04 April 2020

News Flash

वार्षिक भविष्य २०२०

फलज्योतिष शास्त्रातील ग्रह आणि संख्याशास्त्रातील सूर्याचे दर महिन्याला होणारे राश्यांतर या दोन्हीच्या समन्वयातून येणारे निष्कर्ष खूपसे सत्यस्वरूपात दिसून येतात.

संख्या इ. सन २०२० या सालावर २+०+२+०=४ या अंकाचा म्हणजे हर्षल या ग्रहाचा प्रभाव असणार आहे.

भविष्य विशेष
उल्हास गुप्ते – response.lokprabha@expressindia.com

निसर्ग तसेच पृथ्वीवरील प्राणिमात्र यांच्या नात्यात सारखीच संवेदनशीलता दिसते. मनुष्य आपली सुखदु:खे मनाच्या साह्य़ाने प्रकट करीत असतो. तर निसर्ग अतिवृष्टी, प्रलय, धरणीकंप, ज्वालामुखी यातून व्यक्त होत असतो. फलज्योतिष शास्त्रातील ग्रह आणि संख्याशास्त्रातील सूर्याचे दर महिन्याला होणारे राश्यांतर या दोन्हीच्या समन्वयातून येणारे निष्कर्ष खूपसे सत्यस्वरूपात दिसून येतात. या दोन्ही शास्त्राच्या मदतीने २०२० चे भविष्य निदान विस्तृतपणे पाहू या.

संख्या इ. सन २०२० या सालावर २+०+२+०=४ या अंकाचा म्हणजे हर्षल या ग्रहाचा प्रभाव असणार आहे. हर्षलचा मानसिक स्थितीशी खूप जवळचा संबंध येतो. लहरीपणा, चंचलता यामुळे सतत निर्णय बदलत राहणे आणि विशेष म्हणजे पूर्ण वर्षभर हर्षलचे वास्तव्य मेष राशीत असणार आहे. म्हणजेच मंगळाच्या राशीत असणार आहे. त्यामुळे कठोर निर्णय, वादविवाद, स्वार्थीपणा यांचे पडसाद वर्षभर सतत आजूबाजूच्या वातावरणात दिसून येतील.

सन २०२० सालावर ४ अंकाचा प्रभाव असणारच आहे. पण मुळात या इसवी सनात २० आणि सालही २० वे या २०२० मध्ये दोन वेळा २ आले आहेत आणि शून्यही दोन आहेत. एकूण संख्याशास्त्रात याला फार महत्त्व आहे. संपूर्ण तारखेत शून्य अधिक वेळा प्रवेश करते तेव्हा ती तारीख ‘विशेष’ ठरते, इतकेच नव्हे तर ज्या अंकाच्या पुढे शून्य येईल त्या अंकाच्या सद्गुणाची बऱ्याच प्रमाणात वाढ होते. मात्र हळव्या अंकामागे शून्य आले तर समस्यांमध्ये अधिक भर पडते. या वर्षी दोन अंकाची उपस्थिती आणि त्यावर दोन वेळा येणारे शून्य काहीसे उपद्रवी ठरेल.

मात्र या काळात मनाचे संतुलन राखण्यात जे यशस्वी ठरतील ते आपल्या कामाची व्यापकता सहज वाढवू शकतील. हा अनुभव विशेष करून जन्मदिनांक १, १०, १९ आणि २८ तसेच ४, १३, २२, ३१ तसेच ५, १४, २३ या तारखांना जरूर येईल. विशेषत: २, ११, २० आणि २९ तसेच ७, १६, आणि २५ या जन्मतारखेच्या लोकांनी आपले मानसिक आरोग्य जपावे. प्रेम प्रकरणे, चुकीची नाती निर्माण करू नयेत. आर्थिक व्यवहार जपून करावेत. अति हव्यासातून पैशाची गुंतवणूक करणे टाळावे. ६, १५ आणि २४ तसेच ८, १७, २६ आणि ९, १८, २७ या जन्मतारखांनी वादविवाद, कोर्टकचेरीपासून दूर राहावे आर्थिक व्यवहार जपून करावे.

व्यंकटेश स्तोत्रात एक उत्तम कडवे आहे.

माझिया अपराधांच्या राशी। भेदोनी गेल्या गगनासी॥

गगनाला भिडतील असे अपराध, घोटाळे ज्या राजकारण्यांनी केले आहेत, अशा बेताल राजकारण्यांना २०२० हे साल त्रासदायक ठरेल. न्यायदेवतेच्या समोर त्यांना उभे रहावे लागेल, हे निश्चित.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख १७ नोव्हेंबर १९५०. गेल्या वर्षी २०१९ या २+०+१+९=१२= ३ हा अंक जन्मतारखेचा येणारा मूलांक ८ चा मित्रांक होता. या वर्षी २०२० चा मूलांक ४ येतो. ४ आणि ८ अंकाचे फारसे जमत नाही. त्यामुळे या वर्षांत त्यांना संकटांना सामोरे जावे लागेल. विशेष म्हणजे ते त्यात यशस्वी ठरतील. नितीन गडकरी यांची जन्मतारीख २७-५-१९५७ यांचा मूलांक ९, तर भाग्यांक ९ येतो. त्यांना हे साल राजकीय दृष्टीने खूपच चांगले जाईल. भाजपाला अडचणींमधून बाहेर काढण्यात त्यांची शिष्टाई यशस्वी ठरेल.

मेष : २१ मार्च ते १९ एप्रिल

आपला जन्म २१ मार्च ते १९ एप्रिल दरम्यान झाला असेल तर या कालावर ९ अंकाचा म्हणजे मंगळाचा प्रभाव असतो, तर २०२० चा एकांक २+०+२+० = ४ येतो. चारवर हर्षल ग्रहाचे वर्चस्व असते. एकंदरीत या वर्षी वर्षभर मंगळ+हर्षल ग्रहाचा दबाव मेष राशीवर असणार आहे. त्यामुळे अतिभावनिक होणे, मानसिक संतुलन बिघडणे अशा गोष्टींपासून कटाक्षाने दूर राहणे हिताचे ठरेल. वादविवाद, प्रक्षोभता यातून निर्णय होणार नाहीत.  पण शांतपणे विचारपूर्वक घेतलेले निर्णय मोठा आधार ठरतील. आनंदाची गोष्ट म्हणजे गुरूचे उत्तम सहकार्य लाभणार आहे नि त्यातून खूपशा समस्या दूर होतील. आरोग्य, स्वास्थ्य आणि आर्थिक बाबतीत खूप सुखद बदल दिसून येतील. तसेच दशम स्थानातील शनी प्रवेश स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील, कोर्ट-कचेरी प्रकरणात यश मिळेल.

जानेवारी २०२० : गुरू-शनीचे उत्तम सहकार्य असल्यामुळे अडचणीचे रूपांतर अनुभवात होईल आणि बऱ्याच कामात सहजता प्राप्त होतील. आपण आखत असलेल्या योजना मार्गी लागतील. कामांना गती प्राप्त होईल. मित्रमंडळीत, सार्वजनिक कार्यात शब्द जपून वापरा. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

फेब्रुवारी २०२० : खर्चाचे प्रमाण वाढेल. अचानक सुरू झालेला विरोधी सूर हळूहळू कमी होईल. विरोधकांचे डावपेच त्यांच्या अंगाशी येतील, मात्र नोकरी-उद्योगधंद्यात गाफील राहू नका. कामाचे स्वरूप ओळखून वेळेला महत्त्व द्या. अतिविश्वास, अतिअवलंबून राहणे कटाक्षाने टाळा.

मार्च २०२० : या महिन्यातील पूर्वार्धातील रवीचा प्रवास खूप आनंद देईल. आर्थिक आवक वाढेल तितकेच खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीधंद्यात आपल्या कामाचे कौतुक होईल. नवीन ओळखी, नवीन परिचयातून भावनिक मैत्री वाढेल, पण अतिरेक टाळा. कारण पुढील काळाची गणिते आणि दैव साथ देतीलच असे नाही.

एप्रिल २०२० :  महिन्याच्या सुरुवातीचा काळ आरोग्याच्या दृष्टीने काहीसा कठीण जाईल, पण उपाययोजनेतून त्यातून सुटका होईल. वेळेवर औषधपाणी व्यायाम नि योग्य आहार यातून खूपच सुधारणा होईल. नोकरी आणि विशेषत: उद्योगधंद्यात नको ते साहस टाळा. जागरणे, वेळकाढूपणा, गप्पा यांना वगळून कामाकडे लक्ष द्यावे.

मे २०२० : उत्तम यश, शुक्राचे उत्तम सहकार्य असल्यामुळे आर्थिक बाबतीत देण्या-घेण्याच्या व्यवहारात लाभदायक घटना घडतील. मेहनत, श्रम नि सत्यता अडचणीचा मार्ग सोपा करतील. घेतलेले निर्णय यश देतील. मित्र-परिवार-नातेवाईक यांच्यातील स्नेहसंबंध अधिक आनंद देतील.

जून २०२० : पराक्रमात रवी. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ. आर्थिक बाजू उत्तम राहील. विशेषत: उद्योगधंद्यातील कामांना गती प्राप्त होईल. मात्र अतिविश्वास, चुकीचे व्यवहार यात फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. रागाने बोलणे, संबंध तोडणे अशा टोकाच्या भूमिका घेऊ नका.

जुलै २०२० : रवी-मंगळाचा असहकार असल्यामुळे काहीसा त्रासाचा, मनस्तापाचा काळ आहे. महत्त्वाचे निर्णय त्वरित घेऊ नका. धंद्यात नफा-तोटय़ाची बाजू ओळखून पुढचे व्यवहार करा. घरातील नातेवाईक मंडळींची मने दुखवू नका. नाती जपा. खाण्यातला अतिरेक टाळा. आरोग्य जपा. जागरणे टाळा.

ऑगस्ट २०२० : रवी-मंगळ अधिक पेच निर्माण करतील. मात्र शुक्राच्या सहकार्यातून घरचे वातावरण खूपसे स्थिर राहील. आपल्यासाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे. उद्योगधंद्यात, नोकरीत सावधानता बाळगणे खूप गरजेचे राहील. प्रवासाचे योग येतील. धावपळ वाढेल, मात्र हळूहळू नवे सकारात्मक बदल दिसू लागतील.

सप्टेंबर २०२० : षष्ठातल्या रवी प्रवेशातून खूपशा गोष्टी मार्गी लागतील. स्थिरपणे राहून घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. गैरसमजुतीतून निर्माण झालेले वाद सामोपचाराने मिटतील. आरोग्य उत्तम राहील. विरोधक शांत होतील. एकूण धावपळीच्या गडबडीतून यशाचे संकेत मिळतील.

ऑक्टोबर २०२० : अष्टमातील राहू आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरेल. तेव्हा पथ्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. राहू-केतूच्या या स्थितीत नवीन व्यसने लागू नयेत याची काळजी घ्यावी. नोकरीधंद्यात स्पर्धा करू नका. आर्थिक संकटे येणार नाहीत, याची काळजी घ्या. सामोपचाराने वागणे हिताचे ठरेल.

नोव्हेंबर २०२० : रवी-शुक्र फारसे साह्य़ करणार नाहीत. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. नोकरीधंद्यात अचानक समस्या उभ्या राहतील. पण त्या फार काळ टिकणार नाहीत. शक्यतो पैशाचे उधार-उसनवार व्यवहार टाळावेत. मानसिक संतुलन जपावे. खूपशा गोष्टींना महिना अखेर गती प्राप्त होईल.

डिसेंबर २०२० : उद्योगधंद्यात, नोकरीत घाईगर्दीने कोणतेच निर्णय घेऊ नका. आपल्या अंतर्मनात प्रचंड ताकद असते. केवळ नकारात्मक विचार करून ती वाया घालवू नका. वडील, अधिकारी वर्गाचा वेळोवेळी सल्ला घ्या. तो मोलाचा ठरेल. नवीन कामे तूर्त नकोत.

वृषभ : २० एप्रिल ते २० मे

या वर्षीचा २०२० सालचा एकांक चार येतो. चार म्हणजे हर्षल आणि त्यासोबत प्रचंड ताकदीची दोन शून्ये. वृषभ ही शुक्राची रास. शुक्राचा अंक ६ येतो. ६ आणि ४ चे फारसे जमत नाही नि अशा वेगळ्या स्थितीतून वृषभ राशीचा वर्षभर प्रवास होणार आहे. शुक्राच्या सुंदर मानसिकतेचा बाजार होऊ नये, मनाला भावणाऱ्या उच्च विचारांना विकृत स्वरूप येऊ नये याची जरूर काळजी घ्यावी. मनुष्यजीवनात वासना, लोभ या गोष्टी निसर्गात: निर्माण झालेल्या आहेत, पण त्यापलीकडेही एक जग आहे. त्या जगात प्रेम, वात्सल्य हे शब्द आपल्या मनाला आधार वाटतील मात्र भावविवश होऊन सहानुभूतीच्या दारात वारंवार उभे राहू नका. त्याची एक सवय लागेल.

जानेवारी २०२० : गुरू अष्टमात असला तरी महिनाअखेरीस शनी भाग्यात प्रवेश करीत आहे. त्यामुळे बरीच कामे मार्गी लागतील. नवीन योजना, नवीन कामे यात यश लाभेल. मात्र यश टिकवणे ही आपली जबाबदारी असेल. आर्थिक बाबतीत सांगायचे तर पैसे जपून वापरा. आरोग्य जपा.

फेब्रुवारी २०२० : हा महिना खूपसा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. व्यापार उद्योगधंद्यात चढउतार दिसून येईल. आर्थिक व्यवहारात गैरसमज होतील. नातेवाईक आप्तेष्ट मानापमानाचे नाटय़ रंगेल, पण आपण आपला चांगुलपणा जपा. कालांतराने हीच माणसे जवळ येतील.

मार्च २०२० : लाभात रवी असल्यामुळे उद्योगधंद्यात, नोकरीत कामाची समीकरणे जमून येतील. २२ मार्चपर्यंत वाहने काळजीपूर्वक चालवा. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. भांडणे, वादविवाद टाळा. गैरसमज दूर करा. महिनाअखेर अपेक्षित धनलाभ. राजकारणात  आखलेले डावपेच यशस्वी ठरतील. कौटुंबिक आनंदात भर पडेल.

एप्रिल २०२० : आपल्यापाशी असलेल्या चौफेर दृष्टीचा उपयोग करा. सामाजिक कार्यात, राजकारणात आपली मते आपल्या सूचना यांचा आदर केला जाईल. तब्येतीची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ टाळा. साथीच्या आजारापासून जपा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. वेळेला महत्त्व देऊन कामाचा उरक आटपा.

मे २०२० : दशमातील मंगळ उद्योगधंद्यात, नोकरीत गैरसमज निर्माण करील. कौटुंबिक वातावरणात गैरसमज, वादविवाद निर्माण होतील. पण गुरूच्या सहवासातून सामोपचार निर्माण होऊन वातावरण शांत होईल. घरातील तरुण मुलांना परदेशगमनाची संधी उपलब्ध होईल. पोटाच्या किरकोळ तक्रारी त्रास देतील.

जून २०२० : लाभात मंगळामुळे प्रयत्नाला मेहनतीची साथ मिळाली तर प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल. मात्र अति घाई, नको असलेले साहस टाळा. खूपसे दुसऱ्यावर अवलंबून असणे त्रासदायक ठरेल. कामाचे वेळापत्रक पाळा. आर्थिक बाजू हळूहळू बळकट होईल. स्थिरतेतून मार्ग जवळ येतील.

जुलै २०२० : रवी-शुक्र त्रिएकादश योगातून उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम आर्थिक प्रगती साधू शकाल. मात्र उत्तम नियोजन हा त्यातील भाग महत्त्वाचा असेल. तो व्यवस्थित सांभाळणे खूप गरजेचे ठरेल. बाकी ग्रहांचे सहकार्य मिळणार नाही, पण धीराने वाटचाल करून पुढे जाऊ शकाल.

ऑगस्ट २०२० : खर्चाचे प्रमाण वाढेल. उद्योगधंद्यात काहीसे मंदीचे सावट निर्माण होईल. कामात कोणतेही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. वादग्रस्त भूमिका घेऊ नका. समजुतीच्या मार्गातून खूपशा गोष्टी सोप्या होतील. नकारात्मक भाव मनात ठेवू नका. कालांतराने परिस्थितीत बदल होऊन समाधान लाभेल.

सप्टेंबर २०२० : पराक्रमात शुक्र असल्यामुळे उत्तम प्रगतीचा काळ. आपण कामधंद्यात करीत असलेल्या प्रयत्नांचे पडसाद हळूहळू दिसू लागतील. तर कौटुंबिक वातावरणातला तणाव कमी होईल. मात्र अतिभावनिक होऊ नका. परिस्थितीचा अंदाज घेऊन उद्योगधंद्यात नोकरीत कामाचे स्वरूप बदलू शकाल. डावपेच यशस्वी कराल.

ऑक्टोबर २०२० : रवी-मंगळ शुभ स्थितीत, गुरू नवमात असल्यामुळे उत्तम काळ. प्रयत्नास चांगली साथ लाभेल. नवीन कामे, नव्या योजना आकार घेतील. बोलण्या-वागण्यातील नम्रता आपल्या कामात महत्त्वाची ठरेल. एकंदरीत या कालात आपली कामे उरकून घ्या. आपली आर्थिक बाजू हळूहळू बळकट होत जाईल.

नोव्हेंबर २०२० : गुरू ग्रहाचा एकमेव आधार मोलाचा वाटेल बाकी ग्रहांनी काही काळ दुर्लक्षित केले असले तरी त्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही. पण त्यामुळे श्रम-धावपळ वाढेल. येणाऱ्या समस्या फार काळ टिकणार नाहीत, पण त्यातील अनुभव बरेच काही शिकवून जाईल.

डिसेंबर २०२० : अष्टमातील रवी असल्यामुळे वाहने काळजीपूर्वक चालवा. उद्योगधंद्यात, नोकरीत फाजील आत्मविश्वास दूर ठेवा. कोर्टकचेरीपर्यंत मजल मारलेली प्रकरणे समजुतीने मिटवा. जुने  हेवेदावे बाजूला ठेवून स्वत:हून मैत्रीचा हात पुढे करा. निर्थक गोष्टींना मनात थारा देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन : २१ मे ते २० जून

ज्यांचा जन्म २१ मे ते २० जून दरम्यान झाला आहे, अशा लोकांवर ५ अंकाचा म्हणजे बुध ग्रहाचा अंमल असतो. यावर्षी २०२० चा एकांक ४ येतो. चार मुलांक हर्षल ग्रहाचा. या चारचे पाच अंकाशी खूप छान मैत्रीचे नाते आहे. त्यामुळे यावर्षी ही माणसे आपल्या उत्तम बुद्धीचा वापर उद्योगधंद्यात, राजकारणात करून अलौकिक यश प्राप्त करतील. मात्र बुद्धीच्या बाजारात पैशाचा पाऊस पडू लागला की मतिहीन होण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी काही मानसिक पथ्ये पाळली तर जीवनात समतोल कायम राहील आणि आपल्या जीवनाचे सार्थक होईल, यात शंका नाही. ऐहिक सुखांना ओलांडून जाताना यश आपल्या मागे धावत असते, असा विशेष अनुभव हर्षल ग्रहाच्या सान्निध्यात यावर्षी आपल्याला अनुभवयास मिळेल हे निश्चित.

जानेवारी २०२० : बुध-मंगळाचा शुभ सहवास नवीन वर्षांत आपले स्वागत करीत आहे. हा दीर्घकाळ लाभणारा सहवास आपल्याला उद्योगधंद्यात, नोकरीत लाभदायक ठरेल. आपल्या सर्व कामात आपली घोडदौड उत्तम ठरेल. आपल्यापाशी असलेल्या दूरदृष्टीचा, बुद्धीचा उपयोग करा. चिंतन-मनन हे आपल्याला उत्तम मार्गदर्शक ठरतील.

फेब्रुवारी २०२० : रवी-बुध-शुक्राचे उत्तम साह्य़ या कालावधीत लाभेल. सदिच्छा केल्या की मार्ग सापडतो, अर्थात सकारात्मक विचारांची उजळणी हा एक यशस्वी जप ठरतो असा प्रत्यय या महिन्यात येईल. खूप हळवे होणे, भावूक होणे या गोष्टी करू नका. सहनशक्ती वाढवा.

मार्च २०२० : मंगळ-बुध त्रिएकादश योगातून प्रसन्नतेचा काळ आहे. हा महिना फारसा त्रासदायक ठरणार नाही. आपल्यापाशी असलेल्या सुज्ञ बुद्धीचा वापर करा. उद्योगधंद्यात नोकरीत नवीन कल्पना आकार घेतील. मान-अपमान अशा क्षुल्लक वादात न अडकता वेळेला, कामाला महत्त्व द्या. आरोग्य उत्तम राहील.

एप्रिल २०२० : अष्टमात मंगळ असल्यामुळे वाहन चालवताना अतिरेक टाळा. एकादशातील रवी प्रगतीचा आलेख अधिक उंच करील. उद्योगधंद्यात, नोकरीत घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. धन, मानसन्मान लाभेल. आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यातून आत्मविश्वास वाढीस लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मे २०२० : हा महिना काहीसा संमिश्र स्वरूपाचा असेल. व्यापार-उद्योगात चढउतार दिसून येतील. आर्थिक देण्याघेण्यावरून वादविवाद टाळा. रोज समजून घेणारी माणसे वाकडय़ा वळणाने जाण्याचा प्रयत्न करतील. त्यांना खुबीने आपलेसे करा. गैरसमज दूर करा. महिनाअखेर शुभदायक कालाची सुरुवात होईल.

जून २०२० : १५ जूनपर्यंत आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यात पथ्ये पाळा. उद्योगधंद्यात, नोकरीत नवीन संधी चालून येतील. त्या सोडू नका. नकारात्मक भाव मनात ठेवू नका. मेहनत, श्रम, प्रयत्न या जोरावर आपण सहज यश मिळवू शकाल. पैसा जपून वापरा. कलाक्षेत्रातल्या लोकांना नवीन संधी चालून येतील.

जुलै २०२० : गुरू-धनू राशीत परत येत आहे. एकूण गुरूच्या शुभ दृष्टीतून खूपशा कामांना गती प्राप्त होईल. नवीन विचार, नवीन कल्पना आनंदात जगण्यासाठी खूपच मदत करेल. नेहमीचा गोंधळ, चिडचिडेपणा कमी होईल. दुसऱ्याच्या दु:ख-व्यथा समजून घ्या. प्रवासातील ओळखी, मैत्री यात फारसा वेळ वाया घालवू नका.

ऑगस्ट २०२० : रवी-मंगळाची उत्तम फौज आपल्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे उद्योगधंद्यात, कामात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. कलासाहित्य, शिक्षण क्षेत्रात आपल्या बहुमोल कामाची प्रशंसा होईल. वरचेवर आर्थिक गणिते नफा वाढवतील. भागीदारीतील उद्योगधंद्यात नवीन कल्पना उदयास येतील.

सप्टेंबर २०२० : शुक्र-मंगळाचे उत्तम सहकार्य लाभेल. यातून खूपशा घटना दिलासा देणाऱ्या घडतील. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाची व्यापकता वाढेल. आर्थिक बाबतीत खूपशी स्थिरता लाभेल. खिशात पैसे आले की मनाचा मोठेपणा वाढतो. त्यातून होणारे व्यवहार तापदायक ठरू नयेत यासाठी काळजी घ्यावी.

ऑक्टोबर २०२० : आर्थिक आवक आणि खर्चाचे प्रमाण यांचे गणित आखून उद्योगधंद्यातील पुढील रूपरेषा कायम करा. घरात किरकोळ समस्या त्रास देतील. पण शुक्राच्या शुभ सहवासातून मार्ग काढू शकाल. प्रवासाचे योग येतील. महिनाअखेरीस मनस्वास्थ्य चांगले राहील.

नोव्हेंबर २०२० : रवी-शुक्र शुभ योगात, पण राहू व्ययात त्यामुळे आपण आपल्यापाशी असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. अतिभावनिक होणे शारीरिकदृष्टय़ा चांगले नसते हे लक्षात असू द्या. कौटुंबिक कटुता जास्त काळ टिकणार नाही. तरुण मुलांना नोकरी, उद्योगधंद्यात उत्तम संधी प्राप्त होतील.

डिसेंबर २०२० : बुध-रवीशी हर्षलचा नवपंचम योगामुळे खूपशा गोष्टींना कलाटणी मिळून या महिन्यातील वातावरण सकारात्मक होईल. मैत्री, भागीदारी यात झालेले गैरसमज दूर होऊन दिलजमाई होईल. मात्र आपल्या वर्तनात नम्रता खूप महत्त्वाची ठरेल. हा काळ परीक्षेचा वाटला तरी यातून सहजपणे बाहेर पडाल.

कर्क : २१ जून ते २० जुलै

आपला जन्म २१ जून ते २० जुलै या दरम्यान झाला असेल तर या कालावर २ अंकाचा म्हणजे चंद्रग्रहाचा प्रभाव असतो. २०२० मध्ये दोन वेळा दोन आले आहेत नी शून्य ही दोनवेळा आले आहेत. २+०+२+० = ४ हा हर्षलचा अंक आहे. या वर्षी हर्षल आणि चंद्र ग्रहाचा प्रभाव जास्त असणार आहे. हळवेपणा, भावविवशता यांचा अतिरेक होऊ देऊ नका. येणाऱ्या समस्या आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतील आणि याच विचाराचा पाठपुरावा करून कठीण काळही आपण सोपा करू शकाल. अश्रू की घाम, निराशा की श्रम यातील काय निवडायचे ते तुम्हीच ठरवा. हर्षलच्या उथळ वारूला आपले खंबीर मनच आवर घालू शकते हा आत्मविश्वास आपल्यापाशी आधी येऊ द्या.

जानेवारी २०२० : एकूण ग्रहांची प्रतिकूलता वाढली असली तरी शुक्राचा मोठा आधार आपल्याला लाभेल. बाकी इतर ग्रहांचा विरोध कायम राहील. कामात अडचणी निर्माण होतील. पण त्यांना आपण उत्तम तऱ्हेने हाताळू शकाल. जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनत आपले कर्तृत्व सिद्ध करील.

फेब्रुवारी २०२० : शुक्र नवमात उत्तम स्थितीत असल्यामुळे नोकरी, उद्योगधंद्यात, राजकारणात आपले स्थान बळकट होईल, मात्र जिभेवर नियंत्रण ठेवा. आपल्या मनात नसतानाही एखादी व्यक्ती दुखावली जाऊ नये यासाठी नम्रता, विनय हे सद्गुण जपा. ते खूप मोलाचे ठरतील. आरोग्याची काळजी घ्या.

मार्च २०२० : रवि-मंगळ उत्तम स्थितीत असल्यामुळे या दोन ग्रहांचे सहकार्य उत्तम लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. सरकारी दरबारी कामात यश लाभेल. नवीन उद्योगधंद्याच्या सुरुवातीसाठी उत्तम काळ. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्यात सुधारणा होईल.

एप्रिल २०२० : शुक्र-रवि ग्रहांचा खूप मोठा आधार मिळेल नि त्यातून अडचणी माघार घेतील. मनात शक्यता ठेवून कामे करा. सांशकतेला वाव देऊ नका. विचारातील सकारात्मक ऊर्जा हा खूप मोठा आशीर्वाद ठरतो. त्यातून आत्मविश्वास वाढेल नि नक्कीच यश लाभेल.

मे २०२० : हा महिना फारसा त्रासदायक ठरणार नाही. आपल्यापाशी असलेल्या सुज्ञतेचा उपयोग करा. रवि, बुध, शुक्र हळूवारपणे संकटे दूर करतील. राजकारणात, सामाजिक कार्यातील संघर्ष संपेल नि यश मिळेल. वाद कुठे करायचा नि संवाद कुठे साधायचा हे मर्म कळेल. त्यामुळे खूपशा समस्या दूर होतील.

जून २०२० : शुक्र, मंगळ त्रिएकादश योग. शुभ घटनांचा वर्षांव होणार नाही. पण दोन-चारच घटनांचा शिडकावा खूपसा मनाला आनंद देईल. उद्योगधंद्यात, नोकरीत खूप काळ रेंगाळलेली कामे जलदगतीने मार्गी लागतील. नवीन योजना नवीन सुरुवातीसाठी उत्तम काळ.

जुलै २०२० : रवि-मंगळ नवपंचमयोग आणि लाभातील शुक्र यातून मिळत असलेले शुभसंकेत खूपशा गोष्टींना पूरक ठरतील. एकूण प्रसन्नतेचा काळ. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अतिमहत्त्वाची कामे पहिल्या पंधरवाडय़ात पूर्ण करा. घरगुती जमिनीचे वादग्रस्त प्रश्न निकालात निघतील, बोलण्यातील आत्मविश्वास मोलाचा ठरेल.

ऑगस्ट २०२० : मतभेद, गैरसमज दूर होतील. मात्र शुक्र-राहूच्या युतीमधून हळवेपणा हा भोळेपणा ठरू नये. भावनावश होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. सत्य नि विश्वास या सद्गुणांना जागा. आज कठोरतेने घेतलेले निर्णय उद्याची संकटे टाळतील. हुषारीने वागा. चिंता, काळजी करून वेळ वाया घालवू नका.

सप्टेंबर २०२० : शुक्र-बुध त्रिएकादश योग. उद्योगधंदा-नोकरीतील निर्णय ठामपणे घ्यावे लागतील. त्यात चर्चा, संवाद यापेक्षा कृती महत्त्वाची ठरेल. तेव्हा महत्त्वाच्या कामात दिरंगाई टाळा. राजकारण, समाजकार्यात नाती जपा. पैशांची गुंतवणूक तज्ञांच्या मार्गदर्शनातून करा. बँकाची पात्रता शोधा. गुणवत्ता शोधून पैसे गुंतवा.

ऑक्टोबर २०२० : पराक्रमात शुक्र, चतुर्थात बुध. आर्थिक नि मानसिक समन्वय उत्तम साधला जाईल. घरातील नातेवाईक मंडळीत आनंद निर्माण होईल. प्रेम विवाह, नाती गोती अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक मिळतील. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचे स्वरूप बदलण्याची शक्यता, आरोग्य उत्तम राहील.

नोव्हेंबर २०२० : व्ययातील राहू आणि इतर ग्रहांचे पाठ फिरवणे फारसे मनाला लावून घेऊ नका. दशमातील हर्षल उद्योगधंद्यात, नोकरीत वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करील. पण शुक्राचा एकमेव आधार असेल. कुटुंबाची उत्तम साथ मनाला मोठा आधार देईल. तूर्त काळ हाच यावरील सोपा उपाय आहे.

डिसेंबर २०२० : रवि-शुक्र यांची उत्तम साथ मिळेल. आयुष्यात नेमकीच माणसे आपल्याला मदतीचा हात देतात, असा अनुभव या वर्षांच्या अखेरीस येईल. अविश्वासू, अपात्र लोकांचे अनुभव पुढच्या प्रवासाला उपयोगी येतील. मात्र निराश न होता आत्मविश्वास आणि परिश्रम यावर नजर ठेवून पुढे व्हा. उजेडाची जाणीव लवकर होईल.

सिंह : २१ जुलै ते २० ऑगस्ट

२१ जुलै ते २० ऑगस्ट या दरम्यान रवी स्वत:च्या राशीत भ्रमण करीत असतो. या वर्षी २०२० मध्ये ४ या अंकाचा म्हणजे हर्षलचा प्रभाव असणार आहे आणि विशेष म्हणजे ४ चे व १ अंकाचे मित्रत्व खूप जवळचे आहे. त्यामुळे या वर्षांतील सुख-दु:खात रवीला हर्षलची मोठी साथ लाभणार आहे. सिंह राशीची माणसे दुसऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवून दु:ख साजरे करीत नाहीत. ठामपणे प्रसंगाला सामोरे जात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात. विशेषत: या धाडसी वृत्तीतून यांना यशाचा मार्ग मोकळा होतो. भावना, कोमलता यात न गुंतता, स्थिरता, तटस्थता याच्या वागणुकीचे एक अंग यांना नेहमीच यश देत असते.

जानेवारी २०२० : रवी, गुरू ग्रहाची उत्तम साथ लाभेल. चढाई, साहस या शब्दातून मिळणारे यश आणि समजूतदारपणे वागून बौद्धिकतेतून मिळणारा विजय अधिक आनंद देत असतो, असा प्रत्यय या महिन्यात येईल. शिक्षण क्षेत्रात या राशीच्या विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होईल.

फेब्रुवारी २०२० : षष्ठात शनी ग्रहाचा प्रवेश खूप महत्त्वाचा ठरेल. मनातील उत्तम विचार कृतीत उतरवण्यासाठी आशावादी असणे खूप गरजेचे ठरेल. प्रेमात, मैत्रीत काही कारण नसताना अविश्वासाचे वारे वाहू लागतील. स्थितप्रज्ञ राहा. कालांतराने शांत होऊन आपल्या विचारांचे स्वागत होईल.

मार्च २०२० : अष्टमात रवी असल्यामुळे वाहने बेपर्वाईने चालवू नका. स्वत:ला नि लोकांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. नोकरी-उद्योगधंद्यात स्पर्धेला सामोरे जावे लागेल. वरिष्ठांशी, भागीदाराशी वादविवाद टाळा. कोर्टकचेरीच्या बाहेर समेट करणे फायद्याचे ठरेल. लहान प्रवासाचे योग येतील.

एप्रिल २०२० : षष्ठात शनी-मंगळ युतीमुळे शत्रूवर मात कराल. आपल्या विरोधात चाललेल्या कारवाया थंड होतील. मात्र आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे. त्यात दिरंगाई करू नका. नोकरीत प्रमोशन किंवा उद्योगधंद्यात नवीन योजना, नवीन भेटीगाठी सफल होतील. नफ्याचे गणित उत्तम जमेल.

मे २०२० : बाकी इतर ग्रह अनुकूल नसले तरी दशमातील रवी खूपशा गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद देईल. त्यामुळे अभिनय, साहित्य, नाटय़, सिनेमा क्षेत्रांत मानसन्मानाचे योग येतील. स्थावर इस्टेटीत होणारे व्यवहार फलदायक ठरतील. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचे स्वरूप चांगले राहील. स्वत:चे महत्त्व सांभाळताना काळजी घ्या.

जून २०२० : गुरू, रवी, राहू, शुक्र या सर्व ग्रहांचा शुभाशीर्वाद आपल्याला लाभत आहे. या ग्रहांच्या आनंदयात्रेतून लहानसहान गोष्टीतून आनंद मिळवू शकाल. जगण्यातले सुख हे मनाच्या माध्यमातून जाणवते. मनाला मिळणारे समाधान हेच खरे सुख. या महिन्यात मनाची प्रसन्नता जाणवेल.

जुलै २०२० : गुरू पंचम स्थानात, बुध राहू एकादशात असल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. पण खर्चाचे प्रमाणही तितकेच वाढेल. गरज असेल तरच लांबचे प्रवास करा. या महिन्यात येणाऱ्या अमावास्येदिवशी वादविवाद, महत्त्वाची बोलणी टाळा. प्रेमप्रकरणात गैरसमज नकोत याची काळजी घ्या.

ऑगस्ट २०२० : शनी-गुरूचे सहकार्य, रवी-गुरू नवपंचम योग, राहू लाभात असे ग्रहांचे गणित उत्तम जमले आहे. हर्षल भाग्यात असल्यामुळे कोणाशीही स्पर्धा करू नका. प्रकृतीची काळजी घ्या.  गुरूची बौद्धिक क्षमता खूप मदतीची ठरेल. अति स्पष्ट बोलणे, वादविवाद करणे टाळा. प्रेमळ शब्दही माणसाला आपलेसे करतील.

सप्टेंबर २०२० : रवी-गुरू एकमेकांशी त्रिएकादश योग करीत आहेत. स्वीकारलेली कामे चोख पुरी करू शकाल. रवीच्या सहकार्याने उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या योजना उत्तम रीतीने पार पाडू शकाल. धार्मिक कार्यातला सहभाग खूप आनंद देईल. तूर्त कौटुंबिक मतभेद, गैरसमज यांना फारसे महत्त्व देऊ नका.

ऑक्टोबर २०२० : बऱ्याच गोष्टींना आपण स्वत: मर्यादा घातल्या की मनाची निर्थक घोडदौड थांबते. खरंच गरज असेल तिथेच संघर्ष करा, नाहीतर वाऱ्याशी भांडण करण्यासारखे असेल. वेळेला खूप महत्त्व द्या. शुक्रामुळे कलाकौशल्य, नाटय़ सिनेक्षेत्रात कौतुक होईल. राजकारण, सामाजिक क्षेत्राचा व्याप अधिक वाढेल.

नोव्हेंबर २०२० : पराक्रमातील शुक्र आत्मविश्वास वाढवेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम संवाद साधला जाईल. त्यातून नवीन योजना, नवीन कामे पुढे येतील. घरगुती समस्या वाढतील. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन ओळखी, परिचयातून नवे मित्र मिळतील.

डिसेंबर २०२० : लाभात राहू, चतुर्थात शुक्र, षष्ठात शनी या ग्रहांचे पाठबळ खूपच स्फूर्तिदायक ठरेल. या महिन्यात रखडलेल्या गोष्टींना चालना मिळेल. पैशाचे व्यवहार समाधानकारक होतील. नवमातील हर्षलामुळे प्रवासाचे योग येतील. त्यातून आनंद मिळेल. कौटुंबिक सुखात निर्भेळ आनंद लाभेल. कोर्टकचेरीच्या कामात यश लाभेल.

कन्या : २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर

कन्या राशीवर बुध ग्रहाचा अंमल असतो. ५ बुधाचा अंक या वर्षी २०२० साली २ + ० + २ + ० = ४ अंकाचा म्हणजे हर्षलाचा प्रभाव असणार आहे. ४ व ५ हे उत्तम मित्रांक आहेत. या वर्षी हे दोन मित्रांक कन्या राशीच्या लोकांना खूप वेगळ्या विचाराकडे घेऊन जातील. अध्यात्माच्या साहाय्याने सुखाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने खूप सोप्या शब्दात मांडली आहे. ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ इतक्या आनंदी आणि समाधानी वृत्तीने जगण्याची हिंमत या ओळीने दिली आहे. जीवनातील चढउतार म्हणजेच संसार इतक्या सहजतेने या गोष्टीकडे पाहिले की आयुष्यातील बऱ्याच समस्यांची उत्तरे मिळू लागतात. गरजांचे ओझे, अपेक्षा कमी झाल्या की दु:खाचे मूळ नष्ट होते अशा प्रकारच्या नव्या विचारांचा प्रवास कन्या राशीला घडेल.

जानेवारी २०२० : पराक्रमात शुक्र, पंचमात रवी, तर दशमात राहू नव्या योजना, नवीन कामे यांना गती प्राप्त होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. मानसिक स्थिरतेतून उत्साह वाढेल, मात्र आर्थिक बाबतीत उत्साहाला आवर घाला आणि संयमाने वागा. आरोग्य ठीक राहील.

फेब्रुवारी २०२० : रवी षष्ठात, राहू दशमात, चतुर्थात गुरू असल्यामुळे खूपशा गोष्टींची उकल होणार नाही, पण गुप्त शत्रूंचा ससेमिरा हळूहळू कमी होत जाईल. त्रास देणाऱ्या माणसाला कसे दूर ठेवायचे याचे तंत्र अवगत होईल. पण त्यातून कामाचा उरक वाढेल, वेळेची खूप बचत होऊन इतर चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकाल.

मार्च २०२० : हा काळ काहीसा परीक्षेचा ठरेल. हाती घेतलेल्या कामात दिरंगाई करू नका. अशा सवयी पुढील जीवनात जाचक ठरू शकतात. आर्थिक देण्याघेण्याच्या व्यवहारात वावरताना सावधानता बाळगा. कामाच्या घाईगर्दीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अवेळी जेवण टाळा.

एप्रिल २०२० : शुक्र दशमात असल्यामुळे एक मोठा आधार ठरेल. चतुर्थात शनी, मंगळ, केतू आल्यामुळे घरातील कौटुंबिक वादाचे स्वरूप फार काळ ताणू नका. एक पाऊल मागे घेऊन ते परस्पर मिटवणे हिताचे ठरेल. रवी, हर्षल अष्टमात असल्याने रस्त्याने जाताना, वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी.

मे २०२० : रवी-शुक्र भाग्यात, तर गुरू पंचमात परस्पर हे ग्रहांचे योग खूप लाभदायक ठरणार आहेत. षष्ठातील मंगळाचे संरक्षण खूप मोलाचे ठरेल. मात्र टोकाचा हट्टीपणा टाळा. सामंजस्य भूमिकेतून वाद विवादाचे प्रसंग टाळावेत. मानसिकता बदलून एक पाऊल मागे या. खूपसा मार्ग मोकळा होईल.

जून २०२० : रवी-शुक्र उत्तम स्थितीत, तरीही भेटी-संपर्क-चर्चा यामध्ये गुप्तता पाळा. शासकीय कामातील नियम सांभाळा. सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाद टाळून कामे पुढे नेता येतील. नाटय़-साहित्य-सिनेक्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभेल. मानसन्मानाचे योग येतील. दगदग टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

जुलै २०२० : रवी-शुक्राची मदत, तर गुरूचे चतुर्थात आगमन. बाकी उरलेल्या ग्रहांनी पाठ फिरवली आहे. खूप आशावादी राहा,  लहानसहान नकारार्थी विचारांना मनांत फारसे स्थान देऊ नका. प्रेमात, मैत्रीत फसवणूक वा कटू अनुभव येतील. तेव्हा अंतर ठेवून वागा. स्थितप्रज्ञता हा उपाय सर्वात नामी आहे.

ऑगस्ट २०२० : रवी-गुरू नवपंचम योग या महिन्यात खूपसा आधार ठरेल. मात्र ऑगस्ट १६ नंतर पुढील दिवसांत आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचे, वातविकार आणि उष्णतेचे विकार त्रास देतील. उद्योगधंद्यात, नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येतील. आत्मविश्वास व परिश्रम यातून यश नक्की मिळेल.

सप्टेंबर २०२० : शुक्र, बुध त्रिएकादश योग, मात्र प्रवासात घाईगर्दीत चालणे, वाहन वेगाने चालवणे या गोष्टींवर नियंत्रण असू द्या. महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. कोर्टकचेरीच्या कामात यश प्राप्त होईल. नोकरी-धंद्यात आर्थिक व्यवहार जपून करावेत. आरोग्याची काळजी घ्यावी.

ऑक्टोबर २०२० : शुक्र व्ययात आहे. एकूण उद्योगधंद्यात, नोकरीत आर्थिक बाबतीत काहीशी ओढाताण राहील. मात्र या काळात नवीन योजना, नव्या कल्पना यशस्वी ठरतील. प्रेमप्रकरणातून विवाह जमतील. त्यात तात्पुरता विरोध होईल, पण नंतर समजूतदारपणे सर्व स्वीकारले जाईल. नम्रतेतून यशही व्यापक होईल.

नोव्हेंबर २०२० : द्वितीयात शुक्र, पराक्रमात रवी आणि पंचमात गुरू या मातब्बर ग्रहांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. नवीन कामाची उत्साहात सुरुवात होईल. प्रामाणिक मेहनत आणि चिकाटी स्वप्ने पुरी करण्यास मदत करतील. नाटय़-सिनेकलाकारांना कलाप्रांतात विशेष संधी चालून येतील. उद्योगधंद्यातील कामांना गती प्राप्त होईल.

डिसेंबर २०२० : पराक्रमात शुक्र, पंचमात गुरू दोघांतही एक उत्तम शुभयोग होत आहे. रखडलेल्या कामांना गती प्राप्त होईल. मात्र संघर्ष आणि हट्टीपणा टाळा. स्पर्धा स्वत:शीच करा. म्हणजे आपल्यातील दोष दिसून येतील. गुरू-शनीच्या एकत्र येण्यातून बुद्धीला उत्तम चालना मिळेल. त्यातून आपली प्रगती साधाल.

तूळ : २१ सप्टें. ते २० ऑक्टो.

या वर्षीचा २०२० सालचा एकांक चार येतो. चार म्हणजे हर्षल आणि त्या सोबत प्रचंड ताकदीची दोन शून्ये. तूळ ही शुक्राची रास. शुक्राचा अंक सहा येतो. ६ आणि ४ चे तसे फारसे जमत नसले तरी तूळ राशीच्या न्याय देणाऱ्या वृत्तीला हर्षलची निर्भयता जरूर आवडेल. त्यातून होणारे सत्कार्य अद्वितीय ठरेल. या वर्षी नावलौकिक, अर्थप्राप्ती आणि मानसिक क्षमताही भरपूर मिळेल. मात्र मनाचे मोठेपण त्याग, नि:स्वार्थ बुद्धी नि लीनता यातून जपायचे असते. मनाचा सदुपयोग होणे हीसुद्धा ईश्वरसेवा आहे. चतुर्थातला स्वराशीतील शनी उत्तम शुभ फले देईल. तर राहू केतूची २३ सप्टेंबपर्यंतची भ्रमणे ही शुभदायक ठरतील. नेपच्यून बौद्धिक जगतात मानसन्मानाचे प्रसंग घडवून आणेल.

जानेवारी २०२० : गुरू-शुक्र-नेपच्यून त्रिएकादश योगातून मनाची ताकद उत्तम साथ देईल. उद्योगधंद्यात, नोकरीत आपले नेतृत्वकौशल्य सिद्ध करू शकाल. सामाजिक कार्यात, राजकारणात आपले विचार महत्त्वाचे ठरतील. आर्थिक बाजू बळकट होईल. कौटुंबिक बाबतीत मकरेचा शनी फारसा त्रासदायक ठरणार नाही.

फेब्रुवारी २०२० : पराक्रमातला मंगळ खूपशा महत्त्वाच्या गोष्टींना आधार देईल. आपल्या स्नेहशील सरळ वागण्याने उद्योगधंद्यात, नोकरीत वातावरण खूप चांगले राहील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. लहानसहान प्रवासाचे योग खूप आनंद देतील. महिनाअखेरीस किरकोळ आरोग्य समस्या उद्भवतील, काळजी घ्यावी.

मार्च २०२० : गुरूचा सहवास हा महिना पूर्ण सहकार्य करील, तर सहावा रवी गुप्त शत्रूंना काबूत राखील. रोजच्या जीवनातल्या समस्या दूर होतील. नवे विचार, नव्या योजना यशदायक ठरतील. कर्तव्य आणि भावना यांच्या समन्वयातून कामाचे वेगळेपण लक्षात येईल. तूर्त अतिभावनिक होणे टाळा.

एप्रिल २०२० : चतुर्थात शनी-गुरू आणि नवमात राहू कौटुंबिक बाबतीत सुखदायक घटना घडतील. घर जमिनीचे व्यवहार करण्यासाठी उत्तम काळ. या व्यवहारात फायद्याचे गणित उजवे ठरेल. नोकरी-उद्योगधंद्यात नवीन कामांना गती प्राप्त होईल. त्यातून उत्तम धनलाभ होईल. अतिस्पष्टता टाळा नम्रतेने वागा.

मे २०२० : पंचमात मंगळ, तर रवी-शुक्र अष्टमात असल्यामुळे ओळखीतून होणारी मानसिक गुंतवणूक, अतिभावनावश होणे या गोष्टी कटाक्षाने टाळा. लघवीचे विकार, उन्हाळा बाधणे अशा बाबतीत डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यावा. तसेच मित्राच्या आहारी जाणे, व्यसनात गुंतणे यातून नुकसान संभवते.

जून २०२० : षष्ठात मंगळ, तर नवमात शुक्र असल्यामुळे नाटय़-सिनेमा-साहित्य या क्षेत्रांतील व्यक्तींना विशेष मानसन्मान प्राप्त होईल. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा गौरव होईल, मात्र शुक्र-राहूच्या गुंत्यातून मनाची चलबिचलता वाढेल. यात चुकीचे निर्णय घेऊ नका, ते क्लेशदायक ठरतील.

जुलै २०२० : वृषभेचा अष्टमातील शुक्र आर्थिक बाबतीत खूपच मदतीचा ठरेल. मात्र गैरमार्गातून पैसे मिळवणे या प्रकारापासून दूर राहा. नोकरीधंद्यात आपल्या कामाची प्रशंसा होईल. सामाजिक कार्यात, राजकारणात आपण उजवे ठराल. आपल्या शब्दाला किंमत येईल. मात्र भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

ऑगस्ट २०२० : रवी-शुक्र त्रिएकादश योगातून आपली रखडलेली कामे मार्गी लागतील. जमीन जागेचे, घराचे व्यवहार करण्यास अनुकूल काळ. उद्योगधंद्यात, नोकरीत नवीन कामासाठी योग्य काळ. नवमातील राहू कामातील अडचणी दूर करील. मात्र धीराने पुढे गेल्याशिवाय मार्ग मोकळा होत नाही हे लक्षात असू द्यावे.

सप्टेंबर २०२० : व्ययात रवी, सप्तमात मंगळ ही ग्रहस्थिती फारशी चांगली नाही; तरीही पराक्रमातील राहू आणि गुरू खूपशा गोष्टींना मोठा आधार ठरेल. उद्योगधंद्यात नफा-तोटय़ाची बेरीज-वजाबाकी यावर विशेष लक्ष असू द्या. कामातील बारीकसारीक अडचणी मोठे स्वरूप धारण करणार नाहीत यावर कटाक्षाने लक्ष द्या.

ऑक्टोबर २०२० : अष्टमात राहू, व्ययात शुक्र असला मात्र शुक्रामुळे खर्चाचे प्रमाण वाढू देऊ नका. बँकातून काढलेल्या कर्जाचा उपयोग उद्योगधंद्यासाठी वापरा. त्यात घरखरेदी, सोने विकत घेणे या गोष्टी टाळा. नोकरीधंद्यात कामाचे स्वरूप बदलेल. नवीन जबाबदाऱ्या वाढतील.

नोव्हेंबर २०२० : परत षष्ठात आलेला मंगळविरोधी ग्रहाचा विरोध कमी करील. खूप गोष्टी हातातोंडाशी आल्यानंतर हातातून निसटतात. मग दैवाला दोष देऊन मोकळे होणे म्हणजे पाठीमागे फिरणे, पळ काढणे असा अर्थ होतो. पण जेव्हा आपण संकटाच्या मागे लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने कामाची खरी सुरुवात करीत असतो.

डिसेंबर २०२० : वर्षांअखेर रवी-शुक्राची उत्तम साथ मिळाल्यामुळे खूपशा समस्यांचे मार्ग मोकळे होतील; मात्र संशय, भीती या गर्तेत मुळीच अडकू नका. साहसाने, निर्भयतेने जगण्याची सवय तुमच्यातील आत्मविश्वास वाढवत असतो. कुठल्याही स्थितीत मनाचे शोषण थांबवा.

वृश्चिक : २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर

मंगळाच्या दोन राशींपैकी मेष अग्नितत्त्वाची, तर वृश्चिक ही जलतत्त्वाची. या राशीवरही नऊ अंकाचा अंमल असतो. ही रास मुत्सद्देगिरीने शत्रूला नामोहरम करते. या वर्षी २०२० सालचा एकांक ४ येतो, म्हणजे हर्षल ग्रहाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे हर्षल आणि मंगळाच्या उत्तम प्रभावातून या राशीचा प्रवास हेणार आहे. राजकारणात, सामाजिक क्षेत्रात ही माणसे या वर्षी बुद्धिमान राजकारणी म्हणून ओळखली जातील. मात्र हर्षलच्या अतिलहरीपणातून या राशीची कोंडी होऊ नये त्यासाठी सावधपणे, साधनसूचिता पाळून पुढे जावे. ‘भक्त बनू नका, ईश्वर व्हा’ असा थेट संदेश हर्षलाच्या लहरीपणातून येऊ शकतो. वृश्चिक राशीने सारासार विचार करून सुरक्षित निर्णय घेऊन प्रवास करावा.

जानेवारी २०२० : २४ जानेवारीला शनी मकर राशीत प्रवेश करीत आहे. साडेसातीचे एक पर्व संपले. आता शनी मित्राच्या भूमिकेतून आपल्याला मदतीचा हात देईल. उद्योगधंद्यात, नोकरीत आपले कर्तृत्व अधिक उजळून निघेल. तसेच धनु राशीतील गुरू कौटुंबिक सुखात आनंदी समाधानाचे वातावरण निर्माण करील.

फेब्रुवारी २०२० : लाभातील मंगळ-केतूमुळे अपेक्षेपेक्षा जास्त खर्चाचे प्रमाण वाढेल. शनी-शुक्र त्रिएकादश योगातून नोकरी-उद्योगधंद्यात लाभदायक घटना घडतील. नवीन कामे, नवीन ओळखी यातून प्रगतीचा आलेख वर जाईल. मात्र आरोग्याच्या बाबतीत जरूर ती काळजी घ्या. विश्रांती घ्या.

मार्च २०२० : जगण्यातला आत्मविश्वास वाढेल. जमीन इस्टेटीच्या देवाणघेवाण कामात आर्थिक लाभ हेईल. मात्र आर्थिक आवक आणि होणारा खर्च याचा ताळमेळ व्यवस्थित सांभाळा. अति दगदग, कामातून निर्माण होणारा ताण यासाठी झोप आणि आहार व्यवस्थित ठेवावा.

एप्रिल २०२० : गुरू मकर राशीत, शुक्र-गुरू नवपंचम योगातून खूपशा गोष्टी मार्गी लागतील. तर पराक्रमातील मंगळाच्या साह्य़ाने आपली जनमानसातील भूमिका अधिक स्पष्ट होत जाईल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ अशा विचारांतून आपली महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.

मे २०२० : कौटुंबिक बाबतीत समज-गैरसमज मनाला त्रासदायक ठरतील. सतत आपली भूमिका मांडत बसू नका. शांतपणे राहून आपले विचार कृतीत आणा. सल्लामसलत वादविवाद यात आपला वेळ घालवू नका. शनीच्या पराक्रमातून आपला सन्मान जपला जाईल. उद्योगधंद्यात, नोकरीतील गैरसमज दूर करा.

जून २०२० : पंचमात मंगळ-शुक्रातून नवीन ओळखी, प्रेमप्रकरणे या गोष्टींना फारसे महत्त्व देऊ नका. मानिसक गुंता वाढला जाईल नि त्यात मनाची सत्यता हरवून बसाल. नाटय़-सिने कलाकारांना विशेष संधी प्राप्त होतील. भावनेच्या आहारी न जाणे मोठे शहाणपण ठरेल.

जुलै २०२० : रवी-मंगळ नवपंचम योगातून नोकरीधंद्यातील कामाचे स्वरूप बदलू शकेल. मात्र नको ते वादविवाद टाळा. दुसऱ्याची निंदानालस्ती टाळा. नवीन योजना, नवीन कामे यासाठी वेळ अपुरा पडेल. आपल्यावरील वरिष्ठांचा विश्वास वाढेल. हातून छान कामे होतील.

ऑगस्ट २०२० : शनी, गुरू व बुध यांचा शुभ सहवास खूप आनंद देईल. आत्मविश्वास वाढेल. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम संवाद साधला जाईल. त्यातून नवीन योजना, नवीन कामे पुढे येतील. नवीन ओळखी, नवीन परिचयातून मैत्रीचा परिवार वाढेल. षष्ठात मंगळ त्यामुळे शत्रू दूर जातील.

सप्टेंबर २०२० : रवी-गुरू लाभात, शुक्र नवमात. रेंगाळलेल्या कामांना गती प्राप्त होईल. आपल्या युक्तिवादातून सोपे मार्ग पुढे येतील आणि खूपशा अडचणी दूर होतील. आनंदाबरोबर खर्चाचे प्रमाण वाढेल. सखोल विचार, उत्तम बुद्धिमत्ता यातून नव्या कामांना गती प्राप्त होईल.

ऑक्टोबर २०२० : धनस्थानात गुरू, दशमात शुक्र या दोन ग्रहांनी आपले वर्चस्व राखले आहे. त्यामुळे उद्योगधंद्यात, नोकरीत निर्माण झालेले पेचप्रसंग त्यांची तीव्रता कमी होईल. सप्तमात आलेला राहू कौटुंबिक सुखात काहीसा त्रासदायक ठरेल. पण तेही चहाच्या पेल्यातील वादळासारखे असेल.

नोव्हेंबर २०२० : लाभातला शुक्राचा सुरुवातीचा सहवास खूप आनंद देईल; मात्र महिना अखेर हात राखून खर्च करणे जरुरीचे ठरेल. नवीन खरेदी, नवीन जागा यावर आर्थिक चढउतार भासतील. शक्यतो नवीन नोकरी, उद्योगधंदा न करणे फायद्याचे ठरेल.

डिसेंबर २०२० : धनस्थानात गुरू-बुध, पराक्रमात शनी आपण आखलेल्या योजना मार्गी लावतील. वरिष्ठांशी उत्तम संवाद साधला जाईल. धंद्यात कामाला खूप मागणी येईल. त्यामुळे वातावरण उत्साहाचे असेल. मुलांना नोकरीधंद्यात चांगल्या संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात.

धनू : २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर

ज्यांचा जन्म २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान झाला आहे अशा लोकांवर ३ अंकाचा म्हणजे गुरू ग्रहाचा अंमल असतो. या वर्षी २०२० साली २ + ० + २ +० = ४ म्हणजे हर्षल या ग्रहाचा प्रभाव असणार आहे. गुरू व हर्षल यांचे मोठे योगदान धनू राशीला लाभणार आहे. या व्यक्ती बुद्धी आणि मन यांचा उत्तम समन्वय साधून जनहिताचे व्रत साधतील. विजयात किंवा पराजयात संयमाने कसे वागावे याची समज यांच्यामध्ये उत्तम असते. नम्रता म्हणजे लाचारी नव्हे, तो एक सद्भाव आहे. त्यात मोठी सात्त्विकता आहे. त्यामुळे हर्षल ग्रहाच्या मदतीने हा वर्षभराचा प्रवास गुरू आपल्या दिमाखदार वागण्याने उत्तम यशस्वी करील यात शंका नाही.

जानेवारी २०२० : पराक्रमात शुक्र-नेपच्यून या महिन्यातील ही एक जमेची बाजू आहे. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. उद्योगधंद्यात जरी संथपणा वाटला तरी नवीन योजना सफल होतील. विद्याभ्यासात विद्यार्थी वर्गाची चंचलता वाढेल. पण गुरूच्या दृष्टीतून त्यांना यश लाभेल. हट्टाने अभ्यासाला स्वत:ला बसवणे हा त्यावर नामी उपाय.

फेब्रुवारी २०२० : शुक्र, रवी उत्तम स्थितीत असल्यामुळे नवीन संपर्क वाढतील. अनपेक्षित संधी चालून येतील. त्यातून मोठी सफलता मिळेल. व्यापार, राजकारण, कलाप्रांतात, विज्ञानक्षेत्रात खूप संधी चालून येतील. भावनेच्या खेळात संयमाने राहा.

मार्च २०२० : नवे विचार, नव्या योजना यशदायक ठरतील. कर्तव्य आणि मेहनत यांच्या समन्वयातून तुमच्या कामाचे वेगळेपण दिसून येईल. हर्षल-गुरू नवपंचम योगातून येणाऱ्या संधीचा फायदा घ्या. आपल्याशी असलेला आत्मविश्वास कामात खूप मदतीचा ठरेल. धावपळ व दगदग वाढेल.

एप्रिल २०२० : शुक्र-मंगळ नवपंचम योग. नवीन परिचय, ओळखी यातून मैत्रीचे स्वरूप व्यापक होईल. प्रेमप्रकरणे, त्यातून विवाह जमवणे, घरातील ज्येष्ठांची नाराजी पसंती अशा प्रसंगातून वाट काढाल आणि मार्ग मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

मे २०२० : षष्ठात रवी असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घ्याल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. जागेसंबंधित वादविवाद सामोपचाराने मिटवा. फारसे ताणू नका. बोलण्यातील आत्मविश्वास कायम ठेवा. त्यातून आपली कामे होतील. आनंदी बातमी कळेल. प्रवासाचे योग येतील.

जून २०२० : शुक्र-शनी नवपंचम योगातून उद्योगधंद्यातील, वातावरणातील उत्साह वाढेल. आर्थिक बाबतीत जुनी येणी संथपणे येत राहतील. वातावरण जरा संघर्षांचे राहील. गुप्त शत्रूचा त्रास थांबेल. नोकरीत हाताखालच्या माणसांना समजून घ्या. समजुतीने वागा. कालांतराने वातावरण बदलेल.

जुलै २०२० : शुक्र-रवी त्रिएकादश योग हा काळ काहीसा संमिश्र स्वरूपाचा असेल याही स्थितीत आपण आखलेल्या गोष्टी पुऱ्या होतील. आपल्या शब्दाला किंमत येईल. नको त्या ठिकाणी समेट घडवून आणणे, मध्यस्थी करणे अशा गोष्टी टाळा.

ऑगस्ट २०२० : भाग्यात रवी, पंचमात हर्षल-मंगळ. जगण्यात हट्टीपणा आला की त्यापाठोपाठ संघर्ष धावत येतो. कुठलाही संघर्ष मानसिक दु:ख निर्माण करतो. तेव्हा हट्टीपणा आपले तेच खरे या गोष्टी सोडून द्या. कारण संयम शांततेने मार्ग मोकळे होतील. त्यातून समाधान लाभेल.

सप्टेंबर २०२० : शुक्र-मंगळ-हर्षल यातून होणारा संवाद सुरुवातीला जरी गोड वाटला तरी द्वितीयातील गुरू-शनी बोलण्यातून वाद निर्माण करतील तेव्हा उद्योगधंद्याच्या बाबतीत वरिष्ठांशी मतभेद टाळा. बोलण्यातून होणारा गैरसमज त्रासदायक ठरेल. कौटुंबिक जीवनात समजुतीचे धोरण फलदायक ठरेल.

ऑक्टोबर २०२० : गुरू नवपंचमयोग धनात शनी या पाश्र्वभूमीवर परिस्थितीत चांगला बदल दिसून येईल. संकटे आपल्यासोबत संधीही घेऊन येतात असा विलक्षण अनुभव येईल. राजकारणात सामाजिक जगतात होणारा विरोध पूर्ण मावळेल. त्यातून गैरसमज दूर होतील. कामांना गती प्राप्त होईल.

नोव्हेंबर २०२० : नेपच्यून-रवी नवपंचमयोग, त्यात शुक्र लाभात. या सर्व सुपरिस्थितीतून उत्पन्नाचे मार्ग सुचतील. त्यातील गैरमार्ग कटाक्षाने टाळावेत. उद्योगधंद्यातील नवीन प्रयोग, नवीन कल्पना यशस्वी ठरतील. चतुर्थात मंगळ. कौटुंबिक वादविवाद, गैरसमज वाढवू नका.

डिसेंबर २०२० : लाभात गुरू-रवी-नेपच्यून त्रिएकादश योग गृहयोग उत्तम पण तरीही आशावादी राहा. आजचे कठोर निर्णय उद्याचा जगण्याचा मार्ग सोपा करतील. उद्योगधंद्यात, नोकरीत श्रम आणि योग्य ठिकाणी बुद्धीचा वापर केल्यास निश्चित यश लाभेल.

मकर : २१ डिसें. ते २० जानेवारी

आपला जन्म २१ डिसेंबर ते २० जानेवारी दरम्यान झाला असेल तर आपल्यावर कायमस्वरूपी ८ अंकाचा म्हणजे शनी ग्रहाचा प्रभाव असतो. २०२० या वर्षी २+०+२+०=४ या अंकाचा म्हणजे हर्षलचा वर्षभर अंमल असणार आहे. एकूण शनी हर्षलचा वर्षभर चालणारा प्रवास एक मजेदार अनुभव असेल आणि हाच अनुभव खूप मोठे शहाणपण शिकवून जाईल. विशेष म्हणजे अवास्तव अपेक्षा, राग, लोभ यांपासून दूर राहा. कारण आपण करीत असलेल्या विचारांची पद्धत चुकीची असेल तर घडणाऱ्या गोष्टीही त्याच पावलावर पाऊल टाकतात. आपल्या राशीची खरी समस्या ही आहे की आपण जे नको आहे त्याचाच जास्त विचार करतो. हव्या असणाऱ्या गोष्टींना मनात जागाही देत नाही. या विचार करण्याच्या तंत्रात जरूर बदल करा.

जानेवारी २०२० : धन स्थानात शुक्र, हर्षल शुक्राचा त्रिएकादाशयोग. त्यामुळे उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचे स्वरूप सोपे होईल. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रांत आपल्या बहुमोल कामाची किंमत होईल. आर्थिक लाभाचे प्रसंग येतील. शत्रूपक्ष माघार घेईल. आपले वर्चस्व वाढेल.

फेब्रुवारी २०२० : शुक्र-शनी त्रिएकादश, तर षष्ठात राहू. नवीन विचार, नवीन कल्पना आनंदी जगण्यासाठी खूपच मदत करतील. नेहमीचा गोंधळ, चिडखोरपणा कमी होईल. दुसऱ्याच्या व्यथा, दु:खे समजून घ्या. प्रवासातील ओळखी, मैत्री यात फारसे गुंतू नका. स्थिरता बाळगा. आरोग्य सांभाळा.

मार्च २०२० : व्ययात मंगळ-गुरू-केतूमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचा ताण वाढेल; पण या महिन्यात पराक्रमातल्या रवीकडून स्वत:ला सावरण्याचे बळ लाभेल. विशेषत: चतुर्थातल्या हर्षल-शुक्राच्या पाशात अडकू नका. भावना, प्रेम या कोमल विचारात तुमची फसगत होऊ शकते. सावध राहा.

एप्रिल २०२० : स्वराशीतील शुक्राच्या आगमनामुळे सिने-नाटय़-साहित्य-क्रीडापटू यांना मानसन्मानाचे योग येतील. समज-गैरसमज यातून निर्माण झालेला वाद षष्ठातील राहू शांत करील. आपल्या कार्यक्षेत्रात अधिक भव्यता निर्माण होईल आणि त्यात उत्तम यश प्राप्त कराल.

मे २०२० : पंचमात शुक्र-बुध शुभदायक ठरतील. मात्र सुखाचे झुकते माप पदरी असताना ते शोधत राहणे म्हणजे खरीखुरी मानसिकता हरवल्यासारखी आहे. मनाची हुरहुर मनाचा दुबळेपणा याला आवर घाला. यापेक्षा नवीन विचार, नवीन योजना यातील आनंद शोधण्याकडे लक्ष द्या.

जून २०२० : गुरू-मंगळ त्रिएकादशयोग आणि त्यात एकूण ग्रहाचे पाठबळ या काळात महत्त्वाची कामे उरकून घ्या. विशेषत: लक्षात ठेवा, आजचे परिश्रम उद्याचा जगण्याचा मार्ग सोपा करतील. उद्योगधंद्यात, नोकरीत आपला भाग महत्त्वाचा ठरेल.

जुलै २०२० : मंगळ-शुक्र-राहूचे उत्तम सहकार्य, पण कामात घाई टाळा. अतिउत्साह, उतू जाणारे प्रेम आणि साहस टाळा. नोकरी-उद्योगधंद्यात पुढे-मागे होणाऱ्या घटनांमुळे निराश होऊ नका. नवीन जागा, स्थावर खरेदी विक्रीसाठी उत्तम काळ. पैशाची आवक वाढेल. अतिविचार आणि श्रम टाळा.

ऑगस्ट २०२० : शुक्र-रवी त्रिएकादश योग यामुळे लाभदायक घटना घडतील, पण घरात कौटुंबिक वाद निर्माण होतील. त्यात आपली मानसिक स्थिती जपा. हे वाद हास्यास्पद ठरतील. कोणाला किती किंमत द्यावी याचा बोध लवकर होईल. बुद्धी आणि मन यांचा समन्वय साधून मानसिक गुंता दूर करू शकाल.

सप्टेंबर २०२० : बुध-शुक्राशी रवीचा त्रिएकादश, १९ सप्टेंबपर्यंत राहू षष्ठात एकूण हे ग्रह मकर राशीला शुभसंकेत देत आहे. त्यामुळे आपण हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. नवीन योजना, कल्पनांना सफलता प्राप्त होईल. अतिआवश्यक गोष्टीसाठी पैसे खर्च करा. घरातील वातावरण आनंदी राहील. गैरसमज, संशयापासून दूर राहा.

ऑक्टोबर २०२० : एकंदरीत ग्रहाची स्थिती संमिश्रित आहे. त्यामुळे स्थिर शांतपणे प्रसंग हाताळण्याची सवय तुम्हाला यश देईल. गोंधळ, अस्वस्थता, अस्थिरता टाळा. अतिभावनिक होणे टाळा. म्हणजे खूपशा गोष्टीवर निर्णय घेणे शक्य होईल. विशेष म्हणजे महिनाअखेर शुभवार्ता कळतील.

नोव्हेंबर २०२० : रवी-बुध लाभात, तर मंगळ पराक्रमात. आपले भाग्य उजळण्यात या ग्रहाचा मोठा वाटा असणार आहे. खूपशा कामात आपण दाखवलेला संयम आपल्या उद्योगधंद्यात खूप मदतीचा ठरेल. आर्थिक बाबतीत आपली रखडलेली कामे मार्गी लागतील.

डिसेंबर २०२० : शनी-गुरू युती स्वराशीत, पराक्रमात मंगळ, तर लाभात शुक्र. एकूण या पद्धतीने ग्रहाचे एकत्र येणे म्हणजे हा मोठा शुभयोग आहे. उद्योगधंद्यात, नोकरीत आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. आपल्या शब्दाला किंमत येईल. जबाबदारी वाढेल.

कुंभ : २१ जाने. ते १९ फेब्रुवारी

२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान जन्म झाला असेल तर आपल्यावर ८ अंकाचा म्हणजे शनीचा प्रभाव असणार आहे. कुंभ ही वायू तत्त्वाची बौद्धिक राशी आहे. या वर्षी २०२० साली २+०+२+०=४ हा हर्षलचा अंक वर्षभर शनीच्या सान्निध्यात असणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या बौद्धिक जीवनाचा प्रवास खूप मजेदार होणार आहे. विशेष म्हणजे शनीच्या साडेसातीचे विपरीत परिणाम फारसे क्लेषदायक ठरणार नाहीत. उलट आलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यातला बौद्धिक भाग आनंदच देईल. सुखाचा उजेड नि दु:खाचा काळोख या अवस्थेत घट्ट डोळे मिटून मिटलेल्या डोळ्यातून लख्ख प्रकाशाचा आनंद देणारी सतत आपल्याच पावलाकडे नम्रतेने पाहणारी ही रास या वर्षांत प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावील.

जानेवारी २०२० : लाभात गुरू-केतू, पराक्रमात हर्षल. एकूण या ग्रहाच्या स्थितीतून प्रगतीचा प्रवास सुरू होईल. मंगळ रवी त्रिएकादश योगातून खूपशा कामांना गती प्राप्त होईल. उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या कामाची सुरुवात होईल. मात्र हाती आलेला पैसा जपून वापरा. भावी काळाची तरतूद करा.

फेब्रुवारी २०२० : रवी-गुरू त्रिएकादश योगातून उद्योगधंद्यात, नोकरीत नवे विचार योजना यशदायक ठरतील. नवीन मित्रपरिवार, परिचय यातून आनंद मिळेल. राजकीय, सामाजिक जीवनात आपल्याबद्दलचा आदरभाव वाढेल. खूपशा समस्या आपल्या कुशल कामातून दूर कराल. आरोग्य उत्तम राहील.

मार्च २०२० : शुक्र-गुरू नवपंचम योग. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. नवीन परिचय, नवीन ओळखीतून कामांची व्याप्ती मोठी होईल. आर्थिक बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासाचे योग येतील. त्यातून आनंद मिळेल व मनाला हवी असलेली विश्रांती मिळेल. आरोग्य चांगले राहील.

एप्रिल २०२० : पराक्रमात रवी-शुक्र-हर्षल यांचे वास्तव्य खूप मदतीचे ठरेल. नवीन योजना, नवीन कल्पना मार्गी लागतील. आर्थिक आवक वाढेल. जमीन खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ. आपण आता घेत असलेले निर्णय पुढील काळासाठी योग्य ठरतील. भावनिक निर्णय घेताना वडीलधारी मंडळींचा सल्ला जरूर ऐका.

मे २०२० : रवी-मंगळ केंद्रयोगातून कुटुंबात निर्माण झालेले वाद संपुष्टात आणा. केवळ नकारात्मक विचार करून आपल्या अंतर्मनातील प्रचंड ताकद आपण वाया घालवत असतो. अंतर्मनातील विचाराचा कल बदलला की सकारात्मक विचार सुरू होतो आणि त्यातून आत्मविश्वास वाढून गोष्टीचा क्रम बदलतो.

जून २०२० : चतुर्थात शुक्र आणि लाभात गुरू हे दोन ग्रह या महिन्यात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. त्यामुळे स्वीकारलेली कामे या महिन्यात चोख पार पाडू शकाल. उद्योगधंद्यात नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. धार्मिक कार्यातला सहभाग आपल्याला आनंद देईल.

जुलै २०२० : रवी-गुरू-शुक्र यांचा उत्तम सहभाग. एकूण प्रसन्नतेचा काळ. आनंदी मनाने जगण्याच्या काळातही आपण नको त्या काळजींना आमंत्रण देत असतो, अशा वेळी प्रवास करावा. धार्मिक  स्थळांना भेटी द्याव्यात. मित्रमंडळी, नातेवाईकांच्या भेटी घ्याव्यात. आर्थिक बाबतीत आवक वाढेल.

ऑगस्ट २०२० : मंगळ-शुक्र-गुरूच्या सहवासात हा महिना आनंद देईल. नोकरी-उद्योगधंद्यात आपल्या विचारांचे स्वागत होईल. आर्थिक बाबतीत पैसा जपून वापरावा. उधळपट्टी नको, जमीन इस्टेटीचे वाद कोर्टाबाहेर मिटवणे फायद्याचे ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.

सप्टेंबर २०२० : पराक्रमात मंगळ, लाभात गुरू; पण षष्ठातील शुक्रामुळे समंजसपणे वागण्यात शहाणपण ठरेल. नको ते आरोप-आळ येणार नाहीत याची काळजी घ्या. आप्तेष्टाशी संबंध सलोख्याचे ठेवा. मित्रमंडळीत आर्थिक व्यवहार शक्य तो टाळावेत. अतिसंवेदनशील राहणे नुकसानीचे ठरेल.

ऑक्टोबर २०२० : गुरू-रवी त्रिएकादश योगातून रेंगाळलेली कामे जलदगतीने पुढे सरकतील. शेअर कंपन्यांमध्ये पैसे गुंतवताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. पैशाची हाव ठेवून चढय़ा व्याजाने पैसा गुंतवणे धोक्याचे ठरेल. सावधतेने वागा. कामात दिरंगाई, कंटाळा टाळा.

नोव्हेंबर २०२० : लाभात गुरू, दशमात रवी या दोन ग्रहांचे पाठबळ खूपशा गोष्टींना मदतीचे ठरेल. लाभात मंगळ उद्योगधंद्यात पैशाचा वापर काळजीपूर्वक करावा. नोकरीत सध्या बदल करू नये. नवीन कामे स्वीकारा. पाहुण्याची ये-जा वाढेल. हळवेपणातून एकटेपणा येईल. पण कामात गुंतवून घ्या. म्हणजे कामात आनंद मिळेल.

डिसेंबर २०२० : रवी-बुध व गुरू यांचा उत्तम सहवास आपले भाग्य उजळण्याचे संकेत देत आहे. खूपशा कामात आपण दाखवलेला संयम आपल्या पुढील गोष्टीसाठी खूप मदतीचा ठरेल. आनंदी वातावरणात काहीशी अनामिक उदासीनता वाटेल. जुन्या आठवणी, जुने मित्र यांची मनात उजळणी चालू राहील.

मीन : २० फेब्रु. ते २० मार्च

२० फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान जन्म झाला असेल अशा लोकांवर गुरू ग्रहाचा अंमल असतो. गुरूचा अंक ३ तर या वर्षी २०२० सालचा एकांक २+०+२+०=४ हा अंक हर्षलचा अंक आहे. मीन जल रास आहे. यांच्यापाशी उत्तम बुद्धिमत्ता असते. पण तितकाच हळवेपणाही असतो. सोशिकता, वेदना, भूक या शब्दांतील सत्यता यांच्या मनात नि जिभेवर सतत वास करीत असते. त्यामुळे गरीब, अनाथ लोकांविषयी यांना प्रचंड प्रेम, आपुलकी असते. उत्तम प्रतिभा, उदारमतवादी, शांत गंभीर स्वभाव, धार्मिक वृत्ती, कठीण काळातही आनंद मानणे या गोष्टी या राशीकडे असतात. या वर्षी हर्षलचे गुरूसोबत असणे खूप महत्त्वाचे ठरेल. हर्षलच्या उतावीळ स्वभावाला गुरूकडून मुरड घातली जाईल. त्यामुळे हर्षलच्या विक्षिप्त वागण्यातून होणारा अतिरेक टाळला जाईल.

जानेवारी २०२० : लाभात रवी-बुध, तर शनी-शुक्र त्रिएकादश योग. दशमातील गुरूचे भ्रमणही फलदायी ठरेल. कर्तृत्वाला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढेल. नवीन ओळखी, नवीन परिचय यातून कार्याची व्याप्ती विस्तारित होईल. सामाजिक कार्यात मानसन्मानाचे प्रसंग येतील.

फेब्रुवारी २०२० : २४ जनोवारीला शनी मकर राशीत प्रवेश करत आहे. गुरू दशमात एकूण शिक्षण, नोकरी, उद्योगधंद्यात नवीन संधी प्राप्त होतील. पण लोकप्रियता, प्रसिद्धी यामध्ये फारसे फसू नका. यात खऱ्या कामाचा विसर पडेल. रोजच्या जीवनातले साधे नियम पाळून पुढे सरका. शेवटचे दोन आठवडे आरोग्याकडे लक्ष द्या.

मार्च २०२० : शुक्र-शनी नवपंचम योग व्यवसायात, नोकरीत उत्तम संधी प्राप्त होतील. मात्र आळशीपणा, वेळेचा अपव्यय टाळा. कुठल्या कामाला प्रथम स्थान द्यावे याचे उत्तम भान असू द्यावे. भावनिक गुंतवणूक टाळा, म्हणजे मनस्तापाचे कारण संपेल. आर्थिकबाबतीत पैसे जपून वापरा. उधार उसनवार देणे बंद करा.

एप्रिल २०२० : गुरू-शनी-मंगळ लाभात, तर शुक्र धनस्थानात. खूप छान योगायोग. शुभ घटनांमुळे आश्चर्याचा धक्का बसेल. नात्यात, साध्या प्रसंगात भावनावश होणे, हळवेपणा यापासून दूर राहा. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ. जागेसंबंधीचे वादविवाद सामोपचाराने मिटतील.

मे २०२० : लाभात गुरू-शनी, तर पराक्रमात रवी-बुध-शुक्र एकमेकांच्या नवपंचमयोगात. एकूण ग्रहस्थिती उत्तम. नवीन योजना, नवीन कामे यात यश लाभेल. आर्थिक बळ वाढेल. धनस्थानातील हर्षलमुळे खर्चाचे प्रमाण वाढू देऊ नका. घरात नातेवाईकांची वर्दळ वाढेल. घरात शुभमंगल कार्याच्या गोष्टी चालू होतील.

जून २०२० : स्वराशीत मंगळ आणि चतुर्थात रवी-राहू. एकूण काहीशी संमिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पण त्यात शनी-गुरू-शुक्राचा मोठा आधार वाटेल. वरिष्ठांशी उत्तम संवाद साधला जाईल. गुप्तशत्रूची मिरासदारी उखडून काढून टाकू शकाल. मात्र भावनिक हतबलतेतून तडजोड स्वीकारू नका.

जुलै २०२० : गुरू-शनी लाभात, पराक्रमात शुक्र. एकूण उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचे स्वरूप उत्साहदायी राहील. राजकारणात सामाजिक जीवनात उत्तम यश प्राप्त कराल. स्वराशीतील, मंगळातून साहस शिस्तबद्ध राहणे, वेळेचे नियम पाळणे यांसारख्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आनंद मानाल.

ऑगस्ट २०२० : चतुर्थात शुक्र, षष्ठात रवी आणि एकादशात शनी. अनपेक्षित संधीतून मोठी सफलता मिळणे शक्य आहे. त्यामध्ये व्यापार, राजकारण, कलाप्रांतातील करार या गोष्टी करण्यासाठी हा महिना शुभदायक आहे. मात्र दुर्लक्ष, कंटाळा या गोष्टींना थारा देऊ नका.

सप्टेंबर २०२० : पराक्रमात राहू, लाभात शनी यामुळे नोकरीत प्रमोशन तर उद्योगधंद्यात प्रगती. हाती घेतलेली कामे पार पडतील. आर्थिक बाजू चांगली राहील. व्यवहारात पैशाचे गणित उत्तम जमेल. आरोग्य चांगले राहील. न्यायबुद्धीने निर्णय घ्याल. मानसिक स्थैर्य लाभेल.

ऑक्टोबर २०२० : रवी-मंगळ षडाष्टक. यामुळे मानसिक स्वास्थ्य काहीसे बिघडेल. त्यातून कामे उरकण्याची गती मंदावेल. पण मानसिक दडपणाखाली वावरू नका. अष्टमात रवी असल्यामुळे वाहने हळू चालवा. बेफिकीरपणे वागू नका. वरिष्ठांशी समजुतीने वागा. महिनाअखेर वातावरणात बदल होईल.

नोव्हेंबर २०२० : गुरू-शनी लाभात, पराक्रमात राहू, अष्टमात शुक्र. एकूण आपल्या राशीशी ग्रहाचा उत्तम संवाद साधला जात आहे. यशाकडे वाटचाल सुरू राहील. कला-साहित्य-क्रीडा या क्षेत्रात नावलौकिक होईल. शिक्षण पद्धतीतल्या आपल्या नव्या विचारांचे स्वागत होईल.

डिसेंबर २०२० : राहू-शुक्र-शनी-गुरू या ग्रहांचा उत्तम पाठिंबा आपले मनोबल वाढवील. नवीन योजना, नवीन कामे यात उत्तम यश. आर्थिक स्थिती चांगली राहील. पण नको ते खर्च टाळा. जुनी माणसे, नातेवाईक यांच्या भेटीगाठी, घरात मंगलकार्याच्या गोष्टी चालू होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2020 1:05 am

Web Title: yearly horoscope 2020
Next Stories
1 विवाह टिकवण्यासाठी!
2 सरकारची ग्रहदशा
3 तुमचा मोबाइल नंबर काय सांगतो?
Just Now!
X