पुण्यातील चिंचवड येथील मोरया गोसावी हे प्रसिद्ध देवस्थान आहे. हे देवस्थान नेमके कधी अस्तित्वात आले हे स्पष्ट करतील अशी कागदपत्रे उपलब्ध नाहीत. या पीठाचे मूळ पुरुष मोरया गोसावी होते. त्यांनी मार्गशीर्ष वद्य षष्टी शके १४८३ (इ. स. १५६१)ला समाधी घेतली. त्या समाधीच्या ठिकाणीच प्रसिद्ध मोरया गोसावी गणपती देवस्थान आज उभे आहे. मोरया गोसावी यांचे नातू, म्हणजे चिंतामणी यांचे पुत्र नारायणदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हयात होते असे आढळून येते. याचाच अर्थ हे देवस्थान महाराष्ट्रातील शतकपूर्ती झालेल्या देवस्थानांमध्ये अग्रणी आहे.
मोरया गोसावी हे मूळचे मोरगाव येथे वास्तव्यास होते. त्यांनी थेऊर येथे चिंतामणीची घोर तपश्चर्या केली. त्यांना चिंतामणी प्रसन्न झाल्याने अष्ट सिद्धी प्राप्त झाल्या, असे सांगितले जाते. थेऊरहून पुन्हा मोरगावला येवून त्यांनी गोरगरीब, दीनदुबळे यांच्या संकट निवरणाचे कार्य हाती घेतले. पण या जनसेवेमुळे ध्यानधारणेला वेळ मिळेनासा झाला. म्हणून ते चिंचवडनजीकच्या किवजाई जंगलात आले. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते मोरगावला जात. चतुर्थीला मोरयाची पूजा करून पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत असत. हळूहळू चिंचवडचा पसारा वाढत गेला.
त्यांच्या समाधीनंतर त्यांचे पुत्र चिंतामणी यांनी या समाधीवर सिद्धीबुद्धीसहित मोरयाची मूर्ती स्थापन केली. हेच आजचे मोरया गोसावी गणपती देवस्थान होय. या देवस्थानाच्या परिसरात देऊळवाडा (मंगलपूर्ती वाडा) आहे. तेथेही एक गणेश मूर्ती आहे.
असे सांगितले जाते की शके १४११ (इ. स. १४८९) मध्ये नेहमीप्रमाणे मोरगावला वारीसाठी गेले असता मोरगावच्या मयूरेश्वराने मोरयांना दृष्टांत दिला ‘‘आता तू वृद्ध झालास. वारीस येताना तुझे फार हाल होतात. ते मला पाहवत नाही. पुढे तू वारीला येऊ नकोस. मी चिंचवडला येतो.’’ दुसऱ्या दिवशी नदीतील तिसऱ्या अध्र्याच्या वेळी त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाचा तांदळा आला. ती मूर्ती त्यांनी देऊळवाडय़ात आणून प्राणप्रतिष्ठा केली.
मोरया गोसावी देवस्थान पवना नदीकाठी आहे. चिंतामणी महाराजांनी श्रीमोरया गोसावींच्या समाधीच्या डोक्यावर येईल अशी जागा पाहून गुंफेच्या वर सिद्धीबुद्धीसह गणेशमूर्तीचे मंदिर उभारले आहे. हे मंदिर २७ ऑक्टोबर १६५८ ते १३ जून १६५९ या काळात पूर्ण झाले. या मंदिराचे बांधकाम दगडातील आहे. मोरया गोसावी यांच्या समाधीच्या समोरच श्रीचिंतामणी महाराजांची समाधी खोल गुंफेत आहे. त्या जागेवरही एक द्विभुज गणेश मूर्ती आहे. चिंतामणी महाराजांच्या देवळातून बघितले तर मोरया गोसावींच्या समाधीवरील गणपतीचे दर्शन व्हावे अशी रचना आहे.
मोरया गोसावी यांच्या सात पिढय़ांतील सत्पुरुषांच्या सात समाध्या मंदिर परिसरात आहेत. याच परिसरात श्रीकोठेश्वर नावाची जुनी उत्तराभिमुख मूर्ती आहे. शेजारी शमीचे झाड व प्रशस्त सभा मंडप आहे. सभा मंडपाचे लाकूडकाम देखणे आहे. हंडय़ा-झुंबरे आहेत. उत्सवातील सर्व कार्यक्रम देऊळवाडय़ात होतात. देऊळवाडय़ातील मूर्ती वर्षांतून एकदा मोरगावला नेण्याची प्रथा आहे.
देवस्थानाशेजारील पवना नदीवर सुबक घाटही आहे. देवस्थानाकडून थेऊर, सिद्धटेक व मोरगाव देवस्थानांची व्यवस्था पाहिली जाते. आटोपशीर अशा या परिसरात तुळशी वृंदावन, दिपमाळ अशी स्थापत्य वास्तूंची उभारणीही केलेली आहे.
मोरया गोसावी देवस्थानाला छत्रपती महाराजांच्या काळापासून पेशवेकाळापर्यंत अनेक सनदा प्राप्त झाल्या होत्या.
बदलापूरचा महागणपती
संकेत सबनीस
गणेशोत्सव व बदलापूर या मुंबईच्या पूर्वेकडील उपनगराचे फार जुने नाते असून येथील मूळच्या ‘बदलापूर गावी’तील जुने ‘महागणपती मंदिर’ ही या उपनगराची विशेष ओळख. बदलापूर पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर बदलपूर गावाच्या मधोमध हे मंदिर असून ते जवळपास तीनशे ते साडे-तीनशे वर्षे जुने असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मात्र, मंदिराच्या स्थापनेची माहिती उपलब्ध नाही. तरीही या मंदिराच्या स्थापनेनंतरच बदलापूरात सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांची सुरूवात झाल्याचे शहराच्या इतिहासावर नजर टाकल्यावर दिसून येते.
बदलापूर गावात शिवाजी महाराज घोडे बदलायचे ही आख्यायिका असल्याने अनेकांच्या कुतूहलाचा विषय हे गाव ठरले. परंतु तिच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह आहे. परंतु याच आख्यायिकेतून येथील महागणपती मंदिराच्या निर्मितीमागची काही कारणे पुढे आली. बदलापूर गावात पूर्वी घोडय़ांच्या पागा होत्या व तेथूनच हे घोडे बदलले जात. शिवकाळात साधारण १६७० च्या सुमारास पेशवे बाळाजी विश्वनाथ असेच घोडे बदलण्यासाठी आले असता त्यांनी बदलापूर गावाला भेट दिल्यानंतर येथे गणपतीचे मंदिर बांधण्याचे सूचवल्याचे येथील जुने ग्रामस्थ सांगतात. त्यावेळी पेशव्यांकडून मंदिरास दिवा-बत्तीला दोन होन व तीर्थ प्रसादासह अध्यात्मिक कार्यक्रमांसाठी मंदिरास सात एकर जमीन दिल्याची इतिहासात नोंद आहे. सरकार दरबारी त्याचा उल्लेख असून देवस्थान समितीकडे त्याची तत्कालिन सनदही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ब्रिटीश सरकार कडूनही सांज-वातीकरिता ७० वर्षांपूर्वी सहा रूपये वर्षांसन मिळत होते. असे देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाश पांडे सांगतात. मंदिराची देखभाल व पूजा-अर्चा याकरीता पेशव्यांनी अलिबाग जवळील चरी गावातून भिक्षुक रघुनाथ लवाटे यांस आणले त्यांची दहावी पिढी आज गावात आहे.
पूर्वीचे देऊळ
पूर्वी हे देऊळ लाकडी बांधणीचे सर्वसामान्य कोकणी घरासारखे होते. मंदिर कौलारू व पूर्वाभिमुख, समोर दीपमाळ व दर्शनी दरवाजासह आणि तिन्ही बाजूंनी मंदिराच्या दक्षिणोत्तर भागांना जोडणारा कट्टा येथे होता. मंदिराच्या दर्शनी भागास विटांच्या िभतीवजा लोखंडी गजांच्या मोठाल्या चौकटी होत्या. त्यामुळे रस्त्यावरूनच दर्शन होत असे. मंदिरात प्रवेश करताच एक मोठी पंचधातूची घंटा नजरेस पडते. गाभाऱ्याचे जोते चिरेबंदी तर विटांच्या मजबूत िभती होत्या. गाभाऱ्यात दोन-अडीच फूट उंचीची गणपतीची जुनी मूर्ती आहे. ही मूर्ती भीमाशंकर येथून पालखीतून बदलापूर गावात आणल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराच्या नूतनीकरणापूर्वी देवस्थानाच्या उत्तरेकडील बाजूस प. पू. रामकृष्ण परमहंस स्वामींची संजिवन समाधी होती. १९१६ त्यांनी ही समाधी घेतली असून ही समाधी सध्या नव्याने उभारलेल्या गणेश मंदिरात सामावलेली आहे.
पुण्याचा मद्रासी गणपती
नितीन भिंगारकर
पुण्यातील रास्ता पेठेतील अपोलो चित्रपटगृहाकडून केइएम हॉस्पिटलकडे जाताना चित्रपटगृहासमोरच उजव्या हाताला एक रस्ता जातो किंवा सिटी पोष्टाकडून लक्ष्मी रोडने अल्पना चित्रपटगृहाच्या पुढे डाव्या हाताला जो रस्ता जातो तो चांदतारा मशिदीवरून ताराचंद हॉस्पिटलच्या मागच्या बाजूने थेट अपोलो चित्रपटगृहासमोर जातो. त्या रस्त्यावर घ. नं. १४ येथे एक गणपती मंदिर आहे. हा गणपती ‘मद्रासी गणपती’ या नावाने ओळखला जातो. मंदिर देवस्थानची सर्व व्यवस्था दाक्षिणात्याच्या हातात असून ते हरिहर भजन समाज या नावाने कार्यरत आहे.
या मंदिराबाबत सांगितले जाते की, पेशव्यांचे एक दरबारी सरदार रास्ते यांच्या दिवाणाला दृष्टांत झाला व गणपतीने स्वप्नात येऊन सांगितले की, सदर ठिकाणी ‘मी झाडाखाली आहे, मला बाहेर काढ.’ त्यानुसार त्या ठिकाणी सापडली ती हीच मूर्ती आहे.
१९५२ मध्ये काही भजनप्रेमींनी रामचंद्रराव नायडू यांच्या घरी ‘भजन समाज’ या नावाची संस्था स्थापन केली. सुमारे दहा वर्षे या भजनप्रेमींनी शनिवारी व एकादशीला भजन प्रसंगानुरूप कीर्तन वगैरे कार्यक्रम केले. नंतर १९३५ मध्ये रास्तेंच्या या गणपती मंदिरात हा भजन समाज कार्यरत झाला. त्या काळी हे मंदिर कौलारू होते व मंदिराच्या डाव्या-उजव्या बाजूला मोकळी जागा असून, त्यात एक वडाचे, एक उंबराचे (औदुंबर) व एक प्राजक्ताचे झाड होते. त्या वेळी मंदिराची पूजा-अर्चा, दिवाबत्ती हे मंदिराशेजारील भिंगारकर गुरुजी पाहात होते.
भजन समाजाचे भजनाव्यतिरिक्त चतुर्थी अभिषेक, रामनवमी, गोकुळाष्टमी, दीपावली इत्यादी उपक्रम पाहून समाधान झाले व १९४२ मध्ये या मंदिराचा कारभार भजन समाजाकडे कायमचा सोपविला. १९४६ मध्ये समाजाने मंदिराचा जीर्णोद्धार करून अॅस्बेस्टॉस पत्र्यांची बांधणी केली. मात्र, त्या वेळेस फरशी टाकताना आसपासची झाडे काढावी लागली. १९४२ मध्ये समाजाची घटना तयार झाली. सदर समाजाचे ‘श्री हरिहर भजन समाज’ असे नामकरण होऊन संस्था स्थापन झाली.
सुमारे २५ वर्षांपूर्वी मंदिराचा पुन:जीर्णोद्धार होऊन सध्याची इमारत अस्तित्वात आली. इतर मूर्ती स्थापना १९८६-८७ च्या आसपास झाली. सध्याचे दाक्षिणात्य शैलींचे सुरेख गोपूर १९९३ मध्ये पूर्ण झाले.
येथील मूर्ती शेंदूरमुक्त असून, सुमारे साडेतीन फूट उंचीची आहे. रोज सकाळी अभिषेकानंतर वस्त्रे प्रावरणे बदलली जातात. मूर्तीच्या वरील हातात फूल व पाश आहे. डाव्या हातावर सोंड असून, उजव्या हात अभयदर्शक आहे. मूर्तीच्या मागे स्वतंत्रपणे चांदीची प्रभावळ उभी केली असून, डाव्या हाताला धातुची एक उत्सवमूर्ती आहे. समोर उंदराची प्रतिमा आहे. संकष्टी व विनायकी चतुर्थीला, तसेच इतर अनेक कार्यक्रमात पूर्ण मूर्तीला चांदीचे कवच चढवतात. त्या वेळेस मूर्ती विलोभनीय दिसते. डोक्यावर रोज चांदीचा मुकुट चढविलेला असतो.
गणपतीच्या उजव्या हाताला स्वतंत्रपणे पण आच्छादित लक्ष्मीनारायण म्हणजेच बालाजी व पद्मावती यांच्या मूर्ती चौथऱ्यावर असून, तेथेही धातुची उत्सवमूर्ती आहे. त्याच्या उजव्या हाताला सुमारे तीन फूट चौथऱ्यावर बजरंगाची मूर्ती आहे. बालाजीला व बजरंगाला स्वतंत्रपणे प्रदक्षिणा करण्यासाठी सभोवती भरपूर जागा आहे.
गणपतीच्या डाव्या बाजूला स्वतंत्रपणे कार्तिक स्वामी व पार्वती आणि दोघांच्यामध्ये शंकराची पिंड अशी स्वतंत्रपणे प्रतिष्ठापना केलेली आहे. या मूर्ती सुमारे अडीच फूट उंचीच्या चौथऱ्यावर विराजमान आहेत. कार्तिक स्वामी एकमुखी आहे. यापुढे छोटासा नंदीही पाहावयास मिळतो आणि उजव्या हाताला गरुडाची मूर्ती आहे.
कोरेगावचा श्रीचिंतामणी
पांडुरंग सुतार
सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव या तालुक्याच्या शहरात असलेल्या जुन्या मंदिरांमध्ये चिंतामणी गणेश मंदिराची गणना होते. जीर्णोद्धारापूर्वी हे मंदिराचे पूर्णत: दगडी बांधकामात होते. त्या मंदिराची स्थापत्य शैली हेमाडपंथी प्रकारात असल्याचे जाणकार सांगतात. सध्या या मंदिराचे रूप पालटले असले तरी जीर्णोद्धारापूर्वीची मूर्ती आजही त्याच मूळ स्वरूपात आहे. मूळ मंदिर कोणी व कधी बांधले यासंदर्भात ठोस कागदपत्रांचा उल्लेख आढळत नाही. पण जाणकारांच्या मते दहा पिढय़ांपासून हे मंदिर अस्तित्वात आहे. जीर्णोद्धारापूर्वीचे बांधकाम पाहिल्यास याची प्रचिती येते.
या मंदिराच्या परिसरात सुतारवाडा आहे. तेच या मंदिराचे सर्वेसर्वा आहेत. या मंदिराच्या अंगणात हे सुतार मंडळी गावकऱ्यांचे गावकीचे सुतारकाम अनेक पिढय़ा करत असत. सुताराचे वास्तव्य १० ते १५ पिढय़ा येथेच आहेत. याच भागात एक मठ होता. त्या ठिकाणी ग्राम जोशी वास्तव्यास आहेत. तसेच जवळच एक सीताबाईचे तळेही होते. त्याचा उपयोग पाणी पिण्यासाठी होत होता. त्याचे अवशेष अजूनही तिथे आहेत.
पूर्वाभिमुखी असलेल्या या चिंतामणी गणेशाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. मोदकाच्या आकारासारखे दिसणारे हे मंदिर उभारण्याच्या कामात सुतारवाडय़ातील सुतार मंडळींनी पुढाकार घेतला होता. गावकऱ्यांच्या सहकार्यातून व देणगीतून सध्याचे मंदिर उभारलेले आहे.
या चिंतामणी गणेशाच्या हातात परशू, अंकुश दंत व मोदक दिसतात. मांडी घालून बसलेली ही दोन फुट नऊ इंचाची मूर्ती सुबक व सुंदर दिसते. गणेशाची सोंड डावे बाजूस वळलेली आहे. जीर्णोद्धारा वेळी या मूर्तीस वज्रलेप देऊन अधिक सुंदर बनविलेली आहे.
मंदिरामध्ये दररोज सकाळी पूजा-अर्चा होऊन नऊ वाजता आरती होते. गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती कायमस्वरूपी साजरी करत असतात. यामध्ये पहाटे अभिषेक, दुपारी जन्मकाळ उत्सव व अन्नदान केले जाते. या मंदिराचे व्यवस्थापन सुतार मंडळी करतात.
हे मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सर्व भाविकांना खुले असते.
सेलूचा सिद्धिविनायक
दिलीप माणकेश्वर
परभणी जिल्ह्य़ातील सेलू येथे ४५० ते ५०० वर्षां पूर्वीचे प्राचीन गणपती मंदिर आहे. या गणराजास पूर्वी मेढया गणपती म्हणून ओळखले जायचे. १९९६ साली सिद्धिविनायक नामाभिधान पावलेल्या या मंदिरात उत्सवाची ४५० ते ५०० वर्षांची परंपरा असल्याचे ८७ वर्षांचे गोिवदराव कोठुळे सांगतात. त्यांच्या घरी वंशपरंपरेने या गणेशाची सेवा आहे. शाळूवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू शहरात सूभेदाराच्या गढीच्या पायथ्याशी धनगरवाडयाची (गणपती गल्ली) वस्ती होती. जवळच गावाची वेस होती. या ठिकाणी एका माळवदाचे छत असलेले श्रीगणेशाचे मंदिर होते. श्रीगणेशाची मूर्ती एका िभतीला लागून जमीन पातळीपासून चार फूट खोल होती. या गणपतीला वेशीतला गणपती म्हणायचे. सेलू गावाच्या संरक्षणासाठीच गणपती वेशीत बसला अशी भक्तांची श्रद्धा होती.
मेढया म्हणजे पुरातन असा अर्थ डॉ. एकनाथ तांदळे यांनी शोधून काढला. यावरूनच मेढया गणपती म्हणजे पुरातन गणपती असे मानले गेले. माळवद पडल्यानंतर भक्तांनी या ठिकाणी पत्र्याचे छत टाकले व समोरच्या बाजूला लोखंडी जाळी केली. काही काळ या मंदिरात सकाळी दहा ते चार शाळा भरायची. रात्रीच्या वेळी धनगराच्या शेळया, मेंढया येथे आश्रय घ्यायच्या.
१९८२-८३ मध्ये श्रीमंदिराच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली. पहिले गाभाऱ्याचे काम हाती घेण्यात आले. गाभाऱ्यात काचेचे नक्षीकाम सुबकपणे करण्यात आले. मूळ मूर्तीतील झिजलेल्या भागास राजस्थानातील एका गणेशभक्त कारागिराच्या साहाय्याने सुबकता आली.
गणेशमूर्ती पूर्वाभिमुखी चार फूट उंचीची, शेंदूर लेपलेली, विलोभनीय, देखणी आहे. चांदीचा मुकुट, चांदीची मत्स्याकृती कर्णभूषणे परिधान केलेली सिंहासनावर आसनस्थ आहे. श्री गणेश जयंतीला गणेशजन्म सोहळा उत्साहाने साजरा होतो. दैनंदिन कार्यक्रमासोबतच अनंत चतुर्दशीला पालखी सोहळा व महाप्रसादासाठी भाविक उत्साहाने सहभागी होतात.
response.lokprabha@expressindia.com