्लीला येऊन गेलो होतो. एनएसडीमध्ये रुळलो असतो तरच दिल्लीमध्ये मला घरच्यासारखं वाटण्याची शक्यता होती आणि एनएसडीमध्ये रुळणं ही तर फारच अवघड गोष्ट होती. तिथे तुमच्या मनासारखं काहीच नव्हतं. तिथल्या प्रत्येक गोष्टीला व्यावसायिक शिस्त होती आणि ती अतिशय कडकपणे पाळली जात असे. अल्काझींना आपला देश कसा आहे हे अगदी नीट माहीत होतं. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून एनएसडीला येणाऱ्या मुलामुलींना ते नीट समजून घेऊ शकत होते आणि आम्हाला एनएसडीच्या कडक शिस्तीत बसवण्यासाठी काय करायचं हेही अल्काझींना नीट माहीत होतं.
आता मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की, त्यांनी आम्हाला सगळ्यात पहिला धडा कशाचा दिला असेल तर श्रमांचा आदर करण्याचा, त्यांना महत्त्व देण्याचा. ते आमच्या वरच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांकडून अंतोन चेकॉव्हचं ‘थ्री सिस्टर्स’ हे नाटक बसवून घेत होते. त्यांनी आम्हाला कार पॉलिश आणि फडकी दिली आणि सगळा रंगमंच पॉलिश करायला सांगितला. आम्हाला रंगमंच कसा पॉलिश करायचा हे माहीत नव्हतं. तरीही आम्ही ते काम केलं. आमचं काम संपल्यावर ते म्हणाले की, तुम्ही बॅकस्टेज शिकणं आवश्यक आहे. रंगमंचावर दोन दृश्यांच्या दरम्यान अंधार केला जातो तेव्हा पुढचं दृश्य सुरू होण्यासाठी आणि रंगमंचावर आवश्यक ते बदल करण्यासाठी फक्त काही सेकंदांचाच अवधी असतो. या काही सेकंदांच्या अवधीमध्ये जराही आवाज न करता, रंगमंचावर अगदी सावधपणे चवडय़ांवर चालत जाऊन रचना कशी बदलायची असते हे त्यांनी आम्हाला नजाकतीने शिकवलं. आम्हाला हे काम अचूकपणे करता येईपर्यंत ते स्वत: आमच्याबरोबर सराव करायला उभे राहात. त्यांच्यामुळेच बॅकस्टेज करणं हा माझ्यासाठी अगदी आजही अभिमानाचा विषय आहे.
पहिल्याच वर्षी आम्हाला वेशभूषेचा अभ्यास होता. आम्ही त्यासाठी शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचं ‘शोरोशी’ हे नाटक निवडलं होतं. आम्ही त्याची वेशभूषा कशी असेल, काय असेल यावर दिवसरात्र मेहनत केली आणि अखेर सादरीकरणाचा दिवस उजाडला. एक एक करून आम्हाला अल्काझींच्या कार्यालयात जायचं होतं. सगळ्यात पहिल्यांदा जी मुलगी गेली ती इतकी अस्वस्थ होऊन परत आली की, तिच्याशी काही बोलणंच शक्य नव्हतं. तेच दुसऱ्याच्या बाबतीत घडलं. तिसऱ्याच्या बाबतीतही तेच. आत काय होत होतं तेच समजत नव्हतं.
माझी आत जायची वेळ आली तेव्हा माझ्या छातीत धडधडायला लागलं. अल्काझी अतिशय गंभीर चेहऱ्याने बसले होते. त्यांनी मी केलेलं काम हातात घेतलं आणि ते बघण्याऐवजी सरळ रवींद्र भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरच्या त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर फेकून दिलं आणि मला ‘चालता हो’ असं सांगितलं. मी बाहेर पडलो. तसाच धावत खाली गेलो आणि त्यांनी फेकून दिलेलं माझं साहित्य घेतलं. मी त्या कामावर दोन-अडीच महिने घातले होते. त्यामुळे माझ्या सादरीकरणात मी नेमकं काय केलं आहे ते बघण्याऐवजी त्यांनी ते असं फेकून दिलं याचा मला भयंकर राग आलेला होता. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं असलं तरी सुदैवाने माझं साहित्य मोडलंबिडलं नव्हतं, नीट राहिलं होतं. मी ते घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ते ऑफिसला आले तेव्हा त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, ‘‘एखाद्या प्राथमिक शाळेतून आलेला अपरिपक्व विद्यार्थी नाहीये, तर मी इथे एका विद्यापीठातून आलो आहे. मी माझ्या प्रकल्पात काय केलं आहे ते मला नीट माहीत आहे. असं असताना तुम्ही माझा प्रकल्प न बघता फेकून का दिलात?’’
त्यांनी माझा प्रकल्प हातात घेतला आणि त्याच्या कव्हरवरच्या बातम्या वाचायला सुरुवात केली आणि म्हणाले, ‘‘तो वेशभूषेचा प्रकल्प आहे हे मला कसं समजणार?’’
त्यांची ही वाक्यं ऐकल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, की माझ्या प्रकल्पाला मी वर्तमानपत्राचं कव्हर घातलं होतं. मी काय करायला हवं होतं ते माझ्या ताबडतोब लक्षात आलं. मग मी त्यांना म्हणालो, ‘‘सर, मला फक्त अर्धा तास द्या.’’ मग मी दिल्लीमधल्या बंगाली मार्केटला जाऊन रंगीत कागद आणले आणि नव्याने कव्हर डिझाईन केलेला माझा प्रकल्प त्यांच्या टेबलावर ठेवला. दोन दिवसांनी त्यांचा आमच्यावर वर्ग होता. ते वर्गात आले आणि मला म्हणाले, ‘‘तुझा प्रकल्प चांगला होता.’’
अल्काझींबरोबर माझे जे बंध होते, ते नेमक्या शब्दांत कसे मांडायचे हे मला खरंच समजत नाहीये. आम्ही एकमेकांशी मित्रत्वाने वागायचो, एकमेकांचा आदर करायचो आणि आमची नेहमी भांडणंही व्हायची. अर्थात ही भांडणं नाटकाशी संबंधित असायची. मी एनएसडीमध्ये गेलो तेव्हा बायोकेमिस्ट्रीची पदवी घेतलेला, अतिशय भडक डोक्याचा काश्मिरी युवक होतो. माझ्या सहाध्यायांप्रमाणे मी फक्त शालेय शिक्षण घेऊन एनएसडीमध्ये पोहोचलो नव्हतो, तर महाविद्यालयात असताना मी काही सामाजिक चळवळींमध्ये सहभागी झालो होतो.
आज आपल्या देशात नाटकांना जी प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, त्यांची विशिष्ट शैली आहे, त्या सगळ्यामागे इब्राहिम अल्काझी हे नाव आहे. तेव्हा कमानी स्टेडियममध्ये सादर होणारं एक नाटकं बघायला इंदिरा गांधी स्वत: आल्या होत्या हे मला आजही आठवतं. त्या नाटक बघायला चौथ्या रांगेत बसल्या होत्या. कारण नाटक नीट बघता यावं यासाठी चौथी रांग ही एकदम उत्तम जागा असते. नाटक बघून त्या निघून गेल्या. भेटायला वगैरे आल्या नाहीत. एकदा तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन नाटक बघायला येणार होते, पण त्यांना थोडा उशीर होणार होता, तर ‘आपण थांबू शकत नाही, नाटक वेळेवरच सुरू होईल’ असं अल्काझींनी त्यांना कळवलं होतं. राष्ट्रपतींनीही नंतर त्यांना ‘तुम्ही योग्य तेच केलंत’ असं सांगितलं. अल्काझी हे असे होते.
ते एखाद्या दिवशी तरी एनएसडीमध्ये येऊ नयेत, त्यांचा वर्ग एक दिवस तरी होऊ नये असं आम्हाला वाटायचं आणि ते तर रोज अगदी भरपूर तास घ्यायचे. त्यामुळे ते आले नाहीत आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं असं व्हायचंच नाही. व्हायवामध्ये आम्हाला विचारलं जायचं की, तुम्ही किती नाटकांचे प्रयोग बघितले आहेत? तुम्ही किती प्रदर्शनांना गेला आहात? तुम्ही किती पुस्तकं वाचली आहेत? त्यामुळे अशा ठिकाणी जाणं आणि आम्ही तिथे गेलो आहोत हे अल्काझींच्या लक्षात आणून देणं हे आम्ही आवर्जून करायचोच.
अनेकदा असं व्हायचं की, विद्यार्थ्यांच्या तक्रारी असायच्या आणि त्यांचं नेतृत्व करायला मी जायचो. त्या तक्रारी अल्काझी शांतपणे ऐकून घेत असले तरी त्यामुळे ते माझ्यावर वैतागलेले असायचे. १९७० मध्ये माझा एनएसडीचा अभ्यासक्रम संपल्यानंतर त्यांनी आमची समोरासमोर भेट झाली तरी आमची जणू काही ओळखच नाही असं दाखवायला सुरुवात केली. एकदा असंच त्रिवेणी कॉरिडॉरमधून आम्ही एकमेकांच्या समोरून जात असताना मी त्यांना थांबवून म्हणालो, ‘‘माफ करा सर, पण तुम्ही मला अशा पद्धतीने टाळू शकत नाही. तुम्ही मला एक वेळ माफ करू नका, पण मला टाळू तरी नका.’’ त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, ‘‘उद्या ये चहाला.’’ दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी चहा मागवला आणि आम्ही गप्पा मारल्या.
सफदर हाश्मीच्या मृत्यूनंतर आम्ही ९ जानेवारी १९८९ रोजी राष्ट्रीय दुखवटा पाळायचं ठरवलं. तेव्हा काय काय करायचं, कसं करायचं हे सगळं ठरवण्यामध्ये अल्काझींनी पुढाकार घेतला होता. आम्हाला एनएसडीमधून पदवीधर होऊन बाहेर पडल्याला एव्हाना दोन दशकं झाली असली तरी त्यांचे विद्यार्थी असल्यासारखंच तेव्हा परत वाटत होतं. ‘‘सर, मला माहीत आहे काय काय करायचं आहे ते,’’ असं आम्ही सांगितलं असतं तर ते म्हणाले असते, ‘‘ते काही मला सांगू नका, पण काही चुकलं तर बघा, माझ्याशी गाठ आहे.’’ ते ‘सहमत’चे संस्थापक सदस्य होते. आम्हाला ‘सहमत’साठी निधी उभा करायचा होता आणि अनेक कलाकारांनी आम्हाला त्यासाठी त्यांच्या कलाकृती देऊ केल्या आणि मदत केली. त्यासाठी आम्ही अल्काझींच्या पुढाकारातून रवींद्र भवन इथं लिलाव आयोजित केला होता.
त्यानंतरच्या काळात कधी तरी अल्काझींबरोबर मी एका पॅनलवर होतो. त्यातून एका शिष्यवृत्तीसाठी देशभरातले लोककलावंत निवडायचे होते. अर्थात अल्काझी त्या पॅनलचे प्रमुख होते आणि मी त्या पॅनलचा सगळ्यात तरुण सदस्य होतो. एक मुलगी नागालॅण्डच्या अविकसित, दुर्गम अशा भागातून आलेली होती आणि भाषेअभावी तिला नीट संवाद साधता येत नव्हता. अल्काझी मला म्हणाले, ‘‘तिला आणि तिच्या वडिलांना घेऊन जेवायला जा. एनएसडीमध्ये नागालॅण्डहून शिकायला आलेल्या एका विद्यार्थ्यांलाही बरोबर घे. आपल्यापुढे सादरीकरण करण्यासाठी तिला हवं ते निवडायला सांग.’’
आम्ही तिच्यासाठी एक छोटंसं व्यासपीठ उभं केलं आणि तिने बोलक्या बाहुल्यांचा एक सुंदर कार्यक्रम केला. तिचा कार्यक्रम इतका चांगला झाला की, आम्ही सगळे एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघतच राहिलो. अल्काझी मला म्हणाले, ‘‘रैना, आता यामधली आपली जबाबदारी नीट समजून घे. इथे येण्यासाठी ही मुलगी तिच्या घरून किमान दहा-बारा खेडेगावं ओलांडून आली असेल. त्यामुळे या गावांमधल्या प्रत्येकाला माहीत झालं असेल की, हिला दिल्लीच्या लोकांनी बोलावलं आहे. दिल्लीचे लोक म्हणजे नेमके कोण आहेत, ते कसे असतात हे तिथल्या कुणालाच माहीत नाही. तेव्हा आता ही परत जाईल तेव्हा ती तिथली आपली राजदूत असेल. आपण तिच्यासाठी इथे काय काय केलं ते ती तिथे जाऊन सांगेल. कलाकार हे कोणत्याही बदलाचं माध्यम म्हणून काम करत असतात. त्यामुळे आपण खूप काळजीपूर्वक वागलं पाहिजे.’’ त्यांचं हे वाक्य मी कायमसाठी लक्षात ठेवलं.
मी त्यांना शेवटचं भेटलो ते दिल्लीत झालेल्या त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या पार्टीला. तेव्हा त्यांची प्रकृती फारशी ठीक नव्हती. त्यांची ती अवस्था बघून मला फार वाईट वाटलं. मला त्यांना अशा अवस्थेत बघवत नव्हतं. त्यापूर्वी आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो होतो तेव्हा आम्ही कामाबद्दल, कुटुंबाबद्दल बोलायचो. ते आम्हाला त्यांची चित्रं बघण्यासाठी त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलावायचे. पुनर्जागरण (रेनेसॉ) करणारा माणूस म्हणजे काय हे त्यांनी आम्हाला त्यांच्या स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिलं होतं.
(शब्दांकन : दीपनीता नाथ)
अनुवाद : वैशाली चिटणीस
‘इंडियन एक्स्प्रेस’मधून