प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com
‘आईईईईईई..संपली परीक्षा..फायनली..खूप भूक लागलीये, खायला दे ना.. शुंकी.. आई शुंकी कुठेय..?’ किन्शूकने दप्तर जवळजवळ सोफ्यावर फेकतच आईला विचारलं. आई तिथेच बसली होती, तिने शांतपणे किन्शूककडे पाहत म्हटलं, ‘किन्शू, आधी शूज जागेवर ठेव, हातपाय धुऊन घे आणि किचनमधून नाश्ता घे.’ आईचा एकूण नूर बघता किन्शूकला कळून चुकलं की आज काही आईचा मूड बरा नाही, पण आई रागावलेली वाटली नाही, उलट कसल्यातरी काळजीत असल्यासारखी दिसली.
‘आई, पण शुंकी कुठेय?’ किन्शूकने रेटून विचारलं. ‘किन्शूक, तू आवर आणि ये, सांगते मी तुला. जा लवकर.’ आई काळजीच्या स्वरात म्हणाली. आता किन्शूकलासुद्धा भीती वाटायला लागली. गेले दोन-तीन आठवडे शुंकी तसा आजारीच होता. बाबा सगळी औषधं वेळेवर देत होते त्याला, मग आज काय झालं अचानक? आता पण डॉक्टरकडे घेऊन गेलेत बाबा, अजून कसे आले नाहीत? किन्शूक त्याच्या विचारांच्या तंद्रीत आईजवळ कधी येऊन बसला त्याचं त्यालाच कळलं नाही. ‘सांग ना गं आई लवकर. शुंकी कुठेय?’ किन्शूक आता अधीर झाला होता. आईने किन्शूकला जवळ घेतलं. ‘किन्शू, बाबा आता डॉक्टरकडे घेऊन गेलेत ना शुंकीला. आता येतील एवढय़ात. पण अरे, शुंकी आता पूर्वीसारखा बरा नाही होणार. त्याला झालेला आजार बरा होणाऱ्यातला नाहीये. त्यामुळे आता तो जितके दिवस आपल्यासोबत असेल तितके सर्व दिवस आपण त्याच्याबरोबर मज्जा करत घालवायचे. कळतंय ना बाळा..?’
किन्शूकला कळेचना आई काय बोलतेय ते. त्याला आता खूप रडावंसं वाटत होतं. याचा अर्थ शुंकी सोडून जाणार मला कायमचा? तो आता कधीच खेळणार नाही माझ्याबरोबर? मी घरी आल्यावर माझ्या अंगावर उडय़ा कोण मारणार? इतक्यात बाहेरून क्षीणसा भुंकण्याचा आवाज आला. किन्शूक धावत दरवाजापाशी गेला. समोर बाबा शुंकीला कडेवर घेऊन उभे होते. किन्शूक धावत बाबांपाशी गेला. त्यांच्याकडून शुंकीला आपल्याजवळ घेतलं. आता मात्र किन्शूकला आपलं रडू आवरेना. तो शुंकीच्या त्या दमलेल्या डोळ्यांकडे पाहून रडायला लागला. शुंकीसुद्धा त्याची मान किन्शूकच्या कुशीत मुडपून स्वस्थ पडला.
शुंकीला घरी आणलं तेव्हा किन्शूक खूप लहान होता. नुकतंच चालायला-बोलायला शिकलेला. शुंकीसुद्धा अगदी लहान पिल्लू होतं. किन्शूकने जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो थोडासा घाबरला होता. पण शुंकीने त्याच्या पायाचा इवलासा पंजा किन्शूकच्या हातावर अलगद ठेवला, आणि किन्शूकची भीती कुठच्या कुठे पळून गेली. त्या दिवसापासून शुंकी आणि किन्शूक बेस्ट फ्रेण्ड्स बनले. ‘नाव काय ठेवायचं रे आपण या पिल्लाचं?’ एकदा आईने किन्शूकला विचारलं. खूप विचार करून किन्शूक म्हणाला, ‘अं..शुंकी ठेवू, माझ्या नावाच्या उलट.. किन्शू आणि शुंकी.’ त्या दिवसापासून शुंकी त्या घरचा चौथा सदस्य बनला.
वेळ भराभर पुढे जात होता, किन्शूकसुद्धा शाळेच्या इयत्ता पटापट पार करत होता. शुंकी आता पिल्लू राहिलं नव्हता, तोही मोठा झाला होता आणि किन्शू आणि शुंकीची मत्रीसुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली होती. दोघांना एकमेकांशिवाय बिलकूल करमत नसे. किन्शूक शाळेतून घरी यायच्या वेळेला शुंकी दारासमोर येरझाऱ्या घालत असे आणि त्याला यायला पाच मिनिटं जरी उशीर झाला तर किन्शू आल्या आल्या ‘काय रे, किती उशीर. मी कधीपासून वाट पाहतोय तुझी. कुठे होतास इतका वेळ. बरं जाऊ दे. आता आला आहेस तर खेळ माझ्याशी.’ असं काहीतरी आपल्या भाषेत भुंकून भुंकून सांगत असे. किन्शूकलाही त्याच्या मनातलं बरोबर ओळखता यायचं. उन्हाळ्याची सुट्टी पडली की दोघांची स्वारी निघाली मामाच्या गावाला. तिथे तर काय मोकळं रानच. आणि खेळायला बरेच सवंगडी मिळायचे. दिवसभर दोघं पूर्ण गाव उंडारायचे. तासन्तास एकमेकांशी काहीतरी बोलत बसायचे. किन्शूकच्या आईबाबांनाही त्यांच्या बोलण्याचं कोडं कधी उमगलं नव्हतं.
‘किन्शूक, जेवायला चल लवकर.’ आईने तिसऱ्यांदा किन्शूकला हाक मारली. पण त्याचं लक्षच नव्हतं. तो शुंकीच्या बाजूला बसून त्याच्या अंगावरून अलगद हात फिरवत होता. त्याला सोडून कुठे जावंसं वाटत नव्हतं त्याला. शेवटी आईने त्याला हाताशी धरून उठवलं. रात्री झोपतानासुद्धा तो आईला शुंकीबद्दलच विचारत होता. ‘आई, शुंकी होणारेय ना बरा? मला माहीतेय तो बरा होणारेय. त्याने प्रॉमिस केलंय मला तसं.’ असं काहीसं बरळत किन्शूक झोपी गेला. सकाळी त्याला जाग आली तेव्हा आईबाबा काहीतरी कुजबुजत असल्याचं त्याला जाणवलं. तो बाहेर आला, त्याने समोर पाहिलं. शुंकी शांतपणे पहुडला होता. तो काहीच हालचाल करत नव्हता. त्याचे डोळे मिटलेले होते. आणि त्याने किन्शूक दिसल्यावर नेहमीसारखी त्याच्या दिशेने धावही नव्हती घेतली. किन्शूकने आईकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होते. तो शुंकीच्या दिशेने गेला. त्याच्या अंगावरून हलकेच हात फिरवला. किन्शूकच्या डोळ्यातील पाणी शुंकीच्या मिटलेल्या डोळ्यांवर सांडत होते. किन्शूकने अलगद शुंकीचा पंजा त्याच्या हाती घेतला. अगदी पहिल्यांदा घेतला होता तसा..शेवटचा..
शुंकी गेल्यापासून किन्शू अगदीच गप्प गप्प झाला होता. उन्हाळ्याची सुट्टी असूनसुद्धा बाहेर खेळायला जात नव्हता. मित्रांबरोबर वेळ घालवत नव्हता. इतकंच काय तर मामाने खूपदा बोलावूनही तो गावाला जायला तयार नव्हता. त्याच्या आईबाबांना त्याची ही परिस्थिती कळत होती. किन्शूकला आपण नवीन सवंगडी आणला पाहिजे याची त्यांना जाणीव झाली होती, तसं त्यांना किन्शूलासुद्धा सांगितलं. किन्शू मात्र बिलकूल तयार नव्हता. ‘मला माझा शुंकीच परत हवाय, मला दुसरा कोणी कुत्रा नको अजिबात.’ किन्शूक अजिबात तयार नव्हता. तो सतत शुंकी जिथे बसायचा, जिथे खायचा, त्या सगळ्या ठिकाणी सतत फेऱ्या मारत असे. किन्शूकचं हे वागणं आईबाबांना सहन होत नव्हतं. एक दिवस बाबा घरी आले ते किन्शूकला हाका मारतच. ‘किन्शू, किन्शू, लवकर इथे ये, हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. कुठे आहेस.. ये लवकर..’ किन्शू धावत धावत बाबांपाशी गेला. बाबांनी एका मोठय़ा खोक्यातून गिफ्ट रॅप केलेली वस्तू बाहेर काढली आणि किन्शूकला दिली. ‘उघड पाहू, तुझ्यासाठी सरप्राइज आहे.’ किन्शूकने खूश होत पटापट गिफ्ट रॅप काढले आणि आत बघतो तर काय.. जवळपास त्याच्या कमरेला पोहोचेल इतक्या उंचीचा रोबो. तो त्याच्याकडे पाहतच राहिला. ‘तुला गंमत पाहायचीय.. थांब दाखवतो.’ असं म्हणत बाबांनी त्या रोबोच्या पाठीमागे असणारी कळ दाबली. अन चक्क तो रोबो चालायला-बोलायला लागला. किन्शूकला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा रोबोने ‘हाय किन्शूक’ असं म्हणत शेकहॅण्डसाठी हात पुढे केला. किन्शूक तर आ वासून पाहतच राहिला. त्याला हा रोबो खूप आवडला.
तो दिवसभर त्या रोबोशी खेळायला लागला. रोबोसुद्धा किन्शूकने सांगितलेली प्रत्येक गोष्ट करायचा. हळूहळू किन्शूक त्याची सगळी कामं रोबोकडून करून घ्यायला लागला. इतकंच काय तर शाळेतून दिलेला उन्हाळी सुट्टीचा गृहपाठसुद्धा तो रोबोकडून करून घेत होता. पूर्वी त्याला आवडणारी गणितं आता आवडेनाशी झाली. कारण ती सगळी गणितं तो रोबोकडून सोडवून घेत होता. सगळ्या मित्रांसमोर त्याने मोठय़ा फुशारकीने आपला अभ्यास कसा आधीच झाला आणि तोच कसा वर्गात पहिला येणार, हे सांगून टाकलं होतं.
एके दिवशी, तो रोबोला घेऊन टीव्ही पाहत सोफ्यावर बसला होता. रोबो त्याचा गृहपाठ करत होता. आईने ते पाहिलं आणि किन्शूकला ओरडायला लागली. त्याने जर पुन्हा त्याचा अभ्यास रोबोकडून करून घेतला असता तर आई शाळेत येऊन बाईंना हे सगळं सांगणार होती. आईचा ओरडा ऐकल्यावर किन्शूक रडत रडतच आपल्या खोलीत गेला. रडताना त्याला शुंकीची खूप आठवण आली. शुंकी असता तर तोसुद्धा किन्शूच्या पाठी पाठी त्याच्या खोलीत गेला असता. त्याला सतत काय झालं काय झालं म्हणून विचारत राहिला असता आणि जोपर्यंत किन्शू डोळे पुसत नाही तोपर्यंत तिथून हलला नसता. किन्शूकने बाहेर पाहिलं. रोबो तिथे तसाच बसून होता. तो काही किन्शूकचे सांत्वन करायला त्याच्या मागे मागे आला नाही. किन्शूक डोळे पुसेपर्यंत त्याच्या अवतीभवती घुटमळला नाही. किन्शूकला आपली चूक लक्षात आली. त्याने जाऊन रोबोची बॅटरी काढली. बाबांच्या हाती ती देत तो म्हणाला, ‘सॉरी बाबा, माझं चुकलं. रोबोला मी खरंतर माझा मित्र बनवायला हवं होतं, पण याउलट मी त्याला माझा नोकर बनवायला गेलो. यात माझंच नुकसान झालं. शुंकीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तो कायम माझा बेस्टेस्ट फ्रे ण्ड राहील. पण याचा अर्थ असा नाही ना की मी नवीन मित्र बनवणारच नाही. आपण नवीन शुंकीला कधी आणायचंय?’ त्याचं बोलणं ऐकून बाबांनी त्याला जवळ घेतलं. किन्शूक आता त्याच्या नव्या मित्राची आतुरतेने वाट पाहतोय.