ओंकार वर्तले response.lokprabha@expressindia.com
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून गौरवलेल्या औरंगाबाद जिल्ह्य़ातील गड-किल्ले पाहणे हाडाच्या पर्यटकांसाठी मेजवानीच असते, पण या जिल्ह्य़ातील बहुतांश गड-किल्ले हे सामावले आहेत अजिंठा-सातमाळ या सह्य़ाद्रीच्या उपरांगेत. किंबहुना याच रांगेत या जिल्ह्य़ाच्या दुर्गभ्रमंतीचे सार सामावले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. प्रत्येक किल्ल्याची बांधणी आणि साज हा इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा. अशाच काही मोजक्याच किल्ल्यांची ही सफर..
मराठवाडय़ाचा मुकुट ‘किल्ले अंतुर’
औरंगाबाद जिल्ह्य़ातून गेलेली अजंठा-सातमाळ ही सह्य़ाद्रीची उपरांग भटकंतीचे अनेक रंग उधळत जाते. पूर्व-पश्चिम पसरलेल्या या उपरांगेवर अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, शिवाय समृद्ध अशा गौताळा अभयारण्याचे कोंदणही लाभले आहे. हे सारे आहेच, पण औरंगाबाद जिल्हा हा लेणींनी नटलेला आहे, किंबहुना या लेण्या हीच या जिल्ह्य़ाची ओळख आहे, कारण या जिल्ह्य़ातील जागतिक वारसा यादीत असलेली जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी ही, सह्य़ाद्रीच्या अजंठा रांगेत कोरलेली आहे. अशा या मराठवाडय़ातील उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुर किल्ला ठाण मांडून बसलेला आहे. या भागातील सर्व किल्ल्यांचा राजा अंतुर किल्ला आहे. हा किल्ला येतो कन्नड तालुकात. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे हे संरक्षित स्मारक आहे. तसं पाहिलं तर गौताळा अभयारण्यात मुख्य चार किल्ले आहेत. त्यातला प्रत्येक किल्ला आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे प्रत्येक किल्ला एकदा तरी जरूर पाहण्यासारखा आहे. मोक्याचे ठिकाण, प्रवेशद्वाराची अभिनव रचना, शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी केलेले विशिष्ट बांधकाम आणि अशा अनेक गोष्टींमुळे हा किल्ला सरस मानला जातो. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हा किल्ला दोन्ही प्रकारांत मोडतो. भुईकोट आणि गिरिदुर्ग. ही सारी गुणवैशिष्टय़े पाहण्यासाठी का होईना अंतुर किल्ल्याची भटकंती एकदा तरी करायलाच हवी. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्हीही मार्ग गौताळा अभयारण्यातूनच जातात. पहिला मार्ग आहे पायथ्याच्या भोपेवाडी गावातून. या वाटेने चालत जायला दोन तास लागतात. दुसरा मार्ग आहे तो खोलापूर या गावातून. या गावामार्गे एक कच्चा रस्ता थेट अंतुर किल्ल्यापर्यंत जातो. त्यामुळे या दुसऱ्या मार्गाने कमी पायपीट करावी लागते. शिवाय गाडीमार्ग थेट गर्द झाडीतून जात असल्यामुळे वेगळाच थरार अनुभवता येतो. त्यामुळे सहकुटुंब या ठिकाणी जाता येते.
अद्भुत प्रवेशद्वाराचा सुतोंडा
सुतोंडा किल्लाही तितकाच देखणा आणि भटक्यांची तहान भागविणारा आहे. हा किल्ला सायीतोडा, वाडी किल्ला, वाडीसुतोडा किल्ला या नावांनी परिसरात ओळखला जातो. या किल्लय़ावर येण्यासाठी नाशिकहून चाळीसगाव-नागद-बनोटी असा सरळ रस्ता आहे. जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव ते बनोटी गाव हे साधारण ४५ किलोमीटर अंतर आहे. गावाला लागून नदीकाठावर शंकराचं अतिशय सुंदर मंदिर आहे. त्यात आपल्या निवासाची व्यवस्था होऊ शकते. बनोटी गावालगत साधारण ३ किमी अंतरावर नायगाव हे सुतोंडा किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. बनोटी ते नायगाव रस्ता थोडा कच्चा असला, तरी फार खराब नाही.
किल्ला चढाईला सोपा आहे, पण किल्ल्यावर पाहण्यासाठी भरपूर अवशेष आणि वास्तुस्थापत्य असल्यामुळे संपूर्ण दिवस हाताशी हवाच. किल्ला चढण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट गावातूनच समोर दिसणाऱ्या भागातून म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेकडून चोरदरवाजातूनच आहे. या वाटेने वर जाण्यासाठी गावातून सोबतीला वाटाडय़ा घ्यायलाच हवा, अन्यथा वाट चुकण्याचीच शक्यता अधिक. दुसरी वाट समोर दिसणाऱ्या भागातून किल्ल्याला उजवीकडून वळसा घालत (ट्रॅव्हर्स) किल्ला डावीकडे ठेवत पलीकडच्या म्हणजेच दक्षिण बाजूने कातळ फोडून केलेल्या खंदकासारख्या भागातल्या प्रवेशद्वाराने माथ्याकडे जात. हीच वाट जास्त सोयीची आहे, फक्त चालण्याची तयारी मात्र हवी.
वाकाटक साम्राज्याचा जंजाळा किल्ला
वाकाटक काळापासून शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेला हा किल्ला तसा दुर्लक्षितच. मात्र, आजही या ठिकाणी गेल्यावर वास्तुशास्त्राचा हा उत्तम नमुना पाहून डोळ्याचे पारणे फिटते. हा किल्ला सोयगाव तालुक्यात येत असल्यामुळे याच तालुक्यातील अंभईवरून थेट जंजाळा गावात यायचे. याच गावातून सपाट चालीची अध्र्या तासाची पायवाट थेट किल्ल्यावर घेऊन जाते. सध्या किल्ल्यात जाण्यासाठी कच्चा रास्ता आहे. या मार्गाने हा किल्ला भुईकोट वाटतो. दुसरा मार्ग हा सोयगाव तालुक्यातीलच जरंडी गावातून जातो. सोयगाव ते जरंडी हे अंतर ९ किमी आहे. जरंडी गावाच्या पूर्वेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्या सोंडेवरून तीन तासांत गडावर जाता येते. या मार्गाने हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. गडावर जाण्यासाठी तिसरा मार्गही आहे. तो आहे वेताळवाडी गावातून. सोयगाव ते वेताळवाडी अंतर अवघे चार किलोमीटर आहे. वेताळवाडी धरणाच्या पश्चिमेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्यावरून तीन तासांत गडावर जाता येते. जरंडी आणि वेताळवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी वाटाडय़ा घेतला तर उत्तमच, अन्यथा वाट चुकण्याची शक्यता आहे. तीनही मार्गापेक्षा पहिली वाट म्हणजेच जंजाळा गावातून जाणारी वाटच सर्वात उत्तम. जंजाळा किल्ला हा औरंगाबादमधील एक दुर्लक्षित किल्ला आहे. अगदी थोडेच पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतात. याच किल्ल्याच्या पोटात खोदलेल्या घटत्कोच लेणीही आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. लेणीकडे जाण्यासाठी पुरातत्त्व खात्याने चांगली सिमेंटची पायवाट केलेली आहे. जंजाळा किल्लाही राज्य सरकारच्या संरक्षित स्मारक यादीत समाविष्ट झालेला आहे. एक आगळावेगळा आणि अवशेषांनी संपन्न असलेला किल्ला पाहायचा असेल तर या किल्ल्याकडे वाट वाकडी कराच.
छोटेखानी, देखणा लहुगड
औरंगाबादपासून अवघ्या ४० किमी अंतरावर, सिल्लोड रस्त्यावर एक छोटेखानी पण तितकाच देखणा किल्ला आहे तो नांद्रा गावाजवळचा लहुगड. कातळात खोदून काढलेला हा किल्ला म्हणजे दुर्गभटक्यांसाठी पर्वणीच म्हटली पाहिजे. या किल्ल्यावर येण्यासाठी औरंगाबाद शहरापासून फुलंब्रीच्या रस्त्यावर चौका फाटा लागतो. त्या फाटय़ावरून १५ मिनिटांत आपण नांद्रामार्गे किल्ल्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला आवर्जून जाणवते ती म्हणजे मुळात लहुगड हे ठिकाण किल्ला कमी, पण रामेश्वराचे ठिकाण म्हणूनच या पंचक्रोशीत जास्त प्रसिद्ध आहे, कारण या किल्ल्याच्या कुशीत दडलं आहे भगवान शंकराचं- रामेश्वराचं अप्रतिम कातळकोरीव मंदिर. केवळ मंदिरच प्रसिद्ध नसून हे ठिकाण निसर्गभ्रमंती, ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांना दिवसभर भटकंती करण्यासाठी अगदी योग्य आहे. अजिंठा या सह्य़ाद्रीच्या उपरांगेतील डोंगरात वसलेले असल्याने याला निसर्गाचे वरदान भरभरून लाभले आहे. पावसाळ्यात इथे अतिशय निसर्गरम्य वातावरण असते. एक सुंदर गुहामंदिर, त्याचे कलाकुसरीने नटलेले स्थापत्य आणि लहुगडावरील कातळकोरीव पाण्याची टाकी पाहायची असेल तर या लहुगडाकडे एकदा तरी वाट वाकडी करायलाच हवी.
महादेव टाक्याचा डोंगर – लोंझा किल्ला
महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्थानिकांमध्ये किल्ले म्हणून परिचित नसून ते वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावाने ओळखले जातात. हाच अनुभव लोंझा किल्ल्याच्या बाबतीत येतो. या किल्ल्याच्या अवतीभोवती असणाऱ्या गावात जरी तुम्ही लोंझा किल्ला कुठे आहे, असे विचारले तर लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसेल, कारण हा किल्ला ओळखला जातो तो ‘महादेव टाका डोंगर’ या नावाने. अगदी याच नावाची पाटीसुद्धा तुम्हाला रस्त्यावर स्थळ-निर्देशक म्हणून आढळेल. शंभू महादेवाचे स्थान वर असल्यामुळे या किल्ल्यावर भक्तांची वर्दळ असते. अगदी पायथ्यापासून गड माथ्यापर्यंत रेलिंग आणि सिमेंटच्या पायऱ्याही आहेत. किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० किमीवर नागद गावाजवळच हा किल्ला उभा आहे. दुसरा मार्ग म्हणजे जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगावपासूनही या नागद गावाजवळ येता येते. चाळीसगावपासून अवघ्या २६ किमीवर चाळीसगाव-सिल्लोड रस्त्यावर गौताळा अभयारण्यात हा किल्ला आहे. प्रवास शक्यतो खासगी वाहनानेच करावा. किल्ला काहीसा आडबाजूला असल्यामुळे एसटी वेळेवर मिळत नाही.
अवशेषांनी नटलेला वेताळवाडी किल्ला
या किल्ल्याकडे येण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्य़ातील सोयगाव गाठायचे. सोयगावातून या किल्ल्याचे दर्शन आपल्याला होते. तिथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आणि पश्चिम-दक्षिण बाजूस हा किल्ला दिसतो. सोयगावातून हळद्या घाटातून आपण या वेताळवाडी किल्ल्याला पोहोचतो. दुसरा मार्ग म्हणजे सिल्लोडहूनसुद्धा या किल्ल्याचा पायथा गाठता येतो. या किल्ल्याला खेटूनच हळदा घाट रस्ता झाल्यामुळे आपण अगदी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशीच येऊन पोहोचतो. वेताळवाडी किल्ला महाराष्ट्र शासनाच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट आहे. किल्ल्यावर तटबंदी दुरुस्ती, तोफांचे संवर्धन अशी बरीच कामे झालेली दिसतात. इतर अवशेषही शाबूत असल्यामुळे हा किल्ला प्रेक्षणीय होतो. चढाई कमी करावी लागत असल्यामुळे सहकुटुंब भ्रमंतीचा आनंद घेता येतो. पावसाळा हा इथे येण्यासाठी सर्वोत्तम काळ. या दिवसांत इथला निसर्ग कात टाकतो, वातावरण सुखद असते आणि परिसर नयनरम्य झालेला असतो.
भांगसाई मातेचा भांगसी गड
औरंगाबाद-देवगिरी रस्त्यावर, औरंगाबाद शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे. आजूबाजूच्या सपाट परिसरामुळे हा डोंगर उठून दिसतो. या डोंगरावर कातळात कोरलेला सुंदर भांगसी गड किल्ला आहे. भांगसाई देवीच्या मूळच्या भुयारी मंदिरावर नवीन मंदिर बांधण्यात आले आहे.