vachak-lekhakपदवी, मग पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून मी व्यवहारी जगाच्या जंजाळात असा काही गुरफटलो गेलो की कधी काळी आपण मराठी पुस्तकांवर तुटून पडायचो, कवितांच्या भावविश्वात हरवून जायचो याचीही आठवण राहिनाशी झाली. खातेकुंडली मांडून घ्यायला येणाऱ्या गब्बर व्यापाऱ्यांनी लाखो-करोडो रुपयांच्या आकडय़ांत खेळायचं आणि फक्त त्यांचे ते ‘आकडे मोडून’ आपण खायचे एवढंच हाती राहिलं.

खरं सांगतो, या विचारानं येणारी मरगळ झटकायला फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझ्या संग्रही असलेल्या काही मोरपिसांपैकी एक मोरपीस काढून पुन्हा पुन्हा बघणं. ‘नाच रे मोरा’सारखं कायम टवटवीत असलेलं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व ‘पु.ल.देशपांडे’ यांचं मला आलेलं पत्र. पु.लं.ना मी पत्र पाठवलं होतं ते वाढदिवसाच्या शुभेच्छांचं, १९७९ सालचं ८ नोव्हेंबरचं निमित्त साधून. पण त्या शुभेच्छांमध्ये मी भागीदार केलं होतं ‘बटाटय़ाच्या चाळी’ला. चाळीचे सांस्कृतिक सचिव रघुनाना सोमण यांनी ‘बटाटय़ाच्या चाळी’नं पु.लं.चा वाढदिवस कसा साजरा केला याचा सारा कार्यक्रम पु.लं.च्याच शैलीत पत्राद्वारे कळवल्याची ती कल्पना होती. त्यासाठी बटाटय़ाच्या चाळीचं नीट वाचन करून त्यातली पात्रं वापरून तयार केलेलं ते पत्र (लहान तोंडी मोठा घासच होता तो कॉलेजच्या पहिल्या वर्षांतला) पाठवलं होतं माझ्या शुभेच्छापत्राबरोबरच.

‘बटाटय़ाच्या चाळी’च्या त्या पत्रातले मुद्दे अजूनही आपण किती आगाऊ पणा केला होता या विचारानं हैराण करतात.

भ्रमणमंडळ पुण्याला गेलं, पण प्रेमाचं प्रतीक म्हणून द्यायचा आहेर मात्र चाळीतच राहिल्यानं तसंच परत आलं. गच्ची कुणाची हा प्रश्न आता राहिला नसल्यानं ८ नोव्हेंबरला पु.लं.च्या एकसष्टीचे कार्यक्रम त्या गच्चीवर कसे आणि काय काय साजरे करण्यात आले ते अनुक्रमे दिले. त्याचा सारांश असा-

पहिल्यांदा एकसष्ट बालक-बालिकांनी पु.ल. वंदना सादर केली. मधेमधे चमकून जाणारा आवाज कोचरेकर मास्तरांचा.

बाबूराव खरेंनी शिवाजीची कथा सांगण्याच्या आवेशात पु.लं.बद्दल माहिती सांगितली. या इतिहासकथनाचा परिणाम म्हणून दहा युगुलांनी रजिस्टर्ड मॅरेज करण्याची शपथ घेतली.

नंतर गानकोकिळा वरदाबाई हट्टंगडींनी ‘क्षण आला भाग्याचा’ हे आळवून आळवून म्हटलं. ‘मंगलदिन हा..’ या पंक्तीवर खोळंबून त्यांनी कमालीचं औचित्य दाखवलं.

मग कवयित्री डॉ.सौ. काव्यकलाबाई कोरकेंनी पु.लंच्या गुणगौरवपर कविता सादर केली.

‘‘रे चाळकऱ्यांनो, जमा या क्षणी, शुभ इच्छा द्याया

एकसष्टी पु.लं.चि आज हो, गुणगौरव करुया’’

हे ध्रुपद आळवून आळवून म्हटल्यामुळे पुढील ओळी भराभर आटोपल्या.

चाळीचे परंपरागत संगीतकार एच. मंगेशराव यांनी ‘जियो हजारो साल’ हे पेटीवर वाजवलं. नंतर नाटय़भैरव कुशाभाऊ अक्षीकर यांनी बसवलेलं ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटकही सादर झालं.

त्यावर पडदा पडताच सुवासिनींनी पु.लं.च्या तैलचित्राला ओवाळलं आणि पु.लंच्या जयघोषानं अवघी चाळ दुमदुमून गेली. पण तेव्हढय़ात पु.ल. स्वत: आल्याची अफवा उठली आणि पांगापांग होऊन गच्ची रिकामी झाली. यात राघूनाना पु.लं.ना हे लिहायला विसरले नाहीत की ‘‘आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा धसका चाळकऱ्यांनी घेतलाय असा गैरसमज करून घेऊ नये.’’

कितीतरी चाहत्यांच्या पत्रांमध्ये आपल्या या पत्राला काय प्रतिसाद मिळणार या माझ्या विचारातून भानावर आणलं ते पु.लं.च्या उत्तरानं. इतर अनेक चाहत्यांच्या शुभेच्छांना दिलेल्या छापील ‘धन्यवादा’नंतर पु.लं.नी स्वहस्ताक्षरात पुढे तीन चार वाक्ये लिहिली होती खास माझ्यासाठी, अगदी मोजक्या पण चपखल शब्दांत.

‘‘बटाटय़ाच्या चाळीने केलेल्या माझ्या ‘षष्ठीचे’ वर्णन मस्त आहे. उद्याचा एक फार चांगला विनोदी लेखक मला त्यात दिसला. कॉमर्सचे विद्यार्थी आहात म्हणून सांगतो- विनोदी लेखन अव्यापारेषु व्यापार म्हणून सोडून देऊ नका. लिहीत जा. तुम्हाला हे नक्की जमेल.

तुमचा

पु.ल.देशपांडे.

तीच ती प्रसिद्ध स्वाक्षरी.’’

मला वाटतं गद्यात पु.लं.ना आणि पद्यात ग.दि.मां.ना इतके चपखल शब्द कसे गवसत असतील हे कोडं या जगाच्या अंतापर्यंत तरी सुटणं अशक्य आहे.

तर ते पु.लं.चं आलेलं पत्र कुठे ठेवू अन् कुठे नको असं होऊन गेलं. कॉलेजच्या प्राध्यापकांनी नियतकालिकात माझं आणि पु.लं.चं पत्र छापलं तेव्हा आनंद गगनात मावेना.

पुढे मग साहित्यिक गप्पा, भाषणं यांना जाऊ लागलो. वाचनरंगी रंगू लागलो वगैरे वगैरे. पण पु.लं.ना दिसलेला विनोदी लेखक आकडेमोडीतच हरवून गेला. त्याची खंत टोचत टोचतच उदरनिर्वाहाचा व्यापार चालू राहिला. २००८ मध्ये मात्र थोडीशी उसंत मिळू लागल्यावर लेखणीनं उचल खाल्ली आणि त्यानंतर विनोदी लेख, कथा लिहिल्या गेल्या आणि रविवार पुरवणीत म्हणा किंवा मासिक, दिवाळी अंकात म्हणा, प्रसिद्ध झाल्या. पु.लं.च्या शब्दांचा एक हजारांश तरी आपण मान राखला असेल. या विचारानं मनाची टोचणी थोडीशी कमी झालीय.