|| डॉ. जयश्री शं. तोडकर

सेमिनार स्थळापासून केवळ तीन रस्त्यांच्या पल्याड अनेकांचे विश्व उद्ध्वस्त होत होते. अचानकपणे घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनी श्रीलंकेतला ईस्टर संडे रक्तरंजित झाला होता..

माझ्या आवडत्या ठिकाणांपकी श्रीलंका हे एक ठिकाण. तसे श्रीलंकेशी आपले पौराणिक व भावनिक नाते आहेच. श्रीलंकेत व आपल्यामध्ये जेनेटिक अन् सांस्कृतिक साधम्र्यही आहे. मी वरचेवर श्रीलंकेला भेट देत असते. यावेळी डॉक्टरांच्या एका सेमिनारसाठी मी कोलंबोला गेले होते. रविवारी (२१ एप्रिल) पहाटे साडेचार वाजता आम्ही श्रीलंकेला पोहोचलो. हॉटेलवर पोहोचल्यावर थोडीशी झोप काढून सेमिनारसाठी तयार झालो. ठीक साडेनऊ वाजता सेमिनार सुरू होणार होता. माझा विषय ‘लठ्ठपणाशी संबंधित आजार आणि त्यावरील उपाययोजना.. विशेषत: स्त्रियांसाठी!’ हा होता.

सेमिनार सुरू झाला. सुमारे अकरा वाजता माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितले, ‘‘आपल्याला लवकर सेमिनार संपवावा लागेल.’’ साहजिकच मी कारण विचारले आणि त्यांनी दिलेली माहिती ऐकून जिवाचा थरकाप उडाला : श्रीलंकेत लागोपाठ दोन बॉम्बस्फोट झाले होते! हे बॉम्बस्फोट चर्चमध्ये झाले होते व त्यात हजाराहून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले होते. समाज माध्यमांमुळे माझ्याआधीच सेमिनारला आलेल्या लोकांना ही बातमी कळली होती. आयोजकांनी लागलीच सेमिनार थांबवत असल्याचे जाहीर केले व बाहेर काय स्थिती आहे, हे जाणून घेतले. सर्वजण सुरक्षितपणे आपापल्या घरी जाऊ शकतील काय, याची त्यांनी चाचपणी केली. त्याच वेळी सेमिनार स्थळापासून केवळ तीन रस्त्यांच्या पल्याड अनेकांचे विश्व उद्ध्वस्त होत होते. अचानकपणे घडवले गेलेले हे बॉम्बस्फोट श्रीलंकेतला ईस्टर संडे रक्तरंजित करून गेले होते.

सेमिनारसाठी आलेल्या सर्वाना सुरक्षितपणे हलवणे हे पहिले कर्तव्य होते. बाहेर किती बॉम्बस्फोट झालेत याविषयी काहीच अंदाज बांधता येत नव्हता. कळलेल्या बातमीनुसार, आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. नंतर बातम्यांवर बातम्या धडकत राहिल्या.  कोलंबोमध्ये नाकाबंदी जाहीर झाली. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जनतेला उद्देशून शांततेचे आवाहन केले आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा दिलासा दिला. या सगळ्यात कौतुक वाटले ते सेमिनारला आलेल्या लोकांचे. त्यांच्यात कुठलीही बाचाबाची, त्रागा, हेवेदावे, राग दिसला नाही.

टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. सर्व यंत्रणा मदतकार्यात व्यग्र होत्या. सर्वत्र वेदना, किंकाळ्या, आक्रोशाचा कल्लोळ माजला होता. परंतु रुग्णवाहिका व मदत पथकांसाठी लोक बाजूला होऊन वाट करून देत होते. घडलेल्या घटनेचे गांभीर्य व ताण सर्वाच्याच चेहऱ्यावर दिसत होता. त्यातही एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली, ती ही की, विव्हळणाऱ्या समोरच्या माणसांकडे पाठ करून सेल्फी वा व्हिडीओ काढणाऱ्यांची संख्या मात्र शून्य होती.

आम्हालाही त्यांना मदत करण्याची इच्छा असली तरी आम्ही ती काठावरूनच जमेल तशी करण्याचा प्रयत्न केला. कारण अशा परिस्थितीत मुख्य संस्थांवर, कार्यप्रणालीवर, लष्कर वा पोलीस आणि आयोजकांवर प्रचंड ताण निर्माण होतो. विदेशी नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याचे भान ठेवून गरजेपेक्षा जास्त लुडबूड आपण करू नये असे आम्ही ठरवले. सर्वसामान्य लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याला प्राधान्य दिले. अशी एखादी घटना बऱ्याचदा अनेक हिंसक घटनांमध्ये परावर्तित होते. परंतु इथे मात्र कुठेही ब्लेमगेम, हिंसक व चिथावणीखोर भाषणं, जमाव, मोच्रे अशा पद्धतीच्या माहोलचा मागमूसही नव्हता. प्रत्येक जण वेदनेने कळवळणाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होता. अतिशय झपाटय़ाने मदतकार्य सुरू होते. जखमींना इस्पितळात हलवण्याचे काम सुरू होते.

पुढच्या काही तासांत बातमी आली की, दहाहून अधिक संशयित पकडले गेले आहेत आणि २० पेक्षा जास्त ठिकाणी बॉम्बशोधक पथकाने बॉम्ब निकामी केले आहेत. एव्हाना आम्ही व संयोजकांनी सेमिनारला आलेल्यांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहनांची सोय केली. इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते, की त्यावेळी कोणत्याही टॅक्सीचालकाने कोणत्याही दिशेने जाण्यास नकार दिला नाही. त्या सर्वानी आपले काम चोख पार पाडले. त्यात कसलाही हलगर्जीपणा केला नाही. हे पाहून मनात विचार आला- की खरोखरच सर्वासाठी आपत्ती म्हणजे वागणुकीचे व्यवस्थापन करण्याचा धडाच जणू!

संध्याकाळी सहा वाजता कर्फ्यू जाहीर झाला. तो दुसऱ्या दिवशी पहाटे सहापर्यंत होता. मधल्या काळात आम्ही सेमिनारपासून हॉटेलपर्यंत चालत येऊ शकलो. जागोजागी सुरक्षारक्षक होते. ओसंडून वाहणारा रविवारच्या संध्याकाळचा हॉटेल रेणुकासमोरील रस्ता मात्र आज फारच केविलवाणा वाटत होता. सकाळी सर्वत्र पूर्ववत व्यवहार सुरू झाले. आमच्या काही इस्पितळ-भेटी व सेमिनारमधील उर्वरित बैठका सुरळीतपणे पार पडल्या. एकंदरीत लोकांमध्ये आपण सुरक्षित आहोत आणि सरकारी यंत्रणा, लष्कर, पोलीस अगदी योग्य पद्धतीने सर्व ती काळजी घेतील, हा विश्वास दिसून येत होता. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यांनंतर मुंबई लगेचच पूर्वपदावर आली होती, त्याची आठवण झाली. आम्हा भारतीय चमूला फोनवर संदेश आले. आपल्या पासपोर्टचे सर्व तपशील, व्हिसा, राहण्याची माहिती ई-मेलद्वारे पाठवण्याच्या सूचना त्यात होत्या. त्याची पूर्तता आम्ही केली.

सोमवारी रात्री साडेअकराचे कोलंबो-मुंबई विमान आम्ही आधीच बुक केले होते. फोन करून विमान कंपनीकडून खात्री करून घेतली आणि विमान वेळेवर आहे की नाही याची खात्री केली. त्या दुपारी आम्हाला विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली आणि आपण येथून निघू शकू की नाही, अशी शंका निर्माण झाली. तोपर्यंत जवळपास १५ संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि ६० हून अधिक बॉम्ब निकामी करण्यात आल्याची बातमी कळली. एका बॉम्बस्फोटाने झालेली अवस्था ‘याचि देही याचि डोळा’ बघितली होती. त्यामुळे कल्पनाच करू शकत नव्हतो, की हे सगळेच बॉम्बस्फोट झाले असते तर किती भयंकर हाहाकार माजला असता! एव्हाना घरून, नातेवाईक व मित्रमंडळींकडून खुशीलीची विचारणा करणारे फोन सतत येतच होते.

आम्ही रात्रीच्या परतीच्या विमानप्रवासाची खातरजमा करून घेतली. आम्हाला सुरक्षेमुळे चार तास लवकर विमानतळावर पोहोचायचे आहे हे कळले. त्यामुळे लवकरच निघालो. परंतु विमानतळाच्या एक किलोमीटर आधीच गाडय़ांच्या प्रचंड रांगा लागलेल्या होत्या व वरून धो-धो पाऊस सुरू होता. त्यामुळे वाहने तिथेच सोडून देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. तिथून पुढे सामान घेऊन चालत जायचे होते. सुदैवाने सामान वाहून नेण्यासाठी ट्रॉल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ज्यांना योग्य वेळेत पोहोचता आले नाही, त्यांना मलभर अलीकडेच गाडीतून उतरून भर पावसात कडेवर मूल आणि डोक्यावर सामान अशा परिस्थितीत विमानतळ गाठण्याची पाळी आली होती.

सर्व सोपस्कर पार पाडून आम्ही विमानतळावर पोहोचलो. नेहमीपेक्षा सुरक्षा जास्तच कडक होती. मात्र, सर्व विमाने ठरलेल्या वेळेवर उड्डाण करीत होती. भीतीपोटी आधीच येऊन बसलेल्या लोकांमुळे विमानतळाला एखाद्या गावच्या जत्रेचे स्वरूप आले होते. अखेर ठरल्या वेळी आमचे विमान उडाले आणि आम्ही सुखरूप मुंबईला पोहोचलो. कोलंबोतील ते चाळीस तास आयुष्यभराची मोलाची शिकवण देऊन गेले.

jayatodkar@gmail.com