साहित्य :
अडीच वाटय़ा स्वीट कॉर्न, उकडलेले
३ मध्यम बटाटे, उकडलेले
२ ब्रेडचे स्लाइस
१ चमचा आले, किसलेले
३ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून
२ लहान कांदे (ऐच्छिक)
१/२ चमचा जिरे
१/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून
कॉर्न फ्लेक्स, क्रश केलेले (खालील टिपा नक्की वाचा)
१ चमचा मैदा + १/२ वाटी पाणी
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल.

कृती :
१)    बटाटे सोलून कुस्करून घ्यावे. ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ते बटाटय़ात घालावे.
२)    दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये अगदी भरड वाटावेत. उरलेले १/२ कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा.
३)    कॉर्नच्या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा आणि मीठ घालावे. मिक्स करून घ्यावे.
४)    तयार मिश्रणाचे १८ ते २० मध्यम आकाराचे पॅटिस बनवावेत. पॅटिस गोल आणि चपटे बनवावेत.
५)    क्रश केलेले कॉर्न फ्लेक्स एका ताटलीत पसरवून ठेवावे.
६)    मैदा आणि पाणी यांचे मिश्रण एकदा ढवळून घ्यावे. यात ३-४ पॅटिस बुडवून लगेच बाहेर काढावेत आणि कॉर्न फ्लेक्सवर ठेवावेत. दोन्ही बाजूंनी कॉर्न फ्लेक्स चिकटतील याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे सर्व पॅटिस बनवावेत. पॅटिस एकावर एक रचू नयेत. सेपरेट ठेवावेत. अर्धा-पाऊण तास फ्रिजमध्ये ठेवावेत.
७)    अध्र्या तासाने पॅटिस फ्रिजमधून बाहेर काढून १० मिनिटे बाहेर ठेवावेत.
८)    कढईत तेल गरम करून मीडियम आचेवर पॅटिस तळून घ्यावीत. जेव्हा पॅटिस तळणीत सोडाल तेव्हा २०-२५ सेकंद त्याला डिस्टर्ब करू नकात. एक बाजू थोडी तळली गेली की मगच झाऱ्याने बाजू बदलावी. दोन्ही बाजू सोनेरी रंगावर तळाव्यात.
९)    तळलेले पॅटिस टिश्यू पेपरवर काढावेत. पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर सव्‍‌र्ह करावेत.

टिप्स:

  • कॉर्न फ्लेक्स वापरताना प्लेन कॉर्न फ्लेक्स वापरावेत.
  • कॉर्न फ्लेक्समुळे पॅटीस बाहेरून एकदम कुरकुरीत होतात. कॉर्न फ्लेक्सऐवजी भाजलेला जाड रवा किंवा ब्रेड क्रम्स वापरू शकतो.
  • कॉर्न फ्लेक्स वापरणार असाल तर सव्‍‌र्ह करायच्या आधी पॅटीस पेपर टॉवेलवर ठेवा, कारण कॉर्न फ्लेक्स तेल शोषून घेतात.
  • हे पॅटीस शालो फ्रायसुद्धा करू शकतो. त्यावेळी मात्र रवा किंवा ब्रेड क्रम्सच वापरावे.
  • तळणीसाठी तयार केलेले पॅटीस फ्र्रीजमध्ये ठेवल्याने ते छान सेट होतात. तसेच बाहेरील कोटिंग नीट चिकटून राहते व तेलात कमी उतरते.
  • अशाप्रकारे पॅटीस तयार करून फ्रीजमध्ये तयार करून ठेवू शकतो. पाहुणे यायच्या आधी १५ मिनिटे बाहेर काढून मग तळावेत.

कॉर्न कोर्मा

साहित्य :
दीड वाटी स्वीट कॉर्न, वाफवलेले
फोडणीसाठी- दीड चमचा तेल
१/४ चमचा हळद
१/२ वाटी कांदा, बारीक चिरून
१/२ वाटी टोमॅटो, बारीक चिरून
२ चमचे दही
२ चमचे क्रीम किंवा साय
२ वेलची
१/४ चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला.

नारळाचे वाटण :
१/२ वाटी ताजा खोवलेला नारळ
७-८ काजू
२-३ हिरव्या मिरच्या
४-५ लसूण पाकळ्या
१/२ चमचा किसलेले आले
चवीपुरते मीठ आणि साखर.

कृती :
१)    नारळाचे वाटण करून घ्यावे.
२)    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हळद आणि वेलचीचे दाणे घालावे. नंतर कांदा घालून गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतावे.
३)    कांदा छान परतला की नारळाचे मिश्रण घालावे. तेल बाहेर येईस्तोवर परतावे. नंतर टोमॅटो घालून मऊ  होईस्तोवर परतावे. कॉर्नचे दाणे घालावेत.
४)    दही, साय, गरम मसाला, मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. थोडेसे पाणी घालून कन्सिस्टंसी अ‍ॅड्जस्ट करावी.  झाकण ठेवून चार-पाच मिनिटे मंद आचेवर शिजवावे. गरम सव्‍‌र्ह करावे.

मेथी कॉर्न पुलाव

साहित्य :
१ वाटी बासमती तांदूळ
१ वाटी मेथीची पाने
१ वाटी कांदा, पातळ उभा चिरून
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/२ वाटी मक्याचे दाणे, उकडून
१ चमचा किसलेले आले
३ चमचे तेल
३/४ वाटी दही
२ तमालपत्र
४ लवंगा
२ वेलची
चवीपुरते मीठ
१ चमचा तूप
चिमूटभर कसुरी मेथी, पूड करून घ्यावी
थोडी कोथिंबीर, सजावटीसाठी

कृती :
१)    मेथी साफ करण्यासाठी, बारीक चिरून १/२ तास मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावी. बासमती तांदूळ धुवून, पाण्यात २० मिनिटे भिजवून ठेवावा.
२)    धुतलेली मेथी पाण्यातून काढून पिळून घ्यावी म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होईल. भिजवलेले तांदूळही निथळून १० मिनिटे ठेवावेत.
३)    एका खोलगट पातेल्यात तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, वेलची आणि लवंगा घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर ५ मिनिटे किंवा लालसर होईस्तोवर परतावे. नंतर त्यात आले आणि हिरव्या मिरच्या घालून परतावे.
४)    आता पिळून घेतलेली मेथी घालून २ मिनिटे परतावे. त्यात घोटून घेतलेले दही घालून ढवळत राहावे. दही घट्टसर झाले की त्यात उकडलेले कॉर्न घालावे. छान मिक्स करून पाणी घालावे. मीठ घालावे आणि चव पाहावी. पाण्याला उकळी येऊ  द्यावी.
५)    एकदा पाणी उकळू लागले की त्यात धुतलेले तांदूळ घालावे. मध्यम आचेवर, झाकण न ठेवता तांदूळ शिजू द्यावेत. ६०% पर्यंत तांदूळ शिजेपर्यंत झाकण ठेवू नये. नंतर झाकण ठेवून मंद आचेवर तांदूळ पूर्ण शिजू द्यावा. फक्त गरज असेल तेव्हाच हलक्या हाताने भात ढवळावा. खूप जास्त वेळा ढवळू नये, त्यामुळे भाताची शिते तुटतात आणि भात नीट बनत नाही.
भात व्यवस्थित शिजला की वरून तूप घालावे आणि हलक्या हाताने सवर्ि्हग प्लेटमध्ये वाढावा. फ्लेवरसाठी थोडी कसुरी मेथी भुरभुरावी. थोडी कोथिंबीर पेरून सजवावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप :
आवडीनुसार मेथीचे प्रमाण कमी-जास्त करावे.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com