रायआवळा सरबत
साहित्य : आवळा गर एक वाटी, मीठ, साखर दोन वाटी
कृती : आवळा गर तयार करून घेणे. साखरेत थोडे पाणी घालून साखर विरघळून घेणे. नंतर त्यात आवळा गर घालून संधव व मीठ घालणे व उकळणे. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवणे. सरबत पिण्यास देते वेळी दोन चमचे वरील गर घेऊन एक ग्लास पाण्यात सरबत बनवावे.
रायआवळा कढी
साहित्य : रायआवळे १ वाटी, बेसन १ चमचा, कांदा १, हिरवी मिरची १, गूळ चवीप्रमाणे, फोडणीसाठी- जिरे, तूप, जिरे, मोहरी, मेथी दाणे, हळद, हिंग, चवीप्रमाणे मीठ.
कृती : सर्वप्रथम रायआवळे उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर सर्व बिया काढून टाकाव्या. गर तयार होईल. मिक्सरमध्ये कांदा, जिरे, मिरची वाटून घ्यावी. भांडय़ात तूप गरम करून त्यात मोहरी, मेथीदाणे, जिरे, िहग, हळद, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. त्यात वाटण घालून परतावे. त्यात तीन ग्लास पाणी घालावे. अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामधे बेसन कालवावे. ते मिश्रण भांडय़ात घालावे. चवीप्रमाणे गूळ व मीठ घालून एक उकळी आणावी.
रायआवळा आंबट-गोड लोणचे
साहित्य : आवळे एक वाटी, गूळ, मोहरी, मेथी, हळद, िहग, तिखट, तेल, सुक्या लाल मिरच्या दोन, मीठ.
कृती : एका भांडय़ात थोडे तेल घालून गरम करत ठेवणे. तेल गरम करून त्यात मोहरी तडतडल्यावर मेथी, हळद, िहग, मिरच्या व आवळे घालावेत. थोडे पाणी घालून शिजवावे. चवीनुसार मीठ व गूळ घालून शिजवणे. त्यात लालमिरची पावडर घालून ढवळून घेणे. आंबट गोड तिखट लोणचे तयार होईल.
रायआवळा जॅम
साहित्य : रायआवळे गर एक वाटी, साखर दोन वाटी,
कृती : आवळा गर आणि साखर एकत्र करून शिजत ठेवावे. साखर विरघळून घट्ट पाक झाल्यावर गॅस बंद करावा. याप्रमाणे इतर सर्व फळांचा जॅम होऊ शकतो.
रायआवळा लोणचे (तिखट)
साहित्य : आवळे एक वाटी, लोणच्याचा मसाला, मीठ, तेल.
कृती : आवळे धुवून पुसून घ्यावेत. बाऊलमध्ये आवळे घेऊन त्यात मसाला, मीठ घालून एकत्र कालवून घ्यावा. बरणीत खाली मीठ घालून घेणे. मग आवळे घालावेत. वर तेलाची फोडणी गार करून घालावी. एकत्र छान कालवावे. वर थोडे मीठ पसरावे.
शुभांगी संजीव फडके – response.lokprabha@expressindia.com