|| प्राची पाठक

रेवा खूपच वैतागली होती. घरी, शाळेत सतत सगळे हे करू नको, ते करू नको असंच सारखं सांगत असतात. मग करायचे काय, कसे आणि का, ते मात्र कोणीच सांगत नाहीत धड. तिला रागच आला. तिने टेबलवरचे सफरचंद उचलले आणि बागेत जाऊन ते खात बसली. बागेत कडक ऊन होते. तिला परत आठवले. कालच डॅडपण तिला बागेत दुपारचे जायचे नाही म्हणून ओरडला होता. डॅडच्या सुट्टीच्या दिवशी मात्र तो दुपारी काम करतो बागेत. तेव्हा मात्र दुपार आहे, ऊन आहे, असलं काही नसतं.

हा सगळा विचार सुरू असताना तिला समोरच्या जांभळाच्या झाडावर एका पक्ष्याची शेपूट दिसली. चांगलीच मोठी, झुपकेदार शेपूट होती ती. रेवाने सातवीत पक्षी कसे ओळखायचे याचा प्रोजेक्ट केला होता. त्यामुळे तिने भारद्वाज लगेच ओळखला. तितक्यात एक बुलबुल आणि साळुंकी तिथून उडून गेले. दयाळ पण बुलबुलला खेटून उडाले. भारद्वाज उठला आणि त्याने सगळ्या पक्ष्यांना तिथून हाकलून लावले. तिथे एक घरटे बनत असावे. ज्यावर मालकी सांगायला भारद्वाज आलाय. आकाराने मोठे पक्षी लहान आकाराच्या पक्ष्यांवर अशीच दादागिरी करतात, ते रेवाला माहीत होतेच. जरा वेळ युद्धच चालले पक्ष्यांमध्ये. नंतर भारद्वाजदेखील उडून गेला. एका फांदीवर दोन साळुंक्या शांत बसल्या होत्या. शेवटी तिथे घरटे करायची जागा साळुंक्या घेतील तर, असा अंदाज रेवाने बांधला.

तितक्यात गेटचा आवाज आला. रेवाची आई आली होती. आईने रेवासाठी एक कॅडबरी आणली होती. ती खात खात रेवाने आईला पक्ष्यांच्या मारामारीबद्दल सांगितले. ‘‘जागेसाठी ही जुंपते पक्ष्यांची. तुफान मारामाऱ्या. मग एकाला ती जागा मिळते. मग तो घरटं बांधायला घेतो. अध्रे अधिक बांधून झाले की त्याची फिमेल ते घरटे पाहणार. तिला आवडले, तरच ती त्याची जोडीदार होणार! ती नाही म्हणाली तर नव्याने पुन्हा घर बांधा. मी प्रोजेक्ट केला नसता गेल्यावर्षी, तर मला हे सगळे नीट कळलेच नसते गं आई.’’ रेवा.

‘‘अगं, हो, हो. पक्ष्यांची मारामारी लाइव्ह बघितली वाटतं.’’ रेवाची आई म्हणाली.

‘‘हो, तर. आता तूच सांग, दुपारी बागेत जायचे नाही, असे डॅड सतत म्हणत असतो. पण मी आज दुपारी बागेत चक्कर टाकली नसती, तर मला हे प्रत्यक्ष बघायला मिळाले असते का? मग डॅडनेपण ‘नाही’ म्हणताना तो तसं का म्हणतो आहे त्याचं कारण सांगायला नको का? ’’ रेवा पुन्हा मूळ रडगाण्यावर आली.

आईने हसत रेवाला जवळ घेतले. ‘‘माझं पिल्लू किती विचार करायला लागलंय.’’  आईने रेवाचा गालगुच्चा घेतला.

‘‘आई, असं नको करू गं.’’ रेवा गाल चोळत म्हणाली.

‘‘हो का? मग तूपण कारण सांग गालाला हात का नाही लावायचा.’’ आई चेष्टा करत होती.

‘‘गालाला हात लावलेले मला आवडत नाही, मी लहान नाही आता.’’ रेवा म्हणाली.

‘‘अच्छा, पण तू माझ्यापेक्षा लहानच आहेस आणि माझी लाडकी लेक आहेस, त्यामुळे मी तुझा गाल ओढू शकते. तुझे कारण मला पटलेच नाहीये. मग?’’

‘‘आई!’’ रेवा हसून ओरडली आणि अभ्यासाला निघून गेली.

पण आता रेवाच्या डोक्यात हा एक किडा वळवळ करायला लागला. आपल्याला समजा एखाद्याने काही कारण सांगून नाही म्हटले. पण ते कारण आपल्याला पटले नाही, तर? आपल्याला पटेल असे कारण सांगून कोण आपल्याला नाही म्हणणार, नाही का?  म्हणजे, डॅड म्हणत असेल, दुपारी बागेत जात जाऊ नकोस, तर त्याचे कारण काय? ऊन लागते. पण बागेत सावली पण असतेच की. पुन्हा तेच कारण तो स्वतला लावत नाही. याचे काहीतरी उत्तर असणारच त्याच्याकडे. पण ते मला पटले पाहिजे! मला नाही पटले, तर त्याचे ते उत्तर आहे यार, असे मी तरी म्हटले पाहिजे. म्हणजे, कोण केव्हा आणि का नाही म्हणते, याचे आपल्याला उत्तर मिळाले, तरी आपल्या मनात प्रश्न येतातच. काय कटकट आहे राव या नाही म्हणण्याची!

आज रेवा शाळेतून बक्षीस घेऊनच घरी आली. सोबत तिची आवडती मैत्रीण सोनाक्षी होती. सोनाक्षीला चित्रकलेत आणि रेवाला वक्तृत्व स्पध्रेत बक्षीस मिळाले होते. आज आई-डॅडाने दोन्ही बक्षिसांचे कौतुक केले. पण डॅडने विचारलेच, ‘‘दुसरा नंबर कुणाला मिळाला?’’ रेवा आणि सोनाक्षी हसत हसत बोलल्या.

‘‘आम्ही ना-ही वि-चा-र-ले.’’

‘‘अरे, त्या मुलाच्या, मुलीच्या घरी आज म्हणत असतील, पहिला नंबर का नाही मिळाला?’’

‘‘श्या, आम्ही इतकी तयारी केली होती. दुसऱ्या नंबरवर असणाऱ्याने तितकी तयारी तर केली पाहिजे.’’ सोनाक्षी रेवाच्या डॅडला सांगते.

‘‘अच्छा, पण हे कारण त्याला कुठे सांगितले टीचरने? की तुझी तयारी कमी आहे बरे. यांची तयारी जास्त, म्हणून तुला दुसरा नंबर.’’ डॅडा म्हणाला.

रेवा ओरडली, ‘‘डॅड, त्याला कारण सांगितले आणि तो म्हणाला, नाही, माझीच तयारी जास्त आहे. रेवा आणि सोनाक्षीपेक्षा जास्त. तर टीचरचा निर्णय तो कसा ऐकेल?’’

‘‘तेच तर सांगतो आहे. त्याने तुमच्या टीचरचा निर्णय स्वीकारला. त्याने दुसरा नंबर घेतला म्हणजेच पहिला नंबर त्याला मिळाला नाही, ते स्वीकारले ना!’’ डॅड त्याचा मुद्दा सोडायला तयार नाही.

‘‘अरे, असा काय? त्यांना त्यांचे बक्षीस एन्जॉय करू दे पाहू. सुरू नको होऊस लगेच.’’ आई डॅडला तोडत म्हणाली.

‘‘सोनाक्षी, चल गं. आपण आईसक्रीम आणायला जाऊ. आमचे हे वेगळेच युद्ध आहे. तुला नाही कळणार ते.’’

रेवा आईकडून पसे घेते आणि सोनाक्षीसोबत घराबाहेर पडते. अंजीर असलेले एक आवडते फॅमिली पॅक असते दोघींचे आवडते. तेच आणायचे ठरते. पण ते नेमके नसते त्या आईसक्रीम पार्लरमध्ये. रेवा म्हणते, ‘यांच्या स्टॉकमध्ये अंजीर फ्लेवर नव्हते, ते घरी डॅडला सांगू नकोस हां! तो परत सुरू होईल. दुकानदार नाही म्हणाला, म्हणजे त्याने तुम्हाला ‘नो इज नो’ सांगितले. स्टॉकमध्ये ते नाही, हे कारणसुद्धा सांगितले. पण ते कारण तुम्हाला पटो न पटो ऐकून तर घ्यावेच लागले नां, असेच बोलणार बघ तो, रेवा डॅडची नक्कल करत सोनाक्षीला हे बोलून दाखवते. सोनाक्षी पण हसायला लागते.

एव्हाना दुसरे दुकान येते आईसक्रीमचे. रेवा दुकानदार काकांना सांगते, ‘‘काका, अंजीर फ्लेवर फॅमिली पॅक आहे? एक द्या’’.

‘‘पॅक आहे पण फ्रीज उघडू शकत नाही. लाइट गेलेत. फ्रीज उघडला आणि लाइट लवकर आले नाहीत, तर सगळे आईसक्रीम वितळून जाईल,’’ दुकानदार काका म्हणाले.

सोनाक्षी रेवाला म्हणते, ‘‘म्हणजे बघ. तुझा डॅड जे म्हणतो तेच. पहिल्या दुकानात हे पॅक नाही. कारण स्टॉक संपला. इथे आपल्या डोळ्यांसमोर हे पॅक आहे. पण ही काच बाजूला केली की सगळे आईसक्रीम वितळणार. कारण लाइट्स नाहीत. ते केव्हा येतील, ते पण माहीत नाही. त्यामुळे, चटकन उघडून लगेच बंद करू फ्रीज असेही म्हणता येत नाही. आता काय करायचे? आपल्याला तर फॅमिली पॅकच हवे आहे आणि अंजीर फ्लेवरचेच पाहिजे आहे. क्या यार!’’.

रेवा म्हणते, ‘‘हो गं सोनाक्षी, आपल्याला हवे ते असे समोर दिसते आहे. आपल्या हातात पसे पण आहेत. कोणाकडे तर हे आईसक्रीम घ्यायला पसे पण नसू शकतात. आपण पसे देणार आहोत. आपला फ्लेवर यांच्याकडे आहे. पण तरीही आपल्याला हवे ते आईसक्रीम आता तरी मिळू शकत नाही. हा पण एक नकारच आहे. आपण आता या कारणांचा विचार केला आणि हे समजून घेतले!’’

आता तिसरं दुकान. दुकानदार त्याचा छोटा फ्रीज उघडतो आणि अंजीर फ्लेवर आईसक्रीम शोधतो आणि नाहीये असं सांगतो. निघताना रेवा आणि सोनाक्षीच त्याला सांगतात, ‘‘अरे दादा, इथे लाइट्स नाहीत नां आता. मग तू हे फ्रीजचे दार का उघडलेस?’’ तो म्हणतो, ‘‘मला एसेमेस आलेला आहे. लाइट्स अजून दहाच मिनिटांत येतील. त्यामुळे, आता फ्रीज उघडला तरी वीस-पंचवीस मिनिटे तरी काही प्रॉब्लेम नाही आईसक्रीमला.’’ त्या दोघींना जाम भारी वाटतं.

पुढच्या एका चौकात नवे आईसक्रीम पार्लर झालेले दिसते. तिथे दोघी जातात. तिथे लाइट्स असतात, त्यांचा फ्लेवर पण असतो आणि त्यांना हवे ते आईसक्रीम मिळतेसुद्धा.

घरी आल्यावर आईसक्रीम खात खात अंजीर आईसक्रीमची गोष्ट इत्यंभूत सांगितली जाते. आई रेवाकडे बघून म्हणते, ‘‘तुला खरेतर अंजिरावर प्रोजेक्ट करता येईल. तू फिग वास्पबद्दल ऐकले आहेस का? अं, सोप्या भाषेत अंजिराचा किडा म्हणू.’’

‘‘अंजिराचा किडा?’’, रेवा आणि सोनाक्षी एकदम ओरडतात.

‘‘म्हणजे या आईस्क्रीममध्ये किडा आहे की काय?’’, रेवा विचारते.

डॅड मध्येच बोलतो, ‘‘आता आई सांगेल, तूच शोध पाहू! म्हणजे रेवाला अजून एक नकार किंवा टोलवाटोलवी! काही खरे नाही बाबा एका मुलीचे!’’

‘‘चूप रे डॅड तू. आई सांग नां या किडय़ाचे काय ते!’’, रेवा खूपच उत्सुक असते.

‘‘अगं रेवा, अंजिराच्या झाडाची वाढ त्याची काडी लावली तरी होते. अंजिराच्या झाडात तर मेल आणि फिमेलसुद्धा असते. अंजिराच्या फळाला एक छिद्र असते बारीकसे. हे फळ जरा मोठे झाले की हा अंजिराचा किडा एक छोटे छिद्र करून त्या फळात घुसतो. म्हणायला तो किडा. पण ती मादी असते’’, आई सांगते.

‘‘अय्या, पुढे काय होते मग?’’

‘‘मला माहितीये, माहितीये’’, सोनाक्षी मध्येच बोलते. रेवा तिला गप्प करते.

‘‘आई सांग नां. आता नकार देऊ नकोस प्लीज. नाहीतर तुझा टॅब तरी दे. मी शोधून घेते नेटवर.’’

‘‘टॅब मिळणार नाही. नाही म्हणजे नाही.’’ आई हसत सांगते.

‘‘तर, या अंजिराच्या फळात थेटच एंट्री मिळत नाही त्या मादी किडय़ाला. आत जाता जाता तिचे पंख आणि अँटेना तुटून पडू शकतात. अंजिराच्या फळाच्या आत.. खरंतर आतल्या बाजूने वळलेली फुले असतात ती. त्यांचे परागीभवन करायचे काम ही मादी करते. ती पण अशीच. एक काम केले की लगेच हिशेब ठेवणारी! ती ते करता करता तिची अंडी देखील त्या फळातल्या फुलांमध्ये घालून ठेवते. मग तिचे काम संपते आणि ती चक्क त्यात मरून जाते! मग हळूहळू त्या फळात बरेच काही घडते. आतमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन्ही किडे जन्माला येतात. फळाला देखील बारीक तडे गेलेले असतात. त्यातल्या स्त्रिया आता त्याच नर किडय़ांच्या अंडय़ांना घेऊन बाहेर पडतात. नरांचे काम झालेले असते. ते फळाच्या मध्येच मरून पडतात! मादी किडे दूरवर उडून जातात आणि नवीन, ताजी-ताजी अंजिराची फळे शोधतात.’’ आई अगदी सोपे करून सांगत असते.

रेवा एकदम ओरडते, ‘‘या आईस्क्रीममध्ये वापरलेल्या अंजिरात ती मादी आणि बाकीचे ते नर मरून पडलेले असतील? ’’.

‘‘अगं, ते निसर्गाचं चक्रच तर आहे ते. त्यांचे काम झाले की तो त्यांना नाकारतो!’’ डॅडची गाडी परत नकारावर आलीच.

‘‘रेवा, अगं डॅड म्हणतो, ते खरे आहेच. अंजिराच्या फळाने पंख नाकारले किडय़ाचे. पण ते अंडी घेतं किडय़ाची, कारण त्याचे परागीभवनाचे काम किडय़ाने केलेले असते. पण अंडी द्यायचे काम झाल्यावर निसर्गच त्या किडय़ाला नाकारतो. अंडी मात्र वाढू देतो. मग नवे नर त्यांचे काम करतात आणि तिथेच मरून जातात. शेवटी पुन्हा नव्या माद्या किडय़ातून बाहेर पडतात आणि त्यांची संख्या तर वाढवतातच, पण जे पक्षी अंजिरं खातात, त्यांच्यामार्फत बियांचा प्रसार होऊन अंजिराची झाडेही कुठे कुठे रुजतात.’’ आई समजावून सांगत असते.

सोनाक्षी इतका वेळ शांत बसलेली असते. ती आता मध्ये पडते. ‘‘केवळ मादी झाडाचीच फळं आपल्यापर्यंत येऊ शकतात. त्यात हे काही नसते. हे सगळे चक्र नर अंजिराच्या झाडात होते बरे रेवा!’’

‘‘म्हणजे, तिथेही काहीतरी कोणाला तरी नाकारले आहेच तर!’’ रेवा अगदी थकून गेलेली असते, सगळे निसर्गाचे चक्र ऐकून.

शाळेत पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनची स्पर्धा असते. रेवा ठरवते, ‘नाही म्हणजे नाही’ हाच विषय घ्यायचा. ती तिचा आईसक्रीमचा अनुभव, पक्ष्यांची मारामारी असे सगळे वहीत लिहून काढते. अंजिराच्या फळाचासुद्धा मुद्दा मांडायला हरकत नाही, असे ठरवते. पण आपल्याला ते सगळे गुंतागुंतीचे चक्र समजावून सांगता येईल का, तिला प्रश्न पडतो. ती ते मांडलेले खोडून टाकते.

डॅड घरी आल्यावर त्याच्याशी बोलून कुठे-कुठे आपल्याला नाही म्हटले जाते याची यादी करते. डॅडला म्हणते, ‘‘म्हणजे पहिली गोष्ट ही की कोणी तुम्हाला नाही म्हणाले आहे, ते डायजेस्ट केले पाहिजे. त्यावर एकदम आरडाओरडा नकोय करायला, बरोबर ना डॅड?’’

‘‘बरोबर. मग कोणी नाही का म्हणाले, याची त्याची बाजू असेल काही, तर ती ऐकून घ्यायला वेळ दिला पाहिजे. ते लगेच कळेल असेसुद्धा नाही. तर घाई करायची नाही. आपल्याला उत्तर मिळत नाही लगेच म्हणून फार मागे लागायचे नाही. आपली प्रेमाची व्यक्ती आपल्याला नाही सांगते, म्हणजे काही कारण असेल, ते समजेलच आपल्याला, असे स्वतला सांगितले पाहिजे त्या दरम्यान.’’

रेवा शाळेत टीचरकडे जाते. टीचर तिची नोटबुक बघतात. त्यांना रेवाने खोडून ठेवलेला अंजिराच्या फळाचा मुद्दा दिसतो. टीचर विचारतात तिला त्याबद्दल. रेवा मग ते पण सगळे सांगते. टीचर रेवाला सांगतात, ‘‘रिजेक्शन हा तुझा विषय छानच आहे. पण तो आपल्या या स्पध्रेच्या अटींमध्ये बसत नाही. त्यापेक्षा तू जी अंजिराच्या फळाची गोष्ट सांगितलीस नां, तिच्यावर बनवतेस प्रेझेंटेशन?’’ रेवाचा मुद्दाच रिजेक्शन हा असतो. त्यामुळे तिला नाराज न होण्याची अ‍ॅिक्टग तरी करावीच लागते. ती हसते आणि ‘‘लेट मी िथक.’’ असे म्हणून बाहेर पडते.

डॅड विचारतोच रेवाला, ‘‘काय मॅडम रेवा, काय म्हणाल्या टीचर?’’

रेवा थम्स डाऊनची खूण करते.

‘‘ते अटींमध्ये बसत नाही. त्यामुळे, आपली सगळी मेहनत वाया गेलेली आहे, असे तुला वाटेल डॅडा, पण तसे नाहीये. त्यांनी मला अंजिराच्या फळाची गोष्ट प्रेझेन्टेशनवर मांड असे सांगितलेले आहे. ती गोष्ट सांगता सांगता पण मी रिजेक्शनबद्दल बोलू शकतेच की.. येय! म्हणजे त्यांचे ऐकल्याचे त्यांना समाधान आणि मलाही माझा मुद्दा थोडा तरी सांगितला, ते समाधान.’’

‘‘दॅट्स द स्पिरिट रेवा!’’ डॅड म्हणाला.

तितक्यात आई आली. तिलाही रेवाने सगळं सांगितलं.

‘‘वा रे,  वा.. वा रेवा वा! कोणीतरी तुला ‘हे नाही करायचे’ असे सांगितले आणि तू इतकी खुशीत आहेस?’’ आई मजेत विचारते.

रेवा आणि डॅड नेहमीप्रमाणे एकमेकांना टाळ्या देऊन अंजिराच्या किडय़ाचे फोटो शोधायला नेट सुरू करतात!