खबर राज्यांची
गोविंद डेगवेकर – response.lokprabha@expressindia.com
‘आयआयएम बंगळुरु’मधील बुद्धिमंतांनी व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमात कर्तृत्वाची मोहोर उमटवून सुवर्णपदक पटकावले.
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ अर्थात आयआयएम. व्यवस्थापन शिक्षणातील भारतीय शिखर संस्था. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक प्रज्ञा असावीच लागते. परंतु त्यानंतरही जीवतोड मेहनत आणि बुद्धीचा कस इथे लागतोच. ‘आयआयएम बंगळूरु’मध्ये शिकायचंच, अशी जिद्द अंगात असल्याशिवाय इथे पोहोचता येत नाही. हे पोहोचणंदेखील लाखातील काहींना जमतं. बरं येथेच येऊन शिकायचं आणि नोकरी मिळवायची म्हणून काही जण इथे येतात आणि शिकूनही जातात. पण रग्गड पगाराची नोकरी सोडून, आयआयएम बंगळूरुमध्ये प्रवेश घेणारेदेखील आहेत. यातील बहुतांश जण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा सनदी सेवेत असतात. पण ते इतके सहजही नसते. कारण इथल्या अभ्यासाशी असलेली बांधिलकी आणि कुटुंबाला दिला जाणारा वेळ याच्यात तारेवरची कसरत त्यांना करावी लागते.
यातील ३६ वर्षांची झेलेन अगुयार ही अशीच एक विद्यार्थिनी. झेलेन भूगर्भतज्ज्ञ म्हणून मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करीत होती. नंतर तिने भारतीय महसूल सेवेत नोकरी पत्करली. परंतु २०१६ साली त्या नोकरीला रामराम ठोकून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने ती ‘आयआयएमबी’मध्ये दाखल झाली. व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील अष्टपैलू कामगिरीसाठी तिला सुवर्णपदकही मिळाले.
झेलेन म्हणते, शेतकीत मला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे’. अर्थात ही प्रेरणा तिने तिच्या वडिलांकडून घेतली. झेलेनच्या वडिलांनी काजू उत्पादन घेण्यास सुरुवात केली. हाच व्यवसाय पुढे वृद्धिंगत करण्याची तिची इच्छा आहे. ‘आयआयएमबी’मध्ये व्यवस्थापन शाखेत शिकत असताना झेलेनने मुक्त व्यापार केंद्रासाठी एक ‘व्यवसाय नमुना’ विकसित केला. ती सांगते, ‘आयआयएमबीमध्ये वर्षभराच्या कालावधीत जे काही मी शिकले, ते शिकण्यासाठी आयुष्यातील दहा वर्षे खर्ची घालावी लागली असती.’
उद्यम व्यवस्थापनातील (एंटरप्रायजेस मॅनेजमेंट) पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकावणारा बंगळूरुमधील हरीराम थरुकारुगावूर म्हणतो, ‘आयआयएमबी’मधून शिकताना काही स्तिमित करणाऱ्या गोष्टी ऐकायला-पाहायला मिळाल्या. म्हणजे रोज नित्यनूतन शिकण्याचा अनुभव आनंददायी होता. यात पुस्तक आणि अनुभव यांचा सुरेख, समांतर मेळ होता. यातून एकाच विषयाच्या अनेक बाजू समजण्यास त्यामुळे मदत झाली. यामुळे एकदाच विचार करून भागत नाही, हे लक्षात आले.’
‘करिअर’ हा शब्द अनेकांनी उराशी असा काही कवटाळलेला असतो की, आपण करतो तोच योग्य विचार असे अनेकांना वाटते आणि इतरांच्या मतांचा विचार होतच नाही. परंतु ‘आयआयएमबी’मधून बाहेर पडल्यानंतर ‘करिअर’ची गती आणि दिशा बदललेली असते, हे सत्य इथला प्रत्येक भावी व्यवस्थापक मान्य करतो.
उत्तराखंडच्या कुशाग्र मित्तल याची ‘आयआयएमबी’मधील कामगिरी नावाला शोभेल अशीच आहे. त्याने ‘सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन’ या विषयातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. कुशाग्रने सर्वच विषयांत वर्षभरात मिळविलेले गुण आणि त्याने खर्ची घातलेले तास यांची संकलित सरासरी ही त्याचं अष्टपैलुत्व सिद्ध करणारी ठरली. यासाठी त्याला सुवर्णपदक बहाल करण्यात आलं. सध्या तो रेल्वे मंत्रालयासोबत काम करीत आहे. येत्या काळात त्याला शहर नियोजन आणि रसदविज्ञान (लॉजिस्टिक्स) संबंधित केंद्र सरकारमधील वरिष्ठ सार्वजनिक धोरणकर्ता म्हणून सेवा बजावायची आहे.
इथल्या प्रत्येकाची स्वप्नं मोठी आहेतच, पण त्याबरोबरच सामाजिक बांधिलकीही तितकीच घट्ट आहे. ‘आयआयएमबी’मध्ये आम्ही जे काही शिकलो, ते समाजाची सेवा करताना वापरायचे आहे,’ असं मत सुवर्णपदक मिळविलेल्या प्रत्येकानेच व्यक्त केलं.
तमिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्य़ातील गावातून आलेल्या सुकन्या पी. हिने उद्यम व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात पहिली श्रेणी पटकावली. विमा क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान हा तिचा विषय आहे. तिचं स्वप्न इतरांहून वेगळं आहे. तिला शिक्षण क्षेत्रातील नागरी आणि ग्रामीण ही दरी मिटवायची आहे. त्यासाठी ग्रामीण भागांतील मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून द्यायचे आहे. ‘शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती यात अडसर ठरणार नाही, याची तिला शाश्वती हवी आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षण घेताना सुकन्या हिला आलेल्या अडचणींचा संदर्भ देताना ती म्हणते, ग्रामीण भागातील मुलांना एकाच पठडीतील शिक्षण दिलं जातं. मला स्वत:ला दर्जेदार शिक्षण घेताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. ही परंपरा मला खंडित करायची आहे. त्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. मी माझं स्वप्न खूप लहानपासून हृदयात जतन केलं आहे. ते साकार करण्यासाठी मला मोठा कालावधी लागेल. मी मुलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींविषयी जागरूकता निर्माण करण्याचं काम करणार आहे आणि हे काम ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या मुलांसाठी करायचं आहे.
‘आयआयएमबी’मधून ६२५ विद्यार्थी हे पदवीधर झाले आहेत. यातील व्यवस्थापनातील छात्रवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत २४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापनातील अभ्यासक्रमात ४० जण पदव्युत्तर झाले आहेत. तर उद्यम व्यवस्थापनातील पदव्युत्तरांची संख्या ८५ आहे. ७३ जण हे व्यवस्थापनातील कार्यकारी पदव्युत्तर आहेत. याशिवाय ४०३ जण हे व्यवस्थापन अभ्यासक्रमातील पदव्युत्तर आहेत. व्यवस्थापनात अभ्यासक्रमातच १२ अपंग विद्यार्थ्यांनी यश मिळविलं आहे. याच वेळी ‘आयआयएमबी’चे माजी पदव्युत्तर लक्ष्मी कौल, हितेश ओबेरॉय, राजकुमार डी. यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
‘आयआयएमबी’मध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची नव्याने रचना करण्यात आली आहे. विविध देशांमधील व्यवस्थापनातील मातबरांच्या संकल्पनांचा यात समावेश करण्यात आला आहे. या संकल्पनांची भारतीयांना ओळख करून देणं, ‘आयआयएमबी’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला उच्च-स्तरीय कार्यकारी कौशल्य आत्मसात करण्यास पूरक कार्यक्रम राबवणं आणि या माध्यमातून व्यक्तीचं व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेतृत्व विकसित करणं आणि त्याहूनही ते धोरणांचे अग्रदूत बनले पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाखालीच जगातील सर्व स्तरावरील ग्राहकांना दृष्टीपुढे ठेवून उपक्रम-कार्यक्रमांची रचना करण्यात ‘आयआयएमबी’मधून शिकून गेलेला अग्रेसर असला पाहिजे. त्यातूनच नव्या उच्च मानकांचा पाया रचला जाईल. नवी मूल्यं उदयास येतील, असं मत या वेळी ‘आयआयएमबी’च्या वतीने व्यक्त करण्यात आलं.