स्कँडेनेव्हियन देशांमध्ये आढळणाऱ्या सामी या जमातीचे मूळ आठ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. आज या जमातीतले फक्त ८० ते ८५ हजार लोक उरले आहेत. अशाच एका सामी कुटुंबाचा लेखकाने अनुभवलेल्या पाहुणचाराचा अनुभव-

स्कँडेनेव्हियातील विविध देशांना भेट येण्याचा योग आत्तापर्यंत तीन-चार वेळा आला. त्या देशांचा इतिहास, संस्कृती याबाबत वाचताना तेथील सर्वात जुन्या सामी जमातीचा उल्लेख बऱ्याचदा येतो. हिवाळ्यात जवळजवळ सहा महिने उणे ५० डिग्री तापमानात जीव घेणारी थंडी आणि २४ तासांचा अंधार. राहिलेल्या सहा महिन्यांत चोवीस तासांचे सूर्यदर्शन अशा टोकाच्या हवामानात शतकानुशतके टिकून राहिलेल्या व आजही आपली वैशिष्टय़े, चालीरीती जपणाऱ्या या जमातीबद्दल पहिल्या भेटीपासून मोठी उत्सुकता व कुतूहल वाटत होते. सुदैवाने तेथील मुक्कामात एक-दोन वेळा या जमातीत राहण्याची मिसळण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांची जीवनपद्धती, कुटुंबव्यवस्था, उद्योगधंदा याबाबत परिचय झाला.
सामी जमातीचे मूळ आठ हजार वर्षांपूर्वीचे जुने आहे. आज त्यांचे केवळ ८० ते ८५ हजार लोक राहिले असून ते प्रामुख्याने नॉर्वे, फिनलँड व रशियात विखुरले आहेत. त्यातील सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ चाळीस हजार सामी नॉर्वेमध्ये आढळतात. उत्तर नॉर्वेतील कटासजोक खेडय़ात त्यांचे स्वतंत्र पार्लमेंट आहे. सामी जमातीच्या स्त्री-पुरुषांना मतदानाचे दोन अधिकार असतात. एक राष्ट्राच्या संसदेचा प्रतिनिधी निवडण्याचा आणि दुसरा सामी पार्लमेंटमध्ये प्रतिनिधी पाठविण्याचा. सामी जमातीची संस्कृती, वैशिष्टय़े कायम राहावीत म्हणून या पार्लमेंटची स्थापना झाली. जमातीमधील विविध प्रश्न सोडविणे तसेच सामींच्या समस्या राष्ट्रीय संसदेपुढे मांडण्याचे काम हे पार्लमेंट करते. सामी जमातीचा स्वतंत्र ध्वज आहे. तांबडा, निळा, पिवळा व हिरव्या रंगाच्या या झेंडय़ाला एक चक्र असते. तांबडा रंग सूर्याचे तर निळा चंद्राचे प्रतीक मानण्यात येते. सामी जमातीच्या पारंपरिक कपडय़ांवर जे भरतकाम केले जाते त्यातही प्रामुख्याने याच रंगांचा वापर केला जातो.
सामी ही प्रामुख्याने भटकी जमात म्हणून ओळखली जाते. रेनडियरचे कळप घेऊन हिवाळ्यात जागा बदलत फिरावयाचे हे त्यांचे मुख्य जीवन. प्रत्येक सामी कुटुंबाच्या मालकीचे रेनडियर्स असतात. एखाद्याकडे किती रेनडियर आहेत यावरून त्याची श्रीमंती कळते. पण तुझा पगार किती, तुझ्याकडे किती पैसे आहेत असा प्रश्न दुसऱ्याला विचारणे हे जसे असंस्कृत मानले जाते, त्याचप्रमाणे तुझ्याकडे किती रेनडियर आहेत असे त्या समाजात एकमेकांना कधीही विचारले जात नाही. मात्र निरनिराळ्या भागांत किती रेनडियर असावेत, याचे नियम सरकारनेच घालून दिले आहेत. उदा. नॉर्वेमधील लॅपलेंड प्रदेशात एक लाख रेनडियर बाळगण्याची परवानगी आहे. बर्फाळ प्रदेशात रेनडियर म्हणजे वाळवंटातला उंट आणि सामी जमातीचा शतकानुशतकांचा जीवनसोबती. निरनिराळ्या मोसमांत रेनडियरचे निरनिराळे उपयोग आहेत. कडाक्याच्या थंडीत, बर्फाळ प्रदेशात, फार पूर्वीपासून वाहतुकीसाठी रेनडियरच्या गाडीचा वापर केला जातो. एका मर्यादेपर्यंत ते घोडय़ापेक्षाही अधिक चपळ असतात. रेनडियरची शिंगे फार डौलदार व आकर्षक. त्यांच्यापासून बनविलेली औषधे, माणसाची ठिसूळ हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगी पडतात, असे चीनमध्ये मानण्यात येते. त्याचे अन्य वैद्यकीय उपयोगही बरेच आहेत. रेनडियरची लोकर फार ऊबदार. त्यामुळे या लोकरीपासून बनविलेल्या कोटांना सर्व जगातून प्रचंड मागणी असते. साधारणत: हिवाळ्याच्या अखेरीस त्यांच्या अंगावरील लोकर कापण्यात येते. पण त्यामुळे उन्हाळ्यात रेनडियर्सना डासांपासून फार त्रास होतो. या काळात ते गवत खातात. रेनडियरचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे मालक त्यांचा विमा उतरवतात. अपघातात रेनडियर मारला गेला तर दंडाची रक्कम भरताना वाहन चालकाला अक्षरश: नाकी नऊ येतात.
रेनडियरचे मांस फार लोकप्रिय आहे. ‘रेनडियर मीट’ची चव एकदा घेतली की रोज त्यावर ताव मारावासा वाटला तर आश्चर्य नाही. त्यात प्रचंड चरबी असते. मला रेनडियरचे गरमागरम सूप म्हणजे, उणे तापमानात अक्षरश: मेजवानी वाटली. सहा महिन्यांच्या रेनडियर बच्च्याचे मांस फार चविष्ट मानले जाते. सामी जमातीच्या एका खास रेस्टॉरंटमध्ये मुद्दाम जेवावयास गेलो. मेनू होता, ‘रेनडियर मीट विथ मॅश पोटॅटो, सॅमन फिश व सोबत वाइन.’
रेनडियरची नजर कमजोर पण कान व घ्राणेंद्रिये फार तीक्ष्ण असतात. बर्फाळ प्रदेशात चालताना, कोठे दरी आहे, कोठे अन्य धोका संभवतो हे त्यांना बरोबर समजते. त्यांचे आयुष्य १५ ते २० वर्षे, पण आयुष्यभर सतत खूप चालल्याने त्यांना गुडघ्याचा रोग होतो. अशा रेनडियर्सना मारून त्याचा मालक व कुटुंबीय त्याचे मांस खातात.
सामी जमात ही अत्यंत कष्टाळू व धाडसी. हिवाळ्यात तर त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी रोजचा सामना असतो. बर्फाळ डोंगरांतून, हाडे गोठविणाऱ्या थंडीत भटकताना, हिमवर्षांव, बर्फाचे कडे कोसळून काय आपत्ती कोसळेल याचा भरवसाच नसतो. आता अनेक सामी पुरुष आपल्या बायका मुलांना एकाच ठिकाणी ठेवून आपली भटकंती चालू ठेवतात. प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले, की सामी माणूस आपली झोपडी अक्षरश: पाच मिनिटांत उभारतो. त्याच्या मध्यभागी लाकडाची शेकोटी तयार केली जाते व त्याचा धूर चिमणीतून बाहेर सोडला जातो.
उणे ५०-६० डिग्री तापमानात त्यांची आंघोळ करण्याची पद्धत पाहिली, आणि माझ्या अंगात रेनडियरचा कोट असूनही मला हुडहुडी भरली. हिवाळ्यातच ट्रॉमसो शहरापासून सुमारे शंभर किमी अंतरावरील एका अगदी खेडय़ात राहणाऱ्या सामी कुटुंबात मुद्दाम गेलो होतो. सॅम हा तरुण माणूस त्या कुटुंबाचा प्रमुख व त्याची पत्नी व दोन मुलेही सोबत राहात होती. तेथे तापमान होते उणे ३० डिग्री. सॅमने आमचे स्वागत केले आणि चटकन आपल्या ऊबदार झोपडीत नेले. रेनडियरचे गरमागरम सूप प्यायल्याने आता आमच्या अंगात मस्त ऊब आली होती. अर्थात त्यांच्या दृष्टीने उणे ३० डिग्री ही फार प्रचंड थंडी म्हणता येणारी नाही. वर्षांतले दोन-तीन महिने उणे ५०, उणे ६० डिग्रीमध्ये नेहमीच काढावे लागतात.
आज थंडी थोडी कमी आहे म्हणून सॅमने आंघोळीचा निर्णय घेतला होता. झोपडीच्या समोरूनच एक नदी वाहत होती. अर्थात त्या वेळी ती संपूर्ण गोठली होती. आणि चांगले एक फुटाचे बर्फ त्यावर साचले होते. सॅमने चाकूने ते बर्फ फोडावयास सुरुवात केली. तो आत शिरू शकेल एवढय़ा परिघाचा बर्फ त्याने फोडला. त्याच्या खाली पाणी होते. मग सॅमने कपडे काढले. आणि केवळ एका छोटय़ा चड्डीनिशी त्या गोलातून आत उडी मारली. ते दृश्य मी कधीच विसरू शकणार नाही. उणे तापमान, गोठलेली नदी आणि त्यात डुबी मारावयाची.. ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही, ते दृश्य मी डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहात होतो.. त्या नदीत सॅमने तीन-चार डुबक्या मारल्या. त्यांच्या मते गोठलेल्या नदीचे आतले पाणी तेवढे थंड नसते. पाण्यातून बाहेर आल्यानंतर मात्र परिस्थिती फार भयंकर असते. अक्षरश: धावत सॅम झोपडीत शिरला व अतील फायरसमोर बसला. त्यांच्या स्त्रिया व मुलेही याच पद्धतीने आठवडय़ातून एकदा-दोनदा आंघोळ करतात. कडाक्याच्या थंडीत शरीराची कातडी शुष्क (ड्राय) होते. त्यासाठी प्रचंड चरबी असलेल्या रेनडियरचे मांस शिजवून त्याचा ‘फेस पॅक’ तोंडाला लावला जातो.
रेनडियरच्या कातडय़ाची अर्धी चड्डी व कमरेला चाकू हा सामी पुरुषांचा वेष तर स्त्रिया भरतकाम केलेला स्कर्ट घालतात. बायकांच्या कमरेला पट्टा असतो. ज्या स्त्रीच्या पट्टय़ावर गोल गोळे असतात ती अविवाहित आहे व चौकोनी म्हणजे विवाहित असे समजायचे. अशीच पद्धत अमेरिकेतल्या हवाई बेटांवर पाहावयास मिळाली होती. हवाईन स्त्रीने डाव्या कानावर फूल ठेवले की उजव्या यावरून ती विवाहित किंवा अविवाहित हे ओळखता येते.
सर्वसाधारणत: आपल्याच जमातीमध्ये लग्न करण्यास सामी मुलं-मुली उत्सुक असतात. मात्र आपला साथीदार आपणच निवडणार असा त्यांचा आग्रह असतो. सामी जमातीमधील विवाह सोहळा महिना-महिना चालतो. सॅमने त्याच्या लग्नाची जी गोष्ट सांगितली ती मोठी मजेशीर होती. त्या वेळीही पाहुण्यांची ऊठबस चांगली महिनाभर आधी सुरू झाली. लग्नाला निदान हजार लोकांची उपस्थिती नेहमीच असते. सॅमच्या लग्नाच्या वेळी पन्नास रेनडियर्सचे मांस लागले. म्हणजे सॅमला चांगला आर्थिक फटका बसला. पण या जमातीत नवविवाहित दाम्पत्याला भेट म्हणून रेनडियर देण्याची पद्धत आहे. सॅमला एकूण ५५ रेनडियर भेट म्हणून मिळाले. त्यामुळे लग्नात त्याचा पाच रेनडियरचा नफाच झाला. पण महिनाभर व्होडका मद्याचा मात्र अक्षरश: पूर वाहात होता. तो खर्च सॅमला करावा लागला. अर्थात लग्न किंवा अन्य कोणत्याही समारंभात पाहुणेमंडळी, सर्व कामे अगदी घरच्यासारखी करीत असतात हे विशेष.
सामी स्त्रियांची सौंदर्यदृष्टी वाखाणण्यासारखी असते. निरनिराळ्या पद्धतीचे कपडे शिवणे व हस्तकलांमध्ये त्या पारंगत असतात. लहानपणापासूनच त्यांना ती कला शिकविली जाते. त्यामुळेच या समाजाची प्राचीन परंपरा मोठय़ा प्रमाणात जपली गेली आहे. किनाऱ्याजवळ राहणारे सामी लोक हे फार पूर्वीपासून बोटी बांधण्यात निष्णात मानण्यात येतात. एका सामी कुटुंबाच्या १२५ वर्षांच्या जुन्या घरात गेलो होतो. तेथील माहोल काही आगळावेगळाच होता. नानाविध जनावरांची मुंडकी व शेकडो प्राचीन हत्यारे ठिकठिकाणी टांगली होती.
सामी जमात कमालीची परंपराप्रिय आहे. जुन्या समजुती, चालीरीती आजही त्यांच्यात कायम आहेत. त्याचे काही विधी पाहण्याची संधी मिळाली. सर्वजण झोपडीत गोलाकार बसले होत.े तुमच्यातल्या शापित गोष्टी नाहीशा व्हाव्यात व तुमचे चांगले व्हावे यासाठी तो विधी होता. ज्येष्ठ सामी माणसाने बसलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर भस्मासारखे पट्टे ओढले. मध्यभागी अग्नी पेटविण्यात आला. शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणारे जसे भांडे असते, तशी एक किटली त्या अग्नीवर टांगण्यात आली. त्या सामी माणसाचे मंत्रपठण सतत सुरू होते. मग त्याने किटलीतील रेनडियरचे दूध प्रसाद म्हणून सर्वाना दिले. मोठय़ा धीरगंभीर वातावरणात तो समारंभ पार पडला.
अर्थात आता सामी जमातीमधील तरुण पिढी, लॅपटॉप व मोबाइल संस्कृतीचाही अंगीकार करीत आहे. जुन्या चालीरीती सांभाळून आधुनिकतेचे वारेही त्यांच्यात वाहात आहेत. रोव्हेनिमित्त एका रेस्टॉरंटमध्ये वीस-पंचवीस वर्षांची सामी तरुणी भेटली. तिचे सौंदर्य खरोखरच अप्रतिम होते. तीन-चार वर्षांपूर्वी ती भारतात आली होती. सिने अभिनेत्री बनण्याची तिची इच्छा आहे. भारतातील बॉलीवूड जगताबद्दल तिला बरेच आकर्षण होते. पण मुंबई, दिल्लीतील प्रचंड गर्दी पाहून मी कमालीची घाबरून गेले व परत आले असे तिने हसत हसत सांगितले.
सामी जमातीला शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळते. वैद्यकीय विम्याचे संरक्षण हे त्यांतीलच एक मोठे सहाय्य. सामी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस काहीही आजार झाला तर त्यांना सर्व उपचार जवळजवळ मोफत मिळतात. सॅम म्हणाला, आता रेनडियर्स घेऊन डोंगराळ भागात फिरतानाची भीती थोडी कमी झाली आहे. कारण उंच डोंगरावर काही अपघात झाला तरी दहा मिनिटांत हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत उपलब्ध होते.. फक्त जवळ मोबाइल हा हवाच.