सुंदर प्रशस्त, स्वच्छ आणि खड्डेविरहित रस्ते, टुमदार बंगले, नारळ—केळीच्या बागा, सुंदर समुद्रकिनारा अशा अनेक वैशिष्टय़ांनी कोचीला ‘क्वीन ऑफ द अरेबियन सी’ हा किताब मिळवून दिला आहे.
कोची-एर्नाकुलम ही केरळमध्ये येणाऱ्या पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. ही शहरे पाहण्याची माझीही बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती. या शहरांबरोबरच त्याच्या आसपासच्या ठिकाणांबद्दल बरेच काही ऐकले-वाचल्यामुळेही ही शहरे पाहण्याची इच्छा होती. या भगिनीनगरी पाहण्याची संधी अलीकडे चालून आली आणि ती संधी न दवडल्यामुळे या शहरांना धावती का होईना भेट देता आली.
कोची-एर्नाकुलम ही केरळमधील महत्त्वाची शहरे असून, अलीकडील काळात त्यांच्या विकासाचा वेग झपाटय़ाने वाढला आहे. एर्नाकुलम हे भारतातील एकमेव शहर आहे, जिथे तीन ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ मंजूर झालेली आहेत. कोची हे दक्षिण भारतातील मोठे महत्त्वाचे बंदर असून, नौदलासाठी तसेच व्यापारी कंपन्यांसाठी युद्धनौका आणि अन्य जहाजे बांधणारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडची मोठी गोदी येथे आहे. इतकेच नव्हे तर भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, तेलशुद्धीकरण प्रकल्प, केरळ उच्च न्यायालय अशा अन्य महत्त्वाच्या संस्थाही येथे आहेत. तरीही या शहरांमध्ये गोंगाट, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव जाणवला नाही. सुंदर, प्रशस्त, स्वच्छ आणि खड्डेविरहित रस्ते, टुमदार बंगले, नारळ-केळीच्या बागा, सुंदर समुद्रकिनारा अशा अनेक वैशिष्टय़ांनी या शहराला ‘क्वीन ऑफ द अरेबियन सी’ हा किताब मिळवून दिला आहे. आज कोचीतील अनेक जण व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे कोचीच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळविण्यात फारशी अडचण आली नाही. शहराच्या २२ किलोमीटर उत्तरेला वसलेल्या या विमानतळाचे आता आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यापूर्वी कोची हे एक संस्थान होते. ब्रिटिशांनी या शहराचे नाव कोचीन असे केले होते, मात्र १९९६मध्ये या शहराला त्याचे पूर्वीचे कोची हे अधिकृत नाव देण्यात आले. आज कोची शहर एर्नाकुलम जिल्ह्याचाच एक भाग आहे. कोची बंदराच्या किनाऱ्यावरील भाग मुंबईतील चौपाटीप्रमाणे विकसित करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण परिसरात कोठेही कचरा-अस्वच्छता आढळत नाही. या ठिकाणी बसून बंदर आणि तेथे उभी असलेली वेगवेगळी जहाजे न्याहाळता येतात. जर या बंदरात बोटीतून फेरी मारावी असे वाटले, तर तशी
सुविधाही येथे उपलब्ध आहे. या ठिकाणी बोटीत बसून बंदराची फेरी मारण्याचा मोह न आवरल्याने मी आणि माझा मित्र एका बोटीवर स्वार झालो. एखाद्या मोठय़ा बंदरात फेरी मारण्याची ती आमची पहिलीच वेळ होती. त्यामुळे आम्ही बरेच उत्साहात होतोच. या एक तासाच्या स्वारीत बंदरात नांगरलेली विविध प्रकारची जहाजे जवळून पाहता आली. त्यावेळी बोटीत असलेला गाईड त्या जहाजांबद्दलची माहिती देत होताच. एका आलिशान जहाजाच्या जवळ पोहचल्यावर गाईडने सांगितले की, ही लक्षद्वीपसाठीची क्रूझ शीप आहे. कोचीच्या या बंदरातूनच अरबी समुद्रात वसलेल्या लक्षद्वीपची राजधानी असलेल्या कवरट्टीसाठी हे जहाज ये-जा करते. त्यावेळी दूर सागरातून निघालेले महाकाय जहाज नजरेस पडले. संथपणे आपल्या प्रवासाला निघालेले ते जहाज बराच वेळ एकाच जागी थांबल्याचा भास होत होता. आपल्याला फेरी मारून आणले जाते ते कोचीचे मूळचे बंदर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मोठय़ा प्रमाणात वाढू लागल्यावर या बंदरातील व्यापारी जहाजांची वाहतूकही वाढली आहे. त्याचबरोबर तीन विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) कोचीत आल्यामुळे भविष्यात बंदरातील वाहतुकीत आणखी वाढ होणार आहे. त्यातच भारताच्या सुरक्षेला आणि हिंदी महासागरातील राष्ट्रहितांनाही धोके वाढू लागले आहेत. त्यांचा सामना करणे शक्य व्हावे, या हेतूने कोचीतील भारतीय नौदलाच्या तळाचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे नौदलासाठीही स्वतंत्र बंदर नव्याने विकसित करण्यात येत आहे.
या फेरीनंतर किनाऱ्यावर असलेल्या अनेक दुकानांमध्येही फेरफटका मारला. वेगवेगळ्या वस्तू विशेष करून लाकडावर अतिशय बारीक कोरीवकाम केलेल्या वस्तू लक्ष वेधून घेत होत्या. त्या वस्तू महागडय़ा असल्या तरीही खरेदी करण्याचा मोह होतच होता आणि बघताबघता लाकडी हत्ती, की-चेन, संगमरवराच्या छोटय़ाशा तुकडय़ावर कोरलेली चित्रे अशा चार-पाच वस्तू खरेदी करून टाकल्या.
चौदाव्या शतकात कोची हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र बनले होते. मसाल्याच्या पदार्थाचा येथून होणाऱ्या निर्यातीतील महत्त्वाचा वाटा होता. कोची बंदरातून आफ्रिका आणि पश्चिम आशियाला प्रामुख्याने ही निर्यात होत असे. सोळाव्या शतकात कोचीवर पोर्तुगीज, डच, ब्रिटिश अशा वेगवेगळ्या युरोपीयन सत्तांनी राज्य केले. सन १५००मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी पेद्रो अल्वारेस काब्राल याने कोचीत वसाहत स्थापन केली. ती भारतातील पहिली युरोपीयन वसाहत होती. १६६३पर्यंत कोचीवर पोर्तुगीजांची सत्ता राहिली. त्यानंतर ब्रिटिशांनी कोचीवर नियंत्रण मिळविले. कालांतराने ब्रिटिशांनी कोचीच्या पूर्वीच्या हिंदू राजघराण्याला पुनस्र्थापित केले आणि कोचीला भारतातील ब्रिटिश सत्तेतील एका संस्थानाचा दर्जा दिला.
कोचीमध्ये पाहण्यासारखी आणखीही काही ठिकाणे आहेत. खूप पूर्वीपासून कोचीमध्ये ज्यू धर्मीयांचे वास्तव्य आहे. त्यांना येथे ‘कोचीन ज्यूज’ म्हणून ओळखले जाते. कोचीनमध्ये स्थायिक झाल्यावर त्यांनी आपली प्रार्थनास्थळे – सिनेगॉग – येथे उभारण्यास सुरुवात केली. बाराव्या शतकात त्यांनी कोचीमध्ये काही
सिनेगॉग बांधले होते. त्यातील काही सिनेगॉग अजून अस्तित्वात आहेत. त्यांपैकी एक सिनेगॉग ‘परदेसी सिनेगॉग’ म्हणून ओखळले जाते. सोळाव्या शतकात युरोपातून कोचीत स्थलांतरित झालेल्या ज्यूंनी ते सिनेगॉग बांधले आहे, म्हणून त्याचे नाव पडले ‘परदेसी सिनेगॉग’. कोचीनच्या तत्कालीन राजांकडून जमीन मिळाल्यावर १५६८मध्ये हे सिनेगॉग बांधले गेले. त्यावेळी कोचीचे नाव ‘कोगीन’ असल्याचे या सिनेगॉगच्या भिंतीवर बसविलेल्या त्यावेळच्या सीलवरून स्पष्ट होते. ‘परदेसी सिनेगॉग’मध्ये अनेक ऐतिहासिक वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. जसे सिनेगॉगला भेट मिळालेला सुवर्ण मुकुट वगैरे वगैरे. त्याचबरोबर दहाव्या शतकात तयार करण्यात आलेले आणि तमीळ भाषेत लिहिलेले दोन ताम्रपटही येथे ठेवलेले आहेत. त्यावेळी मलबार किनाऱ्यावर तमीळ राजघराण्याचे राज्य असल्याचे त्यावरील उल्लेखावरून समजते. या सिनेगॉगचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात बसविलेल्या चिनी मातीच्या फरशा. अठराव्या शतकात या फरशा सिनेगॉगमध्ये बसविण्यात आल्या होत्या. या फरशांवर खास चिनीशैलीत चित्रे रंगविण्यात आली आहेत. एक घडय़ाळाचा टॉवरही अठराव्या शतकातच येथे उभारण्यात आला आहे. आज कोचीमध्ये वापरात असलेले हे एकमेव सिनेगॉग आहे.
कोची म्हटले की पटकन आठवतात ती येथील वैशिष्टय़पूर्ण मासेमारीची चिनी जाळी, म्हणजेच ‘चायनीज नेट्स’. ही जाळी नेहमीप्रमाणे समुद्रात फेकून मासेमारी केली जात नाही, तर किनाऱ्यावर बसविलेल्या बांबूंपासून तयार केलेल्या संरचनेला जाळे बांधले जाते. भरतीच्यावेळी बांबू खाली करून जाळे पाण्यात सोडले जाते आणि भरती कमी होत जाताना जाळे तिथल्या तिथेच वर उचलले जाते. अशा पद्धतीने या जाळ्यात मासे पकडले जातात. मात्र या प्रकारचे जाळे ठरावीक मर्यादेपर्यंतच खोल जात असल्यामुळे त्याद्वारे मासे पकडले जाण्याचे प्रमाणही पारंपरिक जाळ्यापेक्षा बरेच कमी असते. मात्र या जाळ्यांनी कोचीला एक वेगळी ओळख करून दिली आहे, हे नक्की.
कोचीमधील जेमतेम दीड दिवसाच्या वास्तव्यात तेथे अस्सल इडली, डोसा या पदार्थाचा आस्वाद घेता आला. रोज पोळी-भाजी, आमटी-भात असे जेवण्याची सवय असलेल्या आम्हाला सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत इडली-डोसेच खावे लागले. कारण केरळमध्ये हॉटेलमध्ये जेवण ठरावीक वेळेतच मिळते. ती वेळ चुकली की, मग डोशावरच वेळ मारून न्यावी लागते. मर्यादित वेळेतही कोचीचा जो अनुभव मिळाला तो नक्कीच आनंददायक होता. म्हणूनच परतीच्या प्रवासात एक संकल्पही सोडला, या सुंदर शहराला पुन्हा एकदा शांतपणे भेट देण्याचा.