News Flash

जैव‘दुर्भिक्ष’!

गेल्या आठवडय़ात संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक जैववैविध्याचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला, तर जागतिक वन्यनिधी या संस्थेचा लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट २०२० प्रकाशित झाला.

जैव‘दुर्भिक्ष’!
मानवाकडून निसर्गावर सुरू असलेल्या अत्याचारांचा पाढाच त्यात वाचलेला आहे.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

पुन्हा एकदा तेच झाले. आता फक्त नावे बदलली. आधी रिया आणि शोविक चर्चेत होते. आता दीपिका, श्रद्धा कपूर, सारा अली खान चर्चेत आल्या. आपले लक्ष त्यावरून हटायला तयार नाही. गेल्या आठवडय़ात संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक जैववैविध्याचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला, तर जागतिक वन्यनिधी या संस्थेचा लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट २०२० प्रकाशित झाला. मानवाकडून निसर्गावर सुरू असलेल्या अत्याचारांचा पाढाच त्यात वाचलेला आहे. मुळात साथरोग आणि जैववैविध्याच्या ऱ्हासाचा असलेला थेट संबंध किंवा जैववैविध्य आणि आपल्या  निरोगी आरोग्याचा असलेला थेट संबंधच आपल्या अद्याप लक्षात आलेला नाही. खरे महासाथीच्या काळात हा मुद्दा अधिक अधोरेखित व्हायला हवा..

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जगभरातील जैववैविध्य राखण्यासाठी २० उद्दिष्टे समोर ठेवली होती आणि २०२० सालापर्यंत ती पूर्ण करण्याची शपथ जगभरातील सर्व देशांनी जपानमध्ये २०१० साली घेतली होती. त्याला ‘ऐची  जैववैविध्य उद्दिष्टे’ असे म्हणतात. त्या २० पैकी एकही उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही. याचा अर्थ जैववैविध्याच्या परीक्षेत संपूर्ण जगच नापास झाले आहे. आणि हेही पहिल्यांदा नव्हे तर सलग दुसऱ्यांदा म्हणजेच सपशेल नापास!

खरे तर सध्याच्या कोविड महासाथीच्या काळात आपल्याला या जैववैविध्य अहवालांचे अनन्यसाधारण महत्त्व लगेचच पटायला हवे. ही महासाथ जगभरात वेगात पसरू लागल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी काही विधाने जारी केली होती. त्यातील एकात स्पष्टपणे म्हटले होते की, जैववैविध्याचा थेट संबंध माणूस आणि प्राण्यांच्या आरोग्याशी जोडलेला आहे एवढेच नव्हे तर ते ज्या परिसरात राहतात तेथील जैववैविध्यावर त्यांची संस्कृती अवलंबून असते. मात्र हे प्रगाढ नातेच आपल्याला लक्षात आलेले नाही. आणि सातत्याने आपण जैववैविध्यावर घालाच घालत सुटलो आहोत. माळरान म्हणजे ओसाड जमीन असे म्हणून आपण तिथे ‘बिगरशेतकी’ जमीन विकासासाठी मोकळी कशी करता येईल हे पाहतो. माळरानावरील पक्षी- कीटक यांचीही एक वेगळी जैविकसाखळी असते, हे आपल्या गावीही नसते. आपल्या दुष्कृत्यांतून आपणच गळ्याभोवतीचा फास आवळत जातो. खरे तर माणसाचे जीवन पाणी, अन्न आणि इंधन यावर अवलंबून आहे. यातील प्रत्येक गोष्ट निसर्गातूनच येते आणि जैववैविध्याशी त्याचा थेट संबंध आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे  म्हणणे किमान या महासाथीच्या काळात तरी आपल्यापैकी प्रत्येकाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज संपूर्ण जगभरातील ६० टक्क्यांहून अधिक जनता त्यांना कोणताही विकार झाल्यानंतर प्रथम निसर्गोपचारांचा, त्या त्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक औषधांचा वापर करते. ही औषधे म्हणजे निसर्गातील जडीबुटी असतात. शिवाय आज जी रासायनिक औषधे जगभरात निर्माण होतात त्याच्या शोधामागेही जैववैविध्यच असते. आपण विकासाच्या मागे लागून जैववैविध्य नष्ट करतो, त्या वेळेस सध्या असाध्य असलेल्या अनेक रोग- विकारांवर पुढे येऊ घातलेल्या अनेक औषधांच्या शोधाचीच शक्यता आपल्याच हातांनी नष्ट करत असतो! किंबहुना हेही लक्षात घेतले पाहिजे की, या विकार- विषाणूंच्या जन्माला किंवा फोफावण्याला आपण जैववैविध्यावर घातलेला घाला हेच महत्त्वाचे कारण असते. कारण आपल्या त्या कुकृत्याने आपण निसर्गाचा समतोल बिघडवत असतो!

हा प्रवासच आपल्याला आता ‘जैववैविध्या’कडून जैव‘दुर्भिक्षा’च्या दिशेने घेऊन आला आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 7:51 am

Web Title: united nations biodiversity report 2020 mathitartha dd70
Next Stories
1 कंगव्याचे कंगोरे!
2 शिक्षणाची ऐशी.. तैशी!
3 जलमेव चिंता!
Just Now!
X