टाळेबंदीमुळे समाजात संवाद, प्रेम, आपुलकी वाढली आहे. हजारो मैल दूर असलेली माणसं इंटरनेटच्या आधारे एकमेकांना भेटू लागली आहेत, ख्यालीखुशाली विचारू लागली आहेत. कधी नव्हे ते फोन करून विचारपूस करू लागली आहेत. पालकांना आपल्या पाल्याला वेळ देता येऊ लागला आणि पाल्यालाही आपल्या आई-वडिलांचा वेळ मिळू लागला. हे सगळं जरी खरं असलं तरी, हे सुखाचे क्षण समाजातील विशिष्ट वर्गापूरतेच (शक्यतो महानगर-शहरातील मध्यम आणि उच्च मध्यम) मर्यादित आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस घरातील हिंसा वाढत चालली आहेत.

हाताला काम नसल्यामुळे घरातील पुरुषांकडे पैसा शिल्लक नाही. त्यामुळे व्यसनाधीन पुरुषांकडून गावखेड्यांतील घरांमधून हिंसा टोक गाठत असल्याचे ग्रामीण स्त्रियांचे म्हणणे आहे. त्या सांगतात की, “आमचं हातावरचं पोट आहे. दिवसभर कष्टाचे काम केल्यानंतर आमच्या घरातील चूल पेटते. त्यात आमच्यातील काही स्त्रियांच्या पतींना दारू, तंबाखू, बीडीचे व्यसन आहे. दिवसभर काम करून आल्यानंतर दारू पिऊन आणि पोटभर जेवण करून पती झोपून जायचे. त्यामुळे आम्हाला किंवा घरातील इतर लोकांना फारसा त्रास नसायचा. मात्र, सध्या त्यांच्याकडे कामही नाही आणि पैसाही नाही. दारूचे व्यसन असल्यामुळे पती अस्वस्थ होताहेत. आज टाळेबंदी असली तरी काही ठिकाणी जास्त किमतीने दारू विकली जात आहे. त्यामुळे हे पुरुष दारू मिळावी, म्हणून घरात वारंवार भांडणं काढत आहेत. मुलाबाळांना मारत आहेत. वयस्कर आई-वडिलांना त्रास देत आहेत. आणि विशेष म्हणजे हे सगळं दारूच्या नशेत नसताना घडत आहे. दारूच्या किमती वाढल्यामुळे घरातील तांब्या- पितळेची भांडी, मोबाईल, पंखे, सायकली, असं बरंच काही भंगाराच्या दुकानात किंवा आजूबाजूला कोणाला नगण्य किमतीत विकून महागडी दारू मिळवली जात आहे. आणि पुन्हा त्याचा त्रास घरातील सदस्यांना होत आहे. कृपा करून सरकारने टाळेबंदी लवकर उठवावी.”

करोना विषाणूंचा वाढता कहर विचारात घेऊन शहरे किंवा महानगरे टाळेबंदीचे नियम तंतोतंत पाळत असतीलही मात्र, गावखेड्यांत परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. आजही खुलेपणाने दारू अव्वाच्यासव्वा किमतीने विकली जात आहे. त्यासाठी घरातील साहित्य विकले जात आहे, हे साहित्य विकत घेणारी भंगाराची दुकाने मागच्या दराने खुली आहेत. इतकंच नव्हे तर औषधांच्या दुकानांतून आणि किराणा दुकानातून ही दारू मोठ्या किंमतीने उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे घरातील हिंसा वाढत आहे आणि संसार उघड्यावर येतो की काय, अशी भीती ग्रामीण भागातील स्त्रियांना वाटत आहे.