– सुनिता कुलकर्णी
पुणे हा जादुई शब्द उच्चारला की अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यांसमोर अचाट बुद्धिमत्तेचा एक सागर उभा राहतो. करोनानामक एका क्षुद्र विषाणूने आपल्याला बांध घालायचा प्रयत्न करणं हे या सागराला कसं रुचणार? त्यामुळे हा बांध मोडून काढत उसळण्याचा तो अगदी भल्या पहाटेपासून प्रयत्न सुरू करतो ते मॉर्निंग वॉकच्या रुपात. पण पुणे पोलीस हे देखील याच अचाट बुद्धिमत्तेच्या सागरातून वेचलेले मोती असल्यामुळे ते देखील तितक्याच कल्पकपणे पुणेकरांना बांध घालण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

या कल्पक प्रयत्नांमधून पुणे पोलिसांनी काय काय केलं नाही? मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळचा व्यायाम. तुम्ही व्यायामाबद्दल एवढे सजग आहात तर चला आम्हीच घेतो तुमचा व्यायाम असं म्हणत पुणे पोलिसांनी काही ठिकाणी पुणेकरांना चक्क रस्यावर बसून आसनं करायला लावली. काही ठिकाणी सूर्यनमस्कार घालायला लावले. काही ठिकाणी कमांडो प्रशिक्षणात असतं तसं जमिनीवर झोपून सरपटायला लावलं. काही ठिकाणी शिक्षा म्हणून काही पुणेकरांना चक्क रस्त्यावर उन्हात नुसतं बसवून ठेवलं. तर काही ठिकाणी रस्त्यावर उठाबशा काढायला लावल्या. आता या शिक्षेचा आस्वाद घेतलेले पुणेकर दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडले की नाहीत, माहीत नाही, पण नंतर दिवसभरात रस्त्यावर भटकताना सापडलेल्या काही पुणेकरांची चक्क ओवाळणी करून, त्यांना केळ्याचा प्रसाद देऊन घरी पाठवणी करण्यात आली.

पुणे पोलिसांपासून प्रेरणा घेऊन राज्यातल्या इतर पोलिसांना विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर आणखी कोणत्या शिक्षा देता येतील याची यादीच एका पुणेकराने आम्हाला पाठवली आहे. त्याच्या मते करोना हा शब्द हजारवेळा लिहा, हिम्मतवाला सिनेमा इथे बसून सलग दहा वेळा बघा, ढिंच्यॅक पूजाचं सेल्फी मैंने ले ली आज, किंवा दिलों का शूटर, मेरा स्कूटर हे गाणं १०० वेळा ऐका, कच्चा पापड पक्का पापड बिनचूक म्हणून दाखवा, उलटे चालत घरी जा, दुचाकी डोक्यावर उचलून घेऊन चालत परत जा, तीसपर्यंतचे पाढे बिनचूक म्हणून दाखवा, मराठी शुद्धलेखन बिनचूक लिहून दाखवा, तुमच्या भागातल्या आमदार-खासदार-नगरसेवकांची नावं बिनचूक सांगा, काही अवघड इंग्रजी शब्दांचं स्पेलिंग बरोबर सांगा अशा आणखी कितीतरी शिक्षा करता येतील.

पण त्याहीपेक्षा सगळीकडच्या पोलिसांनी जाहीर करावं की आम्ही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना क्वारंटाइन केलेल्या संभाव्य करोना रुग्णांच्या सेवेची संधी देणार आहोत… त्या क्षणापासून पुण्यातच काय तमाम महाराष्ट्रात एकही माणूस विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसणार नाही.