युतीच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. आपल्या या सहकाऱ्याला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी वाहिलेली आदरांजली-

महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचे स्वतंत्र स्थान होते. मुंडे यांच्याशिवाय शिवसेना-भाजप युती ही कल्पना करवत नाही. त्यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने आता कुठे सुरुवात होत होती. त्यांच्या अचानक जाण्यामुळे केवळ भाजपलाच नव्हे तर शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. मुंडे हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. तळागाळातील लोकांचे नेतृत्व करण्याची त्यांची ताकद काही विलक्षणच होती. संघर्ष आणि मुंडे हे एक समीकरण बनले होते. मराठवाडय़ाच्या एका छोटय़ाशा गावातल्या या तरुणाची ताकद वसंतराव भागवतांसारख्या व्यक्तीने ओळखली. मुंडे व महाजन या जोडगोळीला भाजपच्या राजकारणात भागवतांनी ताकद दिल्यानंतर त्यांनी जी झेप घेतली ती खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. प्रमोद महाजन हे केंद्रीय राजकारणात तर गोपीनाथराव हे महाराष्ट्रात हे समीकरण भाजपमध्ये निश्चित झाले. उमेदीच्या काळात मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्र सरकारवर ते कोसळून पडत असत. विधिमंडळातील त्यांची भाषणे ऐकणे हा एक वेगळाच आनंद होता. विषयाचा अभ्यास आणि विरोधकांवर तुटून पडण्याची त्यांची शैली भन्नाट म्हणावी अशी होती. शरद पवार यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. खरेतर पवारांवर थेट आरोप तोपर्यंत भाजपमध्ये कोणी केला नव्हता. मुंडे यांनी ही हिम्मत दाखवली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्राची सत्ता मिळवणारच हा एक अतूट विश्वास त्यांच्यामध्ये होता. विरोधी पक्षनेते असतानाही त्यांचे लक्ष हे कायम मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे होते. माझ्या म्हणण्याचा विपरीत अर्थ काढू नका.. त्यांना एक विश्वास होता, मुख्यमंत्र्याची खुर्ची एक दिवस मला मिळणारच.. त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.
राज्यात १९९५ साली युतीची सत्ता आली. मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी निवड केली. उपमुख्यमंत्रीपदाचा मान अर्थातच मुंडे यांना मिळाला. तुलनेत विचार केला तर शिवसेनेचे मंत्री हे सत्तेसाठी नवखे होते. त्यामुळे भाजपवर नजर ठेवणे म्हणा किंवा ते वरचढ होणार नाहीत याची काळजी मला घ्यावी लागायची. यातून अनेकदा निर्णय घेताना मुंडे यांच्याबरोबर मतभेद व्हायचे, परंतु त्यांनी आपल्या नाराजीचे कधी जाहीर प्रदर्शन केले नाही. एवढेच नव्हे तर कारभारात बेकी कधी दिसणार नाही, याची काळजी घेतली. एकदाच त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. मला त्याचे खूपच वाईट वाटले. खरेतर मुंडे यांनी चर्चेतून मार्ग काढायला हवा असे माझे मत होते. उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांनी बहिष्कार टाकू नये ही माझी भूमिका होती. प्रमोद महाजन यांनी मुंडे यांची समजूत काढली व आमच्यातील मतभेद संपुष्टात आले. हा एक प्रसंग सोडल्यास मुंडे यांनी सरकारमध्ये असताना मतभेदांचे कधी जाहीर प्रदर्शन केले नाही. गृहमंत्री म्हणून त्यांच्याच कारकिर्दीत मुंबईतील गँगवॉर संपुष्टात आले. अनेक गुंडांचा खातमा मुंडे यांच्याच काळात झाला. वक्तशीरपणा आणि मुंडे यांचे समीकरण कधी जमलेच नाही. कायम लोकांच्या गराडय़ात असलेले मुंंडे कोणत्याही कार्यक्रमाला कधी वेळेवर गेले असे झाले नाही. त्यांच्या वेळ पाळण्याबाबत भाजपमध्येही अनेक विनोद प्रसिद्ध आहेत. शेवटच्या माणसाला भेटूनच मग मुंडे पुढच्या कार्यक्रमाला जायचे. यामुळेच त्यांना उशीर व्हायचा. स्वत: मुंडेही सांगत.. येणाऱ्या प्रत्येक माणसाची एक अपेक्षा असते. त्याचे काम होईलच असे नाही परंतु त्याचे म्हणणे तरी ऐकले जावे.. मी ग्रामीण भागातला, तेथील लोकांची दु:खे वेगळी असतात. जमेल तेवढी त्यांना मदत करणे हे ते कर्तव्य समजत. यामध्ये कितीही वेळ झाला तरी ते पर्वा करत नसत. भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचे म्हणणे ऐकूनच ते पुढच्या कार्यक्रमाकडे वळत असल्यामुळे उशीर होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मला मात्र त्यांचे कारण कधी पटले नाही. मुख्यमंत्री असताना मीही रोज लोकांना भेटत असे. त्यांचे म्हणणे ऐकत असे. सकाळी नऊ ते दहा ही वेळ लोकांना दिलेली असे. त्या वेळात येणाऱ्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून अधिकाऱ्यांना जागच्या जागी योग्य ते आदेश देत होतो. मात्र दहा वाजले की लगेचच पुढच्या कार्यक्रमाला निघून जात होतो. मुंडे यांचे सारेच वेगळे होते. लोकसंग्रहही अफाट होता. येणाऱ्या प्रत्येकाचे काम व्हावे असाच त्यांचा कायम दृष्टिकोन होता. त्यांच्या निधनामुळे महायुतीचे अतोनात नुकसान झाले. बाळासाहेब व त्यांचा जसा जिव्हाळा होता. तसेच त्यांचे व उद्धव ठाकरे यांचेही सख्य होते. मधल्या काळात म्हणजे महाजनांचे निधन झाल्यानंतर मुंडे यांची राजकीय कोंडी झाली त्या वेळी बाळासाहेब मुंडे यांच्या ठामपणे मागे उभे राहिले होते. उद्धव हेही मुंडे यांच्या मागे असेच उभे होते. यातूनच महायुती भक्कमपणे उभी राहिली होती. अर्थात महायुती ही हिंदुत्वाच्या वैचारिक पायावर उभी असल्यामुळे यापुढेही ती भक्कमच राहील, यात मला शंका नाही. परंतु गोपीनाथ मुंडे यांची उणीव कायमच जाणवेल. मुंडे यांच्या अनेक आठवणी आहेत. भाषण उत्तम झाले की सभागृहात मान तिरकी करून पत्रकारांच्या कक्षाकडे नजर फिरवत असत. खिशातून कंगवा काढून केसातून फिरविण्याची त्यांची सवय.. चश्मा टेबलावर फेकणे.. मूठ भरून शेंगदाणे खाणे.. हळूच एखाद्याची फिरकी घेणे.. एखाद्याला मदत करताना भरभरून करणे.. आता त्यांच्या आठवणीच उरल्या आहेत.. मुंडे गेले हे पचवणे अवघडच आहे..
(शब्दांकन- संदीप आचार्य)

Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता