‘आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. मराठी साहित्यात आईचे मोठेपण वर्णन करणाऱ्या साहित्यकृतींमध्ये ‘श्यामची आई’ ही सर्वश्रेष्ठ आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. सानेगुरुजींच्या सिद्धहस्त सृजनशील लेखणीतून साकारलेली ही साहित्यकृती रसिकवाचकांना अतिशय उत्कटतेने मातृमहिमा सांगून मंत्रमुग्ध करते. ‘श्यामची आई’तून मातृप्रेमाची महन्मंगल गाथा गाणारे साने गुरुजी जणू काही आपल्या विशाल मातृहृदयाने आपल्याशी संवाद साधताहेत, असं वाटतं.

श्यामला त्याच्या आईनं चांगलं राहायला, बोलायला नि ऐकायला शिकवलं, वेळप्रसंगी श्यामवरील अतीव मायेपोटी हाती छडीही धरली. आपल्या पदरानं त्याचे ओले तळवे पुशीत आई म्हणाली, ‘श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!’ किती मोठं तत्त्वज्ञान श्यामबरोबर आपल्यालाही या एका वाक्यातून मिळतं.

सानेगुरुजी म्हणत, ‘आईच्या दुधाची चव काही न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणूनच ते दूध बाळाला बाळसे देते, तजेला देते. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आई-वडिलांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक..खरी शिक्षणदायी ‘आई’च आहे. आई देहही देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारी तीच.’ त्यांनी ‘आई माझा गुरू : आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे.’ असेही म्हणून मातेचा उचित गौरव केला आहे.

राजकवी यशवंतांच्या ‘आई म्हणोनी कोणी’ या गीताइतकी लोकप्रियता अन्य कोणाही मातृविषयक गीताला मिळाली नसेल-

‘चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई

गोठय़ात वासरांना या चाटतात गाई,

वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही

पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई,

नोहेचि हाक माते मारी कुणी कुठारी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’

क्षमाशील वृत्तीने मुलांचा अपराध पोटात घालणारी, संकटाच्या वेळी मुलांवर मायेचा पदर पांघरून मुलांना कुशीत घेणारी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारी आई ही परमेश्वराचेच दुसरे रूप आहे, असेच म्हणावे लागेल.

सुप्रसिद्ध लेखिका गिरिजा कीर आईबद्दल म्हणतात की, ‘आयुष्यभर पुरून उरणाऱ्या या नात्याला क्षणाच्या भावनेत कसं कोंडता येईल? आई- मुलाच्या नात्यातला कुठलाही आनंदाचा अथवा दु:खाचा क्षण हा जन्माच्या क्षणाइतकाच उत्कट असतो. जन्मानंतर नात्याचे हे भावबंध अधिकाधिक दृढ होत जातात. म्हणूनच जन्म देण्यावेळची भावना ही क्षणिक असते. पण मातृत्वातली उत्कटता मात्र चिरकालाची असते.’

आईचे मोठेपण सांगताना प्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर म्हणतात, ‘‘माझ्या जीवनात मी आईला परमेश्वराचे स्थान देतो. आई या शब्दातील ‘आ’ म्हणजे आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’. आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजे ‘आई’

‘माधुर्याचा सागर

पावित्र्याचे आगर,

फुलाची कोमलता

गंगेची निर्मलता,

चंद्राची रमणीयता

सागराची अनंतता!’

या ओळी आईचा महिमा यथार्थपणे सांगून जातात. ‘पृथ्वीची क्षमता आणि पाण्याची रसता’ पाहावयाची असेल, तर ती ‘आई’ जवळच आहे. ‘आई’ हेच वात्सल्याचे धन. सगळ्याच रसाची अमृतवेली ‘आई’. ‘आई’ नावाच्या अमृतवेलीवर सदाबहार फुले फुलतात. आपल्याला लहानपण पुन्हा हवे असते. कारण आईच्या कुशीत झोपायला मिळते आणि आई आपल्या हाताने बालकाला अमृतमय घास भरवते. म्हणूनच पृथ्वीच्या पाठीवर शाश्वत टिकणारे प्रेमाचे आणि मायेचे एकमेव नाव म्हणजे ‘आई!’

विनोबा भावेंसारखे थोर देशभक्त ‘स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या सुखाचा विचार आधी करावा,’ ही गोष्ट आपल्या आईकडूनच शिकले. ते म्हणतात, की ‘आईची पूजा म्हणजे वत्सलतेने उभ्या राहिलेल्या परमेश्वराची पूजा. माऊली म्हणजे निस्सीम सेवेची मूर्ती. आईच्या शब्दाहून उंच शब्द नाही.’

राष्ट्रपिता महात्मा गांधीसारख्या थोर नेत्यांनीही ‘आपल्याला आपल्या आईनेच घडविले,’ असे सांगितले आहे. लहानपणी ‘सत्याचे महत्त्व आईने बापूजींच्या मनावर ठसविले,’ म्हणून तर त्यांनी पुढील आयुष्यात सत्याचा आग्रह धरला. आपल्या बालपणातील हकिकती सांगताना ‘अपंगशाहीचे पंतप्रधान’ बाबा आमटे म्हणतात, ‘आई एक उत्तम शिक्षिका असते. तीच आपले सर्वस्व घडविते.’

आईचे महत्त्व सांगताना प्रसिद्ध लेखिका सरोजिनी बाबर यांनी म्हटले आहे, की ‘माय म्हणजे शुद्ध गंगेचे उदक! तिच्या मायेची शाल अंगावर घेताना किती प्रसन्न वाटतं!’ आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकार ग. दि. माडगूळकरांनी आपल्या ‘मातृवंदना’नामक ‘मातेचे महन्मंगल स्तोत्र’च शोभेल, अशा सुरेख गीतात म्हटले आहे की-

‘दिला जन्म तू विश्व हे दाविलेस

किती कष्ट माये सुखे साहिलेस,

जिण्यालागी आकार माझ्या दिलास,

तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!’

मराठी लोककला आणि लोकगीतांवर आधारित ‘रानजाई’ या दूरदर्शन मालिकेच्या शीर्षकगीतावर ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके ‘मराठी’सच आई मानून म्हणतात-

‘माय मराठी माऊली

आभाळाची तू सावली,

गंगा आली ग अंगणी

तुझ्या पावलामधून..’

आई आणि परमेश्वर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे कवी म. भा. चव्हाण सांगतात-

‘आई नावाची वाटते

देवालाही नवलाई,

विठ्ठलही पंढरीचा

म्हणे स्वत:ला विठाई!’

कारण महाराष्ट्रातील सर्व वारकरी सांप्रदायिक पंढरीच्या विठ्ठलालाच ‘माऊली’ मानतात. साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ या पुस्तकाद्वारे आईचा महिमा सांगितला. म्हणूनच आपण त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राची गुरुमाऊली’ म्हणतो.

खान्देशमाऊली बहिणाबाई चौधरी आई आणि आत्या यांच्या नात्यातील अंतराचा फरक दाखविताना म्हणतात की-

‘माय म्हणता म्हणता

ओठाला ग ओठ भिडे,

आत्या म्हणता म्हणता

किती अंतर हे पडे!’

आपल्या चिल्यापिल्यांसाठी अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या आईचा महिमा सांगताना बहिणाबाईंनीच आपल्या ‘खोप्यामधी खोपा’ या कवितेत म्हटलं आहे की-

‘अरे खोप्यामधील खोपा

सुगरणीचा चांगला,

देखा पिलासाठी तिनं

झोका झाडाले टांगला।’

आईचं असंच यथार्थ वर्णन करणारी कविवर्य फ. मुं. शिंदे यांची ‘आई’ ही कविता अशीच बोलकी असल्याने मनाला मोहवून टाकते-

‘आई खरंच काय असते?

लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगडय़ाचा पाय असते!

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही, उरतही नाही!’

आई आपल्या सानुल्याला झोपी लावताना रामकृष्णाच्या, शिवाजीच्या गोष्टी सांगत असते. जेणेकरून या महापुरुषांचे आदर्श आपल्याला सोनुल्याने घ्यावे, हीच तिची धडपड असते. असा संदर्भ देणारी कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता म्हणते-

‘ठेच कान्हूला लागली

यशोदेच्या डोळा पाणी

राम ठुमकत चाले

कौसल्येच्या गळा पाणी,

देव झाला तान्हुला ग

कुशीत तू घ्याया,

तिथे आहेस तू आई

जिथे आहे माया!!’

आईचे निधन ही जगातली सर्वात मोठी दु:खद घटना असते. तिच्या निधनाने जणू काही शरीरातील एक महत्त्वाचा अवयव निघून गेल्याचे सतत जाणवत राहते. तिच्या सहवासातल्या एकेक आठवणी मनात येत राहतात. कविश्रेष्ठ ग्रेस आपल्या आईच्या निधनानंतर लिहिलेल्या उत्कटता दाखविणाऱ्या कवितेत म्हणतात-

‘ती आई होती म्हणूनी

घनव्याकूळ मीही रडलो,

त्यावेळी वारा सावध

पाचोळा उडवीत होता,

ती गेली तेव्हा रिमझिम

पाऊस निनादत होता!’

म्हणूनच इंद्राची सत्ता, कुबेराची संपत्ती, सारं काही एका ‘आई’पुढे तुच्छ आहे. म्हणूनच ‘मायेविन दैवत नाही दुजे’ असं म्हटलं जातं.

गीतकार प्रा. प्रवीण दवणे ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा गौरव करताना म्हणतात, की ‘‘जगातल्या साऱ्या आया जर श्यामची आई झाल्या, तर वृत्तपत्राची पहिली पानं बदलून जातील. संघर्ष, अमानुषता नाहीशी होऊन ज्या जगात आपण ‘विश्वाचे नागरिक’ असू, अशी विश्वात्मक मने तयार होतील. घराघरांतले गुन्हेगारी तंटे मातीत मिळून जातील आणि त्याच मातीतून स्वप्नालाही न सोसणारं, ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ अशा प्रार्थनांचे अंकुर उगवू लागतील. आज साऱ्या जगाला गरज आहे, ती घराघरांतील आई ‘श्यामची आई’ होण्याची!’’

गरीब- श्रीमंत, साक्षर-निरक्षरतेसारख्या कोणत्याही चौकटीत ‘आई’ नावाची व्याख्या अडकत नाही. असा आशय मांडणारी कवी हेमराज बागूल यांची कविता उत्कटतेने म्हणते-

‘माय म्हणजे एक मोठी ऊब

पोराला कवटाळणारा तिचा फाटका पदर

अडवू शकतो जगातील कोणतीही हिमलाट!

माय पुस्तकी अनपढ असली तरी

ती असते अनुभवांची अधिष्ठाता

संस्कारांची कुलगुरू नि स्वयंभू मुक्त विद्यापीठही!’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आई’च्या मोठेपणाची गाथा ‘स्मृती’ या ग्रंथातही वर्णन केलेली आहे. ‘सहस्त्रतु पितृन, माता गौरवेणातिरिच्यते!’ सहस्त्र पित्यांहून, सहस्त्र आचार्याहून मातेचे श्रेष्ठत्व अधिक असल्याची ग्वाहीच ‘स्मृती’ने दिलेली असल्याने, माणसाच्या आयुष्यातलं ‘आई’ हे अमूल्य नातं आहे. म्हणतात ना, ‘बाळाला कुशीत घेण्याची ओढ, ती हुरहुर ‘आई’ शिवाय कुणाला कधी कळली का?’  (संकलित.)
रवींद्र मालुंजकर – response.lokprabha@expressindia.com