आषाढी एकादशीसाठी खास उपवासाचे पदार्थ

वरीच्या तांदळाचा पुलाव

साहित्य-

एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप, दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आले, साखर व मीठ चवीनुसार, अर्धा कप दाण्याचा कूट, दहा-बारा बेदाणे, अर्धा कप रताळ्याच्या फोडी, कोथिंबीर, दहा-बारा काजूचे तुकडे

कृती-

वऱ्याचे तांदूळ धुवून ठेवावेत. एका मोठय़ा भांडय़ात तूप गरम करून त्यात जिरे, लवंग, मिरचीचे तुकडे घालावेत. वरी तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. त्यात बटाटय़ाच्या फोडी आणि रताळ्याच्या फोडी घालाव्यात. दाण्याचा कूट, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे.

दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. हे त्या वरीवर घालून छान मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालून छान वाफ द्यावी.

टीप- सुरणाच्या फोडी, रताळ्याच्या फोडी वेगळ्या शिजवून तुपात थोडय़ा परतून शेवटी वऱ्याच्या तांदळात मिसळल्या तरी चालतात.

उपवासाचे गुलाबजाम

साहित्य-

सव्वाशे ग्रॅम हरियाली मावा (गुलाबजामचा मावा), एक टेबलस्पून अरारूटचे पीठ, एक कप साखर, एक कप पाणी, चिमूटभर खायचा सोडा (उपवासाला चालत असेल तर), तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल घेतले तरीही चालेल.

कृती-

माव्यात अरारूटचे पीठ घालून चिमूटभर खायचा सोडा घाला. थोडे दूध घालून मळून घ्या. २०-३० मिनिटं गोळा तसाच ठेवा. नंतर पुन्हा मळून घ्या. छोटे गोळे करून तळून घ्या.

साखरेच्या गरम एकतारी पाकात गार गुलाबजाम टाकावेत. सहा ते सात तासांनी खावे. जमल्यास गुलाबजाम करताना त्यात खडीसाखर घाला आणि मग गुलाबजाम गोल वळा.

सुक्या खोबऱ्याची बर्फी

साहित्य-

दोन कप डेसिकेटेड खोबरं. (हे कोणत्याही किराणा दुकानात मिळतं.), १५० ते २०० ग्रॅम दुधावरची साय किंवा मावा, दोन कप साखर, अर्धा टीस्पून वेलदोडय़ाची पूड, दोन कप दूध.

कृती-

गॅस पेटवा. एका जाड बुडाच्या भांडय़ात दूध घ्या. त्यात नारळाचा सुका कीस (डेसिकेटेड खोबरं) घाला. मग त्यात साय किंवा मावा घाला. चांगले हलवत राहा. थोडे घट्ट झाल्यावर साखर घाला. सतत चांगलं हलवत राहा. घट्ट झाले की त्याचा गोळा तयार होईल. तो ताटात थापून घ्या. गार झाला की त्याच्या वडय़ा पाडा. त्यात वरून वेलची पूड भुरभुरा.

टीप- या खोबऱ्याच्या बर्फीमध्ये दोन कप नारळाच्या किसाला अर्धा कप आंब्याचा रस किंवा मँगो क्रश किंवा अर्धा कप अंजिराचा क्रश घातला तरी सुंदर चव येते. मावा घातला असेल तर फ्रूट क्रश घाला.

उपवासाचा बटाटावडा

साहित्य-

तीन बटाटे, शेंगदाणे तेल किंवा साजूक तूप, एक टीस्पून जिरे, एक टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट,

मीठ चवीनुसार, कोथिंबीर, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा किंवा केळ्याचे पीठ अर्धा कप.

कृती-

बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी करावी. त्यात आलं मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाटा परतून घ्यावा.

वर दिलेले कोणतेही पीठ घेऊन नेहमीसारखे बटाटेवडे तळावेत.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com