पन्नासेक वर्षांपूर्वीची मुंबई कशी होती.. एखाद्या कुटुंबासारखी.. आपुलकी होती, बडेजाव नव्हता. माणसाला किंमत होती. आता ते सगळं हरवलं बाप्पा…

मुंबईतलं आमचं गोरेगाव मला ‘आटपाटनगर’च वाटायचं. साध्या माणसांच्या कर्तबगारीचा थाटमाट मोठा होता. लैला महाजन, वसुधा पाटील, आशा गवाणकर ही लेखिकांची नावं दिवाळी अंकात दिसायची आणि घरगुती नातंगोतं आपलेपण जपत राहायचं. ‘टोपीवाला वाडी’त मालवणी हेल काढणारं जग हेलकावत राहायचं. मृणाल गोरेंसारख्या नेत्या चक्क रस्त्याने पायी चालत जायच्या. ए.सी. बंद गाडीतून पळत सुटायच्या नाहीत. त्या निर्भय होत्या. ‘आटपाटनगरा’त मनोरंजनाचं खरं साधन रेडिओ हेच होतं. ‘माझा होशील का?’सारखी लाडिक गाणी आकाशवाणीच मुलींना शिकवत होती. ‘हिल हिल पोरी हिला’वर पोरं नाचत होती.
फार हुशार माणसांचं पुस्तकी जगही अस्तित्वात होतं. ‘अंबुताई’ या नावावरून कुणीतरी घरातच राहणारी मठ्ठ बाय सूचित होईल. पण छे! त्या तर कडक शिस्तीच्या उपप्राचार्या आणि शैक्षणिक मूल्य असलेली बुकं लिहिणाऱ्या प्रा. कुंदा दाभोळकर होत्या. एकेकटय़ा राहून या हुशार महिला अभ्यास, ज्ञान किंवा संगीत कलेला वाहून घ्यायच्या. त्यांच्याबद्दल केवळ आदराची भावना असे. तेव्हा मुळात मुंबई इतकी परकी व एवढी पोरकी झाली नव्हती. जीवनशैली अशी आजारी आणि कृत्रिम नव्हती. अनैसर्गिक गोष्टींची अशी ऐट नव्हती. भरपूर सोनेरी प्रकाश, निळंभोर आकाश, ताडा-माडाची झाडं, बावडीत सोडलेले मासे, मराठी नावं लावणाऱ्या वाडय़ा असं वातावरण होतं. गोरेगावात म्हणाल तर गोगटे वाडी, पांडुरंग वाडी, नाईक वाडी, गवाणकर वाडी, सामंत वाडी, पूरकर वाडी अशी छान मराठी ‘ओळख’ होती.
प. बा. सामंतांसारखे पदाधिकारी व पुढारीही किती अभ्यासू होते. शिवाय ते ‘मौज’चं कथालेखन करायचे. तत्त्वाला ठाम असल्यामुळे ही मंडळी सत्त्व राखून होती. व्यसनं अशी ‘आदरणीय’ झाली नव्हती. शिमग्यात झुलणारा दारुडय़ा हा ‘कमीपणा’ मानला जायचा. असा कुणी जुगारी किंवा बेवडा असेल, तर तो जवळ-जवळ वाळीत पडायचा. ‘पेज थ्री’ कल्चर कुठेच नव्हतं. ‘ब्राऊन शुगर’सारखे शब्द ८०च्या दशकात ऐकू येऊ लागले व ९०च्या दशकात ओळखीचे ड्रग अॅडिक्ट तरुण बिचारे कायमचे नाहीसे झाले. नावं कशाला सांगायची!
स्टार सुनील बर्वेच्या शिक्षिका आईने, बर्वे बाईंनी मंजुळ आवाजात आम्हा मुलांना इतकं छान इंग्रजी शिकवलं की, ‘सेंट थॉमस’ शाळेत न जाता, मराठी माध्यमात शिकूनही आम्ही सहजपणे इंग्रजीत बोलू लागलो. मात्र त्याचा रुबाब कधी मिरवला नाही. बुद्धिवादी शिक्षकही आमची जडण-घडण विज्ञानवादी अंगाने करत होतेच. ‘मी नास्तिक का आहे’ (ले. भगतसिंग) सारख्या ग्रेट पुस्तिका सहजपणे उपलब्ध होत्या. ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातही कर्मचारी अगदी आपलेपणाने वागत’ आणि ‘‘माधवला ‘किस्त्रीम’चा अंक द्या रे’’ म्हणत.
‘दूरदर्शन’चं स्वरूपसुद्धा सुरुवातीला छोटय़ा कुटुंबासारखं होतं. मुंबई दूरदर्शनच्या पहिल्या वाढदिवसाला २ ऑक्टोबर १९७३ला ‘आई आमचं चुकलं’ ही बालनाटिका आमच्या टीमने उत्साहात सादर केली होती. उत्साह आताही असेल पण, घरघरणारं जातं व नातंगोतं कुठून आणायचं! ते हरवलं बाप्पा!

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email – response.lokprabha@expressindia.com