– जय पाटील
कॉल केल्यापासून अवघ्या १५ मिनिटांत अॅम्ब्युलन्स दारात हजर होईल, आयसोलेशन वॉर्डमध्ये पाऊलही न टाकता आवश्यक साहित्य रुग्णांपर्यंत पोहोचवता येईल. रेल्वे स्टेशन, मॉलसारख्या भर गर्दीच्या ठिकाणीही तापाचा रुग्ण ओळखता येईल आणि हॉटस्पॉटमधल्या रुग्णांवर दुरूनही नजर ठेवता येईल. आयआयटी बॉम्बेच्या स्टार्टअप कंपन्यांनी करोनाशी दोन हात करण्यासाठी अशी विविध तंत्र विकसित केली आहेत.
‘हेल्प नाऊ’ या स्टार्ट-अप टीमने ‘मेडकॅब्ज’ हे अॅप विकसित केलं असून त्याद्वारे आजवर नऊ हजार रुग्णांना कॉल केल्यापासून अवघ्या १५ मिनिटांत सेवा दिली आहे. त्यासाठी अॅम्ब्युलन्स आणि उबर चालकांना प्रशिक्षण आणि आवश्यक सुरक्षा साधनंही उपलब्ध करुन दिली आहेत. अशी ३०० वाहनं सध्या मुंबईत २४ तास सेवा देत आहेत. कोविड – १९ च्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर असलेली अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘जॅन यू टेक्नॉलॉजीज’ या स्टार्टअपने वाय-फायच्या साहाय्याने चालवता येणारी रोबोटिक स्मार्ट ट्रॉली तयार केली आहे. या ट्रॉलीवरील टॅबलेट स्क्रीनद्वारे डॉक्टर्स कोविड – १९ ग्रस्तांच्या वॉर्डमध्ये न जाताही त्यांच्याशी लाइव्ह संवाद साधू शकतात. शिवाय या ट्रॉलीच्या साहाय्याने कपडे, जेवण आणि औषधंही रुग्णांच्या बेडपर्यंत पोहोचवता येतात. त्यांनी हे तंत्र घातक उद्योगांसाठी विकसित केलं होतं, आता करोनाकाळात त्यात काही बदल करून सेवा देण्यात येत आहे.
‘फाल्कन लॅब्ज’ आणि ‘ऑगल एआय’ या दोन कंपन्यांनी गर्दीतला तापाचा रुग्ण ओळखण्याचं तंत्र विकसित केलं आहे. त्यांच्या फेशियल रेकग्निशन तंत्राशी हे तंत्र जोडून सेवा देण्यात येणार आहे. विलगिकरण क्षेत्रांवर नजर ठेवण्यासाठी, ड्रोनवर आधारित तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केलं आहे.
करोनाकाळात गर्भवती आणि नवजात बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लहान-मोठ्या शंकांसाठी डॉक्टरांकडे जाता येत नाही आणि चिंता वाढत राहतात. दुर्गम भागांत तर हा प्रश्न अधिक गंभीर आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘केअरएनएक्स’ने एक अॅप विकिसत केलं आहे. त्याद्वारे व्हिडिओ सिरिज आणि वेबिनारच्या माध्यमातून स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ मार्गदर्शन करताता. सुमारे १० हजार नर्सेसही या अॅपचा वापर करून रुग्णांना साहाय्य करत आहेत. आरोग्यक्षेत्रासमोर उभं ठाकलेलं आव्हान पेलण्यासाठी आयआयटीने तंत्रज्ञानाचा हात पुढे केला आहे.