कथा-कादंबरीकार रवींद्र शोभणे यांच्या ‘पडघम’ या कादंबरीत्रयीचा दुसरा भाग ‘अश्वमेध’ या नावाने २१ जून रोजी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (ठाणे) तर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीला समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश..
रवींद्र शोभणे यांची ‘अश्वमेध’ ही कादंबरी ‘पडघम’ या त्यांच्या आधीच्या कादंबरीचा पुढील भाग होय. साधारण इ.स. १९७५ ते २००० या कालखंडावर त्रिखंडात्मक कादंबरी लिहिण्याचा संकल्प आहे. या कादंबरी प्रकल्पातील हा दुसरा खंड आहे.
मराठीमध्ये कालखंडाला- प्रत्यक्षातील कालखंडाला केंद्रस्थानी ठेवून कादंबरीलेखन फारसे झाले नाही. अनेक लेखकांनी गरजेप्रमाणे कल्पित कालखंड रेखाटला आहे; परंतु प्रत्यक्षातील कालखंड रेखाटणे तसे अवघड आहे. असा पहिला प्रयत्न भानू काळे यांनी केला होता. प्रत्यक्षातील कालखंड जेव्हा एखादा लेखक चित्रणासाठी निवडतो तेव्हा त्या कालखंडावर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्यक्षातील व्यक्ती त्याला टाळता येत नाहीत. उदाहरणार्थ इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, राजीव गांधी इत्यादी. त्यांची चित्रणे लेखकाला करावी लागतातच. मात्र ही चित्रणे ललित कलाकृतीमधील निर्मिती असली तरी ती अविकृत झाली पाहिजेत याची लेखकाला काळजी घ्यावी लागते. त्याच वेळी वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीचे चित्रण करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या प्रतिभाशक्तीने निर्माण कराव्या लागतात. येथे रवींद्र शोभणे यांनी प्रत्यक्षातील व्यक्तींची प्रभावी पुनर्निर्मिती तर केली आहेच, पण तो कालखंड उभा करण्यासाठी विविध वृत्तीप्रवृत्तींची असंख्य व्यक्तिचित्रेही निर्मिली आहेत. यातून एक कालभान प्रकट होते, ही त्याची मोठीच जमेची बाजू आहे.
इंदिरा गांधी यांच्या हत्येपासून सुरू झालेला ‘अश्वमेध’मधील कालखंड राजीव गांधी यांच्या हत्येपर्यंत येऊन थांबतो. असा हा धामधुमीचा कालखंड साकार करत असताना असंख्य व्यक्ती निर्माण कराव्या लागतात. शेकडो खऱ्या- कल्पिक घटनांची मालिका उभी करावी लागते. ‘अश्वमेध’मध्ये अशा लहान-मोठय़ा शंभरसव्वाशे तरी व्यक्तिरेखा निर्माण केल्या गेल्या आहेत. तसेच कालखंडाचे व्यामिश्र रूप साकारण्यासाठी विविध प्रकारच्या घटना साक्षात करण्यात लेखकाला मोठेच यश मिळाले आहे. घटना-प्रसंगांमधून आणि कृती-उक्तीमधून येथील व्यक्ती ठसठशीत आणि प्रभावी झाल्या आहेत. हा कालखंड काहीसा अंदाधुंदीचा आणि नैतिक मूल्यांच्या ऱ्हासांचा आहे. या सगळ्या गोष्टीसह एक कालखंड येथे सजीव होऊन जातो.
एखादा मोठा कालपट जेव्हा त्याच्या विविध अंगोपांगांसह चित्रित होत असतो, तेव्हा विविध विचारसरणींचा संघर्ष होणे अगदीच स्वाभाविक असते. किंबहुना समाजजीवनातील बहुतांश संघर्ष या दोन कारणांमुळे घडत असतात. एक म्हणजे स्वार्थ आणि दुसरे म्हणजे विचारसरणी. पुष्कळदा आपल्या स्वार्थाला विचारसरणीचाही मुलामा दिला जातो. असा स्वार्थाला दिलेला विचारसरणीचा मुलामा या कादंबरीत जागोजागी दिसतो. मुख्यत: राजकीय स्वार्थ साधताना हे प्रच्छन्नपणे घडताना दिसते. किंबहुना हा मानवी स्वभावच आहे, परंतु केवळ विचारसरणीसाठी संघर्ष, हा फार कमी वेळा आढळणारा प्रकार मानवी जीवनात असतोच. येथेही त्याचे चित्रण येते. विशेषत: हिंदुत्ववादी विचारसरणी बाळगणाऱ्या व्यक्ती आणि पक्ष यांचे चित्रण येथे येते. कुठल्याही पक्षाकडे जेव्हा सत्ता नसते तेव्हा अनुयायी कमीच असतात. त्यामुळे विचारसरणी तर प्रकट करायची, त्यासाठी संघर्ष करायचा तेव्हा अशा वेळी संयम बाळगावा लागतो. अशा संयमाचे चित्रण या कादंबरीत जसे येते त्याप्रमाणेच सत्ताधारी पक्षाकडे अनुयायांची संख्या अधिक असल्यामुळे हुल्लडबाजीही केली जाते. अशा हुल्लडबाजीचेही चित्रण का कादंबरीमध्ये येते. एकंदरीत प्रकट अगर सुप्त स्वरूपातील विचारसरणीचा संघर्ष चित्रित करणे ही ‘अश्वमेध’मधील मोठी जमेची बाजू आहे.
ही कादंबरी राजकीय जीवनावर भर देणारी असली तरी केवळ तेवढेच चित्रण करणे हा तिचा हेतू नाही. राजकारणामुळे संपूर्ण जीवनामध्ये बदल होतात. ‘राजा कालस्य कारणम्’ म्हटले जाते, ते याच अर्थाने. म्हणून राजकारणाचा मुख्य पदर चित्रित होत असतानाच जीवनाच्या अनेक क्षेत्रांत कसे बदल होत जातात याचेही भान येथे प्रकट झाले आहे. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात कसे बदल होत जातात, त्याचे अतिशय सूक्ष्म आकलन रवींद्र शोभणे यांना आहे. विशेष म्हणजे कालखंडात मुद्रणक्षेत्रात बदल सुरू झाले होते. त्यातून खिळे जुळविणारे जुने कामगार कसे बाहेर फेकले गेले याचे चित्रण कदाचित मराठीमध्ये प्रथमत: कादंबरीच्या निमित्ताने आले असणार. शिवाय पत्रकारितेच्या क्षेत्रातील अध:पतनही एकूणच या काळाशी सुसंवादी असे आहे, आणि ते या कादंबरीमध्ये फार समर्थपणे येते.
या कादंबरीचा सामाजिक पटही फार मोठा आहे. एक आंतरजातीय विवाहित जोडपे या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे, परंतु हा विवाह केवळ आंतरजातीय नाही. दोन परस्परविरोधी विचारधारा असणाऱ्या घरातील हे स्त्री-पुरुष आहेत. त्यातून दोन विचारधारा आणि दोन जाती येतातच. शिवाय कुणबी, ब्राह्मण, मराठा, मुस्लीम, इतर मागासवर्गीय, दलितांमधल्या अनेक जाती येथे चित्रित होतात. हा जातींचा पट जसा मोठा आहे, त्याप्रमाणे विविध व्यावसायिकही यात येतात. संपादक, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, विद्यार्थी, विविध पक्षाचे नेते आणि सामान्य कार्यकर्ते, नाटय़क्षेत्रातील नट-नटय़ा, सामान्य गृहिणी, पुढाऱ्यांच्या बायका, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यकर्ते, निपुत्रिक स्त्री-पुरुष, अनैतिक संबंधांतून जन्मलेले लोक, वैषयिक भावनेच्या भरात वाहत जाणारे लोक, शेतकरी असे कितीतरी लोक येतात. तसेच एकाच वेळी विविध पिढय़ांचे लोक कसा विचार करतात याचेही चित्रण येते. एकूणच या कादंबरीचा पट खूपच विस्तीर्ण आहे आणि या विस्तीर्ण पटाला पेलून धरण्याचे सामथ्र्यही रवींद्र शोभणे यांच्यात आहे.
समाजजीवनाच्या जडणघडणीमध्ये आणि घटितांमागे विचारसरणी, मूल्यात्मकता असली तरी एकूण मानवी जीवन विकारवश असते. मूल्यात्मकता आणि विकार जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा मूल्यात्मकतेचाच विजय होईल असे सांगता येत नाही. बहुसंख्य वेळा विकाराने मूल्यात्मकतेवर मात केलेली आहे हे लक्षात येते. अशा विकाराच्या आहारी जाणाऱ्या अनेक व्यक्ती या कादंबरीमध्ये ठसठशीत होऊन येतात. हेमाताई यावलकर हे या संदर्भातील एक महत्त्वाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. विक्रमबद्दलही हेच सांगता येईल. मृणाल तर विकारांबरोबर वाहत जाणारे व्यक्तिमत्त्व. तिच्यावरचे संस्कार, वडिलांची सेवानिवृत्ती यांसारख्या साऱ्याच बाबी तिच्या विकारवशतेपुढे वाहून जातात. नारायणराव जोशी स्वत:ला मूल्यात्मक विचारसरणीशी बांधील समजतो, परंतु जेव्हा असहाय गायत्री समोर येते तेव्हा त्याच्यातले विकार उफाळून वर येतात.  बेदरकारपणे तो तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. भानुदास धवणेसुद्धा विकावश झालेला दिसतो. एकूणच मूल्यात्मकतेवर मात करणाऱ्या विकारवशतेचे चित्रण या कादंबरीतून सतत येत राहते. म्हणूनच ही कादंबरी वास्तवाभिमुख जीवनचित्रण करण्यात यशस्वी झाली आहे, असे म्हणावे लागेल.
विशिष्ट कालखंडाचे चित्रण करीत असताना त्यात त्या कालखंडातील सर्व पिढय़ांचे आणि विविध वृत्तीप्रवृत्तीचे प्रतिनिधी अपेक्षित असतात. त्यामुळे इथे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असणारे लोक जसे असतात, त्याचप्रमाणे अनीतीच्या गर्तेत भिरभिरत राहणारेही इथेच असतात. या दृष्टीने स्वातंत्र्यसैनिक अण्णाजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे पाहता येईल. अण्णाजी शेवटपर्यंत नैतिक भूमिका घेत राहतात, परंतु पुढची पिढी मात्र तडजोडी करीत राहते. अण्णाजींची नातवंडे तर गुन्हेगारी वृत्तीचीच असल्याचे दिसते. म्हणजे एकाच घरातील तीन पिढय़ा तीन प्रकारच्या आहेत. जणू नीती आणि अनीती एकाच वेळी आणि समांतर रूळांवरून वाटचाल करताहेत, असेच हे चित्र आहे. आणखी एक लक्षात घेतले पाहिजे की, सर्वच काळात सर्वच प्रवृत्तींची माणसे कमीअधिक असतात. म्हणजे अण्णाजींच्या काळात सगळेच आलबेल होते आणि पुढच्या काळात सगळेच बिघडून गेले, असेही म्हणता येत नाही. अण्णाजींची आणि देशपांडेची मुले-नातवंडे स्खलनशील आहेत, म्हणून सगळीच पिढी तशी आहे असेही म्हणता येणार नाही. पुढच्या पिढीतही नैतिक अधिष्ठान असलेली माणसे असतातच. अशाच आबा शिरोळेंसारख्या नैतिक पत्रकाराचे चित्रण या कादंबरीतून येते. गायत्री तर या संदर्भातील उत्तम उदाहरण ठरावे अशी व्यक्तिरेखा आहे. प्रत्यक्ष जगण्याचेच प्रश्न निर्माण होतात, अवहेलनाही होत राहते तेव्हाही ती आपले आयुष्य संयमानेच व्यतीत करते. याचा अर्थ एवढाच की कुठल्याही काळाचे सरधोपट असे चित्रण रवींद्र शोभणे करीत नाहीत आणि त्यामुळेच ही कादंबरी अधिक अर्थपूर्ण होत जाते.
कुठल्याही कादंबरीचा कणा हा व्यक्तिचित्रण कसे झाले आहे, यावरच अवलंबून असतो. तेथे असंख्य व्यक्ती त्यांच्या बऱ्यावाईट जगण्यासह उभ्या राहतात. कुठलीही व्यक्ती वर्तमानात जगत असली तरी तिचा भूतकाळ फार महत्त्वाचा असतो. भूतकाळामुळे व्यक्तींच्या प्रेरणा लक्षात येतात. म्हणूनच भूतकाळातील व्यक्ती जेव्हा उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्या जगण्याचा पटही खूपच मोठा आहे, हे लक्षात येते.
‘पडघम’ काय किंवा ‘अश्वमेध’ काय, या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये असंख्य व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. त्यांची चित्रणेही चांगली झाली आहेत, परंतु एक व्यक्तिमत्त्व मात्र या सगळ्यांच्या पाश्र्वभागी सतत राहते आणि ते म्हणजे सत्ता. सत्ता नावाची गोष्टच अशी आहे की ती भल्याभल्यांना कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचवीत राहते. तिच्यामुळे विकासही होतो आणि नैतिक अध:पतनही होते. माणसातले माणूसपण तिच्यामुळे जसे फुलते त्याचप्रमाणे त्याच्यातले क्रौर्यही उफाळून वर येते. मग हे क्रौर्य कधी सत्तेमुळे झाकले जाते तर कधी ते उजागरही होते. अशा प्रकारची सत्ता नावाची गोष्ट संपूर्ण कालखंडाला आणि संस्कृतीलाही आकार देत राहते, परंतु तिचे अस्तित्व कोणाला जाणवत नाही. त्याबद्दल बोलताना आपण तिला कधी राजकारण म्हणतो, कधी दैव म्हणतो, तर कधी आणखी काही. आपण काहीही म्हणत असलो तरी सत्ता नावाची एक शक्ती सर्वदूर पसरलेली असते याचे फार चांगले भान रवींद्र शोभणे यांना आहे, यात मात्र काही शंका नाही. म्हणूनच सतत पाश्र्वभूमी असणाऱ्या या शक्तीची असंख्य रूपे ते फार चांगल्या प्रकारे प्रकट करू शकले, याची प्रचिती ही कादंबरी वाचताना सतत येते.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार