19 February 2020

News Flash

विनोबांचे अक्षर योगदान

ओरिसाच्या पदयात्रेत आचार्य विनोबा भावे यांनी गीतेवरील १०८ साम्यसूत्रांची संस्कृत रचना केली

(संग्रहित छायाचित्र)

हेमंत मोने

आचार्य विनोबा भावे यांचे ११ सप्टेंबर रोजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने बहुभाषाप्रभू विद्वान आणि महात्मा गांधींच्या सत्याग्रहातील या पहिल्या सत्याग्रहीच्या वाङ्मयातील योगदानाचा ऊहापोह करणारा लेख..

अध्ययन आणि अध्यापन हे विनोबा भावे यांच्या जीवनाचे प्रमुख सूत्र. १९२१ साली एप्रिल महिन्यात विनोबा वर्ध्याला आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे सत्याग्रह आश्रम सुरू झाला. विनोबांचा मुख्य भर प्रार्थना आणि सूतकताईवर होता. प्रार्थना म्हणजे वाङ्मय उपासना आणि  सूत कातणे ही कर्ममय उपासना. आश्रमात विनोबा उपनिषदे, शंकराचार्याचे गीताभाष्य यावर वर्ग घेत. प्रवचन करीत. लिहिण्यापेक्षा प्रत्यक्षात पचवलेले विचार आचरणात आणण्यावर विनोबांचा भर असे. विनोबा म्हणजे ज्ञानाची गंगा. तिचा लाभ सर्वाना व्हावा असे जमनालाल बजाज, श्रीकृष्णदास जाजू आदींना वाटे. या मंडळींच्या विनंतीवरून विनोबांनी लेखणी उचलली. आणि त्यातून सुरूझाले ‘महाराष्ट्र धर्म’ नावाचे मासिक. वयाच्या २८ व्या वर्षी विनोबा लिहिते झाले आणि पुढे ५० वर्षे त्यांचे विदग्ध वाङ्मय लोकांसमोर येत राहिले. विनोबांच्या या अक्षर वाङ्मयाला अध्यात्माची बैठक असली तरी ते सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व क्षेत्रांना स्पर्श करते.

‘महाराष्ट्र धर्म’ प्रथम मासिक होते. विनोबांनी त्यात उपनिषदांवर चार दीर्घ लेख लिहिले. विनोबा म्हणत, उपनिषद हे पुस्तक नसून ‘प्रातिभ दर्शन’ आहे. पुढे जून १९२४ पासून ‘महाराष्ट्र धर्म’ साप्ताहिक स्वरूपात निघू लागले. साधारण तीन वर्षे ते अखंडितपणे प्रकाशित होत राहिले. त्यात विनोबांचे २२२ लेख प्रसिद्ध झाले. त्यातील ४० लेखांचे संकलन ‘मधुकर’ या नावाने पुस्तकरूपात १९३६ साली प्रसिद्ध झाले.

विनोबांची विद्वत्ता, शब्दप्रभुत्व आणि यथोचित संदर्भ शोधण्याची कला इथेही दिसून येते. ‘आत्मनिवेदन’ या पहिल्या लेखात विनोबा म्हणतात- ‘‘भक्ती संप्रदायात आत्मनिवेदन शेवटी येत असले तरी पत्रकाराच्या संप्रदायात ते पहिल्या प्रथम येते. कारण भक्ताचे काम आतल्या देवाला जागवण्याचे आणि पत्रकाराचे काम बाहेरच्या देवाला जागवण्याचे असते. परंतु आतला देव जागवल्याशिवाय बाहेरचा देव जागविणे शक्य नाही.’’

ओरिसाच्या पदयात्रेत आचार्य विनोबा भावे यांनी गीतेवरील १०८ साम्यसूत्रांची संस्कृत रचना केली. त्यातील १८ सूत्रांवर कर्नाटकच्या पदयात्रेत पदयात्रींसमोर साम्यसूत्र विवरणपर प्रवचनेही दिली. या सूत्राच्या विवेचनात विनोबांची समन्वयवादी दृष्टी दिसते. गीतेतील स्थितप्रज्ञ लक्षणांतील शेवटचा फलश्रुती सांगणारा जो श्लोक आहे, त्यावरील भाष्यात विनोबांनी हा समन्वय कसा साधला आहे ते पाहा. तो श्लोक असा-‘अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावता न चळे पुन्हा! टिकुनी अंतकाळीही ब्रह्म निर्वाण मेळवी!’

स्थितप्रज्ञाची स्थिती कायमस्वरूपी असते, ती प्रयासाने टिकवावी लागत नाही, हा याचा सोपा अर्थ. यावर विनोबांचे भाष्य असे- ‘बुद्धांनी  यातला ‘ब्रह्म’ शब्द काढून फक्त ‘निर्वाण’ शब्द स्वीकारला. बुद्धांना निषेधक भाषा आवडली एवढाच याचा अर्थ. मनुष्याने आपलेपणा सोडावा, अहंतेचे मडके फोडून टाकावे एवढय़ाचा सूचक हा ‘निर्वाण’ शब्द आहे. याउलट, वैदिकांना विधायक भाषा आवडली. वैदिकांना वाटले की, ‘मोक्ष अभावरूप म्हणण्यापेक्षा भावरूप म्हणणे योग्य. आम्ही नाहीसे झालो, शून्य झालो म्हणण्यापेक्षा आम्ही व्यापक झालो, अनंत झालो असे म्हणणे बरे!’असे वैदिकांना वाटले.’ विनोबा असे सच्चे समन्वयवादी आहेत. विनोबा म्हणतात, भाषेचे स्वरूपच असे विलक्षण आहे, की ती एका बाजूने अर्थ समजावून देते, तर दुसऱ्या बाजूने गैरसमज निर्माण करते. विधायक आणि निषेधक दोन्ही भाषांचे भाव लक्षात घेऊन रुचेल ते स्वीकारावे. सर्वंकष, मौलिक आकलन नि विवेचन संक्रमित करू शकणारी शब्दसिद्धी असल्यानेच विनोबा हे भाष्य करू शकले.

भक्तिमार्गाचे ज्ञानेश्वरी, भागवत, तुलसीरामायण, तुकाराम गाथा आदी ग्रंथ विनोबांनी आयुष्यभर अभ्यासले. पण विनोबांचे ज्ञानदातृत्व एवढे, की हे ग्रंथ पचवून हा ज्ञानसंग्रह त्यांनी त्याचा आशय व भाव कायम राखून मुक्तहस्ते वाटून टाकला. त्यांनी वेदांचे अध्ययन पन्नास वर्षे केले. त्यातून ‘ऋग्वेद सार’ हा ग्रंथ निर्माण झाला. यात १३१९ ऋचा (मंत्र) आहेत. ऋग्वेदातील मंत्रसंख्येचा हा आठवा हिस्सा आहे. विनोबांनी निवड केलेल्या मंत्रांचे रचनाकार कोण असतील? ते २५० ऋषींचे मंत्र असून, त्यात १९ स्त्रियांच्या मंत्रांचाही सामावेश आहे.

‘अष्टादशी’ हा निवडक उपनिषदांवरील सारग्राही ग्रंथ. काही मुख्य उपनिषदांतील वाक्यांचा ब्रह्मसूत्र भाष्यात शंकराचार्यानी उपयोग केला. अशा अठरा उपनिषदांवरील एकूण ७३६ श्लोकांचा अर्थ सांगणारे हे चयन आहे.   ‘एकनाथांच्या भागवताने गीतेच्या दुधात मधाची भर घातली आहे..’ हा विनोबांचा अभिप्राय. त्यातील ‘एकादशस्कंध’ विशेष प्रसिद्ध. या स्कंधातील १५१७ श्लोकांपैकी साररूपात ३०६ श्लोक निवडून ‘भागवत धर्मसार’ तयार झाले. ओरिसाच्या पदयात्रेत जगन्नाथदासाच्या उडिया भाषेतील भागवताचेही विनोबा अध्ययन करीत. पदयात्रींबरोबर संवाद साधत. त्यातील ९३ श्लोकांवर विनोबांनी प्रवचने केली.

ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांचा अभ्यास तर विनोबांनी शालेय जीवनातच केला. ‘महाराष्ट्र धर्म’ मासिकात सुरुवातीपासूनच तुकोबांच्या निवडक अभंगांवर विनोबांचे लेख प्रसिद्ध होत असत. त्यातून पुढे ‘संतांचा प्रसाद’ व ‘तुकारामांची भजने’ ही पुस्तके सिद्ध झाली. १९४१ साली जेलमधील वास्तव्यात ‘एकनाथांची भजने’ हा संग्रह प्रसिद्ध झाला. विनोबा म्हणतात की, ‘ज्ञानदेवांची भजने आणि त्यांची चिंतनिका यांत मी जितका अंश ओतला, तितका ‘गीताई’ सोडल्यास दुसऱ्या कशातही ओतला नसेल.’ दामोदरदास मुंदडा विनोबांचे कथन लिहून घेत. त्यांनी म्हटले आहे की, हे कथन करताना विनोबा भावे समाधीत इतके लीन व्हायचे की त्यांना जगाचे भानच राहायचे नाही. कितीतरी वेळा त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असत.

‘रामदासांची भजने’ हे त्यांचे पुस्तक म्हैसूरच्या पदयात्रेत १९५७ साली संपादित झाले. ‘असार सोडून सार घ्यावे’ हा रामदासांचा उपदेश विनोबांनी आपल्या जीवनातही उतरविला. ‘मनाचे श्लोक’ ही सोन्याची तिजोरी आहे. इतकेच नव्हे तर मनाचे श्लोक ही अपौरुषेय वाणी आहे, असे विनोबा म्हणत. ज्या प्रांतात त्यांची पदयात्रा असे, तिथल्या लोकांशी तेथील संतांच्या आध्यात्मिक ग्रंथांच्या माध्यमातून ते प्रेमपूर्वक संवाद साधत. गुरूनानकांचा ‘जपुजी’ हा ग्रंथ म्हणजे शिखांचा हरिपाठच. ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव आणि कबीराचा बीजक यांतील साम्यस्थळे विनोबा दाखवीत. शंकरदेव आणि माधवदेव हे आसामचे संतपुरुष. त्यांच्या ‘नामघोषा’ या पुस्तकातील वचनांचे ‘नामघोषा सार’ हे पुस्तक विनोबांचीच देणगी होय.

शंकराचार्य, ज्ञानेश्वर आणि महात्मा गांधी या तिघांचे ऋण माझ्यावर आहेत, असे विनोबा नमूद करतात. शंकराचार्याच्या १२०० श्लोकांपैकी ४०० श्लोकांचे ‘गुरुबोध सार’ हे त्यांचे पुस्तक १९५७ साली प्रकाशित झाले. ‘एकादश व्रते’ यावर महात्मा गांधी भाष्य करीत. विनोबांनी या व्रतांवर रसाळ अभंग तयार केले. ते ‘एकादश व्रते’ पुस्तकात आहेत.

परस्परांना समजून घेणे व परस्परांचे गुण ग्रहण करणे याची निकड विनोबांना पदयात्रेत जाणवली. हृदय जोडण्याचे हे मिशन म्हणजे विनोबांचा लोकसंग्रहच होता. कुराणात ६२३७ वचने (आयत) आहेत. त्यातील सारभूत अशा १०६५ वचनांचे त्यांचे ‘कुराण सार’ १९६३ मध्ये  प्रसिद्ध झाले. त्यांनी ‘ख्रिस्तधर्म सार’ही संपादित केले. गौतम बुद्धांच्या धम्मपदांची रचनाही केली. जैनधर्मीयांनाही त्या धर्माचा सारभूत असा ‘समणसुत्त’ हा ग्रंथ तयार करण्यास विनोबांची प्रेरणा कारण झाली.

राजनीतीकडून लोकनीतीकडे नेण्यासाठी विनोबांचे ‘स्वराज्यशास्त्र’ हे पुस्तक अवश्य वाचावे. हे पुस्तक लोकनीतीचे व्याकरण आहे. कालक्रमात हे लेखन अगोदर झाले असले तरी हे ग्रंथ विनोबांच्या अक्षर वाङ्मयाचे कळसाध्याय आहेत. गीताई लेखनास त्यांना आईकडून प्रेरणा मिळाली. विनोबा म्हणतात, ज्ञानेश्वरांनी गीतेबद्दल गोडी निर्माण केली आणि गीताभ्यासाची गरज गीतारहस्याच्या वाचनाने जाणवू लागली.

गीता आणि विशेषत: गीतेच्या पाचव्या अध्यायाबद्दल नि:शंक झाल्यावरच विनोबांनी ‘गीताई’ लेखनास प्रारंभ केला. ‘गीताई’ हा मराठी साहित्यातील एक चमत्कार आहे. ‘गीताईची रचना इतकी सोपी, रसाळ व प्रासादिक आहे, की ती वाचता वाचता तिच्यातील भावार्थ मनामध्ये आपोआप उमलू लागतो,’ असे आचार्य अत्रे म्हणतात. गीताईने खपाचा उच्चांक गाठला आहे. जून २०१६ च्या २६९ व्या आवृत्तीपर्यंत तिच्या ४१ लाख ६८ हजार प्रती निघाल्या. अजूनही गीताईच्या आवृत्त्या निघत आहेत.

१९३२ सालचा विनोबांचा धुळे तुरुंगवास हा अध्यात्मवास सिद्ध झाला. लक्ष्मणशास्त्री जोशी, जमनालाल बजाज यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या काळात दर रविवारी गीतेवर प्रवचने दिली. विनोबांची ही प्रवचने साने गुरुजींनी शब्दबद्ध केली. विनोबांच्या गीता प्रवचनांची सुमारे २३ भाषांत रूपांतरे झाली आहेत. विनोबांचा आयुष्यभराचा प्रवास गीतेबरहुकूम झाला. त्यामुळे त्यांच्या गीताप्रवचनातील शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या ३० वर्षांच्या निदिध्यासाने साकार झालेले महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘स्थितप्रज्ञ दर्शन’! ते षड्दर्शनाच्या पंक्तीत बसणारे आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ लक्षणांचे १८ श्लोक आहेत. त्या प्रत्येक श्लोकावर १९४४ साली शिवनीच्या तुरुंगात विनोबांनी प्रवचने दिली. गीता प्रवचने, गीताई, गीताई चिंतनिका, गीताई शब्दकोश आणि साम्यसूत्रे या पंचकात जो अडकला, तो गीतेच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणं शक्य नाही.

विनोबांचे चतुरस्र लेखन विशिष्ट काळातील असले तरी त्यातील ताजेपणा आणि विचार वर्तमानकाळातही मार्गदर्शक ठरणारे आहेत. विनोबा म्हणत की, ‘जग माझी इतर सेवा किंवा कृती विसरून गेले तरीही गीताई आणि गीता यांना कधीही विसरणार नाही. माझ्या या कृती जगाची सेवा करीत राहतील. कारण गीताईची रचना करताना व गीतेवर प्रवचने करताना मी  समाधिस्थ होतो.’

hvmone@gmail.com

First Published on September 8, 2019 2:12 am

Web Title: acharya vinoba bhave silver jubilee anniversary satyagraha abn 97
Next Stories
1 दखल : जिव्हाळपूर्ण व्यक्तिचित्रं
2 कलायात्रा : कलायात्रेची कारणं
3 निसर्गाच्या लाडात वाढलेली कविता
Just Now!
X