सुनील शिरवाडकर – response.lokprabha@expressindia.com
संकलन
दत्तभक्तांच्या मनात नृसिंह सरस्वती, श्री श्रीपाद श्री वल्लभ यांना तसंच पीठापूर आणि कुरवपूर या स्थानांना अपार महत्त्व आहे. दत्तजयंतीनिमित्त या स्थानांविषयी-

अनादी काळापासून महाराष्ट्रात दत्तभक्तीची परंपरा चालत आली आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथात दत्त अवतारातील श्री श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे विस्तृत वर्णन आढळते. पण ज्या प्रमाणात नृसिंह सरस्वतींच्या लीलांचे वर्णन आढळते. तसे श्रीपाद श्री वल्लभांबद्दल क्वचितच आढळते. असे सांगितले जाते की, कृतयुगात महर्षी अत्री आणि अनसूया यांच्या तपश्चय्रेने प्रसन्न होऊन भगवंताने त्रिमूर्तीच्या वेशांत श्री दत्तात्रय अवतार धारण केला. त्यानंतर वेळोवेळी प्रसंगानुरूप दत्तात्रयांनी विविध ठिकाणी, विविध रूपात अवतार घेतले. त्यातील पहिला आद्य अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ.

असे सांगतात की आंध्र प्रदेशात असलेल्या पिठापूर या स्थानी आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत होता. अप्पलराज शर्मा त्याचे नाव. त्याच्या पत्नीला सुमतीला अपत्ये होऊनही ती वाचत नसत. जी दोन अपत्ये वाचली होती त्यातील एक मुलगा अंध होता आणि दुसरा अपंग होता. एका अमावास्येच्या दिवशी घरी श्राद्धाचा कार्यक्रम चालू असताना भगवान दत्तात्रेय त्यांच्या घरी अतिथी रूपाने भिक्षा मागण्यास उभे राहिले. सुमती देवीने त्यांना भिक्षा अर्पण करताच त्यांनी त्रिमूर्तीच्या स्वरूपात दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. सुमती देवीने निरोगी, गुणवान असा पुत्र प्राप्त व्हावा असा वर मागितला. तथास्तु म्हणून दत्तात्रेय अंतर्धान पावले. काही दिवसांनी सुमती देवींना दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती झाली. हाच तो दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. आणि तो दिवस होता भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी. इसवी सन होते १३२०.

लहानपणापासून श्रीपादांच्या बाललीलांनी सर्वाना मोहित केले होते. वयाची सात वष्रे पूर्ण झाली तेंव्हा अप्पलाराज आणि सुमतीदेवी यांनी श्रीपादांच्या मौंजी बंधनाचा कार्यक्रम ठरवला. मौंजीबंधानाच्या कार्यक्रमात भिक्षा देण्याचा आणि वेदांची दीक्षा देण्याचा विधी असतो. दीक्षा दिल्यानंतर लगेचच श्रीपादांनी चारही वेद, त्यांचा मथितार्थ, त्यांची कारणमीमांसा तेथील उपस्थितांना समजावून सांगितली. वयाची १६ वष्रे पूर्ण झाल्यावर श्रीपादांनी घराचा त्याग केला. बद्रिवन, गोकर्ण महाबळेश्वर आदी ठिकाणी संचार करत ते कुरवपूर येथे आले. कुरवपुरात त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केले. अनेकांना त्यांच्याकडून दीक्षा प्राप्त झाली. दर गुरुवारी ते गुरुतत्त्वाबद्दल सविस्तर विवेचन करत. भक्तांच्या व्याधी, अडचणींचे निवारण करत. कुरवपूर येथे १४ वष्रे वास्तव्य करून त्यांनी आपले अवतारकार्य समाप्त केले. तो दिवस होता,आश्विन वद्य त्रयोदशी, अर्थात धनत्रयोदशी. गुरुचरित्र ग्रंथात या घटनेचे वर्णन करताना सरस्वती गंगाधर म्हणतात..

आश्विन वद्य त्रयोदशी
नक्षत्र मृगराज परियेसी
श्रीगुरू बसले निजानंदासी
अदृश्य झाले गंगेत
ल्ल पिठापूरचे महत्त्व

आंध्र प्रदेशात काकिनाडा या बंदराजवळ पिठापूर हे गाव वसलेले आहे. येथेच श्रीपादांचा जन्म झाला. साधारण २००१ साली येथे एक श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान स्थापन झाले. श्रीपादांचा जन्म ज्या घरात झाला, ते घर संस्थानने खरेदी केले व तेथे हे संस्थान स्थापन झाले. आज तेथे एक सुंदर मंदिर उभे आहे. मंदिरात भगवान दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

येथे भेट देण्याऱ्या भाविकांमध्ये मराठी लोकांचा सहभाग लक्षणीय आहे. तसे महाराष्ट्रातील दत्तभक्त विशेषकरून सांगलीजवळील नरसिंहवाडी, तसेच गाणगापूर येथेच जात असतात. भौगोलिकदृष्टय़ा ती तशी जवळची स्थाने. पण पिठापूरला जाण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे.

नाशिकजवळील ित्रबकेश्वर येथे उगम पावणारी गोदावरी नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, ते राजमहेंद्री हे स्थान येथून अगदी जवळ आहे. पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाने येथे येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास उभारले आहे. कोणताही मोबदला न घेता निवास व्यवस्था, चहा, जेवण याची व्यवस्था ते करतात. पण त्यासाठी आधी फोन करून कळवावे लागते. पिठापूर येथे श्रीपादांच्या काळातील काही मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यात अनघालक्ष्मी मंदिर, कुक्कुटेश्वर मंदिर पाहण्यासारखी आहेत.

२००१ साली संस्थानने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकरभट्ट हे श्रीपादांचे समकालीन. श्रीपादांच्या कृपेने त्यांनी हा ग्रंथ लिहिला. संस्कृत भाषेतील या ग्रंथाचा नंतर तेलुगुत अनुवाद झाला. त्याचा मराठीत अनुवाद हैदराबाद येथील हरीभाऊ निटुरकर यांनी केला आहे. हा ग्रंथ ओविबद्ध नसून गोष्टीरूपाने श्रीपादांच्या लीलांचे त्यात वर्णन केलेले आहे. दत्तभक्तांच्या मते या ग्रंथात भविष्यकाळातील काही घटना सूचित करण्यात आल्या आहे. उदाहरणार्थ, हा ग्रंथ श्रीपादांचे मातामह श्री बापन्नावधानलु यांच्या ३३ व्या पिढीत प्रकाशित होईल. सध्या श्री मल्लादी गोिवद दिक्षितलु हे या ३३ व्या पिढीचे वंशज आहे. त्यांनीच हा ग्रंथ संस्थानाकडे सुपूर्द केला आहे.

या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ एके ठिकाणी म्हणतात, मी पुढील अवतार कारंजा येथे घेईन. त्या वेळी माझे नाव नृसिंह सरस्वती असे असेल. तेथून पुढे मी गाणगापूर आणि नंतर कर्दळीवन येथे जाईन. कर्दळीवनात ३०० वष्रे समाधिस्थ राहिन. त्यानंतर प्रज्ञापुरात म्हणजे सध्याच्या अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ नावाने प्रकट होईन.

श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथात अजून एका ठिकाणी म्हणतात, माझे ज्येष्ठ बंधू धर शर्मा महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी म्हणून जन्म घेतील, दुसरे बंधू राम शर्मा हे श्रीधर स्वामी या नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. या ग्रंथात साईबाबा, गाडगेमहाराज यांच्याबद्दलही काही ठिकाणी सूचक उद्गार आहेत. असे सांगितले जाते.(पिठापूर येथे जाण्यासाठी- मुंबई चेन्नई रेल्वे मार्गावर हैदराबाद, गुंटुरच्या पुढे सामलकोट किंवा काकीनाडा स्टेशनवर उतरावे. येथून साधारण पाच कि.मी. अंतरावर पिठापूर गाव आहे.)