01-vachak-lekhakमी अहमदाबादची. माझे वय साधारण आठ-नऊ वर्षांचे असेल त्या वेळची थोडी अस्पष्ट आठवण. आमची फॅमिली पिकनिक त्या वेळेस दुधेश्वरला गेली होती. सहलीत इतर मोठी मंडळी वनभोजनाच्या तयारीत गुंतली असता मी व माझी मोठी ताई सहलीच्या आनंदात हुंदडत इतर जणांपासून किती दूर गेलो कळलेच नाही. पाहतो तर समोर स्मशान! स्मशानात एक प्रेत जळतंय. आम्ही दोघी पार घाबरलो. सगळीकडे भयाण शांतता! माझ्या बालमनात मरणाच्या भीतीने काहीबाही कल्पना येऊन गेल्या. मृत्यूच्या विचाराने मनावर प्रचंड ताण आला. मन अगदी व्याकूळ होऊन गेलं. तेवढय़ात ताईला दूरवर बंगलेवजा घरे दिसली. ती पटकन मला म्हणाली, ‘‘चल चल, आपण तिकडे जाऊ.’’ त्या घाबरलेल्या अवस्थेत आम्ही दोघी झपाझप पावले टाकीत घरांच्या दिशेने निघालो. चालत असताना त्याच दिशेने गाण्याचे सूर ऐकू आले. आणखी जरा घरांजवळ गेल्यावर सूर व शब्द कानावर पडले आणि मनाला एकदम दिलासा मिळाला. दडपण, भीती जरा कमी झाली, पण ते गाण्याचे सूर, संगीत माझ्या कानांत आणि मनांत पक्के जाऊन बसले.

त्यानंतर साधारण दोन-तीन वर्षांनी आमच्या घराजवळ असलेल्या बंगाली क्लबमध्ये, नवरात्री उत्सवात राज कपूरचा ‘अनाडी’ पिक्चर पाहायचा योग आला. त्यात राज कपूरचे ‘किसी की मुस्कराहटों पे हो निसार’ हे गाणे सुरू झाले आणि वाटले हेच ते गाणे ज्याने सहलीच्या त्या प्रसंगात माझा मूड क्षणार्धात बदलून टाकला होता. गाणे पाहताना राज कपूरचे ते विशिष्ट चालणे, तो चणेवाला आणि परिचयाची वरळी-चौपाटी (माझे आजोळ मुंबई वरळीचे) खूप आनंदाने मन थुई थुई नाचू लागले जणू आणि गाणे मनाच्या कप्प्यात कायमचे घर करून बसले.

त्यानंतर कॉलेजला असताना मैत्रिणीसमवेत मॅटिनीला ‘अनाडी’ पाहिला आणि आवडलेले गाणे खऱ्या अर्थाने कळले. जीवनाचे किती मोठे तत्त्वज्ञान किती सोप्या शब्दांत गीतकार शैलेन्द्रने सांगितलंय. दुसऱ्याच्या आनंदाने मन आनंदून जाणे, दुसऱ्याचे दु:ख आपले समजून कल्पनेने त्यात सहभागी होऊन त्यांचे दु:ख कमी करणे आणि स्वत:बरोबर दुसऱ्यावरही प्रेम करणे, याचेच तर नाव ‘जीवन’. हेच तर जगणे. किती सोप्पं आणि किती खरं! चांगला माणूस बनण्याच्या प्रक्रियेतली पहिली अगदी सोप्पी पायरी! मला खूप खूप आवडतं हे गाणं, गाण्याचा अर्थ, शंकर-जयकिशनचे संगीत आणि मुकेशचा आवाज. सगळं खूप छान! ते माझ्या मनात कायमचं असतं. कारण ते गाणं अप्रतिम तर आहेच पण जेव्हा कधी मी ते ऐकते तेव्हा माझ्या बालपणीच्या रम्यकाळात, माझ्या गतस्मृतीत मी फेरफटका मारून येते आणि मन आनंदून जाते.

हिंदी सिनेमासंगीताचा सुवर्णकाळ म्हणजे साधारण १९५० ते १९७० पर्यंतचा काळ. या काळातील जुनी गाणी ऐकणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव असतो. इतर लाखो लोकांप्रमाणे मीसुद्धा लताबाईंची भक्त आहे. गाण्यातले मला काहीही कळत नाही, परंतु गाणी ऐकणे हा माझा नाद आहे. जो मला अतिशय आनंद देतो. विशेषत: जेव्हा मन अगदी उदास विषण्ण असते तेव्हा जुनी गाणी ऐकणे म्हणजे भूल देऊन घेऊन मन शांत करण्यासारखे असते. मदन मोहन यांचे संगीत असलेली आणि लताबाईंनी गायलेली गाणी ऐकणे म्हणजे अधिकच सुखकारक अनुभव! लताबाईंची त्या काळातील वेगवेगळय़ा संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली जुनी गाणी म्हणजे मोरपिसाऱ्यातले एक एक पीस, जणू हळुवारपणे मनावर फिरणारे.

‘वो कौन थी’ सिनेमातील ‘लग जा गले’ हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक, मदनमोहनचे संगीत आणि बाईंचा स्वर्गीय आवाज. गाणे अगदी हृदयाला भिडते. आज आलेला मोहाचा क्षण आयुष्यात पुन्हा कदाचित येणार नाही. आलेल्या क्षणाकडे पाठ फिरवू नकोस म्हणून आर्ततेने प्रियकराला विनवणारी प्रेयसी. अप्रतिम गाणे! अशी कितीतरी असंख्य जुनी गाणी जी मनाला आनंद देणारी. ज्या गाण्यांनी कठीण प्रसंगी दु:खाच्या प्रसंगी मन शांत करून माझं मन रिझवलं आहे.

एकटेपणात, आत्मकोशात रमणाऱ्यांना गाणी ऐकणे, विशेषत: जुनी गाणी ऐकणे म्हणजे एकान्तवासाचे ‘वैभव’ अनुभवण्यासारखे. शिवाय जुनी गाणी ऐकणे म्हणजे गाण्याच्या आनंदाबरोबर स्मृतिरंजनाचाही आनंद असा दुहेरी आनंद आपण अनुभवत असतो.

‘वो कौन थी’ सिनेमातील कुठलेही गाणे कानावर आले की माझं मला हळूच हसायला येतं. कारणही तसं मजेशीर. सिनेमा प्रौढांसाठी असल्यामुळे बारा-तेरा वर्षांची मी साडी नेसून (मोठी दिसण्यासाठी) माझ्या मामा, मावशांबरोबर सिनेमा पाहण्यासाठी गेले होते आणि डोअर कीपरने ‘साडी पहनी है, फिर भी बडम्ी नहीं लगती, चलो घर जाओ’ म्हणत मला सिनेमागृहात जाऊ दिले नाही.

तेव्हा तशीच अपमानित रडवेली होऊन मी थिएटरपासून चालत घरी गेले. अर्थात मामाचं घर थिएटरपासून फार दूर नव्हते, पण ढगळपघळ ब्लाऊज आणि तशीच विचित्र साडी नेसलेले माझं ते ‘ध्यान’ डोळय़ासमोर आले की आता मात्र हसायला येतं, गंमत वाटते.

तर अशी ही जुनी गाणी, त्यांच्या शब्द, संगीत माधुर्याने आपल्याला भावतातच, पण त्याचबरोबर ती आपल्याला भूतकाळामध्ये घेऊन जातात आणि अगदी चार लोकांच्या संगतीतही आपला गतकाळ, स्मृती अगदी फक्त आपल्याच समोर दाखवून एक वेगळाच आनंद देतात.