सर्वकार्येशु सर्वदा : अर्थपूर्ण शिक्षणाचा आनंददायी ज्ञानयज्ञ!

नवशिक्षणाविषयीच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी ‘ग्राममंगल’ संस्थेतर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहे.

नवशिक्षणाविषयीच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी ‘ग्राममंगल’ संस्थेतर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहे. अनुताई वाघ, प्रा. रमेश पानसे आदींनी तीन दशकांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेने आनंददायी शिक्षण पद्धतीचा एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.
‘ग्राममंगल’च्या सर्व शाळांमध्ये मुला-मुलींना कुणीही शिकवत नाहीत. त्यांची ती अनुभवाने प्रयत्नपूर्वक शिकतात. शिक्षक फक्त त्यांना त्या प्रक्रियेत मदत करतात. सकाळी साधारण दहा वाजता शाळा सुरू होते. आधी मुले-मुली परिसराची स्वच्छता करतात. मग शाळेत नियमित अभ्यास सुरू होतो. सर्वसाधारण शाळांप्रमाणेच प्रत्येकी ४० मिनिटांची तासिका असली तरी येथे विषयानुरूप केवळ शिक्षक बदलत नाहीत, तर मुलांनाही दुसऱ्या वर्गात जावे लागते. कारण येथे विषयानुरूप वर्गखोल्या असून (शास्त्रालय) तिथे गटागटाने मुले विशिष्ट विषयाचा अभ्यास करतात. प्रत्येक गोष्ट आणि गृहीतक व्यवहाराच्या कसोटीवर पारखून पाहण्याची सवय त्यांना बालवाडीपासूनच लागते. तीन ते सहा वयोगटातील मुले-मुली बालवाडय़ांमध्ये येतात. त्यांच्यासाठी ‘ग्राममंगल’ संस्थेने ५००हून अधिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिलेली आहेत. संस्थेच्या वतीने बालवाडी तसेच प्राथमिक शिक्षकांसाठी या रचनावादी शिक्षण पद्धतीविषयी प्रशिक्षण दिले जाते. ऐने येथे एका वेळी २०० शिक्षकांना निवासी प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘लावण्य’ हाही ग्राममंगलचा एक वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प आहे. या नावीन्यपूर्ण कार्यशाळेत परिसरातील कारागीर, कलावंत येऊन आपल्या कलाकृती आणि कलावस्तू तयार करतात. संस्थेत येणारे पाहुणे, पर्यटक त्या वस्तू पाहतात, विकत घेतात.
मुख्यत: ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळावे, या हेतूने सुरू झालेल्या ‘ग्राममंगल’च्या शाळांची दिनचर्या महानगरांमधील तारांकित आणि मानांकित शाळांनाही हेवा वाटावा अशी आहे. सकाळी दहा वाजता मुले शाळेत येतात. शाळा परिसरातील सर्व कामे मुलेच करतात. त्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या समित्या नेमण्यात आल्या आहेत. परिसर स्वच्छता केल्यानंतरच वर्ग भरतात. परिसरातील पाना-फुलांची नक्षी शाळेत ठिकठिकाणी काढली जाते. मुले गटागटाने अभ्यास करतात. येथील शाळेच्या भिंतींवर ‘नेहमी खरे बोलावे’ छापाच्या सुविचारांऐवजी अभ्यासक्रमास पूरक माहितीचे तक्ते, आकृत्या, चित्रे, गणिताची सूत्रे, कविता, सामान्यज्ञानाची माहिती असते. भूगोलाचा तास निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली भरलेला दिसतो. तिथे पृथ्वीचा गोल हातात घेऊन मुले त्यावरील खंड, देश आणि महासागरांचे निरीक्षण करतात. गणिताच्या तासाला मुले व्यावहारिक हिशेब करून भागाकार अथवा बेरीज-वजाबाकीचे तंत्र समजून घेतात. दुपारी भोजनगृहात एकत्र जेवतात. त्यानंतर दुपारचे सत्र सुरू होऊन पाच वाजता शाळा सुटते. थोडक्यात, रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनची आठवण यावी, असाच शाळेचा सारा माहोल असतो.
कधीही शाळेत न गेलेल्या मुलांना शाळेची सवय व्हावी या हेतूने ‘ग्राममंगल’ने आदिवासी पाडय़ांवर बालवाडय़ा सुरू केल्या. गाणी, गोष्टी, खेळ, छोटी कोडी, चित्र आदींच्या माध्यमातून त्यांना शाळेविषयी कुतूहल वाटावे असे वातावरण बालवाडय़ांमध्ये असते. इथेच त्यांना त्यांच्या बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे वळविले जाते. शाळेविषयी वाटणारी भीती त्यांच्या मनातून पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न या टप्प्यावर केला जातो. पुढे पहिली-दुसरीच्या वर्गात त्याचा मुलांना खूप फायदा होतो. पहिली-दुसरीच्या मुलांना उपयुक्त असा ‘लिहू या – वाचू या’ हा नऊ पुस्तकांचा संच ‘ग्राममंगल’ने उपलब्ध करून दिला आहे. संस्थेच्या शाळांमधून द्विभाषा समृद्धी प्रकल्प राबविला जातो. या बालवाडय़ांमुळे दुर्गम भागातील मुलांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढते आणि गळतीही रोखली जाते.
सर्वसाधारणपणे मुले शाळेत जाऊनच शिकत असली तरी मुलांची आणि पालकांची तयारी असेल तर त्यांना घरी राहूनही शाळेचा अभ्यास करता येतो. पुण्यात गेली १२ वर्षे हा प्रयोग राबविला जात असून ‘ग्राममंगल’ त्यांना मार्गदर्शन करते. सध्या अशा प्रकारे ७० मुले-मुली शिकत आहेत. शाळेत न जाताही स्वयंअध्ययनाने दहावीची परीक्षा देता येते, हे या प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?
‘ग्राममंगल’चे ऐने येथील केंद्र मुंबईपासून १३० किमी अंतरावर आहे. डहाणूच्या आधी येणाऱ्या वाणगांव स्थानकात उतरावे. येथून ऐने गाव ११ किमीवर आहे. ठाण्याहून भिवंडी-वाडामार्गे बोईसरला आणि तिथून ऐनेला जाते येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sarvakaryeshu sarvada